मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
रघुनाथभटजी नाशिककर

दत्तभक्त - रघुनाथभटजी नाशिककर

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सतरावे शतक)

वंदेऽद्वैतेश्वरं देवं गोदातीरनिवासिनम्‌ ।
प्रत्यक्षं भृगुरूपं वै रधुनाथाभिधं गुरुम्‌ ॥१॥
ज्ञानसिंधुं कृपासिंधुं सौख्यसिधुं च शाश्वतम्‌ ।
शिवं शिवकरं शांतं शांतिदं शुभदं भजे ॥२॥
अद्वयं द्वयहंतारं दैन्यदु:खनिवारकम्‌ ।
महासिद्धं महात्मानं चिदात्मानं नमाम्यहम्‌ ॥३॥


श्रीअद्वैतेश्वर ऊर्फ श्रीरघुनाथभटजी महाराज यांच्या चरणकमलांस, त्यांनीच प्रेरिलेल्या श्लोकत्रयाने अनन्य नमन करून, त्यांच्याच अगाध व महान्‌ चरित्रातील काही महत्त्वाचा भाग वाचकवर्गापुढे ठेवण्याची सुसंधी मला श्रीअद्वैतेश्वर कृपेने प्राप्त झाली; म्हणून मला आनंद वाटत आहे. यांचे चरित्र फारच थोडयांस माहीत आहे. ते अत्यंत अद‌गुत व उद्‌बोधकर असे आहे. सबंध चरित्र या लहानशा लेखात देणे अशक्य आहे. वाचकवर्गास या साधुवर्याची थोडीशी तरी कल्पना यावी म्हणून त्यांच्या जीवनातील काही भाग मी येथे देत आहे.

पूर्वपीठिका :--- पूर्वी कृतयुगात रेवातीरी (नर्मदातीरी) एका रम्यस्थली भृगुऋषी अनुष्ठानास बसले होते; त्यांनी भगवंताचे ध्यान करून समाधी लावली. ती समाधी बहुकाळपर्यंत टिकली. कृत, त्रेता व द्वापर तीन्ही युगे संपली, तरी समाधिउत्थान झाले नाही. पुढे कलियुग आले, बरीच वर्षे लोटली, एके दिवशी मुनी समाधीतून अकस्मात जागे झाले व शिष्यांस हाक मारून विचारू लागले की, ‘हे युग कोणते चालू आहे?’ त्या शिष्यांनी सांगितले की, ‘कृत, त्रेता, द्वापर, अशी तिन्ही युगे जाऊन सांप्रत कलियुग प्राप्त झाले आहे.’ तीन युगांपर्यंत समाधिअवस्थेत काल गेले. हे पाहून भृगुमुनीस आश्चर्य वाटले. रेवातीरी त्या वेळी इतरही काही मुनी तप करीत बसले होते. एके दिवशी भृगुमुनींनी गोदावरीचे माहात्म्या ऐकले व तेव्हापासून गोदातटाकी वास करावा अशी इच्छा त्यांस झाली. मुनींच्या बरोबर जे इतर (ऋषी) शिष्य होते त्यांस मुनी म्हणाले की, एकाद्या शुचिष्मंत ब्राह्मणाच्या पोटी मी जन्म घेऊन गोदातटाकी वास करतो व तुम्हीही अशाच प्रकारे जन्म घेऊन मजकडे या. मी तुम्हांस बोध देऊन मुक्त करीन; संसारबंधात पडू देणार नाही. याप्रमाणे सांगताच, सर्व शिष्यांस आनंद झाला व मुनींबरोबर आपणही जन्म घ्यावा असे त्यांनी ठरविले.

ठरल्याप्रमाणे भृगुमुनी शिष्यांसह रेवातीरी (सौराष्ट्रात) एका रम्य उपवनी आले व तेथे एक सुंदर मठ करून भगवच्चिंतन वगैरे करू लागले. त्या स्थानास भृगुक्षेत्र म्हणतात. जेथे नर्मदा समुद्रास मिळाली आहे त्याच्या निकटच हे स्थान आहे.

त्या भृगुक्षेत्रात ‘ज्ञानवर्धन’ नावाचा एक सदाचारी ब्राह्मण रहात असे. त्यास पुत्र नव्हता. त्याची पत्नी व तो मोठे शिवभक्त होते. नित्य पार्थिव पूजा करून, ‘हे शंकरा, भृगुसमान मला उत्तम पुत्र दे’ अशी प्रार्थना ते पतिपत्नी दोघे नित्य करीत असत; एके दिवशी त्या दांपत्याने वरील प्रार्थना करून नर्मदेच्या डोहात देहत्याग केला. हे वार्ता शंकरांस कळताच शंकर स्वत: उमेसह रेवातीरी जेथे भृगु ऋषी आपल्या शिष्यांसह अनुष्ठानी बसले होते, तेथे आले. त्यांच्याबरोबर दत्तात्रेय, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, व्यास, अत्री वगैरे ऋषिमंडळीही आली. साक्षात्‌ शंकर उमेसह आपल्या आश्रमात आले आहेत असे पाहताच भृगुमुनींनी आनंदित होऊन उमाशिवांस साष्टांग वंदन करून त्यांस आदराने आसनावर बसविले व ‘काय आज्ञा !’ म्हणून विचारले. शंकर म्हणाले-‘हे भृगो ! शिवभक्त ज्ञानवर्धन द्विज पत्नीसह माझे स्मरण करीत पुत्रार्थ या नर्मदेत देहत्याग करिता झाला हे मला कळले; म्हणून मी येथे त्वरित आलो आहे. म्हणून त्याच्या उदरी तुम्हांला व आम्हांलाही जाणे जरूर आहे व त्या भक्ताचे मनोरथ पूर्ण करणे प्राप्त आहे.’ या शिवाच्या बोलण्यास पार्वतीनेही संमती दिली. तिचे व शिवाचे बोलणे ऐकताच, दत्तात्रेय, वसिष्ठ वगैरे मुनिमंडळीही आनंदाने म्हणाली की, “हे भृगो ! हे सर्वश्रेष्ठा सर्वज्ञा ! तू त्या द्विजाच्या पोटी जन्म घेणार, तसेच उमा व शिवही घेणार हे ऐकून आम्हांस आनंद झाला. आम्ही सर्व आपल्या संगतीचा व दर्शनाचा लाभ घेण्यासाठी अवश्य गोदातटाकी येऊ.’ असे म्हणून ती ऋषिमंडळी अदृश्य झाली व उमा-शंकरही अंतर्धान पावले. शिवाचीच आज्ञा झाली असल्याने त्या द्विज दांपत्याच्या पोटी जन्म घेणे प्राप्त आहे असा विचार केला; आणि आपल्या शिष्यगणास सांगितले की ‘तुम्हीही निरनिराळ्या द्विजांच्या उदरी जन्म घ्याल व माझ्याकडे पुन्हा येऊन पुनीत व्हाल व मी तुमचा मोहपाश छेदीन.’ ‘बरे आहे;’ असे म्हणून सर्वांनी भृगुमुनींचा जयजयकार केला. व बरीच वर्षे रेवातीरी तपाचरण केल्यावर ठरल्या वेळी सर्वांनी देहत्याग केला. शिव-पार्वतींनी भृगुबरोबर आपणही त्या द्विजाच्या उदरी जन्म घेऊ असा विचार केला.

पूर्वजवृत्तांत :---  पुढे, कर्नाटक प्रांतातील मलप्रभा नावाच्या नदीच्या तीरी अशोक नावाचे एक क्षेत्र आहे, तेथे विश्वनाथ भट अळवणीकर नावाचा सत्वस्थ ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी गरोदर होती. तिच्या उदरी तो ज्ञानवर्धन विप्र आला. त्याचे जन्मप्रसंगी मलप्रभेच्या जलात साक्षत्‌ भागीरथी तीन दिवसपर्यंत राहिली होती. दरवर्षी त्या दिवसांत तेथे भागीरथी येते अशी साक्ष अद्याप आहे असे म्हणतात. या दिवसांत तेथे स्नान केले की, भागीरथीस्नानाचे पुण्य लाभते. अशी आख्यायिका आहे.

बालक जन्मल्यावर तेरावे दिवशी विश्वनाथभटांस रात्री स्वप्न पडले ते असे; स्वप्नात साक्षात‌ गणपती आले व म्हणाले, ‘विश्वनाथ ! तुझ्या पोटी जो मुलगी जन्मला आहे, तो सामान्य जीव नसून तो मोठा पूर्वीचा तपस्वी ब्राह्मण आहे. त्याचे नाव गणपती ठेव. त्याचे पोटी भृगुऋषी, शंकर व पार्वती असे जन्म घेऊन जगाचा उद्धार करतील. म्हणून तूं त्या तिघांचा सांभाळ चांगला कर.’ असे सांगून गणपती अदृश्य झाले. सकाळी उठल्यावर विश्वनाथ भटजींनी पत्नीस ते सर्व स्वप्न सांगितले, तिला अत्यंत आनंद झाला. तिने अनेक सुवासिनींस बोलावून त्या मुलाचे नाव ‘गणपती’ ठेविले. तो आठ वर्षांचा झाल्यावर त्याची मुंज केली. त्याच क्षेत्रात काशीनाथभट श्रोत्री यांस एक कन्या झाली. तिचे नाव त्यांनी चिमाबाई ठेविले. त्या श्रीत्रीच्या स्वप्नात गणपती गेले, व त्याला सांगितले की, ‘तुझी मुलगी विश्वनाथभटाचा मुलगा गणपती यास दे’ नंतर काशीनाथभटजींनी आपल्या पत्नीची संमती घेऊन विश्वनाथ भटजींची गाठ घेऊन गणपतीला चिमा द्यावयाची हे निश्चित केले; आणि सुमुहूर्त पाहून लग्नही लावून दिले. लग्नसोहळाही चार दिवस उत्तम झाला.

लग्न झाल्यावर एक चमत्कार झाला. गणपती हा लहान वयाचा होता, तरी नित्य स्नान, संध्या व शिवपूजा यथाविधी करीत असे. तो शिवरात्र, एकादशी वगैरे व्रतेही करीत असे. माघ व. एकादशीस सोमवार होता; त्यामुळे तो महापर्वकाळ होता. दुपारी ऊन कडक पडले होते, जमीन अगदी तापली होती. अशा वेळी गणपती मलप्रभेत स्नानास गेला व त्याने तेथील डोहात बुडी घेतली. त्याच वेळी जलदेवता तेथे त्या डोहात जलक्रीडा करण्यासाठी आल्या होत्या. गणपती दिसण्यात सुंदर होता. त्या देवतांनी  गणपतीस नेले व आपल्या एका उत्तम जलमंदिरात ठेविले.

इकडे काठावरील सर्व लोक ‘गणपती बुडाला बुडाला’ असे म्हणू लागले व त्याचा शोध करू लागले. तो कोठेच सापडेना व अखेर तो बुडाला, ही वार्ता त्या लोकांनी विश्वनाथभटास सांगितली. गणपतीचे मातापिता फार शोक करू लागले. नदीतीरी जाऊन त्यांनी टाहो फोडला व शंकराचा धावा केला व स्वप्न खोटे का ठरले म्हणून रडू लागले. त्या दोघांस शोक अनावर झाला व आपणही डोहात देहत्याग करावा असे दोघांच्या मनात आले. तीन दिवस ते दोघे अन्नपाणी वर्ज्य करून त्या डोहावर शंकराची प्रार्थना करीत बसले. त्यांची हाक मृडानीपतीच्या कानी गेली व तो तेथे हातात शूळ घेऊन धावत आला, आणि जळदेवतांच्या जलमंदिरात स्वत: जाऊन त्यांना दंड देऊन गणपतीस जिवंत स्थितीत वर आणून त्याच्या मातापितरांच्या स्वाधीन केले. तो दिवस शिवरात्रीचा होता. त्यांची शिवोपासना फलद्रूप झाली. मृत्युशय्येवर पडलेल्यास अमृत मिळावे, किंवा दरिद्रयास द्रव्यकृंभाचा अवचित लाभ व्हावा, तसे त्या मातापितरांस झाले. पुत्रास प्रेमाने आलिंगन देऊन, ते सर्व शंकराची स्तुती करते झाले. ज्या ठिकांणी पुत्र बुडाला व जेथे त्याची पुन्हा प्राप्ती झाली. त्या मलप्रभेच्या तीरी त्यांनी ब्राह्मणांकरवी स्वयंभू शिवलिंगाची स्थापना केली आणि अनेक प्रकारे त्याचे पूजन करून ब्राह्मणसंतर्पणही केले.

त्यानंतर गणपती ऊर्फ गणेशभट व त्याची पत्नी चिमाबाई मोठया आनंदाने नांद्त असत. चिमाबाई महान पतिव्रता व लावण्यखणी होती. दोघेही परमशिवभक्त होते. एके दिवशी कर्पूरगौरांनी चिमाबाईच्या उदरात प्रवेश केला व ९ महिने होताच एक सुंदर पुत्ररत्न झाले. त्याचे नाव ‘नारायण’ ठेविले. दुसरे वर्षी चिमाबाईस एक मुलगी झाली, ती साक्षात्‌ पार्वतीच तिच्या पोटी आली होती, तिचे नाव ‘जीऊबाई’ असे ठेविले.

रघुनाथाचा जन्म :--- इकडे रेवातीरी भृगुमुनीस अंतर्ज्ञानाने कळले की, शिवपार्वतींनी चिमाबाईच्या पोटी जन्म घेतला आहे; तेव्हा आपल्यालाही जन्म घेण्यास गेले पाहिजे. नंतर त्यांनी आपल्या सर्व शिष्यगणांस बोलाविले व सांगितले की, मी चिमाबाईच्या उदरी जन्म घेतो. तुम्हीही स्वेच्छेने या कलीत अवतरण करावे व मला गोदातटाकी भेटण्यास यावे असे सांगून आपण एका गुहेत गेले.

एके दिवशी गणेशभटाची बायको निद्रिस्त असता तिच्या नेत्राद्वारे भृगू मुनींनी तिच्या उदरात प्रवेश केला. नऊ महिने झाल्यावर ती प्रसूत झाली. ही प्रसूती अती विचित्र होती. गणेशभटाची बायको तिसर्‍या मजल्यावर निद्रिस्त असता तिला स्वप्न पडले की, आपल्याला पुत्र झाला व तो नऊ महिन्यांचा असतानाच रांगू लागला व तो फार सूंदर आहे. जागी होऊन पाहते. तो खरोखरीच लावण्यवंत पुत्र आपल्या जवळ तिला दिसला. बाळंतपणाचा कोणत्याही प्रकारे तिला त्रास झाला नाही, ‘दर्शनें प्रशस्तीसी ठावो’ या श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या वचनाप्रमाणे त्या मुलास पाहताच त्रिदेहातीत होऊन ति स्वरूपी निमग्न झाली. आपपर भेद सर्व मावळला; इतक्यात समाचारार्थ गणेशभट तेथे आले. ते हसत असलेले बालक पाहतात त्यांचे देहभान गेले व मन उन्मन झाले. याप्रमाणे पुत्रास पाहताच आईबापांस समाधी लागली. सात दिवसपर्यंत उत्थान नाही अशी स्थिती झाली. त्यांची ती तशी स्थिती पाहून कोणी म्हणू लागले की, यांना भुताने झडपले; कोणी म्हणाले, अहो, ही मातापितरे वेडी झाली. सात दिवसपर्यंत त्या बालकाचा सांभाळ, त्याचे लालनपालन घरातील इतर मंडळींनी केले. त्या मातेला शुद्धच नाही. आठवे दिवशी त्या दोघांची समाधी उतरली व ते इतरांस म्हणाले. ‘काय आम्ही आनंदसागरात होतो ! आम्हांस आमच्या समाधीतून का उठविले?’

नंतर गणेशभटजींनी द्विजवृंदास पाचारण केले व त्यांना वस्त्रभूषणे देऊन संतोषविले. बाराव्या दिवशी सुवासिनींचा मेळा जमला व त्या सुंदर बालकाचे नाव सुमुहूर्त पाहून ‘रघुनाथ’ असे ठेविले. हाच बालक पुढे रघुनाथभटजी महाराज म्हणून प्रसिद्ध झाला.

रघुनाथांचे बालपण :--- शुक्लेन्दुवत्‌ रघुनाथ वाढू लागला. एके दिवशी रघुनाथाला पाठीशी घालून माता निजली होती. तीन प्रहर रात्र झाल्यावर माता उठून पाहते तो ते लेकरू देवघरात मांडी घालून ध्यानस्थ बसले आहे. रघुनाथाच्या जवळ जाऊन त्याला मातेने हलवले; पण तो शुद्धीवर आलाच नाही, बर्‍याच वेळाने तो देहावर आला व याप्रमाणे दररोज पहाटे होऊ लागले. तेव्हा गणेशभटजीस भार्या म्हणाली की, हा मुलगा पूर्वीचा कोणी योगिराज असावा. या मुलास झोप मुळीच नाही. आसन घालून नेहमी ध्यानस्थ बसतो. भार्येचे ते बोलणे ऐकून गणेशभटास आठवण झाली की, आपल्या वडिलांच्या स्वप्नात गणपती आला होता व त्याने सांगितले होते की, ‘शंकर, पार्वती व भृगू हे तुमच्या मुलाच्या पोटी येतील’ ते स्वप्न खरे ठरले व आपले पूर्वपुण्य आज उदयाला आले. परंतु ही मुले कार्तिकस्वामीप्रमाणे केव्हाच उठून निघून जातील, म्हणून जपले पाहिजे, गणेशभटजींचे लक्ष चुकवून ही दोन्ही मुले अगदी पहाटेस उठून अरण्यात जात व पुन्हा परत दोन प्रहरी येत.

गृहत्याग :--- पुढे त्या दोघाही मुलांचे उपनयन केले व जीऊबाईचे लग्न करून दिले आणि नारायण व रघुनाथ या दोघांसही मुली सांगून येऊ लागल्या. दोन मुली दोघांसाठी पसंत करून निरनिराळ्या तिथी लग्नाच्या ठरविल्या. प्रथम तिथीला नारायणाचे लग्न लावले. आता दुसर्‍या तिथीस रघुनाथाचे लग्न व्हावयाचे. ही गोष्ट रघुनाथास कळताच, रात्रीच्या वेळी, मातापित्यांचा त्याग करून रघुनाथ गिरिकंदरे ओलांडून पुढे जाऊ लागला. तेथे अनेक हिंस्र पशूंची गाठ झाली. परंतु ते हिंग्र पशू त्याच्याकडे नुसते पाहत व पुढे मुकाटयाने निघून जात. ‘चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्रही न खाती सर्प तया ॥’ या श्रीतुकाराममहाराजांच्या वचनाप्रमाणे अरण्यातील सिंह-व्याघ्रांच्या गाठी पडूनही ते रघुनाथास काही करीत नसत.

नाशकास आगमन :--- प्रवास करीत करीत रघुनाथ एका उपवनात आला. पाच दिवस सारखा पायी, अन्वाणी व एका वस्त्रानिशी, काही न खाता प्रवास झाला. अत्यंत शीण आला म्हणून एका झाडाखाली त्याने थोडा विसावा घेतला. तेथे काही फळे पडलेली होती. ती त्याने भक्षण केली व जवळील एका झर्‍याचे जल प्राशन केले व तो स्वस्थ बसला. जाणारे येणारे मार्गस्थ लोक त्याच्याकडे पाहत व त्यांस असे वाटे की, हा कोणी योगिराज आहे. त्या वेळी रघुनाथाचे वय अवघे बारा वर्षांचे होते. त्यांनी त्यास नम्रपणे विचारले की ‘महाराज ! आपण कोण? कोठे जावयाचे?’ रघुनाथाने आपले नाव सांगून ‘मला नाशकास जावयाचे आहे’ असे सांगितले. ते मार्गस्थही म्हणाले. ‘आम्हांसही तिकडेच जावयाचे आहे.’ मग रघुनाथ त्यांच्या बरोबर जावयास निघाला. जाता जाता दोन प्रहर झाले. लोक म्हणाले. ‘महाराज ! आम्ही थोडा फराळ करतो; आपण आमच्या बरोबर थोडे खाल काय?’  रघुनाथ म्हणाला, ‘गोदातटाकी जाईपर्यंत मी निराहारी राहाणार आहे’ फराळ झाल्यावर ते सर्व वाटेला लागले व दरकूच दरमजल करीत नाशकास आले. नाशकास ती पावन (गंगा) गोदावरी पाहताच रघुनाथास अत्यंत आनंद झाला व त्याने तिला सादर प्रणाम केला. गोदावरीसही हा महात्मा मला पवित्र करण्यासाठी येथे आला आहे हे पाहून तिने तरंगित होऊन आपला आदर व आनंद व्यक्त केला. साधुपुरुषांच्या दृष्टिक्षेपानेही तीर्थास तीर्थत्व येते; मग त्या जलात स्नान केल्यावर का येणार नाही? तीर्थे पाप्यांचे पाप घेतात व ते पाप पुण्यवंतांच्या दर्शन-स्पर्शाने नाहीसे करतात.

मातापितरांचा शोक व अंत :--- इकडे कर्नाटकात अशोक क्षेत्रात रघुनाथाचा असा दररोजचा कार्यक्रम असे की, सकाळी पहाटेच उठून गावाबाहेर अरण्यात जावयाचे व तेथे ध्यानधारणेस बसावयाचे व दोन प्रहरी गावात घरी यावयाचे व मग भोजन करावयाचे. एके दिवशी नेहमीप्रमाणे रघुनाथ घरी दुपारी आला नाही; त्यामुळे गणेशभट व चिमाबाई या उभयतांस फार काळजी वाटली व ते त्याचा शोध करू लागले. नारायणाचे लग्न झाल्यावर दुसर्‍या तिथीस चारपाच दिवसांनी रघुनाथाचे लग्न व्हावयाचे होत; त्याप्रमाणे सर्व तयारीही वधूपक्ष, वरपक्ष यांची झालेली होती. रघुनाथ कोणासही कुठे जातो वगैरे काहीही न कळविता कोठे निघून गेला याचा कोणास पत्ता लागेना. गणेशभटजींनी रघुनाथाच्या शोधार्थ अरण्यात व इतरत्र माणसे पाठविली, पण त्यांसही त्याचा पत्ता लागला नाही. रघुनाथाचा शोध लागत नाही असे होताच त्या मातापितरांस परमावधीचे दु:ख झाले व ती दोघे शोक करू लागली. चिमाबाई तर धरणीवर अंग टाकून रडू लागली. दोघांनी अन्नपाणी वर्ज्य केले. ‘रघुनाथ ! रघुनाथ ! तू आम्हांस कधी भेटशील?’ असा दोघांनी टाहो फोडला. लोकांनी त्यांचे सांत्वन करण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु त्यांचा शोक कमी होईना. अखेर त्या दोघांनी असा निश्चय केला की, रघुनाथाच्या शोधार्थ काशीस जावयाचे व तेथे तो सापडला तर ठीक, नाही तर गंगेत देह समर्पण करावयाचा. याप्रमाणे निश्चय करून ते दोघे काशीस गेले व तेथे रघुनाथाचा शोध केला. तो आढळून आला नाही म्हणून दोघांनी श्रीकाशीविश्वेश्वराचे दर्शन घेऊन भागीरथीत आपआपले देह समर्पण केले.

रघुनाथ भटजींचा फडके यांचेकडे वास :--- रघुनाथ नाशकास आल्यावर गोदावरीच्या दक्षिणतीरी, तीराच्या अगदी निकट जागेवरच बसून राहिला. काही वेळ विश्रांती घेतल्यावर त्याने गंगेत स्नान केले. संध्यावंदन व ध्यानधारणा झाल्यावर भूक लागली होती तरी कोणाकडेही अन्नाची याचना त्याने केली नाही. गोदावरीचे जलपान करूनच तो राहिला. याप्रमाणे सात दिवसपर्यंत रघुनाथाने काहीच खाल्ले नाही. नुसते जलपानच करून राहिला. कोणी विचारलेच तर त्यास तो काहीच उत्तर देत नसे. मौन धरले होते. त्यावेळी नाशकात बाजीराव बळवंत फडके या नावाचे सदाचारी गृहस्थ राहत होते. ते एके दिवशी सहजच गंगेवर आले असता त्यांना रघुनाथ दिसला. त्यास पाहतास एक प्रकारचे आकर्षण वाटले. वय सुमारे बारातेरा दिसत असून योग्याप्रमाणे निस्पृह वृत्ती त्याचे ठिकाणी दिसत होती. हा सामान्य मुलगा नसावा असे त्यास वाटले म्हणून त्यांनी त्याच्याजवळ जाऊन विचारपूस केली; पण रघुनाथ काहीच बोलेना. अखेर फडके यांनी फारच आग्रह धरल्यावर, नाव सांगितले; नंतर फडके म्हणाले. ‘माझ्या घरी चल.’ प्रथम तो तयार नव्हता; परंतु फडके यांचा फारच प्रेमळपणाचा आग्रह दिसल्यावर रघुनाथाने घरी येण्याचे कबूल केले व तो फडके यांच्याबरोबर त्यांच्या घरी गेला. तेथे त्यांनी त्यास जेऊ घातले व सांगितले की, ‘तू आता आमच्याच घरी राहा. आमच्या घरी देवघरात देव आहेत, त्यांची पूजा करीत जा व संस्कृत वगैरे शिकण्यास जोगळेकरशास्त्री यांचेकडे जात जा.’ याप्रमाणे रघुनाथाने कबूल केले व फडके यांच्या घरची पूजा वगैरे झाल्यावर तो नित्य जोगळेकर यांचेकडे शिकण्यास जाऊ लागला. त्यावेळी जोगळेकर हे मोठे प्रकांड पंडित म्हणून गणले जात असत. त्यांच्याजवळ रघुनाथाने दशग्रंथ समग्र थोडक्या दिवसांतच मुखोद्‌गत केले. ते पाहून जोगळेकर व इतर सर्व शास्त्री मंडळीस आश्चर्य वाटले व रघुनाथाची त्यांनी फार प्रशंसा केली. रघुनाथ हा ज्या वेळी जोगळेकर यांजकडे पढण्यास जात असे त्यावेळी त्यास जर उशीर झाला तर तो भूमीवर पाऊल न लागता अधांतरी त्वरेने जात असे हे काही विद्यार्थ्यांनी पाहिले व गुरुजींस सांगितले. पण त्यांस ते खरे वाटेना.

एके दिवशी फडके यांच्या घरी त्यांच्या देवघरात रघुनाथ पूजेस बसला होता. पूजा आटोपल्यावर त्याची ध्यानधारणा सुरू झाली. ती सूरू होताच रघुनाथ एकाएकी गुप्त झाला. फडके यांनी बराच शोध केला. तो दिसला नाही म्हणून त्यांनी देवघराचे दार बाहेरून लावून घेतले. काही वेळाने देवघरात दाराच्या फटीतून फडके यांनी पाहिले तो त्यांस रघुनाथ आसनावर दोन हात उंच अधांतरी ध्यानस्थ बसलेला दिसला. हे पाहतास फडके यांस अत्यंत आश्चर्य वाटले. हा कोणी तरी महायोगी आहे, साम्यान्य मुलगा नाही. ही त्यांची पक्की खात्री झाली. देवघराची कडी हळूच त्यांनी उघडली व रघुनाथाची ध्यानधारणा संपून तो बाहेर आल्यावर त्यांनी रघुनाथाच्या पायांवर डोके ठेवले व सांगितले की, ‘आजपासून तू आमच्या येथे पुजारी नसून आम्ही तुझे पुजारी आहोत. रघुनाथा ! तुला आम्हा ओळखले नव्हेत.’ म्हणून तुझ्यापासून ही देवपूजेची सेवा घेतली याबद्दल क्षमा कर. रघुनाथा ! तुला ‘अरे ! तुरे !’ असे आम्ही आजपर्यंत एकेरी बोललो; पण तू योगीराज आहेस व आजपासून आम्ही तुला महाराज म्हणूनच म्हणणार.’ तेव्हापासून फडके यांनी देवपूजेचे काम त्यास सांगितले नाही. उलट एक महान्‌ साधू पुरुष योगेश्वर असे समजून ते रघुनाथभटजीशी वागत असत.

श्रीदत्तात्रेय यांची भेट :--- भटजी महाराजांचा नित्यक्रम असा असे की, पहाटेस उठून गोदावरीचे स्नान करावयाचे; तेथे संध्या, जप वगैरे सूर्योदयापर्यंत केल्यावर फडके यांच्या घरी यावयाचे; तेथे मानसपूजा, ध्यानधारणा करीत दुपारपर्यंत बसावयाचे, नंतर भोजन व नंतर कोणी आल्यास त्याचेशी प्रेमळ संभाषण, चर्चा अगर शंकानिरसन करणे, हे करावयाचे व संध्याकाळी संध्येसाठी गंगेवर गेल्यावर तिच्या दक्षिणतीरी सुंदरनारायणाच्या समोरच असलेल्या पडक्याशा माडीवर ध्यानास बसावयाचे; रात्रभर तेथे राहून पहाटेस पुन्हा गंगेचे स्नान वगैरे करून फडके यांच्या घरी जावयाचे. कधी कधी रात्री ध्यानासाठी गावाबाहेर लांब वनातही ते जात असत. एके दिवशी ते रात्री वनात ध्यानासाठी गेले असता वाटेतच त्यांस श्रीदत्तात्रेयांची स्वारी दिसली. त्यांस पाहताच भटजी महाराजांनी त्यांस साष्टांग नमस्कार केला. भटजीस पाहताच श्रीदत्तांनी हा भृगू अवतार रघुनाथ आहे हे ओळखले व आपल्या निकट बसविले. दोघांचे प्रेमळ संभाषण सुरू झाले. बोलता बोलता ‘रात्रिरेव व्यरंसीत’ या उक्तीप्रमाणे रात्र केव्हाच निघून गेली. मग श्रीद्त्तांनी भटजींस विचारले की, तुम्ही ध्यानास रात्री कुठे बसता? भटजी महाराजांनी लगेच श्रीद्त्तांच्या हातात हात घालून त्यांस गोदावरीच्या प्रवाहाच्या अगदी निकट असलेली ती माडी दाखविली; ‘येथे आपण येत जावे,’ अशी श्रीद्त्तांस महाराजांनी विनंती केली, पुढे भटजी महाराज व श्रीदत्त हे दररोज रात्री त्या माडीत येऊ लागले व त्या दोघांचे परस्पर अध्यात्मपर संभाषण होऊ लागले व दोघेही ब्रह्मरसात निमग्न होऊ लागले.

कचेश्वर मंदिरातील चमत्कार :--- नाशिक क्षेत्राच्या पूर्व बाजूस सुमारे सातआठ मैल लांब तपोवन आहे. त्या तपोवनात पूर्वी त्या वेळी श्रीकचेश्वराचे मंदिर होते. ते मंदिर फार रम्य व गोदेच्या काठीच असे होते. त्या मंदिरात देवदर्शनासाठी भटजी महाराज गेले होते. देवदर्शन घेतल्यावर थोडा वेळ ते ध्यानस्थ बसले. ध्यान झाल्यावर भटजी महाराज त्या देवास मंदिराभोवती प्रदक्षिणा बर्‍याच घालू लागले. मध्यान्हसमय झाला. त्यांचे पाय उन्हाने पोळू लागले व वरून खूप ऊन लागू लागले. असे नित्य होऊ लागले. महाराजांस ऊन लागे, पाय पोळत तरी ते प्रदक्षिणा घालण्याचे सोडीनात. तेव्हा श्रीकचेश्वर देवास करुणा उत्पन्न झाली. श्रीकचेश्वरमूर्ती फडके यांच्या स्वप्नात गेली व म्हणाली. ‘ऊठ ! निजलास काय? मला ऊन लागत आहे व रघुनाथ कष्टी होत आहे म्हणून मंदिराभोवती छाया करून दे.’ हे स्वप्न पडताच फडके जागे झाले व कचेश्वरी जाऊन पाहातात तो भटजीमहाराज उन्हात प्रदक्षिणा घालीत आहेत व त्यांचे पाय पोळताहेत. हे पाहून ताबडतोब त्यांनी प्रदक्षिणेच्या वाटेवर छाया करून दिली.

सदर मंदिरात अनुष्ठानासाठी अनेक ब्राह्मण येत असत. त्या ब्राह्मणांच्या स्वप्नात कचेश्वर प्रभू गेले व म्हणाले की, ‘रघुनाथ सर्व तपस्व्यांत श्रेष्ठ आहे; त्याला माझे ठिकाणी माना व त्याच्या आज्ञेत राहा. तुमचे त्यायोगे कल्याण होईल.’ ब्राह्मणांना असा दृष्टांत होताच ते सर्व भटजी महाराजांच्या पाया पडले व महाराजांची सेवा करू लागले. नंतर महाराजांनी सांगितले की, ‘जा, तुमचे मनोरथ पूर्ण होतील.’ या आशीर्वादाप्रमाणे प्रत्येकाचे मनोरथ पूर्ण झाले.

भटजींविषयी श्रीनिरंजनांचा अनुभव :--- निरंजनस्वामी या नावाचे भटजींचे शिष्य होते. ग्रंथलेखनाची आज्ञा जेव्हा निरंजनांना झाली त्यावेळी भटजी महाराजांचा व श्रीदत्तांचा संवाद रात्री होत असे. ते पाहण्याचे व ऐकण्याचे भाग्य त्यांनाच एकटयाला लाभले. भटजीमहाराज व श्रीदत्त वेगळे नाहीत, ते एकरून आहेत. हा अनुभव त्यांस आला. महाराज स्वत: अत्यंत विरक्त होते. एकदा एक तरुण स्त्री महाराजांची परीक्षा पाहण्य़ाकरिता एकांत पाहून महाराजांजवळ गेली व कामचेष्टा करू लागली. परंतु महाराजांचे मन निर्विकार असल्याने, तीच लाजली व तिने महाराजांचे पाय धरले व क्षमेची याचना केली.

आजही श्रीरघुनाथभटजींचे भक्त नाशकात व अन्यत्र पुष्कळ आहेत. ते त्यांची अनन्य भावाने नित्य सेवा करीत असतात. श्रीरघुनाथभटजींनी ज्या ठिकाणी जिवंत समाधी घेतली त्या ठिकाणी शिवलिंग स्थापिलेले असून त्यासच ‘अद्वैतेश्वर’ असे म्हणतात. दर शिवरात्रीस महाराजांचे भक्तगण त्या मंदिरात येऊन अहोरात्र उपासना करतात. त्यांच्या भक्तांपैकी अनेकांस महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन झालेले आहे; तसेच अनेकांस त्याचे अनुभवही आलेले आहेत. रघुनाथभटजी महाराजांचे ओवीबद्ध चरित्र त्यांचेच शिष्य प्रख्यात दत्तभक्त श्रीनिरंजन रघुनाथ यांनी लिहिले आहे.
- रा. ब. खाडिलकर

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP