(सन १८८६-१९७४)
वामनरावांचे पिताजी दत्तभट गुळवंणी हे नारायणभटजींचे चिरंजीव. गुळवणी हे कोल्हापूर भागातील कौलवगावचे एक सदाचारसंपन्न मध्यमवर्गीय कुटुंब. वामनरावांच्या मातुश्री उमाबाई या जवळच्या पंचक्रोशीतल्या श्री. मारुतीपंत कुलकर्णी यांच्या कन्या. वामनरावजींचे मातापिता दोघेही विरक्त आणि महान् भगवद्भक्त होते. वाडीची वारी करण्याचा त्यांचा प्रघात होता.
वामनरावांचा जन्म २३ डिसेंबर १८८६ गुरुवार रोजी कुडुत्री येथे झाला. ‘शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते’ या भगवदुक्तीप्रमाणे सदाचारसंपन्न वैराग्यशील कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
वयाचे आठवे वर्षी उपनयनसंस्कार झाल्यावर वडील बंधूंनी संध्या, पूजा, वैश्वदेव, पुरुषसूक्त वगैरे धार्मिक आचारांचे शिक्षण दिले. कोल्हापुरात पं. आत्मारामशास्त्री पित्रे यांचेकडे रूपावली, समासचक्र, अमरकोश, रघुवंश ८ वा सर्ग, अजविलाप, पंचतंत्र वगैरे संस्कृत ग्रंथांचे अध्ययन झाले.
वामनरावांना उपजतच चित्रे काढण्याचा नाद होता. १९०६-७ साली त्यांनी डॉइंगच्या दोन्ही परीक्षा दिल्या आणि थर्ड ग्रेड परीक्षेसाठी ते मुंबईस जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या कलासंस्थेत गेले. वामनरावांनी विवाह करून प्रपंच थाटावा या हेतूने वडील बंधू व मातोश्रींनी वामनरावांना सांगून पाहिले. पण विवाहसंस्कार व्हावा, सामान्यांप्रमाणे ते संसारी-प्रापंचिक गृहस्थ व्हावे असा विधिसंकेत नव्हता. अशाच काही दैवी घटना या तरूण २१ वर्षांच्या वामनरावांच्या जीवनात घडून आल्या.
१९०७ साली गुरुद्वादशीस स्वामी वासुदेवानंदसरस्वती महाराजांचा मुक्काम नरसोबाचे वाडीस होता. महाराजांनी या उत्सवात भाग घेऊन प्रसाद ग्रहण केला. या वेळी वामनराव कोल्हापूर मुक्कामी होते. ‘दत्ताचा एक फोटो व एक हार तयार करून वाडीस ये’ असा वडील बंधूंचेकडून वामनरावांस निरोप आला. त्याप्रमाणे ते फोटो व हार घेऊन आले. स्वामींचे दर्शन झाले. महाराजांना फोटो पाहून समाधान वाटले. त्या प्रसंगी वामनरावांना महाराजांचे हस्ते प्रसादयुक्त अशी एक हातात बांधण्यासाठी पेटी मिळाली. ती वामनरावांचे हातात सतत असे. गुरूंचा हा प्रथमदर्शनी मिळालेला प्रसाद एक शुभचिन्हच होते. वामनरावजींच्या सर्व जीवनास त्यामुळे कलाटणी मिळावी असा हा अभूतपूर्व योगायोग होता.
मध्यंतरी प्लेगचा प्रादुर्भाव झाला. प्लेगने वामनरावांना झपाटले, ते दहा दिवस बेशुद्धावस्थेत होते. प्लेगची गाठ तशीच होती. श्रीगुरुचरित्राची पारायणे सुरू केल्यावर गाठ फुटली व बरे वाटले. वामनरावांचा पुनर्जन्म झाला. श्रद्धा दृढ झाली. नंतर वाडीस येऊन माधुकरी मागून वामनरावजींनी श्रीगुरुचरित्राचे सात सप्ताह केले. श्रीगुरुकृपा फळाला आली. श्रीगुरुदत्तात्रेयाचे ते निस्सीम उपासक झाले.
या सुमारास पवनी या गावी श्रीवासुदेवानंदसरस्वती महाराजांचा चातुर्मास झाला. वडील. बंधूंनी वामनरावांस मातोश्रींना घेऊन येण्याविषयी सांगितले. वामनराव पवनीस झाले आणि योगागोग असा की, महाराजांकडून अनंतचतुर्दशीच्या पुण्यदिवशी त्यांना अनुग्रह मिळाला. वामनरावजींच्या जीवनातला हा सुवर्णमंगल दिवस !
वामनरावजींनी मुंबईस नोकरीनिमित्त काही खटपट केली; पण जमले नाही. मग उपरती झाली. अंगावरील फक्त दोन वस्त्रे व लोटा घेऊन ते गाणगापुरास जाण्यास निघाले. वाटेत अत्यंत त्रास झाला. दौंडला कडक उपवास घडला. तो एकादशीचा दिवस होता. त्या दिवसापासून वामनरावांचे नित्याचे एकादशीव्रत सुरू झाले.
गाणगापूर क्षेत्री श्रीगुरुचरित्र सप्ताह सुरू झाले. सातवे पारायण एक दिवसात केले. सात पारायणे संपवून सांगता केली. जवळ काही नव्ह्ते, म्हणून जवळची छत्री व वस्त्रे पुजार्यास देऊन सप्ताहाची सांगता केली. दृढभक्ती अंगी बाणली म्हणजे मनाचा ताबा शरीरावर केवढा बसतो व केवढे कार्य घडते याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
गाणगापुरी श्रीगुरुचरित्राचे सप्ताह पुरे झाल्यावर गुरुदर्शनाची ओढ लागली. महाराज त्या वेळी हावनूर या भागात संचार करीत होते, असे समजल्यावरून वामनराव पायीच शोधार्थ निघाले. गाणगापुराहून पायीच हुटगी-विजापूर सतीमनी गाठले. धारवाडजवळील मथिहाळ दत्तमंदिरात महाराजांचा मुक्काम आहे. ही बातमी मिळताच ते गदगहून धारवाडला गेले. जवळ तिकिट काढायला पैसे नव्ह्ते, म्हणून घोंगडी होती ती विकून दोन रुपये मिळाले, ते तिकिटासाठी खर्च झाले.
ते धारवाडला पोचले आणि स्वामीमहाराज तेथून पुढे संचारास गेले होते असे समजले ! मग पुढे पदयात्रा सुरू झाली. गुरूचा शोध ही अंतरीची तळमळ प्रेरक ठरली व त्यापुढे कोणत्याही अडचणी आल्या तरी त्यांना न जुमानता पुढील मार्ग सुरू झाला. गदग, हरिहर, तुंगभद्रा-संगमावरील कुडलीमठ, पुन्हा हरिहर, हुबळी, गदग, आंबेगिरी या गावी आले. प्रत्येक ठिकाणी महाराज येथे होते, पण येथून ते पुढे गेले अशी बातमी मिळे. मग ते मल्लापूर, बागलकोट, हावनूर या गावी गेले. हावनूर गावी महाराजांचा मुक्काम गावाबाहेर त्रिकुटेश्वरमंदिरात होता. महाराजांच्या दर्शनार्थ इतके दिवस तळमळणारे वामनराव या गावी आले आणि तडक मंदिरात जाऊन त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले. ‘मी येथे आपली सेवा करून राहणार’ असा आग्रह वामनरावांनी धरला, एकभुक्त राहायचे, माधुकरी मागून उदरनिर्वाह करावयाचा व सदासर्वकाळ गुरुसेवेत घालवावयाचा, असा कार्यक्रम सुरू झाला. रोज तुंगभद्रेचे स्नान घडे. महाराजांच्या तोंडून गीतापाठ व ब्रह्मसूत्रवृत्ती ऐकायला मिळे. महाराजांनी वामनरावांना गीता व विष्णुसहस्रनाम याची संथा स्वत: दिली. गुरूंचा अनुग्रह मिळाल्याने वामनरावांचे भाग्य दुणावले. आपले गुरू हे साक्षात् दत्तावतार आहेत, अशी साक्ष याचवेळी वामनरावांना पटली होती.
महाराजांनी वामनरावांना या मुक्कामात आसने, प्राणायाम व अजपाजप या मंत्राची दीक्षा दिली. ‘माझ्या आयुष्यातला हा सहवास परमभाग्याचा व आनंददायक’ असे वामनरावजी नंतरही सांगत.
वामनरावांनी या मुक्कामात तुंगभद्रेचे एक सुंदर चित्र तयार केले. महाराजांनी त्रिपुरांतकेश्वरावर एक सुंदर काव्य रचिले होते. वामनरावांनी श्लोक हारबद्ध करून देवीच्या चित्राच्या गळ्यात तो हार घातला. महाराजांना फार समाधान झाले. वामनरावांनाही आपल्या कलेचे चीज झाले असे वाटले.
त्यानंतर महाराज जेथे जेथे संचारास जातील तेथे तेथे त्यांचे समवेत वामनराव जात. सेवा कधी चुकली नाही-कधी अंतर पडले नाही.
मधूनमधून वामनराव गाणगापूर, नरसोबावाडी, औदुंबरास जात. औदुंबरास सन १९१२ साली त्यांनी श्रीमालामंत्राचे पुरश्चरण केले. मातुश्री बरोबर होत्या.
श्रीक्षेत्र गरुडेश्वरी महाराजांचा मुक्काम असताना तेथे त्यांनी ब्रह्मसूत्रवृत्ती, दशोपनिषदे, श्वेताश्वतर, कैवल्यमौक्तिक ही उपनिषदे समजावून सांगितली. या मुक्कामात वामनरावांना महाराजांकडून ‘धोती’ ची पद्धती शिकून घेता आली व दीक्षा मिळाली.
टेंबेस्वामी यांनी एकमुखी दत्ताचे स्तवन केले होते
ते असे :---
मालाज्कमंडलुरध:करपद्मयुग्मे ।
मध्यस्थपाणियुगुले डमरूत्रिशूले ।
यस्य स्त ऊर्ध्वकरयो: शुभशंखचक्रे ।
वन्दे तमत्रिवरदं भुजषधकयुक्तम् ॥
या ध्यानाप्रमाणे वामनरावांनी एकमुखी दत्ताचे सुंदर चित्र तयार केले, त्याप्रमाणे षोडश अवतारांपैकी सिद्धराज, अत्रिवरद, कालाग्निशमन, अवधूत, आदिगुरू लक्ष्मीनरसिंह, अशी सुंदर चित्रे तयार करून दिली. दत्तात्रेयाचे चित्र इतके सुंदर, भावपूर्ण, प्रसन्न आहे की, त्याच्या लक्षावधी प्रती आता घरोघरी दिसतात. दत्तात्रेयांचे चित्र काढण्यास सुरुवात करण्यापूर्वी वामनरावजींना स्वप्नात दत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन झाले होते व त्याच भावावस्थेत हे प्रासादिक दत्तचित्र तयार झाले ! चित्रकलेची सार्थकता झाली !
महाराजांच्या कृपेने महाराजांचे परमभक्त श्रीगांडाबुवा महाराज, श्रीगोविंदमहाराज पंडित, श्रीसीताराम महाराज यांचेशी वामनरावांचा सहवास घडला.
वामनरावांनी १९१७ ते १९२६ पर्यंत १० वर्षे बार्शी येथे म्युनिसिपल शाळेत व १९२६ ते १९४२ पर्यंत पुणे तेथे नू. म. वि. हायस्कुलात डॉइंग शिक्षक म्हणून काम केले.
वामनराव हे एक उत्तम चित्रकार होते. पण कलेचा त्यांनी कधी व्यापार-बाजार केला नाही. साधुसंतांचे, देवादिकांचे, सद्गुरुमहाराजांचे अनेक फोटो त्यांनी काढले. चित्रे रंगविली, पडदा तयार करून दिला. क्रेपची फुले तयार केली व ती कला अनेकांना शिकवली. चक्रांकित कुंडलिनीचे एक सुंदर चित्र तयार करून त्यांनी उडुपीचे महाराजांना अर्पण केले.
वामनरावांनी आसेतुहिमाचल अनेक ठिकाणच्या सर्व महत्त्वाच्या तीर्थयात्रा केल्या. श्रीकाशीक्षेत्री अनेक वेळा जाऊन तेथे नित्य गंगास्नान व साधना केली. श्रीशंकराचार्य वाडीकर जेरेस्वामींचे समवेत बद्रीनारायणाचीही यात्रा यथासांग झाली.
सद्गुरू टेंबेस्वामींच्या महासमाधीनंतर वामनरावांना फार तळमळ लागली. योगमार्गातले पुढचे ज्ञान देणारा आता कोण गुरू भेटणार अशी तळमळ वाटू लागली. श्रीक्षेत्र पुष्कर येथे ब्रह्मानंद स्वामी एक मोठे अधिकारी व साक्षात्कारी योगी आहेत असे समजले. वामनराव यांचेकडे गेले व महिनाभर वास्तव्य करून ब्रह्मानंद स्वामी यांचे कृपेने त्यांनी योगाभ्यासाचे महत्त्वाचे पुढचे टप्पे साध्य केले.
वामनराव सन १९२२ साली श्रीगोविंद महाराजांकडे योगाभ्यासासाठी येऊन राहिले. श्रीगोविंदमहाराजांच्या देखरेखीखाली वामनरावांची अभ्यासाची तयारी उत्तम झाली होती. ब्रह्मचर्य, उपासना, सदाचार वगैरे सर्व अनुकूल होते. कुंडलिनीशक्ती जागृत करण्यासाठी हठयोगातील श्रेष्ठ दर्जाचा प्राणायाम व इतर कष्टसाध्य क्रिया त्यांनी आत्मसात केल्या.
पुढे योगायोगाने हुशंगाबाद येथे प. पू. चिन्मयानंद सरस्वती बंगाली स्वामी महाराज यांचे आगमन झाले. ते तेथील मंगळवार घाटावर उतरले होते. त्यांनी तंत्रशास्त्राचा उत्तम अभ्यास केला होता. वामनराव त्यांच्या दर्शनास गेले. पुढे त्यांचा सहवास नित्य होऊ लागला. वामनरावजींच्या आग्रहास्तव स्वामीजी त्यांचे निवासस्थानी येऊन राहिले.
वामनरावजींची तयारी, निष्ठा व अभ्यास पाहून त्याची पूर्ण परीक्षा घेऊन स्वामींनी एके दिवशी प्रसन्न होऊन वामनरावजींना दीक्षा देऊन कृतार्थ केले. कुंडलिनीशक्ती जागृत झाली. ही एक अत्यंत भाग्याची घटना घडली. पुढे या बंगाली स्वामींचे आणि वामनरावजींचे संबंध दृढावले. स्वामी वामनरावजींच्या आग्रहावरून तीन वेळा बार्शीस आले. स्वामींचा मुक्काम बार्शीच्या सुप्रसिद्ध श्रीभगवंतमंदिरात होता.
तेथून जाताना ही शक्ती जागृत करण्याचा अधिकार श्री. वामनरावजींना स्वामींनी प्रसन्न होऊन दिला व त्यांना दीक्षाधिकारी केले. वामनरावजींच्या जीवनातील हा अमृतसिद्धी योगच ! वामनरावजींनी ही शक्ती जागृत करण्याचे कार्य अनंतचतुर्दशीच्या पुण्यपावन दिवशी सुरू केले व पहिली दीक्षा सौ. गोपिकाबाई नावाच्या एका सुवासिनीला दिली. दुसरी व तिसरी दीक्षा व्यंकोबा कुलकर्णी व बापू कुकडे यांना दिली. अशा रीतीने या शक्तीचा प्रसार सुरू झाला. दीक्षा देणारे सद्गुरू आता वामनरावजी हे होते. या दीक्षादानामुळे सर्व लोक त्यांना आता सद्गुरू म्हणून आदराने संबोधू लागले. योगीराज गुळवणीमहाराज, दत्तयोगी गुळवणीमहाराज या बहुमानाने सर्व लोक त्यांना आदराने मान देऊ लागले.
वामनरावजी दीक्षा देतात, कुंडलिनी शक्ती जागृत करतात याची वार्ता सर्वत्र पसरली. वास्तविकपणे प्रसिद्धीपराङमुख वामनराव यांनी याबाबत फार दक्षता घेतली होती. पण त्यांच्या शक्तिरूपी कीर्तीचा सुगंध दरवळायचा थोडाच राहणार? वेधदीक्षेचे प्रणेते म्हणून त्यांच्यासंबंधी कल्याण मासिकात लेख आले. साधकांची रीघ लागली.
सन १९२६ साली वामनरावजी पुणे येथे वास्तव्यास आले आणि नारायण पेठेत बिर्हाड करून राहू लागले. या ठिकाणी तळमजल्यावरील दोन खोल्यांत वामनरावजींची साधना सुरू झाली. या ठिकाणी दत्तोपासना, पूजाअर्चा, अनुष्ठाने नित्य होत. शेकडो लोक साधक म्हणून मार्गदर्शनासाठी, दीक्षेसाठी येत असत. प्रत्येकाची निष्ठा, अधिकार यांची पूर्ण परीक्षा घेऊन महाराज त्या त्या व्यक्तीला दीक्षा देत.
वामनरावजींचे योगमार्गातील सद्गुरू स्वमी चिन्मयानंद यांनी गुरुंच्या आज्ञेने दंडग्रहण केला. त्यांना लोकनाथतीर्थ असे नाव दिले. ते तीनचार वेळा पुणे येथे आले. स्वामींनी आपल्या मुक्कामात अनेकांना दीक्षा दिली. त्यातच श्रीबापूसाहेब मिटकर हे एक गृहस्थ होते. स्वामींच्या कृपेने यांना दूरदर्शन ही सिद्धी प्राप्त झाली असे म्हणतात. पुढे हे स्वामी-लोकनाथतीर्थ काशीस जाऊन राहिले. त्यांच्या महानिर्याणसमयी प. पू. वामनरावजी गुरुमहाराजज त्यांच्याजवळ होते. गुरु-शिष्यांचे अन्योन्य प्रेम व भक्ती अपूर्व होती.
गुरुमहाराजांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी, महत्वाची व चिरकाल टिकणारी कामगिरी म्हणजे टेंबेस्वामी महाराजांच्या वाङमयाचे प्रकाशन. या कामी त्यांना पं. दत्तात्रेयशास्त्री कवीश्वर यांचे सहाय्य लाभले. सन १९४५ साली भागानगर मुक्कामी टेंबेस्वामी महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा झाला. त्या प्रसंगी हा ग्रंथप्रकाशन-समारंभ मोठया उत्साहाने साजरा झाला. अनेक थोर थोर व अधिकारी मंडळी या उत्सवात सहभागी झाली होती.
गुरु महाराजांच्या वयाच्या ७५ व्या वर्षी पुणे मुक्कामी हा अमृत-महोत्सव फार थाटात साजरा झाला. पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात सत्कारसमारंभ साजरा झाला. त्या वेळी लोकनायक बापूजी अणे, पं. सातवळेकर प्रभृती मोठमोठी मंडळी उपस्थित होती. श्रीगुरुदत्तयोग हा ग्रंथही प्रकाशित झाला.
अमृतमहोत्सवानंतर गुरुमहाराजांची प्रकृती खालावली. निसर्गोपचार झाले. आमदार विष्णुपंत चितळे यांनीही चिकित्सा करून उपचार केले. शरीराला अत्यंत क्लेश होत असतानाही गुरुमहाराजंची शांती ढळली नाही. एके दिवशी फार अस्वस्थ झाले. त्या प्रसंगी सर्व मंडळी काळजी करीत होती; पण गुरुमहाराजांनी शांतपणे सांगतले ‘मी इतक्यात जात नाही; काळजी करू नका.’ त्या आजारातूनही ते बरे झाले.
गुरुमहाराज प्रतिवर्षी तुळजापूरास जाऊन त्रिरात्र मुक्काम करून देवीची-तुळजाभवानीची महावस्त्रे वगैरे अर्पण करून शास्त्रोक्त महापूजा करीत. अन्नदानही होते.
पानशेतच्या प्रलयाचे प्रसंगी १२ जुलै १९६१ रोजी श्रीटेंबेस्वामी महाराजांच्या पुण्यतिथि-उत्सवाची तयारी गुरुमहाराजांच्या निवासस्थानी नारायण पेठेत सुरू होती. सप्ताह संपला होता. नैवेद्य दाखवला, आरती सुरू झाली. इतक्यात नदीचे पाणी अंगणात आले. घरात शिरले. प्रलय झाला. खणानारळाने नदीची ओटी भरून गुरुमहाराजन एका वस्त्रानिशी बाहेर पडले आणि सिद्धमातामंदिरात आश्रयासाठी गेले. पुण्यतिथीची सांगता सिद्धमातामंदिरात झाली. आता पुढे काय? जायचे कुठे?
पण सत्यसंकल्पाचा दाता श्रीभगवान नेहमीच धावून येतो. कोणत्या तरी अकल्पित योगायोगाने गोष्टी घडून येतात. तसेच या वेळी घडले. महाराजांचे काही शिष्य वैद्य इंजिनियर, वैद्यमास्तर यांचे मनात एक योगाश्रम स्थापन करावा व तेथे गुरुपादुकांची स्थापना व्हावी व तेथे गुरुमहाराजांचे नित्य वास्तव्यस्थान असावे, असे बेत घोळू लागले. हीच योजना पुढे अनेक शिष्यांना व कार्यकर्त्यांना पसंत पडली. द्रव्यसाहाय्य मिळू लागले. एरंडवणे पार्कजवळ-कर्वे रोडवर एक जागा घेऊन वासुदेवाश्रमाची सुंदर इमारत अल्पावधीत उभारली गेली. ही एक दैवी घटनाच समजली पाहिजे.
२७ जानेवारी, १९६५ रोजी श्रीकृपेने इमारतीची वास्तुशांती, उद्घाटन व समर्पणसमारंभ यथासांग पार पडले. कै, सोनोपंत दांडेकर या प्रसंगी उपस्थित होते. श्रीशंकराचार्य एरंडेस्वामी यांच्या शुभाशीर्वादाने आश्रमवास्तू समर्पणसमारंभ झाला. आश्रमाला सद्गुरुस्मारक वासुदेवनिवास योगाश्रम हे नाव दिले. आश्रमसमर्पण व नामाभिधान झाल्यावर पहिली महत्त्वाची योजना गुरुमहाराजांनी केली. ती म्हणजे आश्रमाचा ट्रस्ट करून सर्व मालमत्ता ट्रस्टींच्या ताब्यात दिली. वासुदेवाश्रम ही आज एक पवित्र व नमुनेदार संस्था उभारली गेली असून या ठिकाणी हजारो भक्त सेवेसाठी, दर्शनासाठी व साधनेसाठी येत असतात. श्रीवासुदेवाश्रमात नित्य काही ना काही धार्मिक कार्यक्रम, प्रवचने-कीर्तने, अनुष्ठाने, नामसंकीर्तने सुरू असतात. येथे होणार्या बहुतेक सर्व कार्यक्रमांना गुरुमहाराज उपस्थित असत. त्यांचे वास्तव्यही वासुदेवाश्रमात नित्य असल्याने या आश्रमाला व तेथील परिसराला एक दैवी मांगल्या व पावित्र्य लाभले आहे. भाविक स्त्रीपुरुषांचे ते एक श्रद्धास्थान झाले आहे.
गुरुमहाराजांच्या आयुष्यास ८० वर्षे पूर्ण झाली व त्यांनी ८१ व्या वर्षात पदार्पण केले; त्यानिमित्त सहस्रचंद्रर्शनशांती व सत्कारसमारंभ एप्रिल १९६७ मध्ये प. पू. विष्णुतीर्थजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. याप्रसंगी गुरुमहाराजांचे हजारो भक्तगण, पंडित, वैदिक मंडळी दूरदूर ठिकाणांहून आली होती. या प्रसंगी सहस्रचंद्रदर्शनशांती, दत्तयाग, श्रीसप्तशतीचंडीहवन, श्रीगणपतिअर्थर्वशीर्षहवन व श्रीरुद्रस्वाहाकार वगैरे सर्व धार्मिक कार्यक्रम यथासांग पार पडले. ३० एप्रिल, १९६७ रोजी एम्. इ. एस. कॉलेजच्या असेंजच्या असेंब्ली हॉलमध्ये श्रीगुरुमहाराजांचा सत्कारसमारंभ फार थाटाने साजरा झाला. लोकनायक बापूजी अणे, म. म. द. वा. पोतदार, पं. सातवळेकर व त्यांच्या पत्नी इत्यादी समारंभास उपस्थित होते.
श्रीगुरुमहाराजांच्या गुणवर्णनपर अनेकांची भाषणे झाली. योगचूडामणी ही बहुमोल पदवी गुरुमहाराजांना शाल-श्रीफल देऊन हार घालून अर्पण करण्यात आली. वैदिक ब्रह्मवृंदाची संभावना योग्य प्रकारे करून त्यांना दक्षिणा देण्यात आली. समारंभात दानधर्म व अन्नसंतर्पण मोठया प्रमाणात झाले. दत्तभक्तीचा व योगमार्गाचा प्रसार करून योगीराज गुळवणी महाराजांनी हजारो साधकांना मार्गदर्शन केले. १५ जानेवारी १९७४ या दिवशी ते दत्तचरणी विलीन झाले.
--- ना. स. करंदीकर