खंड ८ - अध्याय ३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शिवशंकर कथा सांगती । महामुनी ती श्रवण करिती । अहं असुरेश माजला अती । स्वयं निघाला दिग्विजया ॥१॥
रथावरी आरूढ झाला । पुत्रासह त्या वेळा । प्रधानासहित असुरसंघ चालला । नाना वर्णपर महाक्रूर ॥२॥
काळासही भय वाटावें । ऐसें उग्ररूप त्यांचें जाणावें । नाना वाहनांतून चालावें । अहं असुरेन्द्रामागून ॥३॥
चतुरंग सैन्यांत शोभत । दैत्य नायक बळवंत । पृथ्वी जिंकण्या इच्छित । शंखादी महावीरांसहित तेव्हां ॥४॥
शंखादी महावीरांनी जिंकिले । पृथ्वीवरील नृप बंदी झाले । कांहीं जखमी कांहीं मेले । कांहीं आले शरण त्यांना ॥५॥
जे श्ररण आले त्यास सांगती । कारभार द्यावा आम्हांप्रती । आमचे सेवक होऊन जगतीं । राज्य कर आनंदानें ॥६॥
ते समस्त असुर जिंकित । सप्तद्वीपवती पृथ्वी त्वरित । तदनंतर पाताळांत प्रवैशत । दैत्येंद्र नागमुख्या जिंकण्या ॥७॥
परी शेषनाग अन्य नागांसहित । त्यांना आला शरण क्षणांत । जाणून वरदानप्रभाव मनांत । सामोपचार करी दैत्यांशी ॥८॥
वार्षिक कारभार स्वीकारून । शेष मनीं दुःखी होऊन । स्वस्थळीं गेला नागेंद्र महान । परी दैत्य काय करिती ॥९॥
त्याच्या राज्यांत स्थापिती । कांहीं असुरांसी निश्चिति । शेषनागावरी ते ठेविती । पहारा नित्य स्वबळानें ॥१०॥
त्यानंतर दैत्येंद्रांसहित । शूक्राच्या मार्गदर्शनें युक्त । अहं असुर प्रतापवंत । स्वर्गलोकीं प्रवेशला ॥११॥
तो महा तेजस्वी गर्वयुक्त । इंद्राकडे दूत पाठवित । दूत देवराजास नमून सांगत । निरोप अहं असुराचा ॥१२॥
इंद्र तो ऐकून क्रोधयुक्त । देवमुख्यांसह भेटण्या जात । आंगिरसासी त्वरित । सत्कार करी मुजि तयाचा ॥१३॥
रागावून इंद्र सांगत । असुरांचें जयवृत्त । अहं असुर वरप्रभावें महाबळयुक्त । आज दूत त्याच्या आला ॥१४॥
तो मज निरोप सांगत । शरण यावें देवांसहित । इतुका झाला मदोन्मत्त । आता काय करावें ? ॥१५॥
आपण सर्वज्ञ देवपक्षांत । स्वामी म्हणून आलों तुजप्रत । तुझ्या आज्ञावश समस्त । सांगा आतां उपाय कांहीं ॥१६॥
तेव्हां आंगिरस गुरु सांगत । अहं असुर गणेशवरें मत्त । यांत संशय कांहीं नसत । जिंकील सर्वही ब्रह्मांड ॥१७॥
म्हणून शरण जाणें न शोभन । जाऊया विधात्याकडे आपण । तो श्रेष्ठ सर्वभावें असून । करील हित तोचि आपुलें ॥१८॥
तदनंतर सारे त्वरा करून । विधात्यासी भेटले जाऊन । इन्द्रासहित देव त्यास नमून । सांगती दैत्यज वृत्तान्त सारा ॥१९॥
तो ऐकून खेदखिन्न । ब्रह्मा जाई त्यांस घेऊन । शंकराकडे त्वरा करून । प्रणाम करून सर्व सांगे ॥२०॥
शंकरही निःश्वास सोडित । ऐकून त वृत्तान्त । त्या सर्वांसह त्वरित जात । विष्णूजवळी त्या समयीं ॥२१॥
त्यांचें वचन ऐकत । तैं विष्णु क्रोधयुक्त । महेश्वरासी आश्वासन देत । पराक्रमपूर्ण वचन बोले ॥२२॥
मीं महादैत्या त्या असुरांसहित । मारीन रहा निश्चिंत । मायायुक्त अहं असुर असत । परी मज माया न बाधेल ॥२३॥
ऐसें बोलून महादेवाप्रत । अन्य देवांसह महाभाग तेथ । दैत्य पैरूषाची वाट पहात । वैकुंठांतच राहिला ॥२४॥
अहंकारासुरासी ज्ञात । जेव्हां हा सकल वृत्तान्त । तो प्रवेशला अमरावतींत । दैत्येंद्रांसह हर्षभरें ॥२५॥
इंद्रासनीं तो विराजत । अप्सरा गण त्यात सेवित । गंधर्व त्याचि स्तुति गात । शोभला अत्यंत वैभवें ॥२६॥
तदनंतर देवपदांवरी  स्थापित । असुरांसी तो स्वर्गांत । स्वर्ग थोर भोगी समस्त । असुरांसह सासर्‍यासमवेत ॥२७॥
तदनंतर तो महाबळवंत । दैत्यसंघ घेऊन ब्रह्मलोकीं जात । तैं पाहून विधिहीन हर्षित । ब्रह्मासनावरी बसला ॥२८॥
भोगिले विविध भोग परम । तदनंतर गेला कैलासीं अभिराम । तो लोक जिंकून सकाम । भानुलोक जिंकला शक्तिलोकही ॥२९॥
तेथविलास विविध भोगून । विकुंठविजयार्थ उद्यतमन । दूत पाठवी कालासम भयदर्शन । केशवाप्रती त्या समयीं ॥३०॥
काल नामक तो दूत । केशवासी जाऊन सांगत । मी अहं असुराचा दूत । समेट करण्या आलों असे ॥३१॥
हा वैकुंठ लोक सोडून । देवांसहित जा त्वरा करून । जेथ इच्छी तुझें मन । अन्यथा तुज मीं मारीन ॥३२॥
माझी सूचना जरी न संमत । तरी युद्ध करी मजसमवेत । काळाचें वचन ऐकून क्रोधयुक्त । केशव म्हणे तयासी ॥३३॥
त्या दूतास जणू जाळित । विष्णूचे शब्द तेजयुक्त । श्रीविष्णू म्हणे जा सांग त्वरित । अरे मंदविक्रमा अहं असुरा ॥३४॥
तूं काय मज सांगसी । मीच मारीन क्षणीं तुजस्ती । तैसेची दैत्यसेनेसी । जा दूता तूं तुज अभय ॥३५॥
तुज खलाधमा न मारीन । दूतत्वाचा मान राखीन । सांग स्वामीस जाऊन । सोड आपुलें राज्यपद ॥३६॥
तैं कालासुर दूत परतला । दैत्यसभेंत त्यानें निवेदिला । निरोप जनार्दनाचा आला । तो ऐकतां राग अनिवार ॥३७॥
सारे दैत्यगण क्रोधयुक्त । अहंकारासुरासमवेत । युद्धार्थ झाले उद्युक्त । तेव्हां विचारी अहं तयांसी ॥३८॥
दैत्यमुख्यांस हितावह वचन । बोले अहं असुर निश्चिंतमन । महाबलहो कां खिन्न । झालात तुम्हीं चिंतातुर ॥३९॥
अमोघ अस्त्रांनी देईन । तुम्हांसी मी सुखसमाधान । ऐसें बोलून तत्क्षण । सज्ज केलें धनुष्य त्यानें ॥४०॥
मनीं तो अत्यंत संतप्त । मंत्रून अग्निअस्त्र सोडित । तें दशदिशांस जाळित । वैकुंठावरी चाल करी ॥४१॥
देव अत्यंत क्षोभयुक्त । वरुणास्त्र तेव्हां सोडित । परी तें अग्न्यस्त्र न शांत । प्रखर तेज तयाचें ॥४२॥
म्हणोनि देवगण भयभीत । पळती होऊन अग्निपीदित । वैकुंठ सोडून ते जात । वरूणदेव तेव्हां काय करी ॥४३॥
चंद्रासहित रणांगणांत । पर्जन्यवृष्टी तो करित । परी त्या पर्जन्यजलेंही न विझत । परमदारूण अस्त्राग्नी ॥४४॥
वरूणही पळाला चंद्रासहित । तेव्हां शक्ति महास्त्र सोडित । वरुणात्मक तें वर्षत । जळधारा अकस्मात ॥४५॥
परी जणूं घृतपूरित । तैशियापरी अग्नि प्रदीप्त । मायायुक्त तो दहन करित । अति प्रखर स्वतेजानें ॥४६॥
तेव्हां होऊन संतप्त । शक्ति पळाली क्षणांत । क्रुद्ध होऊन सूर्य येत । त्या असुराशी लढावया ॥४७॥
तोही स्ववीर्यसंयुक्त । वरूणास्त्र वेगें सोडित । परी त्याचाही दाह होत । दिवाकर म्हणोनी पळाला ॥४८॥
तदनंतर शिव क्रोधसमन्वित । स्वयं रणक्षेत्रांत लढत । तोही होऊन अति पीडित । पळून गेला रक्षणार्थ ॥४९॥
विष्णू नंतर अति खेडयुक्त । स्वयं दारूण शस्त्र सोडित । तथापि तो अग्नि न शमत । परम दारून सर्व सर्व भयंकर ॥५०॥
अतिदाह होऊन जनार्दन । करी तेथून पलायन । सर्व देवही भयग्रस्त मन । गिरिकंदरीं पळाले ॥५१॥
गिरिगुहांत गुप्त राहती । कंदमुळें ते खाती । ऐसें त्यांचे दिवस जाती । परी असुरांस कळलें वर्तंमान ॥५२॥
तेव्हां ते आपापल्या शस्त्रांसहित । असुरवीरांच्या संगतींत । आग्नेय दिशेस जात । वैकुंठीं हर्षभरानें तें ॥५३॥
तेथ राहून चित्तांत । अभिमानें तो मदोन्मत्त । माझ्याहून श्रेष्ठ कोणी नसत । ऐसा गर्व त्याचे मनीं ॥५४॥
तदनंतर अहं असुर नेमित । आपले असुर अधिकारी सर्व जगांत । गर्वास शिवपदीं स्थापित । श्रेष्ठास स्थापिलें वैकुंठीं ॥५५॥
आपुले पुत्र कैलास वैकुंठांत । नेमून अन्य जागांत । पिशुनास शक्तिलोकांत । वेदघ्नास नेमियले ॥५६॥
प्रमादास ब्रह्म लोकांचा नाथ । शंखास इंद्रपद देत । कालास यमलोकीं नेमित । कमळास वरूणलोकीं ॥५७॥
अधर्म घारकास कुबेरपदावर । स्थापून तो महा असुर । महाबळी परतला सत्वर । स्वनगराकडे तदा ॥५८॥
तेथ राहून करी शासन । ब्रह्मांडाचें गर्वितमन । मनीं म्हणे माझ्यासमान । तेजस्वी ना कोणी असेल ॥५९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खण्डे धूम्रवर्णचरिते अहमसुरब्रह्मांडजयो नाम तृतीयोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP