खंड ५ - अध्याय ३२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल सांगती कथा पुढती । ऐसी गजाननाची उक्ती । तैसेंच पुढें हे प्रजापती । दक्षा सर्वही जाहीलें ॥१॥
वृंदा गणेशास वंदून । तप करी वनांत जाऊन । चिंताक्रांत मानसीं होऊन । गणेशावरी भावलब्ध ॥२॥
गणेशास मनीं ध्याऊन । तप केलें उत्तम एकमन । नाममंत्र सतत जपून । आदरें पूजी गणेशासी ॥३॥
ऐशियापरी दीड लक्ष वर्षें जात । तेव्हां गणराज प्रसन्न होत । तिजला वर देण्या येत । एकाएकी प्रसन्नमुख ॥४॥
त्यास प्रणाम करून पूजित । वृंदा झाली अति हर्षित । त्याचें स्तुतिस्तोत्र गात । भावभक्तिप्रभावें ती ॥५॥
विघ्नराजा तुज वंदन । भक्तविघ्नहरा तुज नमन । अभक्तां विघ्नदात्या तुज अभिवादन । परेशा तुज प्रणाम असो ॥६॥
परांत परात्परासी । भक्तेशासी भक्तिप्रियासी । ब्रह्मेशासी गणाधीशासी । ब्रह्मरूपासी नमन असो ॥७॥
गणाधिपतीसी अमेयासी । अप्रतर्क्यासी स्वानंदवासीसी । शिवविष्णुमुख्यांसी स्वपददात्यासीं । अनाथासी नमन असो ॥८॥
सर्वांच्या नाथासी वक्रतुंडासी । सर्वांत आदि पूज्यासी । विनायकासी वीरासी । शूर्पकर्णासी नमन असो ॥९॥
ढुंढीसी गजाननासी हेरंबासी । चिंतामणीसी अनंतगुणासी । नाना क्रीडाकरासी । परांच्या परेशा नमन तुला ॥१०॥
मूषकध्वजासी पूर्णानंदासी । सर्वांच्या मातापित्यासी । ज्येष्ठांच्या ज्येष्ठ राजासी । ज्येष्ठपद प्रदात्यासी नमन ॥११॥
तूम योगाकार परात्पर । गणाधीशा मी तर पामर । तुझें काय गाऊं स्तोत्र । म्हणोनि केवळ प्रणास करितें ॥१२॥
त्यानें प्रभो तुष्ट होई । गाणेशयोग मज देई । गाणपत्या मज करी नेई । अपराध माझे विलयासी ॥१३॥
तुझ्या सन्निध पूर्वी केलें । सदाचाराचें मी उल्लंघन तसलें । ते अपराध पाहिजे क्षमले । तुझ्या पूजेंत मान देई ॥१४॥
गणाधीशा तूं मान्य करावें । स्वीकारावें मज अल्पभावें । वरदायका मज उद्धरावें । कृपा करून दयाळा ॥१५॥
तुझी समता नाथा मजसी । कदापि अशक्यप्राय ऐसी । परी तपाच्या मदानें तैसी । आगळीक्र पूर्वीं मी केली ॥१६॥
परी तूं ती क्षम्य मानावी । माझी ही प्रार्थना ऐकावी । ऐसी स्तुति गायली बरवी । पुनरपि वंदी गणेशातें ॥१७॥
ऐसें वृंदेचें वचन ऐकून । वाक्यविशारद बोले प्रसन्न । माझा आद्ययोग लाभशील पावन । गाणपत्य तूं होशील ॥१८॥
मुली महाभागें तुजला स्थान । मिळेल एकदा वर्षातून । भाद्रपद शुक्लचतुर्थीस पावन । तुझें पत्र मज मान्य होईल ॥१९॥
जरी वापरती माझ्या पूजनांत । त्या दिनीं जन भक्तियुक्त । तुजला तरी मी स्वीकारीन पुनीत । वृंदे तुज हें वरदान ॥२०॥
एकवीस प्रकारची पत्री वाहती । त्यांत तुझे एक प्त्र मजप्रती । मान्य होईल त्या दिनीं प्रीती । अन्य दिनीं हें न चालेल ॥२१॥
मर्यादा उल्लंघनासम पाप जगांत । न झालें पूर्वीं न होईल खचित । तूं स्वल्प उल्लंघन करितां परित्यक्त । जाहलीस तत्काळ ॥२२॥
जे माझ्या नियमांचें उल्लंघन । करिती त्या जनां मी त्यजीत । परी । तूं तप घोर करून । भावबळें मज बांधिलेंस ॥२३॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र । भुक्तिमुक्तिप्रद पवित्र । ब्रह्मभूयप्रद सर्वत्र । पठकां वाचकां सर्वदा ॥२४॥
तुलसी कधीं मज अन्यकाळीं अर्पिती । ते त्यायोगे पापी होती । त्या उल्लंघनें भीति । तयांसि माझ्या शापाची ॥२५॥
परी या स्तोत्राचें वाचन । अथवा करील जो श्रवण । तुलसीदल वाहनें जें पाप उन्मन । तें सासें त्याचें सरेल ॥२६॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावले सत्वर गजानन । तुलसीचें मन प्रसन्न । हर्षोत्फुल्ल जाहलें तैं ॥२७॥
तेव्हांपासून चिंतामुक्त । ती महाभागा तुलसी होत । विष्णुपत्नी पुढें सुपुनीत । तें कथानक पुढे असे ॥२८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते तुलसीवरप्रदानं नाम द्वात्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP