मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ४८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत सांगती शौनकाप्रत । मासांचें चरित प्रसंगोपात्त । ऐक जें सर्वसिद्धिप्रद असत । संक्षेंपानें या वेळीं ॥१॥
श्रावणांत सेव्य गाणेश पंचक । वरुण ऐसें करितां पावक । लाभला ज्ञान गाणेशसंभव सुखैक । दिशा स्वामित्व लाभला ॥२॥
भाद्रपद मासांत वायु सेवित । मयूरेश्वरासी तैंस लाभत । योगज्ञान दिगीशत्व होत । गाणपत्य प्रभु तोही ॥३॥
आश्विन मासीं देव गंधर्व । सेविती विघ्नेश्वरा भक्तियुक्तभाव । ऐश्वर्ययुक्त  होऊन वैभव । प्राप्त झालें तयांसी ॥४॥
कार्तिकांत वक्रतुंडास सेविती । विद्याधर गण भावभक्ती । आपापल्या कार्यांत प्रगती । होऊन झाले ज्ञानधर ॥५॥
आदित्य मार्गशीर्षांत । विकटास सेविती विनीत । ते जेजस्वी ज्ञानयुक्त । त्यायोगें महामुने जाहले ॥६॥
पौषांत वसू सेविती । लंबोदरास ते पावती । ज्ञानोदय नानाभावपरायण होती । ऐसा महिमा जाणावा ॥७॥
माघांत रुद्रसेवा करिती । गणेशानाची निश्चिती । गाणपत्य महाभाग संचार करिती । अकुतोभय ते सारे ॥८॥
फाल्गुनांत निऋति सेवित । गणेशास भावयुक्त । दिक्पतिपद लाभत । अभिचार भावाख्य कर्मभोग ॥९॥
चैत्रांत अप्सरा गण सेवित । धूम्रवर्णांस भक्तियुक्त । नाना लावण्य लाभत । गायन वादनादि ऐश्वर्य ॥१०॥
वैशाखांत हेरंवा सेविती । यक्षजन अतिप्रीती । स्वव्यापारकुशल होती । नानाभोगपरायण ॥११॥
ज्येष्ठांत विनायकास सेवून । नाग झाले सामर्श्य संपन्न । बहुविध कार्यंकर्ते होऊन । नानाभोगपरायण ॥१२॥
आषाढांत पक्षिगण सेवित । गजाननास श्रद्धायुक्त । ते सारे भोगसंयुक्त । जाहले स्वकार्यकुशल सारे ॥१३॥
ढौंढ म्हणजे अधिक मासांत । ढुंढिराजास पर्वत भजत । विविध धातूंनी युक्त होत । रत्नाकर ते जाहले ॥१४॥
वार्षिक व्रत आचरिती । आपापल्या मासीं गजानना पूजिती । गाणेश पंचकांत मति । स्नान करून नमिती ते ॥१५॥
ऐसे नानाविध जन लाभले । सिद्धिमास फळे भले । त्यांचें वर्णन अशक्य झालें । अयुत जरीं वर्णनें ॥१६॥
हें मासभव सर्वं महिमान । सांगितलें तुज महान । हें वाचिता वा ऐकतां जन । सर्व सिद्धि प्राप्त करिती ॥१७॥
जें जें वांछित तें तें लाभत । यांत संशय मुळींच नसत । अंतीं गणेश्वराच्या धामांत । लीन होतात भक्त जन ॥१८॥
हें सर्घ तुज कथिलें । जे जे प्रश्न विचारिले । त्यांचें उत्तर तुला दिले । आणखी काय ऐकूं इच्छिसी ॥१९॥
ओमित श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खण्डे धूम्रवर्णचरिते मासानां माहात्म्यवर्णनं नामाष्टचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । गजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP