खंड ८ - अध्याय ४२
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ कौंडिण्य म्हणे ब्रह्मदेवास । भ्रशुंडी-देवर्षीचा संवाद सुरस । त्यांतही गणेशमहिमा विशेष । विशद करून मज सांगा ॥१॥
ब्रह्मा सांगें वृत्तान्त । एकदा सर्वं मुनिजन विचार करित । सर्व मिळून विधात्यास भेटत । संशय मनीचा दूर करण्या ॥२॥
मज लोकध्यात्यासी प्रणाम करून । सर्व हर्षित होऊन । काश्यपादि देवेंद्र मुख्य प्रसन्न । म्हणती सारे देवर्षी ॥३॥
सर्वपूज्य हा गणेश असत । सर्वादिपूज्य वर्तत । नामरूपधर अव्यक्त । ब्रह्मणस्पतिवाचक ॥४॥
वेदांत ऐसें असे ख्यात । ब्रह्मच केवळ असत । त्यांत सगुण निर्गुण भेद नसत । ऐसें रहस्य जाणावें ॥५॥
देहधारी गणेशान । वेदांत ऐसें ब्रह्मणस्पति अभिधान । म्हणोनि संशययुक्त मन । तुज प्रश्न विचारितों हा ॥६॥
तूं योगिवंद्य साक्षात । सर्वांचा प्रपितामह विख्यात । आमचा संशय दूर करी । समस्त अनुभवानें तादात्म्यें ॥७॥
ब्रह्मा म्हणे त्या समयीं मी शांत । त्याचें वचन ऐकून चिंतायुक्त । कांहींच न बोलता मोहयुक्त । बैसली मुग्ध भावानें ॥८॥
त्या सर्वांसहित मी विधि जात । केशवाच्या सन्निध भ्रान्त । त्यास प्रणाम करुन विचारित । संशय देव ऋषींचा ॥९॥
विष्णूसही त्याचे उत्तर । येत नव्हतें साचार । त्यांच्यासह तो सत्वर । शंकराकडे निघून गेला ॥१०॥
ज्ञानसिद्धिस्तव ते नमित । गिरिजानाथासी विनत । आपुला संशय सांगती समस्त । शिवशंकरही निरूत्तर ॥११॥
परी तैं शिव स्वचित्तांत । गणेश्वरास स्वगुरूस स्मरत । सुखदायक वचन सांगत । प्रत्युत्तररूपानें ॥१२॥
आदिमध्यान्तीं वसत । भ्रुशुंडी मुनिश्रेष्ठ सतत । सर्वभावज्ञ हितकारक असत । तो आपणा सर्वांसी ॥१३॥
तो भ्रुशुंडी आपणांस सांगेल । गणेशनामाचें महिमान विमल । त्यास सर्व ज्ञात असेल । म्हणोनि सिद्धेश्वर ऐसा ख्यात ॥१४॥
तदनंतर शंकरासहित । ते देवर्षी जाती भ्रुशुंडीप्रत । जो महाभाग पवित्र आश्रमांत । निवास करून राहिला ॥१५॥
देवर्षीसी प्रणाम करून । यथायोग्य त्यास पूजून । तो म्हणे हितकारक वचन । धन्य माझा जन्म वाटे ॥१६॥
धन्य माझें कर्मादि वाटत । जेणें तुमचें दर्शन घडत । सांगावें कोणत्या कारणें सांप्रत । आलात आपण सारे येथ ॥१७॥
साक्षात् गणपतीचे विभूतिपदधर । आपण गणेशरूप थोर । मज पावन करण्या उदार । येथ आगमन केलेंत ॥१८॥
भ्रुशुंडीचें ऐकून वचन । शंकर बोले त्यास नमून । महाभागासी योगींद्रासी पूजून । गुरूंच्या गुरुसी स्तवूनी ॥१९॥
गणेशाचें महत्त्व जाणसी । साक्षात् शुंडाधर तूं अससी । यांत कुठे संदेहासी । अल्पही जागा दिसत नाहीं ॥२०॥
म्हणून संशय दूर करावा । आम्हांसी मार्ग दाखवावा । नामरूपधर नित्य बरवा । विघ्नेश्वर हा कैसा ख्यात ॥२१॥
ब्रह्मणस्पति संज्ञा तयाप्रत । वेदवेदांत असे ज्ञात । त्यांचें वचन ऐकून म्हणत । अहामुनि तो तयांसी ॥२२॥
सर्व सारज्ञ गाणपत्य श्रेष्ठ । गणेशभक्तांत तो वरिष्ठ । गः शक्ति सूर्यं अः प्रोक्त । णः विष्णु अः शिव असे ॥२३॥
त्यांचा स्वांमी गणेशान । म्हणोनि ब्रह्मणस्पति महान । गण समूहवाच्य असून । बाह्यांतरभावें एक तें ॥२४॥
त्यांचा स्वांमी गणेश । त्यायोगें हा ब्रह्मणस्पति सर्वेश । अथवा ग अविबोधरूप विशेष । ण स्वानंद निवृत्ति कर ॥२५॥
त्यांचा स्वांमी गणेशान । त्यायोगें ब्रह्मणस्पति प्रसन्न । विश्वें ग प्रसून असून । ब्रह्में ण अन्तर्गत ॥२६॥
त्यांचा ईश गणेश असत । म्हणोनि ब्रह्मणस्पति ख्यात । ऐसें नाना अर्थ युक्त । नान असे त्या महात्म्याचें ॥२७॥
त्याचे अर्थ अनेकविध । कोण सांगूं शके विर्वेध । चित्तरूप महामाया पंचविध । बुद्धि भ्रांतिप्रदा असे ॥२८॥
सिद्धिमाया परा ख्यात । त्या दोघापासून निर्मित । आपुल्या क्रोडेस्तव नानाविधियुक्त । विश्वे होती मोहयुक्त ॥२९॥
ब्रह्में ब्रह्मांत स्थित । त्यांचा मोह दूर करण्या सतत । योगदानार्थ आदरयुक्त । नामरूपधर गणेश झाला ॥३०॥
अर्थ सत्ता समायुक्त । नाम त्याचें जरी असत । तरी नाशविनाशादि युक्त । भेद कैसे संभवती ॥३१॥
तेव्हां गणेशाचें स्वरूप वर्णन । करितों सुखप्रद जें पावन । जेणें तुम्हीं संशयहीन । होऊन भजाल निरंतर तें ॥३२॥
समष्टिव्यष्टिरूप युक्त । कुंभस्थळ त्याचें ख्यात । वेदत्रयी त्रिनेत्ररूपांत । शुंडा तुरीय वाचक ॥३३॥
धर्म अधर्म हे दोन अधर । बिंदु गळा असे थोर । देही आत्मा हा दंत सुंदर । सदैकबोध जठर वाचक ॥३४॥
सांख्य शास्त्र हें त्याचे कान । अर्थंवाचक कर शोभन । मायामायिकरूप चरण पावन । गणपतीचे प्रसिद्ध असती ॥३५॥
यांचा संयोगरूप ज्ञात । देह त्याचा सुरर्षीनो समस्त । स्वसंवेद्यात्मक हा ख्यात । योगी जन तत्त्वदर्शकांसी ॥३६॥
त्यांच्या अभिमानशून्यत्वें असत । गणेश हा अयोग वाचक जगांत । देहधारी गणेशाचा देह असत । संयोग उभयविध ॥३७॥
संयोग अयोगांच्या योगें होत । देहधारी गजानन उदात्त । योगदानार्थ होत । जगतांच्या ब्रह्मांच्या पर ॥३८॥
कंठाखालीं विश्व असत । शिर हें गजात्मक ब्रह्म ज्ञात । त्यांच्या संयोगें शोभत । देहधारी गजानन ॥३९॥
ऐशियापरी नाना अर्थभावें ध्यात । योगी अमल तयांस चित्तांत । गणपतीचा देह असत । प्राज्ञांनो मायामोहवर्जित ॥४०॥
शब्दार्थ सत्तेनें युक्त । त्याचें शरीर विराजत । नाश-अनाशभाववर्जित । तैसेंचि तन्मय तें असे ॥४१॥
ऐसें हें नामरूप रहस्य समस्त । सांतितलें तुजला सांप्रत । जैसें मुद्गलें वर्णिलें असत । तैसेचि हें महाभाग हो ॥४२॥
गणेश नाम एकवार जपत । तरी नर होईल ब्रह्मभूत । द्विवार जपतां करित । ऋणी आपुला गणेशासी ॥४३॥
गणेश ऐसें एकदा जपत । तरी जगद्ब्रह्माचा योग स्मृत । म्हणून गणेश नाम न स्मरत । तो दुरात्मा जाणावा ॥४४॥
त्या नामवर्जिताचा संग टाळावा । तो चांडाळ शिरोमणि मानावा । गणेशासी जप करून साधावा । नानाविध विश्व ब्रह्मसन्मान ॥४५॥
जो गणेशरूपाचें ध्यान करित । तो जगद्ब्रह्माचा योग साधित । जो गणेश मूर्तिरूप पाहत । नाना ब्रह्मे त्यानें पाहिलीं ॥४६॥
विश्वें तैशीं ब्रह्में वर्तत । गणना त्यांची वर्णनातीत । त्यांचें पूजन अशक्य असत । अनंत भावानें त्यांच्या ॥४७॥
परी त्याचा सुलभ भाव । व्हावा म्हणोनि नामरूपधर देव । ढुंढि जाहला योगमय प्रभाव । भक्तिलालस हा महाप्रभू ॥४८॥
त्याचें करितां पूजन मनन । जगद् ब्रह्माचें साधे पूजन । विविध शांतिरूप जें महान । यांत काहीं संशय नसे ॥४९॥
गणपाचें हें सर्व रहस्य वर्णिलें । नामरूपात्मक पूर्ण संक्षेपें भलें । सुरर्षींनो पाहिजे विशेषें केलें । भजन त्याचें संशयवर्जित ॥५०॥
ऐसें बोलून महायोगी भ्रुशुंडी थांबत । सर्वसारज्ञ जो गणेशभक्त । मूर्तिमंत गणेशचि वाटत । कथिला ज्यानें नाममहिमा ॥५१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीसन्मौद्गले महापुराणे अष्टमे खण्डे धूम्रवर्णचरिते गणेशनाममाहात्म्यकथनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP