मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
माणिकप्रभू

दत्तभक्त - माणिकप्रभू

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १८१७-१८६५)

मोगलाईत निजाम हैदराबाद राज्यात (आजच्या म्हैसूर राज्यात) कल्याण गावी मनोहर नाईक नावाचे परम भगवद्‌भक्त रहात होते. त्यांच्या धर्मपत्नीचे नाव बायजाबाई होते. हे दांपत्य दत्तोपासक असून अहोरात्र दत्तसेवा करण्यात निमग्न असे. श्रीदत्त भगवानाच्या आशीर्वादाने त्यांना तीन पुत्र झाले. पहिला मुलगा हणमंत (दादासाहेब), दुसरा माणिकप्रभू व तिसरा नरसिंह (तात्यासाहेब).

मनोहर नाईकांना दृष्टान्त झाल्याप्रमाणे श्रीदत्तप्रभूंनी माणिकप्रभूंच्या रूपाने या धर्मपरायण दांपत्याच्या पोटी शके १७३९ (सन १८१७) मध्ये अवतार घेतला. बारशाच्या दिवशी मुलाचे नाव ‘माणिकप्रभू’ असे ठेवण्यात आले. बाळप्रभूंचे अनुपम तेज पाहून कल्याण गावातील लोक आकृष्ट झाले. गावातील व आसपासच्या खेडयातील लोक या द्त्तावतारी प्रभूंच्या दर्शनास येऊ लागले.

कल्याण गावातील अधिकारी नबाबसाहेबांची मनोहरपंतांच्या कुटुंबावर पूर्ण कृपादृष्टी होती. त्यामुळे माणिकप्रभूंची सर्व व्यवस्था लहानपणापासूनच राजयोग्याप्रमाणे होती. त्यांच्या अंगावर हजारो रूपयांचे हिरे, मोती व सोन्याचे दागिने आणि भरजरी उंची वस्त्रे
होती. या वस्तू सांभाळण्यासाठी त्यांचे सभोवती नेहमी पाचसहा अरब, रोहिले शिपाई नबाबाने ठेविले होते. माणिकप्रभूंस पाचवे वर्ष लागल्यानंतर त्यांची वृत्ती फारच खेळकर होत गेली. गावातील मुलांबरोबर ते नाना प्रकारचे खेळ खेळू लागले.

कल्याण गावात माणिकप्रभू या नावाचा श्रीदत्तावतार झाला आहे, अशी बातमी सर्वत्र पसरल्यामुळे दर गुरुवारी आसपासचे लोक दर्शनास जमू लागले.

पुढे सातव्या वर्षी मौजिबंधनाचा समारंभ मोठया थाटात झाला. गायत्री मंत्राचा उपदेश होताच हे सर्व ब्रह्मकर्म आपोआप स्वमुखाने म्हणू लागले. हा चमत्कार पाहून जमलेले सर्व शास्त्री, पंडित, वैदिक, याज्ञिक वगैरे थक्कच होऊन गेले. हे कोणी महापुरुष असावेत असे सर्वांना वाटू लागले.

प्रभू कधी शाळेत गेले नाहीत; परंतु त्यांस बाळपणापासूनच तेलंगी, कानडी, फारशी, उर्दु, संस्कृत आणि मराठी इतक्या भाषा लिहिता वाचता व बोलता येऊ लागल्या. शिकवल्याशिवायच त्यांना स्वयंस्फूर्तीचे संपूर्ण ब्रह्मकर्म व वेदशास्त्रातील सर्व विषय अगदी मुखोद‌गत येत होते. चार वेद व सहा शास्त्रांत पारंगत असलेल्या पंडितांचीही त्यांच्यासमोर बोलण्याची प्राज्ञा नव्हती.

प्रभूंस आठवे वर्ष लागल्यावर त्यांची वृत्ती फारच चपळ व चंचल होत गेली. ते गावातून मुले जमवून गावात व अरण्यात जाऊन नेहमी खेळत असत. एकदा बाहेर पडले की दोन दोन दिवस घरी येत नसत. घरची मंडळी त्यांचा पुष्कळ शोध करीत, परंतु प्रभू सापडतच नसत. अशा परिस्थितीत प्रभूंच्या अंगावर दागदागिने राहिले नाहीत. त्यांनी काही दागिने लोकांना वाटून टाकले. मग नवाबाचा अरब रोहिले शिपायांचा पहारा जागचे जागी राहिला.

प्रभूंची दया आंधळेपांगळे लोकांवर फार असे. तसेच हिंदू व मुसलमान यांच्यावर त्यांची कृपादृष्टी सारखी असे. त्यामुळे मुसलमान लोकही त्यांना भजू लागले. प्रभूंचा हा लौकीक निजाम सरकारच्या कानावर जाऊन पोचला होता.

प्रभू आता घराबाहेर पडण्याचा विचार करू लागले. प्रभूंचे थोरले बंधू दादासाहेब आता सोळा वर्षांचे झाले होते. ते एकान्तात राहून अहोरात्र ईश्वरचिंतनात मग्न असत. धाकटे बंधू तात्यासाहेब हे चार वर्षाचे झाले होते. अशा वेळी प्रभू एके दिवशी कोणालाही न विचारता घराबाहेर पडले व हुमणाबादेपासून वीस कोस असलेल्या मंठाळ गावास जाऊन पोचले. बाहेरगांवचे हजारो लोक प्रभूंच्या दर्शनास येत; परंतु प्रभू तेथे नाहीत हे पाहून ते दादासाहेबांच्या दर्शनावर समाधान मानून नवस वगैरे अर्पण करीत.

प्रभू मंठाळ गावात आहेत हे कळताच प्रभूंचे वडील व मातोश्री तात्यासाहेबांस बरोबर घेऊन मंठाळ गावी जाऊन प्रभूंना भेटले. तेव्हा प्रभू त्यांना म्हणाले, ‘श्री दत्तात्रेयांच्या साक्षात्काराप्रमाणे आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला; तुमचे मनोरथ पूर्ण केले. व्रतबंध होईपावेतो तुमचेजवळ राहिलो. आता आम्हांस सर्वस संचार करून भक्तजनांचा उद्धार करून अवतारिक कृत्ये केली पाहिजेत. म्हणून यापुढे तुम्ही आमच्याविषयी दु:ख व क्लेश करू नयेत. घरी जाऊन दत्तसेवा करून कालक्रमणा करावी. तुमचा आग्रहच आहे तर आम्ही लवकरच य़ेऊन तुम्हांस भेटतो.’ असे म्हणून त्यांना निरोप दिला. नंतर प्रभू एक वर्षपर्यंत मंठाळच्या अरण्यात अंबील कुंडाजवळील एका गुहेत गुप्त राहिले. कधीमधी प्रभू मंठाळच्या लोकाना दर्शन देत. ही गुहा अद्याप तेथे असून ती ‘माणिकप्रभूंची गुहा’ या नावाने प्रसिद्ध आहे.

एका वर्षानंतर प्रभू एकाएकी कल्याणास घरी दत्त म्हणून येऊन उभे राहिले. लोकांना ही बातमी कळताच हजारो लोक दर्शनास येऊ लागले. हजारो रूपये प्रभूंपुढे जमा होऊ लागले. प्रभू ते सर्व रुपर्य रोजच्या रोज गोरगरिबांस खैरात करू लागले. रोज कथा, कीर्तने, पुराणे, भजने व गाण्याचा कार्यक्रम प्रभूंपुढे होत असे. असा कार्यक्रम चारपाच वर्षेपर्यंत चालू होता.

तात्यासाहेबांची मुंज झाल्यावर काही महिन्यांनी प्रभूंचे वडील मनोहरपंत यांची समाधी झाली. त्या वेळी मातोश्री बयाबाई यांना अत्यंत दु:ख झाले. प्रभूंनी आपल्या ज्ञानसामर्थ्याने मातोश्रींचे नाना प्रकारे समाधान करून वडील बंधू दादासाहेब यांजकडून वडिलांचे उत्तरकार्य यथासांग करविले आणि हजारो रुपये दानधर्म केला.

नंतर प्रभू कल्याणहून निघाले ते सहा कोसांवर असलेल्या पांचाळ गावी पांचाळेश्वर मारुतीच्या देवळात येऊन राहिले. तेथे समाराधना वगैरे करून एक अष्टक करून त्यांनी मारुतीची प्रार्थना केली.

नंतर प्रभू मैलार गावी आपले कुलदैवत श्रीखंडोबाच्या दर्शनासाठी चंपाषष्ठीस जमणार्‍या यात्रेस गेले. श्रीखंडोबाची महापूजा बांधून हजारो रुपयांचे वस्त्रालंकार देवास अर्पण केले, व गोरगरीबांस हजारो रुपये दानधर्म केला. हैदराबादचे राजे बंसीधर यांनी श्रीदत्तजयंतीचा सर्व खर्च केला.

मैलारहून पुन्हा आपल्या घरी कल्याणास आले. तेथे आल्यावर प्रभूंनी मुलगी पाहूना आपले धाकटे बंधू तात्यासाहेब यांचे लग्न ठरविले. कल्याणच्या नवाबसाहेबांनी दहा हजार रुपये खर्च करून लग्नसमारंभ मोठया थाटाने केला. ब्राहमणभोजने, दानधर्म व सर्व जातींस भोजने वगैरे उत्तम प्रकारे पार पडली. यामुळे प्रभूंची कीर्ती सर्वत्र पसरून शेकडो कोसांवरून नित्य नवी यात्रा दर्शनास येऊ लागली. पुष्कळ पर्यटन करून व अनेक अतर्क्य चमत्कार दाखवून नंतर मुधोळ गावाच्या पहाडातील एका गुहेत प्रभू समाधी लावून बसले. पुढे ते मुधोळ संस्थानात फिरत असता एका वडार्‍यास सर्पदंश होऊन तो मृत्यू पावला असता त्यास उठविले. त्यामुळे त्यांची कीर्ती होऊन यात्रा भरण्यास आरंभ झाला. मुधोळच्या आसपास प्रभूंच्या दहापाच गाद्या स्थापन झाल्या.

हुमणाबाद आणि गडवंती यांच्या दरम्यान निविड अरण्यात असलेल्या एका जुन्या शिवालयात एका ब्राहमणाच्या कुटुंबास, ते श्रीप्रभूंच्या दर्शनासाठी येत असता हत्यारबंद लुटारू चोरांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचे सर्व वित्त लुटून त्यांचा प्राण घेण्यासाठी शस्त्रे उगारली. तेव्हा सर्व मंडळींनी प्रभूंचा धावा केला. त्याच वेळी भक्तवत्सल श्रीप्रभू तेथे प्रकट झाले. श्रीसद्‌गुरु माणिकप्रभूंच्या दिव्य शक्तीने चोरांनी मारण्यासाठी वर केलेले हात जागच्या जागी थिजून गेले व पाय लुळे पडले. तेव्हा चोर श्रीप्रभूंना शरण गेले व त्यांची त्यांनी माफी मागितली. तेव्हा प्रभूंना वंदन करून ते चोर आनंदात तेथून निघून गेले. श्रीप्रभूंनी त्या ब्राहमण कुटुंबाचे कोटकल्याण केले.

त्या दिवसापासून प्रभूंनी आपले राहण्याचे ठिकाण तेथेच करून पुढे समाधीकाळपर्यंत भक्तजनांचा उद्धार करीत तेथेच राहिले.

प्रभू अरण्यात शिवालयाजवळ येऊन राहिल्याची खबर लागताच हुमणाबादेहून सरकारी अंमलदार नायब प्रभूंच्या दर्शनास आले व जुन्या शिवालयाची साफसफाई करून देवास रूद्राभिषेक करण्यात आला. पाच दिवस तेथे मोठा समारंभ झाला. ब्राह्मणांस व इतर सर्व जातीचे लोकांस भोजने देण्यात आली. ब्राह्मणांना पात्री एकेक रुपया प्रभूंनी दक्षिणा दिली व गोरगरीबांस दानधर्म पुष्कळ केला. प्रभूंच्या दर्भनास हजारो लोक नित्य येऊ लागले. प्रभू एका जुनाट बेलाच्या खोडाखाली उघडयातच बसत. यात्रेसाठी येणारे लोक कोणी झाडाखाली व कोणी पाल्याचे पडदे लावून राहू लागले.

हुमणाबादच्या सरकारी नायब व कामदार मंडळींनी साहित्य सरंजामाची कोठी तेथे लावून दिली आणि सेवेसाठी व इतर व्यवस्थेसाठी चाकर माणसे ठेविली.

कल्याणहून तात्यासाहेब व मातोश्रीसह भक्तमंडळी राहण्यासाठी प्रभूंजवळ आली; परंतु प्रभूंनी त्याना दादासाहेबांजवळ राहण्याची व आठवडयातून एक वेळ गुरुवारी अथवा शनिवारी येथे येण्याची आज्ञा केली. इतर ब्राहमण, यात्रेकरू, आंधळे, पांगळे आणि सेवेकरिता राहिलेले रोगी यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था भंडारखान्यातून होत असे.

पुढे श्रीदत्तजयंतीचा उत्सव फारच थाटात झाला. याच वेळी तात्यासाहेबांनी प्रभूंची आज्ञा घेऊन विद्वान ब्राहमणांडून श्रीदत्ताच्या गादीची स्थापना केली.

तात्यासाहेब, देशमुख व नायब वगैरे मंडळींनी प्रभूंच्या आज्ञेने बर्‍याच झोपडया बांधून त्या जागेस गावाची रचना आणिली. श्रीदत्तांची गादी व प्रभूंसाठी वर छापरी घालून व खाली पक्की चिरेबंदी इमारत बांधून जागा सुशोभित केली. पुढे चार-पाच वर्षांनी सर्व जागा व्यवस्थित करून या पुण्य स्थळास ‘श्रीमाणिकनगर’ असे नाव ठेवले. भक्तजनांनी पुढे माणिकप्रभूंकरिता गादी तयार केली आणि भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी प्रभू त्यावर आनंदाने बसू लागले. श्रीदत्तांच्या गादीजवळ नित्य भजन, पूजन व आरत्यांचा थाट होऊ लागला.

अरब व रोहिले लोकांत प्रभूंची कीर्ती होऊन ते प्रभूंच्या दर्शनास येऊ लागले. पुढे पुढे तर मुसलमान लोकांचे मेळे व मोठमोठ पीरजादे प्रभूंच्या दर्शनास य़ेऊ लागले. प्रभू हिंदू व मुसलमान भक्तांच्या सर्व मागण्या पुर्‍या करीत; कोणाची पोटदुखी बरी करणे, कोणास मुले देणे, महारोग बरे करणे, पिशाच काढणे इत्यादी हजारो मागण्या प्रभूंच्या जवळ येत. यात्रेकरू. व्यापारी, शेठसावकार, सरकारी कामगार इत्यादी लोकांचे प्रभूंपुढे लाखो रूपये भेट म्हणून जमत असत. हिंदू व मुसलमान यांचे मिळून वर्षातून चार मेळे प्रभूंजवळ जमत असत. मोहरम व ग्यारबी या दोन महिन्यांत मुसलमानांचे, संक्रांतीस जंगमांचा व श्रीदत्तजयंतीस हिंदूंचा मेळा जमत असे. प्रभू सर्वांना एक रुपयापासून हजार रुपयेपर्यंत बिदागी देत असत. जो जे मागेल ते त्याला बहुधा प्रभूंकडून मिळायचेच ! नाही कोणास म्हणत नसत व रिक्त हाताने कोणाला जाऊ देत नसत. दरवर्षी एकंदर तीस लाख रुपये खर्च होत असत. याप्रमाणे माणिकनगरात श्रीमाणिकप्रभूंची दिनचर्या नित्य आनंदात व उत्सवात चालत असे.

प्रभूंच्या मनात राजकीय थाट वाढविण्याचा मुळीच हेतू नव्हता. फक्त परोपकार व दानधर्म यांशिवाय त्यांचा कोणताही हेतू नव्हता. परंतु तात्यासाहेबांनी आपल्या हौशेने चारपाच वर्षांत माणिकनगरास व प्रभूंच्या दरबारास फारच शोभा आणली. सर्व प्रकारच्या जिनसा मिळण्यासाठी लहानशी बाजारपेठही बसविली गेली. माणिकनगरास पूर्व व पश्चिम अशा दोन मोठया वेशी बांधल्या, आणि प्रत्येक वेशीवर जमादार व रोहिले अरब शिपायांचा बंदोबस्त ठेवला. तसेच नगारखान्याची संस्थापना करण्यात आली.

वडील बंधू दादासाहेब व मातोश्री बयाबाई यांची निर्याणाची वेळ जवळ येताच श्रीप्रभूंनी ब्रहमज्ञानाचा बोध केला. तात्यासाहेबांनी समाधी घेतली व मातोश्री श्रीदत्तस्मरण करीत ब्रहमरूपी लीन झाल्या. पुढे सर्व विधी धर्मशास्त्राप्रमाणे श्रीप्रभूंच्या व तात्यासाहेबांच्या हाताने झाले. प्रभूंनी हजारो रुपये दोघांप्रीत्यर्थ दानधर्म केला.

पुढे शृंगेरीचे जगद्‌गुरु श्रीशंकराचार्य श्रीमाणिकप्रभूंच्या भेटीस आले. श्रीप्रभूंची स्वारी मोठया थाटाने श्रीजगदगुरूंस सामोरी गेली होती.

जगद्‌गुरूंना सिंहासनावर बसवून त्यांची तात्यासाहेबांकडून यथासांग पाद्यपूजा करवून त्यांना वस्त्रे, भूषणे, हत्ती, घोडे, पालख्या सर्व अर्पण केले. भोजनसमारंभ मोठया थाटाने झाला. प्रभूंचा आदरसत्कार स्वीकारून जगद्‌गुरूंची स्वारी जाण्यास निघाली तेव्हा प्रभू त्यांना पोचविण्यासाठी दोन कोसपर्यंत गेले होते.

काही दिवसांनंतर पुढे त्यात्यासाहेबांची प्रकृती बिघदल्याने व त्यांचा समाधिकाळ जवळ येत आहे असे भविष्य पाहून प्रभूंनी तात्यासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव मनोहर अप्पासाहेब यांच्या मुंजीचा बेत ठरवून मुंज मोठया समारंभाने उरकून घेतली. पुढे तात्यासाहेबांनी स्वत: गुरुचरित्राचे पारायण करून पुष्कळ दानधर्म केला. भजन, पूजनादी सर्व सत्कर्मे साधून नियमित दिवशी आनंदाने बोलणेचालणे करून सर्वांचा निरोप घेऊन प्रभूंच्या चरणावर मस्तक ठेविले आणि मग योगासन घालून समाधी घेतली. प्रभूंनी त्यांचे चिरंजीव अप्पासाहेबांकडून सर्व उत्तरविधी शास्त्रोक्त करविला आणि हजारो रुपये दानधर्म करून तात्यासाहेबांचे नाव प्रभूंनी अजरामर करून ठेविले.

श्रीसमर्थ अक्कलकोटचे स्वामी महाराज एकदा प्रभूंच्या भेटीस आले होते. प्रभूंची व त्यांची एकांतात भेट झाली होती.

यानंतर प्रभूंनी समाधी घेण्याचा निश्चय केला. समाधीचा दिवस मार्गशीर्ष शुद्ध एकादशी मुक्रर केला. समाधी घेतल्यानंतर पुढे चार दिवसांपर्यंत ही गोष्ट गुप्त ठेवण्याविषयी आपल्या विश्वासू तीन चार भक्तांस सांगितले. प्रभू त्यांना म्हणाले, ‘तसे जर न केले तर मायामोहामुळे मध्येच हा बेत उघड झाल्यास अनर्थ होईल. कारण मुसलमान भक्त मायामोही व भावनाविवश आहेत. ते येथे येऊन गोंधळ करतील व मग समाधीस विघ्न येईल. म्हणून ही गोष्ट गुप्त ठेवावी आणि समाधी घेतल्यानंतर चार दिवसांनी लोकांस दर्शनास सोडावे. समाधी झाल्यावर सोळावे दिवशी अप्पासाहेबांस गादीवर बसवून सर्व व्यवस्था पूर्ववत्‌ चालू ठेवावी’ असे सांगून समाधी तयार करण्याची सर्व व्यवस्था त्यांच्याकडून गुप्त रीतीने करविली.

मार्गशीर्ष शुद्ध एकादशीस सूर्योदयापूर्वी स्नान करून मग अप्पासाहेबांकडून प्रभूंनी पूजा-अर्चा करवून गळ्यात पुष्पांचे हार घातले व पंचारती करून घेतली. सर्वांस प्रसाद दिला. नंतर आपल्या गळ्यातील हार काढून अप्पासाहेबांच्या गळ्यात प्रसाद म्हणून घातला आणि सर्वांस आशीर्वाद देऊन प्रभू आत समाधीत बसले. मग ‘अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त’ अशी सर्वांनी गर्जना करून एका हाताने नेत्रांचे अश्रू पुशीत व दुसर्‍या हाताने द्वारास चिरा लावून बंदोबस्त केला. नंतर सर्व मंडळी मनातल्या मनात खिन्न होऊन आपल्या घरी गेली. अशा रीतीने शके १७८७ मार्गशीर्ष शुद्ध एकादशी सन १८६५ मध्ये श्री सद्‌गुरु माणिकप्रभू समाधिस्थ झाले. पुढे सोळाव्या दिवशी अप्पासाहेबांना त्यांच्या गादीवर बसविले.

प्रभू मोठे वक्ते आणि अनेक भाषाभिज्ञ होते. त्यांनी विपुल काव्यरचना केली आहे. त्यांच्या कविता मोगलाईत व इतर ठिकाणी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘कल्पतरु’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. श्रीमाणिकप्रभूंची पुण्यतिथी दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीस मोठया थाटाने साजरी होते. याशिवाय दरवर्षी बरेच उत्सव उजविण्यात येतात. परंतु मुख्य उत्सव श्रीदत्तजयंतीचा मार्गशीर्ष शुद्ध एकादशी ते पौर्णिमेपावेतो पाच दिवसांपर्य़ंत थाटामाटाने साजरा करण्यात येतो. या उत्सवात व पुण्यतिथीस जातपातीचा कोणताही भेद ठेविल्याशिवाय अखिल भारतातील लोक येऊन भाग घेतात. लाखो लोकांची यात्रा जमते. प्रभूंच्या नंतर श्रीमनोहर माणिकप्रभू व श्रीमार्तंड माणिकप्रभू यांनी हा संप्रदाय वाढविला.

श्रीमाणिकप्रभूंच्या पदांची थोडी ओळख खालील पद्यांवरून होण्यासारखी आहे.

१. श्रीगुरु माझा दत्त दयाघन रे ॥धृ॥
अंतर चालक त्रिभुवनपालक ॥ सकलांसी जीवन रे ॥१॥
अखंड अगोचर व्याप्तचराचर ॥ शाश्वत चिद्‌घन रे ॥२॥
माणिकदासासी मेळविलें स्वरूपासी ॥ देऔनि औन्मन रे ॥३॥

२. श्रीपाद श्रीवल्लभा मां पाहि ॥ यतिवर्या दीन करूणा, शब्दें करुनि बाही ॥धृ॥
नगर पीठ पुरा पूर्व दिशेसि राज पीता सुमतिच्या कुशीं ॥ दत्तात्रय त्वां अपस्तंभ वंशीं अरूपरूप परि देह धरिलासी ॥१॥
मुंज लागली सप्तम वरुषीं लग्न लावितां न लगे म्हणसी ॥ देऔनि दोन पुत्र मातेसी बद्रिकाश्रम पाहूं गेलासी ॥२॥
गोकर्णी तीन वर्षे वास श्रीगिरी चातुर्मास ॥ निवृत्ति संगमाहुनि कुर्वपुरासी ॥ कृष्णा गंगा वाहे ग्रामास ॥३॥
अंबिका पुत्र त्या मतिमंदासी ॥ कृपादृष्टीनें पंडित करिसी ॥ पुत्र ज्ञानि होय पुढील जन्मासी व्रत दिधलें तिसी शनिप्रदोषीं ॥४॥
वर दिधला त्वां रजकालागी विदुर नगरीचें राज्यसुखी भोगी ॥ नरसिंह सरस्वती होऔनि योगी दर्शन देइन मी तुजलागी ॥५॥
गंगेमधें गुप्तचि झाला कुर्वपूरामधें वासचि केला ॥६॥
पाहि पाहि श्रीसद‌गुरुनाथा कृपा करूनी दर्शन दे आता ॥ तुजवीण कोण असे मज दाता ॥ माणिकदास तारि दीनानाथा ॥७॥

३. राखी लाज माझी अवधूता ॥धृ॥
तुझें नाम घेऔनि हिंडे जगीं मी । वागवूनि पंचभूतां ॥१॥
माणिकदासाचें विघ्न दूर करी ॥ दत्त अत्रेयाच्या सुता ॥ राखी लाज ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP