मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय १७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक म्हणती सूतासी । महाभागा तूं संगसी । योगद पूर्ण कथा आम्हांसी । पापहारिणी तेथें तुष्ट ॥१॥
पुराणांत युगांचीं चिन्हें वर्णिलीं । तीं ऐकून विस्मित झाली । मति आमुची संशयीं पडली । म्हणोनि पुनरपि विचारितों ॥२॥
कृतत्रेतायुगांत स्त्रीस्वातंत्र्य । द्वापारांत एकपतित्व नित्य । श्वेतकेतु तैं पुरस्कारित । ऐसें आम्हां ज्ञात असे ॥३॥
तरी कृतयुगीं अहल्या शापित । कां जाहली इंद्रसंगें हें न कळत । ऐसें बहुविध मार्ग दिसत । कृतयुगांत आम्हांसी ॥४॥
कृतयुगीं वर्णाश्रम न वर्तत । सर्वं जन एक वर्णाश्रमीं स्थित । त्रेतायुगीं क्षात्रधर्म निर्मित । प्रपितामह ऐसा क्रम ॥५॥
तदनंतर वर्णाश्रमयुक्त । जाहलें मानव जगांत । सौरचांद्रकुळांत । नृप विख्यात जाहले ॥६॥
पुनः कृतयोग होतां उदित । सौरवंशीय चांद्रवंशीय नृप प्रजायुक्त । वर्णांश्रमविभावें वर्तत । मानव हें कैसें घडे ? ॥७॥
हें कौतुक विरुद्धवाचक । युगधर्मयोगें कलियुगांत एक । सर्व क्रिया पापकारक । नष्ट जरी होताती ॥८॥
तरी वर्णाश्रमविभागांची स्थिती । कैसी होय कलियुगीं निश्चिती । चतुर्गुणकर्में सिद्धिप्राप्ती । नरांस कलींत कैसी लाभ ॥९॥
म्हणून युगभव समस्त । सांगावें यथातथ्य वृत्त । महाभागा सुलभ सुगमार्थयुक्त । अनुक्रमें आम्हांसी ॥१०॥
सूत सांगे शौनकाप्रत । युगे नानाविध असत । तत्त्वद्रष्टे मुनि वर्णित । अर्थज्ञें न मूढ व्हावें ॥११॥
मतभेद जरी असती । तरी मोह पडू न द्यावा चित्तीं । तुरीय देहग कृतयुगा वर्णिती । त्रेयायुग सुषुप्तिपर ॥१२॥
द्वापारांत स्वप्नदेह । कलियुगीं तो जागृती सह । तेथ गुणप आत्मा निःसंदेह । सर्वत्र एकचि महर्षींनो ॥१३॥
माया सुषुप्तिरूप वर्तत । नाना आधारांनी युक्त । नानाविध तिच्यांत । व्यभिचार ना होईल ॥१४॥
जेथ तेथ स्थित । ती शुभदा स्वपतीस पाहत । सूक्ष्म स्थूल ती सृजित । त्याहुन भिन्नही निर्मिती ॥१५॥
त्यापासून गुणेशज रूप । तदाकार सुरूप । भिन्नभावापासून रूप । जागृत स्वरूप दोघांचेंही ॥१६॥
त्यांत पतिकलत्रादि व्यभिचारयुक्त । होईल म्हणून श्वेतकेतु घालित । मर्यादा त्या समयांत । श्वेत म्हणजे स्वप्न जाणा ॥१७॥
स्वप्न हा ज्याचा ध्वज असत । ऐसा तो श्वेतकेतु ख्यात । ऐश्या युगमानें विचक्षण नेमित । युगें सर्व महामुनी ॥१८॥
कोणी कृतयुगास ध्यान । त्रेतायुगास म्हणती यज्ञ । द्वापारास आचार संबोधून । कलियुगास देह म्हणती ॥१९॥
ध्यानांत सारे एक वर्णांश्रमयुक्त । तेच एकरूपधर ज्ञानयुक्त । यज्ञ कर्ममय ख्यात । तेथ वर्णाश्रम वास करी ॥२०॥
म्हणू वर्णाश्रमाचा आचार । त्रेतायुगांत ज्ञात सत्वर । ऐसा नानाविध सर्वप्रकार । कथिला असे प्राचीन मुनींनीं ॥२१॥
तेथ संशय संशय न धरावा । त्यांच्या वचनांचा आशय जाणावा । युग माहात्म्यांचा ऐकावा । संक्षेपें आतां वृत्तान्त ॥२२॥
कलियुगांत सिद्धिप्रद । कर्म ज्यानें होईल सुखद । ब्रह्मा निर्मी काल विशद । धर्माधर्म व्यवस्थेनें ॥२३॥
तो युगरूपें चार विभागांत । पुरातन काल होत । कृत त्रेता द्वापर कलि युक्त । सिद्धिप्राप्त्यर्थ खास मंत्र देई ॥२४॥
त्यांस प्रणाम करून वनांत । युगपुरुष जाती श्रद्धायुक्त । तेथ गणेशाक मनीं चिंतित । जप करिती मंत्राचा ॥२५॥
निराहारा राहून तप करिती । गजानन त्यायोगें संतुष्ट होती । त्यांच्या भक्तीनें वर्षसहस्त्रान्तीं । वर देण्यास प्रकटले ॥२६॥
त्यास प्रकट पाहून । युगपुरुष  करिती वंदन । यथाविधि पूजा करून । हर्षगद्‍गद स्तवन करिती ॥२७॥
गणेशासी भक्तसंरक्षकासी । नानारूपधरा हेरंबासी । भक्तांसी सर्वदायकासी । अभक्तनाशका तुज नमन ॥२८॥
परेशासी परांच्या परासी । स्वानंदवासी नानामायाप्रचारकासी । सदा स्वानंदभोगदात्यासी । अमेयशक्ते नमन तुजला ॥२९॥
पालकासी नाना मायाप्रहारकासी । मायिका मोहदात्यासी । लंबोदरासी लोक उदरस्थासी । एकदंता तुज नमन असो ॥३०॥
शूर्पाकारकर्णासी । त्रिनेत्रासी परमात्म्यासी । गजाकारवक्त्रासी । चतुर्भुजा तुज नमन असो ॥३१॥
सर्वांच्या आदिपूज्यासी । देवासी देवरूपासी । देवदेवासी विघ्नेशासी । देवदेवेशन तुज नमन ॥३२॥
सर्वांच्या ज्येष्ठरूपासी । मातापित्या सर्वपूज्यासी । ब्रह्मनिष्ठासी ब्रह्मभूतप्रदा तुज नमन ॥३३॥
ब्रह्मासी ब्रह्मादात्यासी । शांतिस्था नमन माझें तुजसी । वेदही थकले ज्या कार्यासी । तें मीं कैसें करूं सांग ॥३४॥
वेदांनी मौन धरिलें । शिवादि देव जेथ थकले । तेथ माझें ज्ञान निमालें । स्तवनीं तरी नवल काय ॥३५॥
म्हणोनि तुझें योगरूप । जें अवर्णनीय स्वरूप । त्यास वंदितों निष्पाप । युगें प्रार्थिती गणेशासी ॥३६॥
तो सुप्रीत चित्तें म्हणत । भक्तवात्सल्ये नियंत्रित । माझें हें स्तोत्र अद्‍भुत । सर्वप्रद होईल ॥३७॥
तुमची ही रचना सुंदर । भक्तियुक्त असे उदार । ही स्तुति वाचतां ऐकतां सुंदर । माझी भक्ति लाभेल ॥३८॥
जे जे स्तोत्र पाठक इच्छित । अथवा श्रोता मनीं वांछित । अथवा श्रोता मनीं वांछित । तें तें सर्व देईन तयाप्रत । भुक्तिमुक्तिप्रद हें स्तोत्र ॥३९॥
युगांनो हें सर्व संमत । होईल स्तोत्र जाणा निश्चित । महाभागांनो मनोवांछित । वर तुम्हीं मागावें ॥४०॥
तुमच्या हया स्तोत्रानें तुष्ट । भक्तिभावें मीं संतुष्ट । देईन तुम्हां युगांनो इष्ट । सर्व कांहीं वर मागा ॥४१॥
युगांनी तेव्हां प्रार्थिलें । गजानना तूं आम्हां निर्मिलें । अतुल सामर्थ्य पाहिजें दिलें । उत्तम भक्ति आम्हांसी ॥४२॥
कृत युग तेव्हां म्हणत । कर्मपरायण मजप्रत । करी स्वधर्मरुचि सूक्त । सत्त्वयुक्त सर्वदा ॥४३॥
प्रभो मी मोक्षार्थ उद्यत । सदैव व्हावें ऐसें वांछित । त्रेतायुग तदनंतर याचित धर्मनिष्ठत्व गजाननासी ॥४४॥
म्हणें सत्त्वरजयुक्त । भुक्तिमुक्तिप्रियत्व द्या निश्चित । द्वापर नंतर निववीत । भुक्तिसुखपर । मज करावें ॥४५॥
धर्मपरायण मीं व्हावें । भोगबुद्धिपर स्वभावें । रजतमें युक्त रहावें । ऐसें करी दयाघना ॥४६॥
कलियुग अन्तीं प्रार्थित । तामस व्हावें देहभोगार्थ उद्युक्त । विकर्मरुचि संयुक्त । गजानना तूं ऐसें करी ॥४७॥
चारही युगें हर्षभरित । पुनरपि गजाननासी वंदित । एकैक आश्रितभावें सतत । प्रभो गणेशा आम्हां करी ॥४८॥
त्यांचें तें ऐकून वचन । मेघगंभीर स्वरें गजानन । सर्वांसी सुखदायक प्रसन्न । ऐसें वरदान देत असे ॥४९॥
लक्षांश कृतयुग होत । तेव्हां कलि तेथ प्रवेशत । शतांशें त्रेतायुगांत । द्वापरांत अयुतांशें ॥५०॥
जेव्हां त्रेतायुग शतांशें प्राप्त । तेव्हां सहस्त्रांशें द्वापर विलसत । अयुतांशें कलियुग पापिष्ठ । नांदेल हें निश्चित ॥५१॥
परस्पर प्रेवेशें ऐसें वर्तत । युगें चारही निश्चित । द्वापाराचा शतांश होत । सहस्त्रभाग कलिप्रवेशे ॥५२॥
त्रेता दशसहस्त्र अंशें असत । शतांशरूप कलि युगांत । द्वापर युगपरिकीर्तित । यशप्रिय स्वधर्म युक्त ॥५३॥
ऐशा क्रमें सर्वत्र प्रिय । युगांनो तुम्हीं निःसंदेह । मज जाणून बंधभय । दूर होईल त्वरित तुमचें ॥५४॥
वाञ्छितार्थ लाभेल । ऐसें माझें वरदान अमल । ऐसें बोलून वचन निर्मल । गणवल्लब पावले अंतर्धान ॥५५॥
युगें हर्षसमन्वित । त्रेतायुग सर्वत्र संमत । मुक्तिप्रिय कृतयुग आज्ञा पाळित । युगवरा वरप्रदान हें ऐसें ॥५६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते युगवरप्रदानं नाम सप्तदशोऽध्यायः समाप्तः
। श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP