मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय २१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक विचारिती सूतासी । सहा महिन्यांत विघ्नेश्वरासी । विशेष पूजोनिया त्याच्या तुष्टीसी । कैश्या परी प्राप्त करावी ॥१॥
ऐशा परी करून गणेशभजन । कोण पावले सिद्धि जन । त्याचें चरित्र अतिपावन । सिद्धिप्रद आम्हां सांगावें ॥२॥
सूत तेव्हां सांगती । अरुणोदय होतां भक्त करिती । तीर्थजळांत । स्नान व्रतसंयुक्ती । आपापल्या शाखेनूसार ॥३॥
स्वशाखामार्ग संध्यादिक करावें । वैदिक तांत्रिकमंत्र म्हणावे । त्यायोगें गणेशासी पूजावें । पुराण मंत्रादींनीं अथवा ॥४॥
यथोपचार करून पूजन । रहावें एकभुक्त एकनिष्ठ मन । हविष्यान्न फलाहार सेवून । अथवा निराहार रहावें ॥५॥
ब्रह्मचर्याचें करावें पालन । नखें केसादींचे न करावें । जमिनीवरी करावें शयन । सत्य सदा बोलावें ॥६॥
अथवा धरावें मौन । स्वधर्माचें करावें पालन । एक मास व्रत पालन । कोणीही भक्तीनेम करावें ॥७॥
ब्राह्मण क्षत्रिय वा वैश्यजात । शूद्रासही प्रशस्त हें व्रत । सधवा स्त्रियांत सुखप्रद असत । विधवांसही विशेषें ॥८॥
त्यांत पंचक आनंदे भजावें । गणेशपूजन भक्तिभावें । दीपकदान करावें । ब्राह्मणासी द्यावें भोजन ॥९॥
शमीमंदारांचें सेवन । प्रदक्षिणा तयांसी घालून । गाईची शुश्रूषा करून । सर्वसिद्धि प्राप्त करावी ॥१०॥
ऐशापरी नानाविध पूजन । करावें गणेशाचें एकनिष्ठ मन । एकमास व्रत करून । गजाननासी तोषवावे ॥११॥
अन्य शंभु मुख्यादी देवांचे । मानवानें ब्रत पाळावें साचें । स्वेच्छेनुसार तयांचे । करावें पूजन एक मास ॥१२॥
ऐसें हें सहामासांचें पूजन । धर्मार्थकाममोक्षकर पावन । करावें आवश्यक मानून । तेणें लाभे इच्छित सर्व ॥१३॥
जें जें मनीं इच्छित । तें तें या मासव्रतानें लाभत । या विषयींचा इतिहास वृत्तांत । सांगतों तुज संक्षोपानें ॥१४॥
शंभासुर नामक महादैत्य बळवंत । एकदा जाहल ब्रह्मांडाधिपति अकल्पित । त्यानें वेद पळविले समस्त । स्मृतिसहित स्वबळानें ॥१५॥
जेव्हां हाहाकार सर्वत्र माजला । कर्महीनतेचा प्रभाव घडला । वर्णसंकर कर्माचा जाहला । प्रचार सार्‍या भूमंडळीं ॥१६॥
तेव्हां मुनिगणांसहित । ब्रह्मदेवादी समस्त । विष्णूस शरण विनीतचित्त । स्तविती त्यासी मनोभावें ॥१७॥
वेदांची मुक्ति व्हावयास । जगता सौख्यलाभ होण्यास । प्रार्थिती ते विष्णूस । तेव्हा विष्णू काय करी ॥१८॥
अन्य देवांस निरोप देऊन । स्वयें शंभूस भेटला तत्क्षण । विनयानें वंदन करून । म्हणे शंभो राख आतां ॥१९॥
शंखासुर दुर्जय जाहला । वेदगण त्यानें हरिला । त्यावरी विजय मिळविण्याला । शक्ती मजला तूं देई ॥२०॥
त्या शंखासुराच्या वधाचा उपाय । सांगे मजसी तूं सदय । तेव्हां श्रीशिव तयाचा भाव । जाणून विष्णूस सांगती ॥२१॥
जनार्दना समीप कार्तिकमास । त्यांत मासव्रत करी तूं विशेष । तोषवी गजानना देवेशास । तेणें विघ्नहीन तूं होशील ॥२२॥
महाबळी शंखासुरास जिंकशील । अन्यथा नसे उपाय सबळ । पुरुषोत्तमा तूं हें व्रत निर्मळ । अवश्य करी विजयार्थ ॥२३॥
तें ऐकून करी वंदन । शंकरास विष्णू आनंदून । परपुरंजय तैं जाऊन । बादरिकारण्यीं व्रत करी ॥२४॥
भक्तिसंयुक्त पुरश्चरण । केलें तयानें सुजाण । एकाक्षरमंत्र जपून । गणनाथा त्यानें तोषविलें ॥२५॥
कार्तिकांत गाणेश पंचकाचें सेवन । तदनंतर मार्गशीर्षात करी गमन । अन्य देवांजवळी जनार्दन । प्रोत्साहन त्यांसी देत असे ॥२६॥
तदनंतर बुद्धिपतीस स्मरत । आपल्या मनीं विचार करीत । कोणत्या उपायें सांप्रत । दैत्येशाशी जिंकावें ॥२७॥
तेव्हां गणेशकृपेनें ह्रदयांत । स्फूर्ति त्याच्या उत्पन्न होत । मत्स्यस्वरूपें युद्धांत । विजय मजला लाभेल ॥२८॥
इतुक्यांत आकाशवाणी होत । केशव देवेश ती ऐकत । परवीरहन्ता जो असत । मत्स्यरूपे मारी शंखासुरा ॥२९॥
तदनंतर घोर युद्ध करून । मत्स्यावतार घेऊन । त्या भयंकर शंखासुरास मारून । सांग वेद सोडविले ॥३०॥
वेद समस्त सोडविले । ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले । तेव्हां ब्रह्मदेवें त्यास स्तविलें । देवमुनिगणांसहित ॥३१॥
कार्तिकमासीं व्रत करून । स्नानादि विधि आचरून । विष्णूस लाभलें बळ महान । शंखासुर त्यानें मारिला ॥३२॥
अन्यही एक कथा असत । सांगतों ती तुज हर्षयुक्त । पापविनाशी जि असत । कार्तिक व्रतासंबंधी ॥३३॥
पौलस्त्य ब्राह्मण कोणी असत । सोमदत्त नामें विख्यात । तो होता स्वधर्मरत । तपस्वी शुचिव्रत सर्वदा ॥३४॥
एकदा तो गौतममुनीस भेटत । गणेशभक्ति करण्या उद्यत । विनयपूर्वक त्यास वंदित । योगिश्रेष्ठाअ भक्तिभावें ॥३५॥
सोमदत्त म्हण गौतमाप्रत । कोणत्या उपायें साक्षात । विघ्नेश दृष्टिगोचर होत । तो उपाय मजसी सांगावा ॥३६॥
क्षणभंगुर हा देह असत । कैसें साधावें तरी हित । गौतम त्यास म्हणत । कार्तिक महिना जवळ आला ॥३७॥
मासात्मक व्रत आचरण करीं । महाप्रभूतें पाहण्या इच्छिसी जरी । ऐसें बोलून कथन करी समग्र यथाविधी तयाप्रत ॥३८॥
आपुल्या आश्रमीं स्थान । राहण्यास तयास देऊन । महिनाभराचें व्रताचरण । प्रारंभ त्याचा करवून घेई ॥३९॥
गाणेश पंचकाचें सेवन । एकनिष्ठ स्वभावें करून । कार्तिक व्रताचें आचरण । उपोषणादी करीतसे ॥४०॥
ह्रदयांत गजाननाचें ध्यान । मुखीं षडक्षर मंत्रजप महान । समाप्तीच्या दिवशीं शोभन । आश्चर्य एक घडलें तैं ॥४१॥
महाविप्रा तें ऐकावें । दृढ निश्चयप्रत हे व्हावें । पूजेस्तव बैसला भक्तिभावें । सोमदत्त तो भावपर ॥४२॥
कार्तिक पौर्णिमा ती असत । सोमदत्त एकासनीं स्थित । दूर्वा शमी मंदारपुष्पें वर्तत । समीप त्याच्या त्या स्थानीं ॥४३॥
अकस्मात ब्राह्मण कोणी येत । तो पूजासाहित्य घेऊन पळत । परी सोमदत्त तैसाचित स्थित । मौन धरून निजासनीं ॥४४॥
नियमरत तो आसन न सोडित । गाणपासी मनीं स्मरत । मनीं त्याच्या शोक दाटत । तेव्हां अद्‍भुत एक घडलें ॥४५॥
त्याच्या अंगावरी जे लोम । ते सर्वही औषधिमय मनोरम । त्वचाभावे शोभती अभिराम । दूर्वा शमी स्वरूपानें ॥४६॥
शिखायुक्त स्वशिर । दूर्वार्थ कापून वहण्या अधीर । शस्त्र उचलून घात घोर । करता झाला स्वकंठावरी ॥४७॥
तेव्हां गणनायक त्वरित । ब्राह्मणरूपें तेथ प्रकटत । शमीमंदारादि सर्व देत । पुनरपि त्या सोमदत्तासी ॥४८॥
म्हणे सोमदत्त करी पूजन । हट्ट आपुला पुरवून । पूजा साहित्य लाभून । अति हर्षित सोमदत्त ॥४९॥
आपुला पूजानियम पूर्ण करित । तदनंतर त्या विप्रास वंदित । म्हणे विप्रा कोण तूं सांप्रत । नाथा परीक्षा पाहिलीस ॥५०॥
माझें दूर्वादिक साधन । प्रथम नेलेंस तूं हरून । आतां पुनरपि दिलें आणून । नियम माझा पूर्ण झाला ॥५१॥
तूं विप्र न साक्षात्‍ देवेश । विघ्नेश्वर तूं परमेश । माझी परीक्षा पहावयास । आलास ऐसें मज वाटे ॥५२॥
आतां आपुलें निज रूप दाखवी । अन्यथा देह त्यागीन ही जाणावी । प्रतिज्ञा माझी सत्य सांगावी । महाभागा सारी स्थित ॥५३॥
त्यानें मी तृप्त होईन । ऐसें ऐकून त्याचें वचन । व्रतप्रभावें संतुष्टमन । गणराज दाखवी निजरूप ॥५४॥
चार भुज त्रिनेत्रयुक्त । शुंडादंडविराजित । सिद्धिबुद्धिसमायुक्त । परशुआदि शस्त्रधर ॥५५॥
नाना भूषणांची शोभा दिसत । शेष नाभीवरी रुळत । चिंतामणि ह्रदयावरी विलसत । लंबोदर एकदंताच्या ॥५६॥
मूषकावरी तो बैसला । वस्त्रालंकारांनी नटला । सोमदत्तें तो देव नमिला । हर्षनिर्भर मानसानें ॥५७॥
रोमांचित काया होऊन । आनंदपूर्ण नयन । भक्तिभावें जाचे प्रतापवान । देहभान सारें तो विसरला ॥५८॥
आनंदविभोर मनें पूजित । पुनरपि हेरंबासी नमित । करांजलि जोडून स्तवित । भक्तिभावें सोमदत्त ॥५९॥
गणेशासी परेशासी । सदा शांतिप्रदायकासी । योगरूपासी ह्रदिस्थासी । विघ्नेशासी नमो नमः ॥६०॥
महाविघ्नविघ्नदासी । परमात्म्यासी भक्तविघ्नहर्त्यासी । सत्ताधारासी अनादीसी । महाकाळासी नमन असो ॥६१॥
काळासी काळरूपासी । अंतीं विहारयुक्तासी । आदिनाथासी विनायकासी । सर्वांच्या देवासी नमन ॥६२॥
सर्वांच्या नायकासी । नायकां पदादी दात्यासी । लंबोदरासी सर्वोदरस्थासी । ब्रह्मेशा तुज नमन असो ॥६३॥
अपार उदार भावासी । आदिमध्यांतहीनासी । तदाकार स्वरूपासी । स्वानंदपते तुज नमन ॥६४॥
स्वसंवेद्यासी सिद्धिदात्यासी । सुभक्तीच्या पालकासी । दुष्टांच्या सिद्धिहारिसी । गणनाथा तुज नमन असो ॥६५॥
सिद्धिपतीसी महासिद्धिरूपासी । बुद्धिपतीसी सुबुद्धिदात्यासी । साधुजनप्रियासी । संप्रज्ञानस्वरूपा तुज नमन ॥६६॥
दुष्टंस दुर्बुद्धिदात्यासी । असंप्रज्ञात महाशिवासी । संप्रज्ञात असंप्रज्ञात रूपें घेसी । नमस्कार तैसा गजाकारा ॥६७॥
सदा योगरूप तूं अससी । किती स्तवूं मी गणनाथा तुजसी । कुलशील यश धन्य मजसी । मातापिता सारे धन्य ॥६८॥
धन्य हें कार्तिकमास व्रत । ज्याच्या आचरणें दृष्टिगत । प्रभू गणपती तूं साक्षात । द्विरदानना भक्ति जडवी ॥६९॥
तुझिजा चरणीं दृढ भक्ति । सदा असावी ऐसी मती । देई अन्य न वांछा चित्तीं । गाणपत्यपरायण मीं ॥७०॥
त्याचें तें वचन ऐकून । गणेश बोले कृपावचन । जें जें इच्छिसी तें तें लाभून । सफळ होतील कामना ॥७१॥
महामुने तूं जगांत । गाणपत्यप्रिय अत्यंत । होशील माझा अनन्य भक्त । सर्व मान्य सोमदत्ता ॥७२॥
तूं केलेलें हें स्तोत्र । सर्वसिद्धिप्रद सर्वत्र । पाठका श्रोत्यांस पवित्र । इच्छापूरक सर्वकाळ ॥७३॥
ऐसें बोलून अंतर्धांन । विघ्नेश जाहला गजानन । सोमदत्त महाभाग नमन । गौतमासी करीतसे ॥७४॥
त्या वेळेपासून प्रख्यात । जाहला तो योगिश्रेष्ठ जगांत । सोमदत्त गणपप्रिय सर्व संमत । ऐसें माहात्म्य व्रताचें ॥७५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खण्डे धूम्रवर्णचरिते धूम्रमहिमावर्णनं नाम एकविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP