मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय १०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सनकादी पुनः विचारिती । धूम्रवर्णाचे अवतार नाना असतीं । त्यंतील प्रमुख कोणते जगती । तें आम्हांसी सांगावें ॥१॥
धूम्रवर्णाचें चरित्र श्रवण । करितां न तृप्ति पावती श्रवण । अहंकारशामक जो पूर्ण । चरित्र श्रवणीं लालस त्याच्या ॥२॥
शीशिव म्हणती तयांप्र्त । मुख्यांत मुख्य जे असत । त्यांचें सांगेन चरित्र । अन्यथा अशक्य वर्णायासी ॥३॥
नेतिरूप हें सहज पद । त्यानें सृजिलें समाख्य ब्रह्म आनंदप्रद । त्यानें निर्मिले सत्यानृत विशद । तदनंतर उत्थान संयुक्त ॥४॥
विप्रेशांनो ब्रह्मद्वय सृष्ट । ती दोन्ही परत नामयुक्त । त्यायोगें देहिमय देह प्रचुर असत । ब्रह्म त्यानें बिंदुनिर्मित ॥५॥
तो बिंदु चतुर्देंहमय असत । त्यांतून स्थूल सूक्ष्म सम नाद सृष्ट । विश्वरूप नानाभेदयुक्त । त्यापासून व्यष्टिरूप ॥६॥
ऐसी हीं ब्रह्मरूपें उत्पन्न । अक्षम सर्वतः ज्ञानहीन । त्यांनी तप आचरिलें एकमन । नामाहीन तत्त्वांचें ॥७॥
बीजरूप सर्वांचा मंत्र जपून । निरंतर त्या अनामिका ध्याऊन । ऐसीं शंभर वर्षें जातां प्रसन्न । गजानन तैं जाहला ॥८॥
त्यानें मंत्रमय स्वरूप दाखविलें । त्याच्या कृपेनें त्यांनीं तें पाहिलें । ह्रदयीं त्यांच्या स्थिरावले । एकाक्षर मंत्र तेजयुक्त ॥९॥
ज्ञानकर मंत्र तो पाहून । ब्रह्में मनीं हर्षूंन । आदरें करिती नमन । संग्रह करिती मंत्राचा ॥१०॥
मंत्राकार गणेशासी ध्याती । अत्यंत यत्नें विघ्नपा तोषविती । दिव्य वर्ष सहस्त्रा नंतर होती । श्री गजानन प्रसन्न ॥११॥
आपुलें स्वरूप दाखवित । योगिध्येय जें उत्तम असत । नरकुंजर रूप त्यास पाहत । ह्रदयीं अत्यंत विस्मित झाले ॥१२॥
त्या ब्रह्मांसी ढुंढि देत । सुनिर्मल ज्ञान तैं त्वरित । त्यायोगें गणराजाचें रूप ज्ञात । जाहले त्या ब्रह्मांसी ॥१३॥
सगुण निर्गुणयुक्त योगमय परम । तें पाहून रूप मनोरम । ब्रह्में हृष्ट होऊन अभिराम । नित्य विघ्नेशासी ध्याती ॥१४॥
जप ध्यान नित्य करिती । तेव्हां संतुष्ट प्रीत गणपती । शिवरूपधर जाती । पंचवक्त्र त्रिलोचन ॥१५॥
मुंडमाला गळयांत । व्याघ्राचें हस्तीचें चर्म पांघरित । विभूतीचा लेप पुनीत । सर्वांगावरी विमल होत ॥१६॥
शेषनागाचें विभूषण । वृषध्वज वृषारूढ महान । चंद्रचूड त्रिशूलधर शोभन । अर्धांगी गिरिजायुक्त तो ॥१७॥
योगींद्र योगिवंदित । महेश ऐसा तेथ प्रकटत । ब्रह्में त्यास पाहून विस्मित । वस्तुतः तो गणेशचि ॥१८॥
ब्रह्में त्याचा आदर करिती । गणेशकृपेनें जाणिलें चित्तीं । सकळ कौतुक ती पाहती । परस्मरांसी सांगतीं ॥१९॥
शिवाच्या ह्रदयीं बोध । तेथ सहज गणपाकृति सुबोध । वर्ण धूम्रायित विशद । त्यायोगें धूम्राक्षर नाम झालें ॥२०॥
त्याचें बिंब मायायुत । पडलें जगांत ब्रह्मांत । त्यायोगें हा प्राज्ञ असत । वृषध्वज महान ॥२१॥
बिंबबिंबी प्रभावाने ख्यात । धूम्रवर्ण ऐसें यास म्हणत । भेद शास्त्रवादांत । कदापि तो वरद न होईल ॥२२॥
तदनंतर तीं ब्रह्में उठून वरती । गणपाची स्तुती करिती । ह्रदयांत स्थित त्या शिवास नमिती । विशेषें भावभक्तीनें ॥२३॥
विधिपूर्वक शंभूस पूजून । आनंदे प्रणाम करून । आनंदमुख्यें ब्रह्में करिती स्तवन । अत्यंत आदरभावानें ॥२४॥
धूम्रवर्णासी गणेशाकृतिधरासी । बिंबासी शंकरासी । शंभूसी अमेयशक्तीसी । पार्वतीपते तुजला नमन ॥२५॥
वृषध्वजासी देवासी । सहजासी मायाश्रयासी । मायाचालकासी परात्म्यासी । महेश्वरा पूर्णा तुज नमन ॥२६॥
हेरंबासी जटाजूटधारकासी । निर्मोहासी सदाशिवासी । परेशासी त्रिशूलधरासी । स्वाधीना तुजला नमन असो ॥२७॥
पंचवक्त्रधरासी । अनाथाच्या नाथासी । परब्रह्म स्वरूपासी । ब्रह्माधिपते तुजला नमन ॥२८॥
गिरीशासी चित्ताभस्मांगधारकासी । मुंडमाळा धारकासी । सर्पभूषणासी नानाभेदयुक्तासी । नाना खेळकर्त्या तुज नमन ॥२९॥
ज्याच्या वामभागीं असत्य त्यासी । दक्षिणांगीं सत्य तयासी । त्यांच्या अभेदें आनंदरूपासी । स्वस्वरूपा तुज नमन असो ॥३०॥
महामायादी समरूपा वर्तत । देह तुझाची तो ख्यात । अर्धनारीरूपीं आत्मरूप ज्ञात । शंभो तूच नमन तुला ॥३१॥
ऐशा ब्रह्मरूपी ब्रह्मास । सर्वांच्या नेति कर्त्यास । पाहून धन्यता आम्हांस । महेशाना आज वाटे ॥३२॥
तूंच धूम्रवर्ण अससी । भेंद कांहीं न दिसे आम्हांसी । असमर्थ तुमच्या स्तुतीसी । प्रभो नमस्कार स्वीकारावा ॥३३॥
शिव म्हणे ऐसें बोलून । महेशानातें आदरें नमून । ब्रह्में जाहली पदलीन । तेव्हां शंकर त्यांस म्हणे ॥३४॥
करूणानिधि आदि शंभु म्हणत । ब्रह्मांनो वर मागा सांप्रत । तुमच्या तपानें मीं तुष्ट । स्तोत्रानें तैसाचि भक्तीनें ॥३५॥
जें ह्रदयांत ईप्सित । तें मागा संशय न धरावा येथ । ब्रह्में म्हणती आम्हांप्रत । उत्तम भक्ति देई नाथा ॥३६॥
महेश्वरा विद्यारूपा स्वकार्यांत । स्मृति देई आम्हां सतत । आपापलें कार्य करतां बंधमुक्त । आम्हीं न व्हावें ऐसें करी ॥३७॥
सतत योगधारक व्हावें । बंधहीन जगतीं स्वभावें । ऐसें वरदान द्यावें । हीच आमुची प्रार्थना ॥३८॥
श्रीशिव म्हणती तयांप्रत । जें जें इच्छिलें तें तें प्राप्त । होऊन व्हाल सुखयुक्त । दुर्लभ तुम्हां काय असे ॥३९॥
आतां बंधहीन योग्यास । करावा खास योगाभ्यास । जो साधता तुम्हांस । बंधभय न कदा बाधेल ॥४०॥
सर्वांचा नेति कर्ता मजला । जाणता चतुर्थकाला । चारांच्या संयोगें बुध जनाला । स्वस्वरूपाचें ज्ञान झालें ॥४१॥
ज्यापासून स्वाधीन । रूप उपजलें पराधीन । त्रिधा कलांशें तो गजानन । ऐसें तुम्हीं जाणावें ॥४२॥
स्वस्वरूपमय ढुंढी कीर्तित । जो असे मायायुक्त । चारांच्या चालकत्वें जगांत । संयोग अभेदें तो प्रभू ॥४३॥
अयोग पंचहीन सतत । निवृत्तिवाचक ख्यात । तेथ ब्रह्मांचा जगतांचा न होत । योग परस्परांशीं ॥४४॥
संयोग अयोग योगें ज्ञात । गणेश योगवाचक जगतांत । पूर्णशांतिप्रद ब्रह्मभूत । गजानन साक्षात ॥४५॥
ग कार स्वस्वरूपाख्य । ण कार असे योगाख्य । त्यांच्या स्वामी नरकुंजर ख्पाख्य । गणेश थोर श्री देव ॥४६॥
त्यास विशेषें भजाल । तरी शांति तुम्हां लाभेल । सतत बंधहीन व्हाल । अन्यथा हें असंभव ॥४७॥
जैसा धुरानें जो देश व्याप्त । तो मानवासी न दिसत । तैसा हा दिसून न दिसत । धूम्ररोधन म्हणोनि ॥४८॥
चित्तमयी माया रत । पंचधा जी विविध वस्तूंत । त्या मायेनें जे युक्त । ते न पाहती त्या देवासी ॥४९॥
वेद वर्णमय कथित । ते मायेनें धूम्रमय होत । म्हणून गणेशासी स्वशिष्याप्रत । धूम्रवर्ण ऐसें वर्णिती ते ॥५०॥
पूर्णशांतिप्रद योग जाणून । धूम्रवर्णात्मक पावन । त्या योगें भजावा गजानन । ब्रह्मांनो तुम्हीं सर्वदा ॥५१॥
जीं जीं कार्थें स्वभावस्थ उचित । तीं तीं करा समर्पित । धूम्रवर्णासी तरी बंधमुक्त । व्हाल तुम्हीं निःसंशय ॥५२॥
ऐसें बोलून महादेव होत । तेथेंचि तैं अंतर्धान क्षणांत । ब्रह्में त्यांसी नमन करित । नंतर विविध जगतीं निर्मिती ॥५३॥
यथोपदिष्ट योगानें भजत । गणेशासी आदरें ती सतत । योगयुक्त ब्रह्में पुनीत । ऐसा हा शिवरूप गणेशावतार ॥५४॥
धूम्रवर्णकलांश असत । शिवात्मक अवतार हा परम अद्‍भुत । सर्वसिद्धिप्रद सतत । वाचका श्रोत्या सर्वांसी ॥५५॥
जो हा योग आराधित । त्यास ऐहिक भोग प्राप्त । अंती स्वयं स्वानदपुरांत । जाईल तो हें निश्चित असे ॥५६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमें खंडे धूम्रवर्णचरिते शिवात्मकावतारचरितं नाम दशमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP