मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
अनंतसुत कावडीबोवा

दत्तभक्त - अनंतसुत कावडीबोवा

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १७९७-१८६३)

श्रीअनंतसुत विठ्ठल ऊर्फ कावडीबोवा हे मूळ जिल्हा नगर तालुके पारनेरमधील होंगा नदीतीरावरील पिसा पिंपळगांवचे राहणारे होते. त्यांचा जन्म शके १७१९ चैत्र शुक्ल १५ बुधवार, दिनांक ११-४-१७९७ चा आहे. ते ऋग्वेदी आश्वलायन शाखीय देशस्थ ब्राह्मण होत. त्यांचे गोत्र भारद्वाज होय. ते पिसा पिंपळगावचे वतनदार कुळकर्णी होते. याशिवाय इतर तीन गावचे कुळकर्णीपणही त्यांचेकडे होते. त्यांचे संपूर्ण नाव विठ्ठल अनंत पिंपळगावकर असे होते. ईश्वरभजनात व देवसेवेत राहून ते कुळकर्णीपणाचे कामही पहात होते. ते पुंडलिक व श्रावणासारखे मातृपितृभक्त होते. मातापित्यांचा वृद्धापकाळ झाला, त्या वेळी पित्याने स्वत:स कावडीत बसवून काशीयात्रेस नेण्याची आज्ञा केली. आज्ञा शिरसावंद्य मानून विठ्ठलबोवांनी आपले वडील अनंतराम व मातोश्री सौ. राधाबाई यांना कावडीत बसवून बरोबर एक रामा नावाचा गडी व सामानासाठी एक घोडा यांसह ते काशीयात्रेस निघाले. मातापित्यांस कावडीत बसवून यात्रा करविल्या म्हणून त्यांचे नाव कावडीबोवा असे पडले.

यात्रा करीत असता त्यांच्या मातोश्री सौ. राधाबाई यांना विष्णुपदी देवाज्ञा झाली, ते पाहून आपण आता संसारमुक्त झाल्याने अनंतरावांनी प्रयागात येऊन ब्रह्मावर्तात आल्यावर संन्यास ग्रहण केला व ब्रह्मावर्तात ज्येष्ठ वद्य ५ स समाधी घेऊन ते नारायणस्वरूपी लीन झाले. त्यांना तेथे जलसमाधी देण्यात आली. तेथे त्यांचे और्ध्वदेहिक कार्य आटोपल्यावर त्या रिकाम्या कावडीत आता श्रीविठ्ठलरखुमाईच्या मूर्ती ठेवून कावडीसह विठ्ठलबोवांनी पुढील यात्रा सुरू केली.

याप्रमाणे यात्रा सुरू असताना गालव क्षेत्री मुक्काम होता व त्या दिवशी श्रीदत्तजयंतीचीही पर्वणी होती. गावात दत्तजन्मासाठी कोणी कीर्तनकार मिळेना; म्हणून गावकर्‍यांनी बुवांस कीर्तन करण्यास विनंती केली. पण आपणांस कसे जमेल म्हणून ते मंडळीशी बोलत असता विप्ररूपाने येवून श्रीदत्तात्रेयांनी त्यांना कीर्तन करण्यास व ग्रंथ लिहिण्यास आज्ञा केली व प्रसाद खाण्यास दिला व मी तुजबरोबर आहे, काळजी करू नये असे सांगितले. कीर्तन आटोपले व पुढील यात्रा सुरू झाली. कीर्तन सर्वांस फारच आवडले होते. ग्रंथरचना कशी होईल या विवंचनेत त्यांनी लेखनास सूरूवात केली नव्हती हे पाहून पुन्हा श्रीदत्तात्रेयांनी ब्राह्मणवेषाने येऊन ग्रंथ लिहिण्यास सांगितले व वरप्रदान दिले व मीच सर्वोतोपरी सहाय्य होईन असा आशीर्वादही दिला. याप्रमाणे वरप्राप्तीनंतर प्रवास चालू असताच त्यांचा मुक्काम उज्जैन क्षेत्री झाला. तेथे त्यांनी ‘श्रीदत्तप्रबोध’ या ग्रंथाचे चाळीस अध्याय लिहिले व पुढे द्वारावती (द्वारका) यात्रेस जाण्याच्या विचाराने यात्रा करून सन १८५६ च्या सुमारास बडोद्यास आले. प्रथम त्यांचा मुक्काम वाडीतील श्रीमंत राजे पांढरे यांच्या श्रीराममंदिरात झाला. बडोद्यातील त्या वेळच्या महान्‌ संत-महंतांच्या भेटी झाल्याने त्यांना अतिशय आनंद वाटला. बडोद्यास या महान्‌ मातृपितृभक्तशिरोमणी श्रीकावडीबुवांचे तत्कालीक अनेक शिष्यसमुदायही, त्यांचा उपदेश घेऊन झाला होता. त्यांपैकी एका शिष्याने त्यांना बर्‍हाणपुरा चौखडी रस्त्यावर एक श्रीराममंदीर बांधून देऊन त्यांना कायम राहण्याचा आग्रह करून ठेवून घेतले. याच श्रीरामाच्या मंदिरात कावडीत बसून आणलेल्या श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींची त्यांनी स्थापना केली व संवत १९१५ मध्ये तेथे मुक्कामास आले. याच मंदिरात वास्तव्य केल्यानंतर श्रीद्त्तप्रबोध ग्रंथाचे उरलेले २१ अध्याय त्यांनी लिहिले. असा हा ६१ अध्यायांचा ग्रंथ त्यांनी संवत १९१६ प्रजापती नाम संवत्सरी शके १७८२ चैत्र शुद्ध प्रतिपदा भ्रुगुवारी इ. सन १८६० मध्ये लिहून पूर्ण केला.

याप्रमाणे बडोदे येथे श्रीसेवेत व चिंतनात काळ घालवीत असता, श्रीविठ्ठल-अनंतसुत ऊर्फ कावडीबोवा हे संवत १९१९ आषाढ शुक्ल अष्टमीस वैकुंठवासी झाले. तरी ते ग्रंथरूपाने अमर असून श्रीदत्तभक्तांस त्यांच्या साक्षित्वाचे अनुभवही येतात.

श्रीदत्तप्रबोध ग्रंथाचे प्रथम प्रकाशन श्रीदामोदर सावळाराम यंदे यांनी सन १९०० मध्ये केले. श्रीगुरुचरित्र व श्रीगुरुलीलामृतप्रमाणेच हा महान्‌ प्रासादिक ग्रंथ श्रीदत्तप्रसादे लिहिलेला आहे. श्रीगुरुचरित्रात श्रीगुरूंचे वर्णन आहे. तसेच श्रीगुरुलीलामृतात श्रीअक्कलकोटस्वामींचे वर्णन आहे. श्रीदत्तप्रबोध ग्रंथात श्रीदत्तात्रेयांनी आपले मातोश्री सती अनसूयेस केलेला अध्यात्मपर असा उपदेश आहे. हा प्रासादिक ग्रंथ असून श्रीदत्तात्रेयांनीच वदविलेली अशी ही श्रीदत्तस्वरूप वाङमयमूर्तीच आहे. म्हणून तो सांप्रदायिक  दत्तभक्तांना अत्यंत पूजनीय व संग्राहय असा आहे. भाषा अत्यंत प्रेमळ व ह्रदय-स्पर्शी अशी आहे. हा वरद ग्रंथ असल्याने वाचन, पाठव सप्ताहरूपे अनुष्ठान करण्याने मन:कामना पूर्ण होतात, असा अनेकांचा अनुभव आहे.

बडोद्यास श्रीकावडीबुवांचे श्रीराम व श्रीविठ्ठल-राही-रखुमाईचे असे मंदिर आहे. तेथे दरसाल श्रीद्त्तप्रबोधकार अनंतसुत विठ्ठल ऊर्फ कावडीबोवा महाराज यांच्या पुण्यतिथीचा उत्सव आषाढ शु. १ ते ८ पावेतो होतो. पुण्यतिथी आषाढ शु. ८ स असते. या उत्सवात अखंड नामसप्ताह, श्रीदत्तप्रबोधपारायण, निरनिराळी संतमंडळींची कीर्तने, प्रवचने व भजने, श्रीगुरुचरित्र, सप्तशतीपारायणे, वेदपारायणे आदी विविध कार्यक्रम होत असतात. उत्सवसमाप्तीस अन्नसंतर्पण, महानुभाव अनेक रूपांची पाद्यपूजा, ‘संतपूजा’ होऊन संतांचे स्तवन व महाप्रसाद होत असतो. पौर्णिमेस गोपालकाळा होऊन हा उत्सव पूर्ण होतो. तसेच चैत्रात श्रीरामजन्मोत्सवही होतो.

श्रीअनंतसुत विठ्ठलबोवांनी श्रीदत्तप्रबोध ग्रंथाशिवाय स्फुट अभंग, करुणा-शतक अभंग, सांप्रदायिक सद्‌गुरुनमस्कारश्लोक व अभंग वगैरे वाङमय लिहिलेले असून बरेचसे अप्रसिद्ध आहे. ते जनार्दन-एकनाथ-निंबराज संप्रदायी असून त्यांचा आनंद संप्रदाय होय.

श्रीअनंतसुत विठ्ठल ऊर्फ कावडीबोवांनी बडोद्याच्या मंदिराची सेवा, पूजन, भजन व संप्रदाय चालविण्यासाठी आपले आते बंधू श्रीगोपाळबुवा यांना सहकुटुंब आपले गावाहून बोलावून आणून त्यांस प्रसाद व वरदहस्त ठेवून सर्व व्यवस्था सोपविली होती. श्रीगोपाळबुवाही अत्यंत लीन, प्रेमळ निस्सीम भगवद्‌भक्त असे होते. भजन व देवसेवेत राहून त्यांनी चारी धाम यात्रा केल्या होत्या व शेवटी चतुर्थाश्रम घेऊन फाल्गुन शुद्ध ३ दिनांक १५-३-१९१८ वय ७५ ला समाधिस्थ झाले. त्यांची समाधी कावडीबोवांच्या समाधिमंदिरात आहे. हे गोपाळकाला उत्तम करीत असत.

त्यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव श्रीशंकरबोवा हेही भजन व देवसेवा करून उत्सव-महोत्सव करीत असत. ते सुप्रसिद्ध कीर्तनकारही होते. श्रीमंत गायकवाड सरकारतर्फे बडोद्यास दर श्रावण मासात होणार्‍या कीर्तनपरीक्षेचे ते परीक्षक म्हणूनही होते. कै. श्रीमंत सजाजीराव महाराज गायकवाड यांचे धाकटे बंधू श्रीमंत संपतराव महाराज गायकवाड यांचे ते गुरू होते. श्रीमंत संपतरावांना त्यांनी भजन शिकविले होते.

ग्वाल्हेरचे सरकार श्रीमंत माधवराव महाराज शिंदे यांच्या येथे प्रतिवर्षी श्रीगणेशउत्सवात नामसप्ताह होत असे. त्या वेळी श्रीमंत संपतराव महाराजांचा एक भजनाचा पहारा असे. त्या मेळ्याचे अध्यक्ष श्रीशंकरबोवाच होते.

पुत्रवत्‌ पालन केलेले त्यांचे भाचे श्री. सुंदरनाथ व जगन्नाथ राजापूरकर या उभय बंधूंस मंदिराचे पुढील कार्य एकविचारे चालविण्यास सोपवून व वरदहस्त ठेवून, सन १९५० शके १८७२ संवत २००६ कार्तिक शुद्ध पंचमीस सोमवारी उपवास सोडून, श्रीशंकरबोवा ह्रदयविकाराने वैकुंठवासी झाले.

त्यांचे आज्ञेप्रमाणे हे उभय बंधू एकविचारे श्रींची पूजासेवा, आषाढी उत्सव, रामनवमी उत्सव आदी नित्य-नैमित्तिक कार्यक्रम पार पाडीत.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP