मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय १९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक प्रार्थिती सूतास । महिन्यांचें चरित आम्हांस । सर्वार्थकोविदा अतिसुरस । मलमासाचेंही वर्णन करावे ॥१॥
सूत सांगे ब्रह्मांगातून । संवत्सर प्रतापवान । बारा महिन्यांचें समुत्पन्न । जाहलें पूर्वीं मुनींनो ॥२॥
छायेपासून मलमास । उत्पन्न झाला हा विश्वास । शुभप्रद ऐसें सर्वं मास । गणपाचें ध्यान करिती ॥३॥
संवत्सर सर्व महिन्यांसहित । तपश्चर्या आचरित । तेव्हां गणाधीश प्रकटत । भक्तजनप्रिय त्यांसमोर ॥४॥
त्या संवत्सरास समाधिमग्नास । गजानन बोले वचनास । माग संवत्सरा वरास । मासांसहित ह्रदयेप्सित ॥५॥
गणेशवचनास ऐकून । संवत्सर जागृत होऊन । उठून करी वंदन । भक्तिभावें गणेशासी ॥६॥
महिन्यांसह पूजित । यथाविधि उपचारें विनीतचित्त । पुनरपि प्रणाम करित । विघ्नेशास स्तवी कर जोडोनी ॥७॥
धूम्रवर्णासी वक्रतुंडासी । हेरंबासी परेशासी । विघ्नेशासी शूर्पकर्णासी । सर्वपूज्या तुज नमन असो ॥८॥
परमात्म्यासी लंबोदरासी । सर्वादिकपूज्यासी सुपात्रासी । अनाथांच्या नाथासी । त्रिगुणरूपा तुज नमन असो ॥९॥
गुणहीनासी गणेशासी । आदिमध्यांतसंस्थासी । आदिमध्यांतविवर्जितासी । गणचालका नमन तुला ॥१०॥
ब्रह्मपतीसी ब्रह्मिष्ठासी । ब्रह्मासी ब्रह्मभूतासी । सिद्धिबुद्धिप्रदात्यासी । सिद्धिबुद्धिमया तुज नमन ॥११॥
सिद्धिबुद्धिपतीसी । सर्वेशासी अनंतविभवासी । अनंतमायाप्रचारकासी । मायिका मोहदात्या नमन तुला ॥१२॥
शांतियोगमयासी । शांतियोगाधारकासी । शांतियोगप्रदात्यासी । योगेशा तुज नमन असो ॥१३॥
गणाधीशा चिंतामणिस्वरूपा स्तवन । किती स्तुती करावी विनम्रमन । वेद योगी आदि मौन । तुझ्या स्तवनीं धरितात ॥१४॥
तयांसीही जें न जमलें । तें मज पामरा अशक्य झालें । परी अंतीं तुज नमिलें । आतां तुष्ट हो गणनाथा ॥१५॥
स्वकार्यांचा वर देऊन । सिद्धिद सुखद तीं करून । भक्ति दृढ दे आम्हां लागून । तुझ्या चरणीं गजानना ॥१६॥
सर्व भयावें दूर करी । स्वभावज वीर्य करवी विघ्नारी । मासादिकांत जें उद्धरी । साधुचरनादींचें पूजन ॥१७॥
ऐसें बोलून वंदन । महिन्यांसहित करून । संवत्सर मूक होता वचन । गणाधीश म्हणे तयासी ॥१८॥
त्या स्तोत्रानें संतोषित । म्हणे जें जें तुमचें वांछित । मासांतर संवत्सरा तें फलयुक्त । होईल जाणा निःसंशय ॥१९॥
सूर्याच्या संयुक्त रहाल । बारा देहधर व्हाल । कर्मांचें फलदाते विमल । विशेषें तुम्हीं व्हाल सगळे ॥२०॥
ब्रह्मार्पण जें कर्मं करिती । नर जें मासांनो जगतीं । सलोकता तयांप्रती । अंतीं मिळेल ऐसें जाणा ॥२१॥
यथायोग्य विभागें जगांत । व्हाल तुम्हीं साक्षी मोहवर्जित । आदित्य ज्यास त्यागित । तो अधिक मास होईल ॥२२॥
अधिक मासा तूं ख्यात । होशील मल नामें पुण्यवंत । तुझ्या कालावधींत करित । कर्में ती सारी सफल होतीं ॥२३॥
त्यांसी नाना भावांचें फल देईन । तुमचें स्तोत्र हें पावन । पाठकां वाचकां सिद्धिसंपन्न । करील हें स्तोत्र भावपर ॥२४॥
कालिदोषभव पाप होत । काल उल्लंघनादिक नष्ट क्षणांत । भुक्तिमुक्ति अंतीं लाभत । स्तोत्राच्या या प्रभावें ॥२५॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावले गजनल्लभ गजानन । संवत्सर प्रसन्न होऊन । स्वकार्यमग्न जाहला ॥२६॥
महिनेही स्वकार्ययुक्त । जाहले ह्रदष्ट अत्यंत । कालभावधर समस्त । कर्म साक्षी नरांचें ॥२७॥
ऐसें हें महिन्यांसहित । संवत्सराचें चरित । वाचील वा ऐकेल जो जगांत । तयास सुख लाभेल ॥२८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धुम्रवर्णचरिते समासवत्सरचरितं नामैकौनविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP