मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
नारायणस्वामी

दत्तभक्त - नारायणस्वामी

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(समाधी सन- १८०५)

श्रीनारायणस्वामी-पूर्वाश्रमात विसापूर ग्रामनिवासी गार्ग्यगोत्री ऋग्वेदी देशस्थ महाराष्ट्र ब्राह्मण, उपनाव जोशी. पूर्ववयात विद्या व सदाचारसंपन्न असल्याने त्या प्रांतात विद्वन्मान्य होते. पहिली पत्नी परलोकवासी झाल्यावर कोल्हापूर प्रांतातील तारळे गावातील श्री. रामदीक्षित गुळवणी यांच्या कन्येबरोबर त्यांचा दुसरा विवाह झाला व त्यांना विश्वंभर नावाचा पुत्र झाला. याप्रमाणे सुखाने त्यांचा संसार चालला होता. एकदा पुण्यात विद्वत्सभेत शास्त्रार्थात त्यांचा पराभव झाल्याने त्यांना अत्यंत खिन्नता प्राप्त झाली. पुन: शास्त्रात असा पराभव न व्हावा म्हणून अधिक अध्ययन करण्याकरता घरदार सोडून ते काशीला गेले व त्या ठिकाणी चांगल्या गुरूच्या जवळ राहून गुरूंची उत्तम सेवा करून सर्व शास्त्रांत पारंगत झाले.

श्रीनारायणस्वामींचा शास्त्राध्ययन करण्याचा उद्देश गुरुंनी ओळखून त्यांच्याजवळ ‘वादामध्ये कोणाचाही पराभव करणार नाही’ अशी गुरुदक्षिणा मागितली. ती आज्ञा मान्य करून श्रीनारायणस्वामी आपल्या गावी परत आले. त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या व काही वर्षांनी पत्नी स्वर्गवासी झाली. पुत्राला विद्याभ्यासासाठी पुण्याला ठेवून आपल्या दोन मुलींसह कोल्हापूरला श्रीजगदंबेच्या सेवेला ते राहिले. भगवतीने संतुष्ट होऊन त्यांना नरसोबाच्या वाडीला जाऊन श्रीदत्ताची आराधना करण्याची आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणे श्रीकृष्णपंचगंगेच्या संगमावरील श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीत मुलींसह राहून श्रीदत्ताची उपासना करू लागले.

‘ईश्वरप्रणिधानाद्वा’ या भगवान्‌ पतंजलीच्या वचनाला सत्य करण्यासाठी भगवान्‌ द्त्तात्रेयांनी त्यांच्यावर अनुग्रह केला व त्यांना समाधिसिद्धी प्राप्त झाली. निरंतर ईश्वरचिंतन केल्याने ईश्वर संतुष्ट होतो व त्याच्या अनुग्रहाने समाधी सिद्धी होते.

याप्रमाणे नित्य श्रीनारायणस्वामींचा समाधिअभ्यास चालला असता एके दिवशी पहाटे श्रीनारायणस्वामी नित्याप्रमाणे समाधी लावून बसले. त्यादिवशी मुलींना रोजच्या वेळेच्या पूर्वी जाग आली व शौचाला जाण्याकरता मुली वडिलांना हाका मारू लागल्या. श्रीनारायणस्वामींचा समाधिभंग होईल म्हणून श्रीदत्तांनी श्रीनारायणस्वामींचे रूप घेऊन, मुलींना बाहेर नेऊन त्यांचा विधी उरकून, त्यांना अंथरूणावर झोपवून, श्रीनारायणस्वामी समाधीतून उठण्यापूर्वी श्रीदत्तात्रेय अदृश्य झाले.

नित्याप्रमाणे समाधीतून उठल्यावर श्रीनारायणस्वामींनी मुलींना शौचाला जाण्याकरता उठविले तेव्हा मुली म्हणाल्या, “तुम्ही आम्हांला आताच शौचाला नेऊन आणले आणि पुन: कशाला जागे केले?’ मुलींनी शौचाला गेलेली ती जागा दाखविल्यावर ती गोष्ट सत्य असल्याची त्यांची खात्री झाली व आपली समाधी भंग होऊ नये म्हणून प्रभूंनीच हे कृत्य केले असे समजून त्यांना अत्यंत दु:ख झाले. देवाकडून अशी सेवा घेणे अनुचित समजून एका मुलीला कोल्हापूर प्रांतातील सोळांकूर या गावी व दुसर्‍या मुलीला त्याच प्रांतातील कापसी या गावी योग्य वरांना देऊन आपण विरक्त होऊन पुन: पूर्वीप्रमाणे ते उपासना करू लागले.

देवाजवळ संन्यास घेण्याची इच्छा प्रकट केल्यावर योग्य वेळी संन्यास होईल असे देवाचे सांगणे झाले. श्रीनारायणस्वामी नित्य पहाटे संगमावर स्नानाला जात असत. एके दिवशी नित्याप्रमाणे स्नानाला गेले असता पाय घसरून पाण्यात गेले. त्या ठिकाणी श्रीदत्त भगवान श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी असून संन्यासाची सर्व तयारी पाहून चकित झाले. श्रीनृसिंहसरस्वतींनी स्वत: प्रणवोच्चारपूर्वक सर्व संन्यासविधी यथाशास्त्र करून त्यांना दंड दिला व श्रीनारायणसरस्वती असे नाव ठेवले. हा सर्व विधी झाल्यावर ज्या ठिकाणी ते पाण्यात गेले होते तेथूनच दंडकमंडलूसह संन्यासीवेषात बाहेर आले.

त्यांना संन्यासीवेषात पाहून तेथील मठातील महंताना वाटले की, गुरुशिवाय याने स्वत:च संन्यास घेतला आहे. हा भ्रष्ट आहे असे समजून त्यांच्यावर बहिष्कार घातला.

श्रीनारायणस्वामी आपल्या खोलीचे दार बंद करून बसत असत. बाहेरून कोणी भक्ताने नमस्कार केल्यास आतून ‘नारायण’ असा शब्द येत असे. ते पाहून हा काय प्रकार आहे हे पाहण्याकरता एके दिवशी रात्री मठाधिपती नारायणस्वामींच्या खोलीच्या दाराच्या छिद्रातून पाहू लागले. त्या दिवशी शनिवार असल्याने श्रीनारायणस्वामी डोळे मिटून प्रेमाने नृसिंहाचे भजन करीत होते; व एक मोठा सिंह त्यांच्या समोर बसलेला आहे असे त्यांना दिसले.

ते पाहून श्रीनारायणस्वामींचा अधिकार फार मोठा आहे असे वाटून ते नारायणस्वामींना शरण गेले व ‘आपला अधिकार न समजल्यामुळे मी आपणाला भ्रष्ट समजलो’ असे म्हणाले. तेव्हा नारायणस्वामींनी त्यांना आपल्या संन्यासाची सर्व हकीगत सांगितली. मठाधिपती त्यांचे शिष्य झाले व कृतकृत्य झाले. श्रीनारायणस्वामी शालिवाहन शके १७२७ चैत्र वद्य अमावस्येला नरसोबाच्या वाडीत समाधिस्थ झाले. त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव चैत्र महिन्यात अद्याप त्यांचे वंशज नरसोबाच्या वाडीला येऊन करीत असतात.

परमेश्वराच्या सगुणरूपाची उपासना करून हल्लींच्या कालातही ईश्वरप्रसादाने उपासकाला ब्रह्मसाक्षात्कार होऊन तो जीवन्मुक्त होतो हे सांगण्याकरता श्रीवासुदेवानंदसरस्वतींनी आपल्या युवशिक्षेच्या शेवटी श्रीनारायणस्वामींचे संक्षिप्त चरित्र वर्णन केले आहे.

-  वा. द. गुळवणी

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP