मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ४९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक म्हणे सूताप्रत । शंकर सनकादिकांचा संवाद सांप्रद सांप्रद । सर्वसिद्धिकर परम पुनीत । सांग कृपया आम्हांसी ॥१॥
नाना अवतारयुक्त । धूम्रवर्णाचें असे चरित । ऐकून सनकादिक विचारित । काय प्रश्न योगसिद्धयर्थ ॥२॥
सूत तेव्हां सांगत । धूम्रवर्णावताराचें चरित । राक्षसवधासहित ऐकत । विचारिती तैं द्विज ह्रष्टरोम ॥३॥
सनकादिक शंकरास म्हणत । नाना अवतारसंयुक्त । ऐकून माहात्म्य उदात्त । धूम्रवर्णाचें संतुष्ट आहों ॥४॥
आतां सर्वेशा योगप्राप्ति । होण्यास उपाय सुलभ रीती । सांगावा योगिनायका आम्हांप्रती । सुखकर जो शीघ्र सुगम ॥५॥
श्रीशिव सनकादिकां म्हणत । गणेशह्रदय सांगेन सांप्रत । सर्वसिद्धिप्रदायक शांतिप्रद होत । साधकासी शीघ्र जें ॥६॥
एकदा मी गणनाथाच्या ध्यानांत । बैसलों होतों भावयुक्त । तेथ श्रेष्ठ नदी गंगा मजप्रत । ऐसा प्रश्न करिती झाली ॥७॥
शंकरा सांग मजप्रत । कोणाचें ध्यान तूम नित्य करित । तें जाणण्या मीं इच्छित । तुझ्याहून अधिक श्रेष्ठ कोण ॥८॥
तेव्हां मीं तिजला म्हणत । गणेश देवदेवेश वर्तत । ब्रह्मब्रह्मेश साक्षात । त्याचें ध्यान करितों मी ॥९॥
आदरें सर्व भावज्ञ पूजित । कुलदेव सनातन गणेश ज्ञात । त्याचें ह्रदय जें गुप्त । तें तुज सांगेन सर्वप्रद ॥१०॥
सर्वज्ञें तें तुज कळेल । तैं तूं त्यास जाणशील । मीही अज्ञानावृत दुर्बल । तपश्चर्यामग्न होतों ॥११॥
तेथ तपःप्रभावें पाहिला । ह्रदयांत गजानन देव भला । त्याच्या दर्शनमात्रें मजला । स्फूर्ति प्राप्त झाली प्रिये ॥१२॥
गणेश्वरास जाणून । योगिवंद्य मी झालों पावन । तें गणेशह्रदय शोभन । सांगतों तुज ऐक आतां ॥१३॥
गाणेशयोगांत निपुण । तूंही होशील महान । या गणेशह्र्दय स्तोत्रमंत्राचा पावन । शंभु ऋषि जाणावा ॥१४॥
नाना छंदांत याची रचना । गणेश देवता शोभना । गंहें बीज माना । ज्ञानात्मिक शक्तिसिद्धक नाद ॥१५॥
श्रीगणपति प्रीत्यर्थ करावा । अभीष्टसिद्धयर्थ जप बरवा । ऐसा याचा विनियोग व्हावा । आतां सांगतों षडंगन्यास ॥१६॥
ॐ गं हया एकाक्षरें करावा । करण्यास षडंगन्यास तो ध्यावा । देव गजानन जो भवा । पार करण्या सामर्थ्य देई ॥१७॥
सिंदूरासम ज्याचे तीन नयन । पृथुतर जठर रक्त वसन । पाशांकुश भग्नदंत धारण । अभयमुद्रा धारण करी ॥१८॥
सिद्धिबुद्धीनेम प्रशिष्ट । ऐसा जो गजानन एकदंत । नाना भूषणें जो विलसत । निजजन सुखद गणेश ॥१९॥
नाभीवरी शेष रुळत । ऐश्या त्या गणेशाचें चिंतन करित । ऐसें ध्यान करून पूजित । मानसोपचारें भक्त तैं ॥२०॥
किंचित्‍ मूलमंत्र जपून । गणेशह्रदय म्हणावें एकमन । एकवीस नांवें गणेशाचीं पावन । अर्थानुसंधानें जपावें ॥२१॥
ॐ गणेश एकदंत । चिंतामणि विनायक प्रख्यात । ढुंडिराज मयूरेश लंबोदर पुनीत । गजानन हेरंब वक्रतुंड ॥२२॥
ज्येष्ठराज निजस्थित । आशापूर वरद सर्वश्रुत । विकत धरणीधर ज्ञात । सिद्धिबुद्धिपति ब्रह्मणस्पति ॥२३॥
मांगल्येश सर्वपूज्य असत । विघ्नांचा नायक जो ख्यात । ऐश्या त्या देवास वंदित । हेंच ह्रदय गणेशाचें ॥२४॥
गंगा त्यावर प्रार्थित । हया एकवीस नांवांचा अर्थ । सदाशिवा सांगावा मजप्रत । जेणें गणेशह्रदय कळेल ॥२५॥
करूणानिधीस त्या ऐसें विनवीत । तेव्हां श्रीशिव तिज सांगत । गकाररूपें विविध चराचर वर्तत । णकारग ब्रह्म परात्पर ॥२६॥
हया दोन अक्षरांत । त्या गणेशाचे गण संस्थित । त्या गणेशास मीं नमित । परमश्रेष्ठ एकदेवासी ॥२७॥
मायास्वरूप सदैव वाचक । दंत मायिकरूप धारक । त्यांच्या योगें एकदंत बुद्धिस्थित । जनभक्तिलालसी नमितों ॥२८॥
चित्त प्रकाशक विविधांत स्थित । लेपादि विवर्जित नमित । भोगविहीन भोगकार असत । त्या चिंतामणीस नित्य नमितों मी ॥२९॥
विनायकासी नायकवर्जितासी । विशेषें ईश्वरात्म्याच्या नायकासी । प्रिये मीं त्या निरंकुशासि । सर्वदासी प्रणास करितों ॥३०॥
सदात्मकासी भावयुत चित्तासी । नमितों सादर मी त्यासी । वेदपुराणें महेश्वरादिक तयासी । देव मानव शोधिती ॥३१॥
नाग असुर योगेश्वर ढुंढिती । ब्रह्मगण जंतू शोधिती । म्हणोनि ढुंढी तयासी म्हणती । प्रणास माझा तयासी ॥३२॥
मायार्थवाच्य मयूरभाव । नाना भ्रमार्थ करितो देव । म्हणून मयूरेश नांव । नमितों त्या मायापतीसी ॥३३॥
ज्याज्या उदरांतून प्रसूत । हें विश्व तैसी ब्रह्में जठरांत । पुनरपि होती संस्थित । अनंतरूप जठर त्याचें ॥३४॥
म्हणोनि लंबोदर म्हणती । तयासी माझी नित्य प्रणती । गळयाच्या खाली जगाची स्थिती । गजात्मक ब्रह्मशिर ॥३५॥
त्यांच्या योगें गजानन म्हणत । तयास माझें प्रणाम सतत । दीनार्थवाच्य हे अक्षर वर्तत । जगताचें तें प्रतीक ॥३६॥
रंब शब्द निगमांत । असे ब्रह्मार्थवाचक ख्यात । उभयतांचा पालक ज्ञात । तया हेरंबा नित्य प्रणाम ॥३७॥
विश्वात्मक ज्याचें शरीर एक । म्हणून वक्त्र परमात्मरूपैक । तुंड तेथे विलसत । त्यांच्या योगें वक्रतुंड ॥३८॥
त्या वक्रतुंडास नित्य नमन । मातापिता हा जगतांचा महान । त्याचे मातापिता कोणी नसून । श्रेष्ठ हा ज्येष्ठराज असे ॥३९॥
ऐसें म्हणती शास्त्र निगम । तयासी माझा प्रणाम । नाना चतुःस्थ निजस्वरूप मनोरम । स्वानंदनाथा त्या नमितों मी ॥४०॥
पूर्णाची पूर्ण समाधिरूप वर्तत । स्थिति ती स्वानंद ख्यात । मनोरथ चराचराचे पुरवित । म्हणोनि आशाप्रपूरक तो ॥४१॥
तयासी माझें नित्य नमन । वरप्रभावें विश्व स्थापून । ब्रह्मविहारी हा पावन । म्हणून वरप्र्द वरद हा ॥४२॥
विप्रमुख हयासी वरद म्हणती । तयासी माझी नित्य प्रणती । मायामय सर्व हें जगतीं । मिथ्यास्वरूप भ्रमदायक ॥४३॥
त्याहून परतर । ब्रह्म वर्णिती । सत्य हा परेश विकट ख्याती । त्यास नमितसें मीं भावभक्ति । धरणीधर आदिभूता नमन ॥४४॥
चित्ताच्या पृथ्वी नानाविध । योगिजन सांगती विशद । त्यांचा धारक एकच योगद । म्हणोनि धरणीधर नाम ॥४५॥
विश्वात्मिका ब्रह्ममयी बुद्धि । विमोहप्रदा ती सिद्धि । त्यांच्या योगें खेळे योगादि । योगनाथ तो सिद्धिबुद्धि ॥४६॥
तयास करितों मी नमन । असत्य सत्‍ साम्य तुरीय वर्तन । नैज्यगनिवृत्तिरूपें रचून । खेळ करी जो स्वयं सदा ॥४७॥
योगमय जो विलसत । त्यास मी सदा वंदित । ब्रह्मणस्पति नाम सार्थ । मांगल्य पतीसी माझें नमन ॥४८॥
अमंगल हें विश्व असत । तें योगसंयोगयुत प्रणश्वर वर्तत । त्याहून परता मंगलरूप युक्त । म्हणोनि शांतिप्रद मांगल्यपति ॥४९॥
सर्वत्र मान्य जो असत । आदिपूज्य शुभाशुभ कार्यांत । सकलांचा प्रकाशक श्रेष्ठ । त्याहून पूजनीय अन्य नसे ॥५०॥
आदिसंमत तो सर्वपूज्य ख्यात । तयासी मीं नित्य वंदित । भुक्ति मुक्ति जो देत । तुष्ट होतां भक्तिप्रिय ॥५१॥
जो निज विघ्नहर्ता । भक्ति हीनासी । विघ्नकर्ता । म्हणोनि विघ्नराज जगता । प्रणाम माझा नित्य त्याला ॥५२॥
नांवांच आर्थ तुजप्रत । प्रिये गंगे सांगितला समस्त । विघ्नेश्वराचें परम रहस्य वर्तत । एकवीस नामें गणेशह्रदयांत ॥५३॥
हीं एकवीस जो जाणून जपत । तो ब्रह्ममय इहलोकांत । गंगा त्यावरी प्रार्थित । गणेशनामांचें ह्रदय कथिलें ॥५४॥
तें ब्रह्मप्रद असत । परी मज त्याचा अनुभद नसत । म्हणोनि शंकरा सांग समस्त । तंत्र ह्या गणेशह्रदयाचें ॥५५॥
शंकर गंगेसी सांगत । मंत्र घेऊन विधियुक्त । पुरश्चरणमार्गें भज तैं उचित । ज्ञान तुजला होईल ॥५६॥
मंत्रराजाचें ह्रदय सांगतो । संक्षेपें तुज विशद करितों । मंत्र हाच गणेश असतो । ते उभभिन्न नसती ॥५७॥
गकार ब्रह्मदेव । अकार तो विष्णुदेव । बिंदु जाणावा शिव । सूर्व अनुनासिक संज्ञेंत ॥५८॥
त्यांचा संधि ती महाशक्ति । हाच मंत्र योगी म्हणती । देवता गणनाथ जगतीं । संयोग करी तयांचा ॥५९॥
त्यांपासून ॐ कारमय उत्पन्न । विश्वप्रिये पूर्वी हा महान । म्हणून ओंकारयुक्त प्रसन्न । गणेश एकाक्षर मंत्र ॥६०॥
तार म्हणजे ओंकार । षड्‍विध तो ख्यात थोर । अकार उकार मकार । नाद बिंदू उभयही ॥६१॥
शून्याते जाण महामायिक । त्यांतील भेद ऐक । शून्य देहिस्वरूप साशंक । बिंदु देह ऐसा ख्यात ॥६२॥
त्या उभययोगें चतुर्विध विश्व । स्थूलादि भेदकर भव । ऐसा मंत्रराज सर्वभव । गजाननाचा तूं जाणत ॥६३॥
शास्त्रोक्त विधानें न्यासादि करून । तदनंतर गणेशपूजन । पूजनानंतर जप विचक्षण । भक्तानें हा करावा ॥६४॥
जपाचा दशांश होम करावा । आगमविधि अनुसरावा । त्याच्या दशांश तर्पण देवा । गणपासी करावा ॥६५॥
त्याच्या दशांश मार्जन । त्याच्या दशांश विप्रभोजन । ऐसें हें पंचांग पावन । यथाविधि त्वरित करितां फलद ॥६६॥
म्हणोनि तूं मंत्रराजाचें पंचक । आचरण करी निःशक । ऐसें बोलून मंत्र पावक । विधिपूर्वंक देत तयासी ॥६७॥
मजला प्रणाम करून । गंगा गेली निघून । करण्या तपश्चर्या महान । विधिपूर्वक तदनंतर ॥६८॥
मयूरेशा समीप जात । गंगा उत्तम तप आचरित । मंत्रध्यानपरायण करित । पुरश्चरण एक सरित्श्रेष्ठा ॥६९॥
तेव्हां गणेश प्रसन्न । प्रकटला वर देण्या उत्सुकमन । भक्तवत्सलाच्या कृपें करून । तिच्या ह्रदयांत ध्यान स्फुरलें ॥७०॥
त्या एकवीस नामांचा जप करित । त्यायोगे अर्थज्ञा ती होत । हर्षयुक्त होऊन वास करित । तेथेंचि ती गंगादेवी ॥७१॥
नित्य भक्तिसमायुक्त । गणनायकासी ती भजत । हें वृत्त ऐकून विचारित । सनकादिक शिवासी ॥७२॥
ब्रह्मभूता नदीश्रेष्ठ भजत । मयूरेशा कैसी तें न समजत । त्याचें कारण आम्हांप्रत । सांग नाथा नमन तुला ॥७३॥
शिव म्हणती ब्रह्मभूत जन । भजतसे सदा प्रसन्न । नवधा भक्तिभावें गजानन । तत्पर होऊन महर्षींनो ॥७४॥
पुत्रकलत्र जननी जनक । मित्र गण द्रव्य सखा एक । वृत्तिज विद्यायुक्त स्वर्ग परैक । मोक्ष तूंच गुरो मजला ॥७५॥
विघ्नपती हाच सर्व असत । परात्पर गुरू सर्वांप्रत । सांसर्गिक मायिक वाचिक आचरत । मानसज कर्म त्याच्यासाठीं ॥७६॥
ज्ञान ह्रदयस्थ जें असत । तेंही विघ्नेश्वरास समर्पित । योगाकारें विघ्नेश होत । एक असून अनेकाश्रित ॥७७॥
तो विविध भोग भोग्त । शुभअशुभ समाश्रित । मी नर नसून साक्षात । गणनायक खेळतों ॥७८॥
स्वामिसेवक भावानें तर । ब्रह्मांत हा ब्रह्म श्रेष्ठ । ऐशा विधीनें विप्र भजत । गणनायका योगबळें ॥७९॥
योगी शुक मुख्यादि सतत । मुद्‍गलादि महर्षि सेवित । हें सर्व कथिलें गुप्त । गणपतीचें ह्रदय येथें ॥८०॥
ह्या ह्रदयाच्या साहाय्यें तोषवावा । विघ्नेश महर्षींनो ध्यावा । जैसें देहेंद्रियांत ह्रदय ठेवा । मुख्य असे सर्वांसी ॥८१॥
त्या ह्रदयांत गणनायक राहत । जीवस्वरूपें विलसत । तैसें हें गणेशह्रदय ज्ञात । त्यांत राहतो योगपती ॥८२॥
तो ब्रह्मनायक साक्षात । हया गणेशह्रदयस्तोत्रें तोषवित । जो नरोत्तम गजाननास विनत । तो भोगितो सकल भोग ॥८३॥
नंतर योगमय होत । ऐसें माझें वचन ऐकती ब्रह्मयुत । तदनंतर मज नमून जात । सर्वही सनकादि तपोवनांत ॥८४॥
एकाक्षर मंत्राचें पंचक सेवून । गणेशह्रदय जाणून । ते सारे गाणपत्य महान । जाहले नंतर सर्वदा ॥८५॥
नित्य गणेशह्रदय जपती । भक्तियुक्त ते हिंडती । स्वेच्छेनें करती भ्रमंती । म्हणोनि तू सेवी गणेशह्रदय ॥८६॥
ऐसें करिता सेवन । गाणपत्य मुख्य होशील सुजाण । मुद्‍गल म्हणती ऐसें वचन । बोलून महानाग शेषा मंत्र देती ॥८७॥
यथासांग मंत्र एकाक्षर । शेष करी त्याचा स्वीकार । शंकरास प्रणाम करून सत्वर । साधिता झाला हा मंत्र ॥८८॥
तो यथान्याय साधून । जाहला तो ह्रदयज्ञ । नित्य ह्र्दयें करी स्तवन । त्या द्विरदानन देवाचें ॥८९॥
गणेशह्रदय पुण्यकारक । जो नर ऐकेल वा वाचील हें पावक । त्यास इच्छित सारें सुखदायक । मिळून अंतीं ब्रह्मभूतत्व ॥९०॥
जो नर हें नित्य वाचित । गणेशाचें ह्रदय पुनीत । तो गणेशचि स्वयं होत । त्याच्या दर्शनें सिद्धि लाभे ॥९१॥
पुत्रपौत्र कलत्रादि लाभत । जो हें श्रद्धेनें वाचील त्याप्रत । धनधान्य सुविपुल प्राप्त । आरोग्य अचल श्रीसंपत्ति ॥९२॥
एकवीस दिवस एकवीस वेळ वाचित । गणपतीचें चिंतन करित । त्यास ईप्सित सर्व लाभत । असाध्यही साध्य होय ॥९३॥
राजबंधनांतून होत मुक्त । त्रिकाळ पाठ करिता भक्तियुक्त । मारण उच्चारणादि विधि नष्ट । वश्य मोहादि शत्रूंचे ॥९४॥
परकृत्याचा प्रणाश होत । संग्रामांत जय लाभत । वीरश्री संयुक्त होत । याचे पाठें न दुर्लभ कांहीं ॥९५॥
विद्या आयुष्य यश प्रज्ञा लाभत । अंगहीनास अंग प्राप्त । जें जें चिंती तें तें प्राप्त । होतसे निश्चित मर्त्यासी ॥९६॥
यासदृश अन्य कांहीं नसत । शीघ्र सिद्धिकर जगांत । क्षाक्षात गणपतीनें सांगितलें असत । तें तुज निवेदिलें ब्रह्मदेवा ॥९७॥
गणेशभक्तिहीनासी । दुर्विनीतासी विद्वेषकासी हें गणराजह्र्दय देऊ नये भलत्यासी । युक्त जो त्यासीच द्यावें ॥९८॥
गणेशभक्तियुक्तास । साधूस प्रयन्त करणारास । द्यावें तेणें विघ्नेशास । प्रेम वाटून प्रसन्न तो ॥९९॥
महासिद्धिप्रद हें ह्रदय तुजप्रत । सांगितलें दक्षा अद‍भुत । आतां काय ऐकण्या चित्तांत । इच्छा तुझ्या सांग असे ॥१००॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनपिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते गणेशह्रदयकथनं नामैकोनपंचाशत्तमो‍ऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP