मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय २८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शिवदत्त म्हणे गर्गाप्रत । महायोग्या माझ्या मनांत । एक शंका सदा वसत । समाधान तिचें करावें ॥१॥
योगी जन येथ जगांत । नाना मतें प्रतिपादित । कोणी शिवास भजा म्हणत । कोणी सांगती रविउपासना ॥२॥
कोणी शक्तिपूजा उपदेशिती । कोणी गणेश्वरा पूजा म्हणती । कर्मज्ञान विदेहकारी म्हणती । वर्णिती आत्मज्ञान श्रेष्ठ ॥३॥
योगमत सांख्यमत । आनंद अव्यक्तादींनीं बोधित । अन्न प्राण मन इत्यादि असत । बहुविध मतांतरें ॥४॥
परी गर्गा ताता तूं सतत । गणेश्वर श्रेष्ठ ऐसें मानित । सर्वभावें तेंच सांगत । तरी सर्वमान्य गति कोणती ?  ॥५॥
गर्ग तेव्हां शिवदत्ताप्रत । म्हणे परागति तुज सांगत । असे ऐतिहासिक एक चरित । एकचित्तें ऐक वत्सा ॥६॥
एकदा नैमिषारण्यांत । वसिष्ठें आरंभिला यज्ञ पुनीत । विप्रेंद्र देवेंद्र तेथ येत । नाना वर्णाचे प्राज्ञजन  ॥७॥
श्रेष्ठ त्रैलोक्यनिवासी । मुदितमनें आले यज्ञासी । वसिष्ठाच्या महोत्सवासी । शुक मुख्यादि योगिजन ॥८॥
नागशेषादिक जमले । हर्षभरें चर्चा करूं लागले । तेथ वेदान्तवादांत कुशल सांगते झाले । परस्परांशी आपुली मतें ॥९॥
आपापलें मत श्रेष्ठ म्हणती । आपुल्या तत्त्वीं दृढमती । नाना प्रकारें वाद घालिती । परी निर्णय होईना ॥१०॥
तेव्हां शुकास नमस्कार करून । सर्वजण म्हणती वचन । भगवंता सर्वसारज्ञा हितवचन । सांप्रत आपुलें सांगावें ॥११॥
योगींद्रांत महामते तूं श्रेष्ठ । शास्त्रवादांत पारंगत । सार हितकारक आम्हांप्रत । सांग आतां आम्हांसी ॥१२॥
योगींद्रांत शुका श्रेष्ठ अससी । विभूतिपदवीयुक्त तूं जगासी । तुझें वचन आम्हां सर्वांसी । अधिकृत सेवनीय सर्वंदा ॥१३॥
त्यांचें तें ऐकून वचन । शुक स्मरे मनीं गजानन । नंतर सर्वसारज्ञ बोले प्रसन्न । सर्वांसमक्ष त्या सभेंत ॥१४॥
अन्नकोशमय जें ब्रह्म । तें अन्न नामक राजसंमत मनोरम । जागृतींत स्थूलस्वरूप परम । वेदवाणी असे सांगे ॥१५॥
प्राण ब्रह्म असे शरीरांत । प्राणकोशांचा प्रकाश करित । मन कोशमय ब्रह्म कीर्तित । मनोमय तें जाणावें ॥१६॥
विज्ञान कोशगत ब्रह्म वर्तत । विज्ञानपद वाचक ज्ञात । तीन कोशांत जें स्थित । सूक्ष्म तें स्वप्न अंतरंगीं ॥१७॥
आनंद कोशांत जें स्थित । बुधजन । आनंदमय त्यास म्हणत । तें सुषुप्तीत उभयत्र वर्तत । सम ऐसा वेदविचार ॥१८॥
चैतन्य जें चेतनेंत वसत । ब्रह्मात्म्याचा प्रत्यय देत । तुरीय अस्मिताख्य ज्ञात । नाददेह प्रकाशक तो ॥१९॥
बिंदुमय जें ब्रह्म देहात्मधारक । चार देहांचा संयोगकारक । संयोगी त्वंपद । आश्रयक । ऐसें रहस्य जाणावें ॥२०॥
उत्पत्ति स्थिति नादयुक्त । चतुर्विध ब्रह्म शास्त्रोक्त । प्रचुराख्य चतुर्देहांत । म्हणोनि त्वंपदसंज्ञा तया ॥२१॥
चतुर्विध देहांत स्मृत । देही सदात्मक वर्तत । उत्पत्तिस्थिति नाशहीन असत । सोऽहं पदाचा आश्रय ॥२२॥
बिंदु मोहयुक्त सतत । भ्रांतीने नानरूप भासत । एकलाच स्वयं वेदांत वर्णिला असे तत्पदाश्रय ॥२३॥
जो देहाचा अभिमान धरित । तो जीव ऐसें सर्व वर्णित । देहाभिमान ज्यास नसत । तोच परमात्मा जाणावा ॥२४॥
देहदेहीचा समायोग होत । तो योग असिपद ख्यात । मनोवाणीविहीनत्व वर्तत । बोधरूप त्यास म्हणती ॥२५॥
जो न बाह्म न आंतर । न रूप न अस्मितात्मक थोर । चारांच्या संयोगांतही नसे खरोखर । बिंदुमात्रात्मक तो असे ॥२६॥
सोऽहंकार रूपस्थ तो नसत । सदा तो भेदविवर्जित । म्हणोनि काय वर्णावें सांप्रत । बोधरूप तो असे ॥२७॥
बोधानें होय सर्व ज्ञात । बोधाचा बोधक नसत । म्हणोनि बोधमय ख्यात । ब्रह्म असि पदानें जें युक्त ॥२८॥
प्रकृतीच्या संगे बोध । पुरुषधारक सुबोध । प्रकृति पुंभवसौख्य शोध । जाणतसे तो सर्वदा ॥२९॥
प्रकृति पुंभवसौख्य जाणून । स्वतः निर्मिती करून । द्विधा भावें खेळतसे प्रसन्न । विशेषें असि पदात्मक ॥३०॥
म्हणोनि हा स्वतः उत्थान । ऐशा नामें ज्ञात महान । बोधामुळे उत्थानभाव उत्पन्न । होतसे हो सुविचक्षणांनो ॥३१॥
त्यापलीकडे विबोध नाम । खेळवर्जित ब्रह्म मनोरम । तें बोधनाशानें लाभे अभिराम । योग्यांसी परम मोदप्रद ॥३२॥
बोधनाश होता समर्थ । मोजण्या संख्या कोण यथार्थ । म्हणोनि सांख्यपर ब्रह्म सार्थं । संख्यानाशें वर्णिलें ॥३३॥
देहदेहिमयांत सतत । ब्रह्म असे द्वैतस्थित । स्वस्वबावविहीन वर्तन । म्हणोनि विबोधक परम तो ॥३४॥
बोध होतां विषयादिकांत । उत्थान मानवांचें होत । बोधनाश जैं होत । तेव्हां उत्थानवर्जित ते ॥३५॥
ब्रह्मांत ब्रह्मभूताचें उत्थान । कदापि न होत उत्पन्न । उत्थानवर्जित सांख्य ब्रह्म वर्णन । योगीजन करिताती ॥३६॥
जेव्हां उत्थानसंयुक्त । ब्रह्म असत्‍ व्यक्त । तेव्हां उत्थानविहीनांत । योगी जनांचें मन रमतें ॥३७॥
त्यापुढें उत्थानसंयुत । सांख्यसंज्ञित ब्रह्म ज्ञात । ब्रह्मोत्थानाविना होत । उत्थान तें अन्य मार्गानें ॥३८॥
त्यांच्या अतीत स्वसंवेद्य ब्रह्म । संयोगधारक परम । सर्व ब्रह्मांचा अनुपन । तेणें विप्रहो तें तन्मय ॥३९॥
स्वस्वरूपाहून परब्रह्म नसत । संयोगाख्य जें वर्तत । तेथे उत्थानहीन असत । तैंसेंचि उत्थानसहितही ॥४०॥
तेच पंचवा जन्मत । स्वानंदवाचक ब्रह्म ख्यात । असत सत्‍ सम नेति वर्तत । पांचवे तें आनंदरूप ॥४१॥
जेथ तें अन्नं ब्रह्म ऐसें सांगत । श्रुति तेथ अन्नमय असत । अन्न उपाधियोगें तयाप्रत । नाम तें लाभे विचक्षण हो ॥४२॥
त्याच्या अनुभवरूप । ह्रदयांत योग्यांच्या जें उत्पन्न होत । तें रुपक त्याचेंच ज्ञात । नामरूपात्मक सर्वदा ॥४३॥
समाधीच्या योगें त्यागित । योगी तें प्राणब्रह्मांत । अन्नाचा लय तेथ होत । स्वयमेव त्या वेळीं ॥४४॥
ऐशा प्रकारें क्रमानें होती । योगींद्र स्वानंदस्थ जगती । सर्व ब्रह्में त्यागून करिती । समाधियोगें प्रानादिक ॥४५॥
त्यांचा तेव्हां लय होत । म्हणोनि तीं उत्पत्तिनाशयुक्त । उत्पत्तियुक्त जें असत । तें असद्रूप म्हणताती ॥४६॥
म्हणौनि सन्मूलक असावीं । ब्रह्में स्वस्वमोहें बरवीं । बोधसांख्यात्मक व्हावी । स्वस्वरूपें तयांचीं ॥४७॥
तेथ उद्‍भूत होऊन । अंतीं योगभावें लय पावून । सद्रून स्वानंद पावन । नाना ब्रह्मांत संस्थित ॥४८॥
ती शक्ति वेदवादांत । शाक्त ब्रह्म नामें ख्यात । असतांत खंडमय वर्तत । जीवन जे अनुपम ॥४९॥
सद्रूप स्वस्वख्य मनमोहन । तेंच आत्मरूप सूर्याचें पावन । त्यांचा निर्माता साक्षात शोभन । स्वानंदनामें ज्ञात असे ॥५०॥
विष्णु तो ख्यात वेदांत । प्रवेशून तेथ होत । तिघांचा कर्ता स्वाधीन अव्यक्त । तो शिव वर्णनातीत ॥५१॥
शक्ति सूर्य विष्णु शिवांचा होत । मंत्रसंयोग तो पूर्ण स्वानंद असत । चतुर्विध निर्मूंन पुनरपि संहारित । स्वानंद ब्रह्म मायायुत ॥५२॥
ब्रह्मांचा तैसा जगतांचा भाव । त्यायोगें होय संभव । भवप्रत्ययसंज्ञ स्वस्वरूप ठाव । तेंचि ब्रह्म जाणावें ॥५३॥
समाधिसंज्ञ ब्रह्म । अन्वयभावें सर्वत्र अभिराम । भवप्रत्यय योग मनोरम । महा ओज युक्त तें ॥५४॥
त्यापरतें परम योग नाम असत । ब्रह्म मायाविवर्जित । मायेनें सर्व वर्णन उपजत । त्यावर्जित अवर्णनीय ॥५५॥
ब्रह्मांचा हा जगद्रूप खेळ चालत । मायायोगें सतत । त्यांचा संयोग तेथ घडत । अयोगांत काय उरणार ॥५६॥
जें जें उत्थानयुक्त । तें तें बोधमय ख्यात । उत्थानवर्जित तें ज्ञात । सांख्यविबोधग नांवानें ॥५७॥
समाधिसंज्ञ जें वर्तत । तेव्हां ते स्वानंद नामें प्रख्यात । स्वतःत प्रवेश करिता होत । अयोगांत शब्दातीत ॥५८॥
ब्रह्म ब्रह्मांत होत स्थित । तेव्हां न होय गतागत । व्यतिरेकात्मयोगें असत । योग्यांची गति ब्रह्मांत ॥५९॥
सदा निवृत्तिसंज्ञ असत । ब्रह्म तें मायाविर्जित । स्वस्वरूपहीनत्वें लाभत । निवृत्ति तदा सत्यार्थे ॥६०॥
मायानाशार्थ उपाय असत । उपाय एकला अद्‍भुत । ब्रह्मयोगात्मक तो ज्ञात । उपायप्रत्यय नावानें ॥६१॥
अयोगें परम ब्रह्म लाभत । शांतिदायक योगाख्य निश्चित । संयोग अयोगयोगें हस्तगत । योगिनायकांच्या अनुक्रमानें तें ॥६२॥
तेच परमब्रह्म योगरूप असत । गणराज हा ब्रह्मणस्पति ख्यात । ब्रह्मांचा जो ब्रह्मरूप साक्षात । शांतियोगानें लाभतो ॥६३॥
संयोगांत गणराज ज्ञात । गकार अक्षरांत । अयोगांत णकारीं विलसत । त्यांचा पतिअ तो गणपति ॥६४॥
ऐसें हें वेदांतसार । योगमार्गानुसार । त्यास भजा तुम्ही सादर । जरी शांति इच्छा मनीं ॥६५॥
गर्ग म्हणे ऐसें सांगून । शुकयोगी धरी मौन । सर्व होऊन विस्मितमन । वाहवा वाहवा म्हणती तैं ॥६६॥
आपापलें मन त्यागून । निःसंशय समस्त आम्ही होऊन । गणेशभजनों रममाण । जाहालों तैं पुत्रा शिवदत्ता ॥६७॥
क्रमानें शांति लाभून । गाणप प्रसिद्ध होऊन । गणेश्वराप्रत जाऊन । योगशांतिदरूप झाले ॥६८॥
शुकगीता तुज सांगितली । ब्रह्मदायिनी जी भली । ही जो ऐकेल वा वाचील सगळी । ब्रह्मरूप तो होईल ॥६९॥
यासदृश अन्य ज्ञान । अन्यत्र नसे योगप्रद पावन । श्रवणें सर्व सिद्धि लाभून । क्रमाक्रमानें मुक्तिलाभ ॥७०॥
जें जें मानव इच्छित । तें तें पावेल निश्चित । अंतीं स्वानंदवासी होत । ब्रह्मरूप त्यायोगें ॥७१॥
शुकगीतेसम नसत । अन्य कांहींही थोर जगांत । वेदोपनिषदांचें सारभूत । ऐसी ही असे शुकगीता ॥७२॥
दुर्जनास ही न सांगावी । वेद गुह्यमयी बरवी । शुद्धचित्त योग्यांस द्यावी । प्रयत्नपूर्वक ही पुत्रा ॥७३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमें खण्छे धूम्रवर्णचरिते शुकगीताकथनं नामाष्टाविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP