दत्तभक्त - बालमुकुंद
महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात.
(समाधी, सन १८७७)
श्रीबालमुकुंद अथवा बालावधूत हे प्रख्यात दत्तोपासक श्रीपंतमहाराज बाळेकुंद्रीकरांचे गुरु होत. बेळगाव जिल्हयातील खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीच्या काठी पार्श्ववाड नावाच्या गावी १८५० च्या सुमारास बाळाजी अनंत कुलकर्णी ऊर्फ बळप्पा नावाचे एक ॠग्वेदी देशस्थ ब्राहमण रहात असत. बाळप्पांचे पूर्वज वाईकडील असून ते स्मार्त होते. पार्श्ववाडकडे राहू लागल्यावर त्यांनी वैष्णव पंथाची दीक्षा घेतली. अंगी वैराग्य बाणल्यामुळे त्यांचे संसारातील व व्यवसायातील मन उतरले व त्यांनी तपाचरणास आरंभ केला. निर्जन वनात योगधारणेचा अभ्यास केल्यानंतर त्यांना श्रीरामचैतन्य नावाच्या एका अवधूताचे दर्शन झाले. या श्रीरामावधूतावर श्रीदत्तात्रेयांचा अनुग्रह झाला होता. हेच बाळप्पा पुढे बालावधूत अथवा बालमुकुंद या नावाने प्रसिद्धीस आले. पुढे कबरीवनात त्यांनी आणखी योगसाधना आरंभिली. पार्श्ववाड गावातील मल्लिकार्जुनांच्या देवाल्यात ते एकतारीवर सुरेख भजन करीत.
‘सुकुमार गात्र मनोहर । उटी सुंदर । भस्माची वरुती । निजशांति झाली । मोहित पाहूनी मूर्ति ॥ मस्तकीं जटाचा भार । भाळीं केशर मुद्रा सुंदर । अनुपम कांति । आरक्त नेत्र उन्मीलित कृपेची दीप्ती ॥ कौपीन कांसें दंडकमंडलू करीं । हो करीं । शिव धन्य शिवशिव गर्जतसे वैखरी । वैखरी । उन्मत्त बालपिशाचस्थिति स्वीकरी ।’ असे यांचे वर्णन श्रीपंतांनी केले आहे.
यांच्या पिशाचवृत्तीमुळे यांना लोकांकडून त्रास होत राहिला; म्हणून हे पार्श्ववाड गाव सोडून बेळगावजवळच्या कर्डेगुददीच्या डोंगरावरील दाट झाडीत असलेल्या गडदलक्ष्मीच्या देवळात राहू लागले. या स्थानात अस्वलांचा उपद्रव फार असल्याने जंबुनगर, रीसपुरी असेही याचे नाव आहे. कर्डेगुददी येथील रामप्पा गोपाळ कुलकर्णी व शंकरप्पा तळकलकर यांनी यांचा अनुग्रह घेतला. बालमुकुंद ही शुद्ध प्रेमाची मूर्ती असून सदा आत्मरंगात रंगलेली असे. एकतारीवरील यांची साठ एक कन्नड पदे उपलब्ध आहेत. ‘मूकनाग बेकू । जनरोळजाणा गिरबेकु’ या त्यांच्या कन्नड पदावर श्रीपंतांनी ‘श्रीबाळबोधामृतसार’ नावाचा एक विस्तृत निबंध लिहिलेला आहे, श्रीपंतांचे यांच्याविषयी प्रथमत: फारसे अनुकूल मत नसले तरी पुढे त्यांचे बालमुकुंदांवर विलक्षण मन जडले. बालमुकुंदांनी त्यांच्यावर अनुग्रह करून अवधूत पंथाची दीक्षा दिली. शके १७९७ मध्ये आश्विन वद्य १२ च्या दिवशी झालेल्या अनुग्रहाचे मोठे रेखीव व प्रत्ययकारी वर्णन श्रीपंतांनी ‘ब्रहमांनंद परमाद्वैत शुद्ध बद्ध सद्गुरु’ या पदात केले आहे. ‘बालावधूत सद्गुरु जनीं आगळा । अद्वैत बोधामृत पाजुनी । चुकवितो भवघाला । पिसेपण मिरवीत आपण । खेळवी भक्तमेळा ॥ पूर्णकृपें निज खूण दावुनी । प्रकटवी दत्तकळा ॥’ अशी निष्ठा श्रीपंतांची यांच्याविषयी होती. आपला अवधूतमार्ग चालविण्यास श्रीपंत समर्थ असल्याची खात्री बालमुकुंदांना होती. सन १८७७ च्या अखेरीस बालमुकुंद श्रीशैल्यास जाण्यासाठी निघाले:आणि नंतर ते कोणासच देहरूपाने दिसले नाहीत. श्रीपंतांनी म्हटल्याप्रमाणे ‘वेणुनगरीं ब्रहमज्ञानाचें कोठार । उघडुनियां थोर ख्याति केली ॥ श्रीशैल्य यात्रेचें करूनिया मीस । दत्तह्रदयीं वास गुप्त केला ॥’
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2018
TOP