मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
गोरक्षनाथ

दत्तभक्त - गोरक्षनाथ

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सुमारे ११ वे शतक)

आदि गुरु दत्तात्रेय आणि गोरक्षनाथ यांचा संबंध आपण मागे पाहिला आहेच. भगवान दत्तात्रेय आणि सिद्धाचार्य गोरक्षनाथ यांची भेट गिरनार पर्वतावर झाली असल्याचे प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी गोरक्षनाथांवर दत्तात्रेयांनी सिद्धीसामर्थ्य दाखवून अनुग्रह केला. आज या स्थानाला ‘कमंडलू तीर्थ’ या नावाने महत्त्व प्राप्त झाले आहे. गोरक्षनाथांनी येथील शिखरावरील दत्तपादुकांचे दर्शन घेतल्याची कथा प्रसिद्ध आहे. दत्तांनी त्यांना या ठिकाणी उन्मत पिशाचवत्‌ अशा दिगंबर, भस्मचर्चित, जटाजूटधारी अशा स्वरूपात दर्शन दिले. नाना सिद्धींचे चमत्कार दाखवून गोरक्षनाथांवर दत्तात्रेयांनी याच ठिकाणी कृपा केली. गोरक्षनाथांच्या परंपरेतील बहुतेक सर्व नाथांचा दत्तात्रेयांशी संबंध असल्याने व दत्तपंथातील अनेक महत्वाच्या बाबी नाथपंथाने विकसित केल्या असल्याने श्रीगोरक्षनाथांच्या चरित्राची रूपरेखा पाहाणे अगत्याचे आहे.

नाथसिद्धांच्या ज्या विविध नामावली सध्या उपलब्ध आहेत त्यांत गोरक्षनाथांचा उल्लेख येतो. मत्स्येन्द्रनाथांचे शिष्य म्हणून गोरक्षनाथांचा उल्लेख येतो, मत्स्येन्द्रनाथांना म्हणजे आपल्या गुरूंना स्त्रीराज्यातून म्हणजे वामाचारी पंथातून मुक्त करणारा एक थोर सिद्ध पुरूष म्हणूनही गोरक्षनाथांचा गौरव केला जातो. गोरक्षनाथांचा काल व त्यांचे जीवनवृत्त यांची विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. मत्स्येन्द्रनाथ व गोरक्षनाथ यांचे कार्य अकाराव्या शतकातले असावे. असा संशोधकांचा तर्क आहे. या योगी सिद्धांचे आयुर्मान अनेकदा अवघड काम होऊन बसले आहे. या दोनही सिद्धपुरुषांचे अनेक अवतार असल्याचेही सांगतात.

गोरक्षनाथांच्या जन्मासंबंधी एक आख्यायिका अशी की, एका पुत्रकांक्षिणी स्त्रीस महादेवांनी विभूतीभस्माचा प्रसाद दिला. या स्त्रीने अश्रद्धपणे तो प्रसाद शेणाच्या उकीरडयावर टाकून दिला. बारा वर्षांनी आपल्या प्रसादाचा परिणाम पाहाण्यासाठी महादेव आले तेव्हा त्यांनी राखेच्या ढिगार्‍यातून हाक मारून ‘गोरक्ष’ नाथास उभे केले. कधी या कथेतील आदिनाथाऐवजी म्हणजे शिवाच्या ऐवजी मत्स्येन्द्रनाथांचे नाव येते. ही पुत्रकांक्षिणी स्त्री ब्राह्मण असल्याचे सांगतात. मत्स्येन्द्रनाथ व गोरखनाथ यांनी नेपाळमध्ये अनेक प्रकारचे चमत्कार केले. नेपाळी परंपरेप्रमाणे मत्स्येन्द्रनाथ हे गोरक्षांचे गुरु आहेत, तर गोरक्षसिद्धांतानुसार गोरक्ष हे प्रत्यक्ष शंकराचेच पुत्र वा शिष्य आहेत. गोरक्षनाथांचे जन्मस्थान नेपाळ, पंजाब, गोरखपूर, यांपैकी कोठेतरी असावे. गोदावरी नदीच्या तीरी चंद्रगिरी नावाच्या गावी एका ब्राह्मण स्त्रीस गर्भसंभव होऊन गोरक्षनाथ जन्मल्याचेही सांगतात. गोपीचंदाची आई मैनावती ही गोरक्षनाथांची शिष्या होती. नेपाळी परंपरेनुसार दक्षिणेकडील वडव नावाच्या देशात महामंत्राच्या प्रसादाने महाबुद्धिशाली गोरक्षनाथांचा जन्म झाला. क्रूक्स आणि गियर्सन यांच्या मते सत्ययुगात पंजाबमध्ये, त्रेतायुगात गोरखपुरामध्ये, द्वापरयुगात हुरभुजमध्ये व कलियुगात काठेवाडात गोरखमढी येथे गोरखनाथ यांनी अवतार घेतले. गोरक्षनाथांनी नेपाळ, पंजाब, बंगाल, कच्छ, काठेवाड, नासिक, उडिसा इत्यादींच्या यात्रा केल्या होत्या.

गोरखनाथांचा जन्म, त्यांचे कार्य, त्यांचे पंथीय तत्त्वज्ञान यांचा अभ्यास आजकाल वाढत आहे. डॉ. कल्याणी माल्लिक, डॉ. प्रबोधचंद्र बागची, डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी, डॉ. मोहनसिंग इत्यादी संशोधकांच्या अभ्यासामुळे श्रीगोरक्षनाथांच्या कार्यावर नवा प्रकाश पडत आहे. मोहनसिंग यांच्या मतानुसार गोरक्षनाथ हे एका हिंदू विधवेचे अवैध पुत्र असावेत. समाजात त्यामुळे खालचे स्थान मिळाल्याने त्यांनी स्वपराक्रमाने वैचारिक क्रांती केली. गोरक्षसिद्धान्तसंग्रहात त्यांना ‘ईश्वरी संतान’ (बेवारशी) म्हटले आहे. ‘मतिरत्नाकर’ नावाच्या महानुभावी ग्रंथात तर गोरक्षनाथांसंबंधी म्हटले आहे. ‘आणि गोरक्ष जन्मला शूद्र कुळीं.’ त्यांचा जन्म ब्राह्मणकुळात झाला असल्याचेही काही संशोधक सांगतात. त्यांचे वैराग्य प्रखर होते. आपल्या वैराग्यपूर्ण मार्गावरून घसरणार्‍या आपल्या गुरूस, म्हणजे मत्स्येन्द्रनाथास त्यांनी सावरले. म्हणून की काय ज्ञानेश्वर त्यांना ‘विषयविध्वंसैकवीर’ म्हणतात. त्यांचा संचार सर्व भारतभर असून अमरनाथ, गहिनीनाथ, निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर ही शिष्यपरंपरा महाराष्ट्राच्या दृष्टीने फारच महत्त्वाची आहे.

गोरखनाथांचा एक महत्त्वाचा विशेष असा की, त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपला धर्मविचार लोकभाषांतून सांगितला. संस्कृत, प्राकृत वा अपभ्रंशमिश्र हिंदी अशा भाषांतून त्यांचे ग्रंथ मिळतात. अमनस्कयोग, ज्ञानदीपप्रबोध, गोरक्षपद्धती, गोरक्षसंहिता, योगमार्तंड, गोरक्षकल्प, अवधूतगीता, गोरक्षगीता, गोरखबानी; असे काही ग्रंथ गोरक्षनाथांच्या नावावर मिळतात. अमरौघशासनम्‌, महार्थमंजरी, सिद्धसिद्धान्तपद्धती; हेही ग्रंथ गोरक्षनाथांचे म्हणून सांगतात. योगधारणा, पिंडब्रह्यांडविचार, कुंडलिनीजागृती, गुरुचे मह्त्त्व, देशकालतीत व जातिभेदातीत तत्त्वज्ञान, लोकभाषांचा उपयोग; हे गोरखनाथांच्या पंथांचे मुख्य विशेष होत. हिंदू व मुसलमान एका विचारावर प्रथम वावरले ते गोरक्षनाथांच्या परिवारात. नाथपंथाच्या रावळ शाखेत आजही मुसलमानांचा भरणा विशेष दिसतो. नाथपंथात स्त्रीशूद्रांच्या उद्धाराची तळमळही प्रामुख्याने दिसते. विमलादेवी व मैनावती या दोन स्त्रिया नाथपंथात होत्या. बंगालमधील नाथपंथीय हडिपा (जालंदरनाथ) हा एक अंत्यज होता. गोरखनाथांच्या प्रेरणेमधूनच भाषेचा उपयोग अखिल भारताच्या संदर्भात होत राहिला. गोरक्षनाथांच्या पंथात वर्णाश्रमधर्माला स्थान नसल्यामुळे वर्णभ्रष्टांना या संप्रदायाचा मोठाच आधार वाटला.

‘गोरक्षचरित्र म्हणजे गुण व शक्ती या दोन गोष्टींचा एक सुरेख मणिकांचन योग आहे. ब्रह्मचर्यपरायण, हठयोगाचारनिष्ठ व नीतिसंपन्न अशा योगी संप्रदायाच्या विकासाचे मूळ श्रेय गोरक्षनाथांकडेच आहे. त्यांचा उपदेश व त्यांचे प्रत्यक्ष आचरण यांमध्ये फरक नव्हता. त्यांनी जीवनाकरिता ब्रह्मचर्य, संयम, उद्‌वेगरहित ह्रदयमार्ग योग्य मानला होता. जर त्यांनी ह्या मार्गाचे प्रत्यक्ष आचरण केले नसते तर निखालसपणे मत्स्येंद्रांच्या उद्धाराकरिता ते न जाते व स्वत:च त्या ठिकाणी रममाण झाले असते. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवरून हे स्पष्ट दिसून येते की, ते कामिनी आणि कांचन या दोनही गोष्टींना साधी राहणी व साधनात्मक जीवन यांच्या दृष्टीने विघातक मानीत असत. ते यौगिक सिद्धिंचा प्रयोग फक्त परहितसाधनाकरिताच करीत होते.’ (अमनस्कयोग:पृष्ठे २८-२९) त्यांचा संप्रदाय स्वत:ला अतिवर्णाश्रमी मानतो. ते समदृष्टीने वावरत. भोग, मद्य, मांस इत्यादींच्या सेवनापासून ते अलिप्त होते. योगी पुरुषांना द्रव्याची इच्छा नसावी, असे त्यांना वाटे. स्त्रीकडे बघण्याची त्यांची दृष्टी मातृभावाची होती. संयमपूर्ण जीवन व साधी राहाणी यांचा ते आदर्शच होते.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP