दत्तभक्त - वासुदेव बळवंत फडके
महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात.
(सन १८४५-१८८३)
अव्वल इंग्रजीतील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे एक थोर दत्तोपासक म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचा जन्म कुलाबा जिल्हयातील शिरढोण गावी झाला. कर्नाळ्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्याकडे होती, लहानपणापासून वासुदेव हूड व बंडखोर वृत्तीचा होता. कल्याण, मुंबई, पुणे येथे थोडेफार शिक्षण झाल्यावर त्या वेळच्या जी. आय. पी. रेल्वेकंपनी, ग्रँट मेडिकल कॉलेज इत्यादी ठिकाणी नोकरी करणार्या वासुदेवाच्या मनात इंग्रजी राजवटीविषयी तिरस्कार उत्पन्न होत होता. सत्तावनच्या युद्धाची प्रेरणा त्याच्या मनास होतीच. पुण्याच्या फायनान्स ऑफिसात नोकरी करीत असताना त्यांच्या मनातील वैराग्यवृत्ती उसळून वर आली. मंत्रतंत्र, सत्पुरुषांच्या गाठीभेटी य़ांत त्यांना गोडी वाटे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनाही ते भेटले होते. वासुदेव बळवंतांचे आराध्य दैवत श्रीदत्त हेच होते. श्रीपादवल्लभ नामक ध्यानाचे एक चित्र त्यांनी एका चित्रकाराकडून मुद्दाम काढवून घेतले होते. दत्ताचे हे रौद्र दर्शन त्यांच्या बंडखोर मनाला प्रेरणा देई. त्याची नित्य ते पूजा करीत. रोज ते श्रीगुरुचरित्राच्या पोथीचा अध्याय वाचीत. दत्तांच्या आराधनेचा व उपासनेचा एक ग्रंथ ‘दत्त माहात्म्य’ नावाचा प्रसिद्ध करण्याचा त्यांचा मानस होता. गंगाधरशास्त्री दातार यांच्याकडून ‘दत्तलहरी’ या स्तोत्राचे भाषांतर करवून वासुदेव बळवंतांना प्रसिद्ध केले होते. राजद्रोहाखाली यांना हद्दपारीची शिक्षा झाली. एडन येथेच जन्मठेप भोगीत असताना त्यांचे निधन झाले. ‘दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांसाठी दिल्या. हिंदवासियांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये?’ अशी त्यांची वृत्ती होती.
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2018
TOP