मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय २७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक विनवी सूतासी । वैशाखाचें माहात्म्य आम्हांसी । तैसेची श्रावण माहात्म्यासी । मलमास महिमाही सांगावा ॥१॥
सूता तूं सर्वांर्थकोविद । सांग सारें आम्हां विशद । तेव्हां सूत सांगे सौख्यप्रद । वैशाखव्रताचें महिमान ॥२॥
वृत्रासुर महादैत्य जिंकित । त्रैलोक्यासी महा बळवंत । कर्मखंडन मार्गें वांच्छित । देवांस नष्ट करावया ॥३॥
तेव्हां देवगण सारे भयभीत । स्वगुरूसी शरण जात । उपोषणपरायण ते प्रार्थिंत । त्यास म्हणे बृहस्पती ॥४॥
उदारधी तो महातेज युक्त । इंद्रादि देवगणा सांगत । करावें तुम्हीं वैशाख व्रत । तेणें सामर्थ्य लाभल ॥५॥
त्या व्रताच्या प्रभावानें सुरनायक । दधीचीच्या अस्थींचे पावक । वज्र लाभून ठार करील निःशंक । महासुरा त्या वृत्रासी ॥६॥
सुरर्षी तें ऐकून नमिती । तदनंतर वनांतरीं जाती । गुप्तरूपें आचरती । वैशाखव्रत आनंदानें ॥७॥
गाणेश पंचकातें नित्य सेविती । गणेशाचें ध्यान करिती । स्मरणपूर्वक पूजिती । परम भाविक ते सारे ॥८॥
वैशाखी पौर्णिमेच्या दिनीं । रात्री पाहती ते स्वप्नीं । सर्व सुखावह गणराज भक्ताभिमानी । पूजिती भाव भक्तीनें ॥९॥
ती मूर्ति त्यांस म्हणत । मी प्रवेशून इंद्रदेहांत । मारीन त्या महासुरास । निश्चित । वरदान हें माझें असे ॥१०॥
अमर मुनी सारे जागृत । होऊन स्वप्न आठवित । ते सारे जाहले विस्मित । परस्परांसी सांगती ॥११॥
सर्वांसी पडलें तेच स्वप्न । तदनंतर देवनायक वर आठवून । क्रोधसमायुक्त करी गमन । दधीचीच्या आश्रमाप्रती ॥१२॥
देवंसहित तेथ जाऊन । त्या दधीतीसी प्रार्थूंन । त्याच्या अस्थींचें वज्र करून । युद्धास गेला देवराज ॥१३॥
त्या समयीं वृत्रासुरा आव्हान । देऊन करी युद्ध दारून । वज्र मुनिअस्थीचें वापरून । वृत्रासुरा जर्जर केलें ॥१४॥
दैत्यांसहित वृत्र लढत । इंद्र अमरगणांसह झुंजत । त्या वृत्रासुरास मारित । तेव्हां पळाले दैत्य सारे ॥१५॥
ते पाताळ लोकांत गेले । देवेंद्रापुढें नमले । देव सारे आनंदले । गणपतीसी नमिती तैं ॥१६॥
बदरी अरण्य देशस्थ गणेशास । स्तविती ते भावसुरस । देवर्षींचें स्तोत्र त्या समयास । गणनायका प्रिय झालें ॥१७॥
परमात्म्यासी गणांच्या पतीसी । गणात्म्यासी परेशासी । अनंतमायाखेळकर्त्यासी । ब्रह्मेशा तुज नमो नमः ॥१८॥
महाविघ्ननाशासी । महात्म्यासी विघ्नेशासी । सुभक्तांच्या पालकासी । हेरंबा तुज नमन असो ॥१९॥
महादीनपालकासी । ढुंढीसी लंबोदरदेवासी । देवदेवेशासी अनाथासी । प्रणाथा तुज नमन असो ॥२०॥
नाथ हीनासी नाथनाथासी । वक्रतुंडासी परात्परतमासी । योगशांति प्रदात्यासी । योगपते तुज नमन असो ॥२१॥
योगासी सगुणासी निर्गुणासी । सुगुणनिर्गुणवर्जितासी । अनंतमायेनें संचारकर्त्यासी । मायाहीना तुज नमन असो ॥२२॥
मायिका मोहकर्त्यासी । मूषकवाहनासी मूषकध्वजासी । सिद्धिबुद्धिपते तुजसी स्वानंदस्था । आमुचें नमन असो ॥२३॥
गणाध्यक्षा किती करावे स्तवन । शांतिरूप परात्पर तूं पावन । वेदादीही धरिती मौन । शास्त्रवेते योगोजनही ॥२४॥
ऐसें बोलून करिती नमन । देवर्षी नंतर करिती गमन । आपुल्या स्थानीं परतून । हर्षयुक्त सारे चित्तांत्त॥२५॥
वर्णाश्रमयुक्त जन । जाहले विगतज्वर पावन । देवर्षींसी हविर्भाग लाभून । आनंदी आनंद झाला ॥२६॥
ऐशापरी हें वैशाखव्रत । प्रभावें त्याच्या देवेंद्र वृत्रासी मारित । देवमुनी सुखी होत । ऐसीचि अन्य कथा असे ॥२७॥
गार्ग्यवंशज द्विज पुनीत । शिवदत्त नामा गणेशभक्त । नित्य गणनायकासी भजत । शास्त्रधर्मानुसारें ॥२८॥
भार्यापुत्रसमन्वित । अग्निहोत्र तो नित्य करित । होता अत्यंत तेजयुक्त । एकदा गर्ग तेथ आले ॥२९॥
योगींद्र ते येती सदनांत । जाहला मुदित शिवदत्त । सर्वार्थ कोविद त्यांस पूजित । महाभागा गर्गासी ॥३०॥
आपुल्या सुतास तो पाहत । नित्य जो होता सेवारत । विनयशाली मनीं वांछित । मुक्ति सुख सर्वदा ॥३१॥
तें पाहून गर्ग तोषला । आपुल्या पुत्रास म्हणाला । अरे शिवदत्ता सांग बाळा । काय तूं मनीं वांछितोसी ॥३२॥
जें जें तुझ्या मनांत । तें तें पुरवीन समस्त । शीलप्रभावें तुझ्या संतुष्ट । यांत संशय कांहीं नसे ॥३३॥
त्याचें तें ऐकून वचन । शिवदत्त करांजली जोडून । तयास प्रणाम करून । सुखप्रद वचन बोलला ॥३४॥
योगींद्रसत्तमा जरी तूं प्रसन्न । वेदरहस्य जें गुहय शोभन । तें सांगून करी पावन । कृतकृत्य मजलागी ॥३५॥
गर्ग म्हणे तयाप्रत । चौर्‍यांशी लक्ष योनींत । मानवयोनि श्रेष्ठ वर्तत । विशेष सुज्ञ जरी त्यांत जाहला ॥३६॥
धर्मार्थकाममोक्षांची पात्रता । त्या सुज्ञास लाभे तत्त्वता । त्यांतही ब्राह्मण वर्णांत जन्मतां । श्रेष्ठता परम लाभते ॥३७॥
ऐसें शास्त्रसंमत मत । सर्वकर्माधिकार तैं लाभत । त्या स्वधर्मशास्त्रज्ञांत । तपयुक्त अधिक श्रेष्ठ जाणा ॥३८॥
त्या तपस्व्यांत ज्ञानी महाश्रेष्ठ । सर्वत्र आत्मदर्शन तयाप्रत । त्यांतही योगी अधिक श्रेष्ठ । गाणपत्य योगी श्रेष्ठतम ॥३९॥
जन्मो कोणत्याही वर्णांत । गाणपत्य अधिक संमत । गणेशयोगी श्रेष्ठ सर्वांत । ऐसें सांगे वेदवाणी ॥४०॥
ऐसें हें वेदान्तसंभूत । सार तुज सांगितलें समस्त । म्हाणोनि भजावें गणेशाप्रत । तेणें कृतकृत्य होशील ॥४१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णंचरिते वैशाखमासमाहात्म्ये शिवदत्तबोधो नाम सप्तविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP