खंड ८ - अध्याय ९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सनकादि श्रीशिवास म्हणती । कुरूक्षेत्राची ऐकिली ख्याती । महादेवा धूम्रवर्णाचें जगतीं । प्रमुख क्षेत्र तें सर्ववरद ॥१॥
त्याचें माहात्म्या आम्हांसी । सांगावें संतोषप्रद जें जगासी । शिव सांगती तेव्हां त्यासी । अवर्णनीय त्याचा महिमा ॥२॥
हिमाचल प्रांतीं ऐशान्य दिशेंत । धूम्रवर्णाचें हें क्षेत्र ख्यात । त्याचें माहात्म्य संक्षेपें सांप्रत । सांगतों ऐका एकचित्तें ॥३॥
देवर्षी केला स्थापन । धूम्रवर्ण शुंडादंडमुख श्रीमान । चतुर्बांहुधारक त्रिनेत्र महान । एकदंत परशुधारी ॥४॥
तेथ अहंकार असुर भजत । गणेशासी भक्तियुक्त । त्या गणेशाच्या वामांगीं विलसत । सिद्धि सर्वपियंकरी ॥५॥
दक्षिणांगीं बुद्धि असत । मूषक शोभत त्याच्या पुढयांत । त्या क्षेत्राचा विस्तार ज्ञात । दशयोजनें चतुरस्त्र ॥६॥
धूम्रवर्णाच्या पुढयांत । मुद्‍गल मुख्य भक्त वर्तत । शुकादी भजती स्तुति गात । पाठीं पार्षद प्रमोदमोदकादी ॥७॥
त्यांच्या हातांत शस्त्रें असतीं । ते धूम्रवर्णास सेविती । प्रयागादी तीर्थें वामांगीं वर्ततीं । काशी मुख्य क्षेत्रें त्यास भजती ॥८॥
दक्षिणांगी अमरवर । शंभु विष्णु मख्यादि सुरवर । शस्त्रांसहित सपरिवार । गणनायका नित्य भजती ॥९॥
शेषादी नागराज पर्वत । हेममुख्य तेथ पूजित । गंधर्व चारणसिद्ध आराधित । वसु तैसे मनू तेथें ॥१०॥
आदित्य रूद्र विद्याधर । अप्सरादी तेथ वसती थोर । द्विरदाननासी भक्तिपर । भजती या क्षेत्रांत सारे ॥११॥
जें जें श्रेष्ठतम त्रिलोकांत । तें तें येथ असे स्थित । धूम्रवर्णाच्या सेवेंत रत । भक्तिभावें समन्वित सदा ॥१२॥
त्याचीं स्थानें असंख्य़ असती । त्यांची अशक्य असे गणती । परी संक्षेपें मीं तुम्हांप्रती । कथिलीं कांहीं महर्षींनो ॥१३॥
येथ जे महासिद्धिप्रद । क्षेत्र असे पुनीत विशद । त्यांत स्नान । त्यास विघ्नप सुखद । महत्त्वपूर्ण स्थान हें ॥१४॥
येथ करितां स्नान । वांछित लाभून सर्व जन । अंतीं मोक्षपदाचा सन्मान । त्यास लाभे निःसंदेह ॥१५॥
विष्णुमुख्य देवगण । कश्यपादी महर्षी प्रसन्न । तेथ प्रहृष्ट होऊन । स्नान करिती नित्य नेमें ॥१६॥
अन्य क्षेत्रस्थ नागादी येत । या क्षेत्रांत स्नान करित । अनेक जन निवास करित । येथ स्नानाथं आनंदें ॥१७॥
शिव विष्णु मुख्यांची असती । तीर्थें तेथ पवित्र अती । त्यांत स्नान करतां प्राप्ती । होते त्या त्या पदांची ॥१८॥
तेथ धूम्रवर्णाचें घेतां दर्शन । ईप्सित लाभें धन्य जन । यात्रा करिती भक्त जन । लाभती धर्मार्थकाममोक्ष ॥१९॥
भाद्रपद शुक्त चतुर्थी दिनीं । धूम्रवर्ण मूर्ति देवऋषीनीं । पूर्वीं स्थापिली मध्याह्रीं । म्हणोनि तिथि ही परम पावन ॥२०॥
या तिथीस वार्षिक उत्सव । यात्रापर करिती सदैव । परस्परांस बोधभाव । सांगती ते गजाननाचा ॥२१॥
शंकर महर्षी आदियुक्त । रोमांचांनी तेव्हां होत । गाणेश जे तेथ जात । तेही हर्षभरित होती ॥२२॥
यात्रापूर्ण करून जाती । ते सारे स्वस्थानाप्रती । धूम्रवर्णास मनीं स्मरती । भक्तिभावें सर्वदा ॥२३॥
अंतीं स्वानंदलोकांत । ते सर्वही जाती निश्चित । शैव वैष्णवादी क्रममार्गें जात । स्वानंदलोकीं शेवटीं ॥२४॥
जे या क्षेत्रांत पावती निधन । ते स्वानंद लोकीं जाऊन । ब्रह्म रूपक गाणप होऊन । सदैव सुखी निवसतात ॥२५॥
धूम्रवर्णक्षेत्राचें महिमान । विस्तारें सांगण्या अशक्य म्हणून । कथिलें यथामति अल्प प्रमाण । मुनिसत्तमहो ऐकावें ॥२६॥
जेवढीं गणेशक्षेत्रें ब्रह्माडांत । ब्रह्मभूतमय असत । तीं तीं सारीं चतुःपदमय वर्तत । धर्मंअर्थंकाममोक्षपर ॥२७॥
पाचवें जें ब्रह्माकार । क्षेत्र तें गणपतीचें थोर । ऐसें हें क्षेत्र उदार । माहात्म्ययुक्त धूम्रवर्णाचें ॥२८॥
हें माहात्म्य जो ऐकत । अथवा स्वयं वाचीत । अन्यांस वाचून दाखवित । त्यास सर्वार्थ लाभेल ॥२९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते धूम्रमहिमावर्णंनं नाम नवमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP