खंड ५ - अध्याय २७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्षें विचारिले मुद्‍गलाप्रत । दूवेंचें चरित्र अति अद्‍भुत । हर्षकारक तें सांगा मजप्रत । शमी-मंदाराहून भिन्न ॥१॥
तें मुद्‍गल सांगती तयाप्रत । पूर्वी देवदेवेश ब्रह्मा सृष्टि निर्मित । चराचर निर्मूनिया चिंतित । अन्नासंबंधी तयाच्या ॥२॥
प्रतितामह तो ध्यान लावित । गजानन देवा शरण जात । तेव्हां त्याच्या एका रोमांतून जन्मत । एक देवी अपूर्व ॥३॥
सर्वतः तिज हातपाय असत । सहस्त्र वदनें तिची शोभत । सहस्त्र अवयव विराजत । ऐसी देवी पाहूनिया ॥४॥
ब्रह्मदेव झाला हर्षभरित । ती देवी अन्नरूपा गुणयुक्त । सर्वांचे पोषन करी सतत । तिजमुळें सर्वधारक ब्रह्म ॥५॥
विधात्यास प्रणास करून । समोर उभी ती कर जोडून । म्हणे आज्ञा करावी मज लागून । काय करूं मी पितामहा ॥६॥
ब्रह्मा म्हणे तिजप्रत । सर्वांसी अन्नदाती तूं असत । दूर्वा नामे होशील ख्यात । तप करी विधानतः ॥७॥
निर्माण करी सर्व अन्न । जैसी आज्ञा तैसें करीन । ऐसें बोलून वचन । प्रणाम करून तपास बसली ॥८॥
तप केलें तिनें प्रसन्न । मनांत गणेशाचें ध्यान । निराहार सर्वथा राहून । एकाक्षरमंत्र तिनें जपिला ॥९॥
त्या मंत्राचा जप करित । दिव्य सहस्त्र वर्षें पर्यत । तेव्हां वरदायक प्रकटत । श्रीगणेश तिच्यापुढें ॥१०॥
त्या देवास पाहत । तैं ती लगबग वरती उठत । प्रणाम करून पूजित । अथर्वशीर्षें स्तवन करी ॥११॥
तिज म्हणे गणेशाय । नानाविध सृष्टि रचून । महाभागे सर्ववंद्य होऊन । आदर्शभूत तूं सार्‍यांसी ॥१२॥
ऐसें देऊन वरदान । गणाधीश पावले अंतर्धान । ती दूर्वा हर्षयुक्त मन । सृष्टि रचण्या संकल्प करी ॥१३॥
तिच्या मस्तकापासून । विविध जन्मलें स्वर्गान्न । त्यायोगे स्वर्गस्थ जन । विविध रस भोगिती ॥१४॥
उदरापासून तिच्या निःसृत । विविध अन्न त्या समयीं उचित । भूमिसंस्थ जन तें भोगित । नाना रसयुक्त तृप्तिकर ॥१५॥
तिच्या पायापासून । जे निर्माण झालें अन्न । तें विविध षड्‍रस भोगून । आनंदले पाताळनिवासी ॥१६॥
त्या दूर्वेच्या अंगप्रत्यंगातून । उपजलें नाना अन्न । त्यानें देवी संतुष्ट पावन । प्राणिमात्रही तोषला ॥१७॥
हृष्ट पुष्ट जन समस्त । पाहताआं ब्रह्मा आनंदित । संतोषून जात तिजप्रत । द्विजाकरवी मंत्राभिषेक करी ॥१८॥
अन्नाधिपत्यीं अभिषिक्त । पूर्वी दुर्वा तैं होत । ब्रह्मदेवाच्या प्रभावें लाभत । सर्वमान्यत्व ती दूर्वा देवी ॥१९॥
राज्यश्री लाभता मदयुक्त । पुढे ती मंत्रजप विसरत । प्रजापते तेणें विघ्नयुक्त । स्पर्धा करी पार्वतीशी ॥२०॥
ती स्वमानसीं विचार करित । नित्य आनंदें मी अन्नपूर्णा जगांत । जगदंवा सर्वांची वर्तत । अन्नपूर्णत्व कारणें ॥२१॥
ती मी अन्नस्वरूपस्थ असत । ऐसा गर्व वृथा करित । तिचें जाणून हें इंगित । रागावली जगज्जननी ॥२२॥
परी दूर्वेंचें दौरात्म्य सहन । करी पार्वती राग गिळून । राहिली शिवासंन्निध मौन । पुढें एकदा काय घडलें ॥२३॥
एकदा चंद्राच्या गृहांत । महोत्सव एक असत । तेथ देवादिक समस्त । आले आपापल्या स्त्रियांसहित ॥२४॥
तेथ दूर्वा मदोन्मत्त । निंदी जगदंबा पार्वतीप्रत । म्हणे ही वृथाचि असे ख्यात । जगांत जगदंबा नामें ॥२५॥
ही नांवाची जगदंबा असत । परी सत्यार्थे न जगा पाळित । ऐंशा विविध वाक्यांनी निंदित । जगदंबा तैं क्रोध करी ॥२६॥
होऊन अत्यंत क्रोधयुक्त । दूर्वेस शाप तेव्हां देत । माझ्या रोमांतून जन्मून विश्चित । का स्पर्धा करिशी मजसवें ॥२७॥
तरी दृष्टे तूं गवत होऊन । पडून रहा भूतलीं जाऊन । ती दूर्वा तेव्हांपासून । तृणरूपा जाहली ॥२८॥
परम पावनी सर्ववंद्या ती दुःखित । द्विरदाननासी स्मरत । म्हणे अपराध क्षमावा तूं दयावंत । मंत्रत्याग घडलासे ॥२९॥
ऐसें बोलून वनांतरांत । दूर्वा तप आचरी उत्तम सतत । विघ्नेश्वरा देवास ध्यात । मंत्रजपपरायणा ती ॥३०॥
ऐसी शंभर वर्षें जातीं । गजानन तैं प्रसन्न होती । तिजला वर देण्या प्रकटती । भजनप्रिय विनायक ॥३१॥
गणराजास पाहून । भक्तिभावें करी ती वंदन । आनंदानें करी स्तवन । कर जोडून दक्षा ती ॥३२॥
गणेशासी विघ्नराजासी । भक्तांची विघ्नें संहर्त्यासी । अभक्तांना भयंकर जो त्यासी । अनंतासी नमन असो ॥३३॥
अप्रमेयासी नाना लीलाधरासी । हेरंबासी महेशासी । नमन पूज्यासी । सर्वपूज्या सर्वादिपूज्या ॥३४॥
ब्रह्मरूपासी ब्रह्माकारासी । सर्वेशासी ब्रह्मणस्पतीसी । अनाकारासी साकारमूर्तीसी । ब्रह्मरूपा तुज नमन असो ॥३५॥
शांतीस शांतिदात्यासी । परेशासी लंबोदरासी । चौरेशवाहनासी परात्म्यासी । चतुर्भुजा तुज नमन असो ॥३६॥
ज्येष्ठांत ज्येष्ठराजासी । ज्येष्ठराजासी । ज्येष्ठपद प्रदात्यासी । महोदरासी पूर्णासी । पूर्णानंदा तुज नमन ॥३७॥
स्वानंदवासीसी सिद्धिबुद्धिमयासी । सिद्धिबुद्धिपतीसी । भक्तेशा नाथा तुजसी । नमो नमः सर्वदा ॥३८॥
काय स्तुति मी करूं सांप्रत । वेदही तुझ्या स्ववनीं विस्मित । म्हणोनि भावें प्रणाम करित । त्यानें प्रभु तुष्ट होई ॥३९॥
ऐसी स्तुति करून । आनंदें नाचे न देहभान । तेव्हां गणराज गणेशान । प्रसन्न होऊन म्हणे तिजला ॥४०॥
तूं रचिलेलें हे स्तोत्र म्हणेल । त्याचा अपराध क्षम्य होईल । जें जें मनीं वांछील । तें तें सर्व देईन त्यासी ॥४१॥
भुक्तिमुक्तिप्रद हें स्तोत्र । सिद्धिप्रद जगीं सर्वत्र । तुझ्या ह्रदयीं जो पवित्र । तो अन्य हेतुही पुरवीन ॥४२॥
क्रोधयुक्त मी भक्तितोषित । सांप्रत मंत्रत्याग अपराध क्षम्य मानित । ऐसें वचन ऐकून म्हणत । दूर्वा भयभीत । मानसानें ॥४३॥
प्रजापते तिच्या नेत्रांत । आनंदाश्रु ओघळत । प्रीतीनें ती लंबोदरास म्हणत । दृढभक्तित दे देवा तुझी ॥४४॥
जरी तूं नाथा वर देसी । तरी गणाध्यक्षा दे मजसी । तुझी भक्ति जेणें सुखासी । न्यून न कदा पडेल ॥४५॥
जगदंबा जी पार्वती । तिची कलांशा मी जगतीं । तिच्यासह स्पर्धा चित्तीं । करता शापित जाहले ॥४६॥
मजला तृण रूप लाभून । घरातलीं मी पडेन । तुज समीप आले म्हणून । वाचवी महाभयांतून या ॥४७॥
तें ऐकून दूर्वेचें वचन । तिजला म्हणे गजानन । शरणागत तूं म मजसी दीन । ऐसें कां तूं वदतेस ॥४८॥
चिंता सारी सोडावी । रक्षणाची निश्चिती धरावी । सर्व शुभ करून सुखी करावी । तुजसी हा शब्द माझा ॥४९॥
अंशानें तूं तृणरूप होशील । महीतलावर पडशील । परी दैवी देधधरा राहशील । स्वर्गलोकीं आनंदाने ॥५०॥
पृथ्वीवर तृणरूपांत । अमृतधारिका तूं निश्चित । शतमूळा प्रकांडापासून वाढत । प्ररोहा तू शत अंकुरा ॥५१॥
सर्वमान्या सर्वपूज्या होशील । देवादींसीही प्रिय अमल । यात संदेहाचा लव नसेल । अन्नदायिके माझ्या वरानें ॥५२॥
महामंगला तू प्रीतिवर्धिनी । माझी होशील प्रिय जनीं । शुभमंगल दायिका जीवनीं । ऐसा वर तुज देतों ॥५३॥
तुझ्या पत्रानें देवतांचें पूजन । करतील समस्त जन । तुझ्या सम पुण्यद पावन । सर्व पानांत अन्य नसे ॥५४॥
लक्ष्मी ललितिकादी अवतार । शक्तीचे जे उदार । त्यांना विशेषे प्रिय फार । होशील तूं महाशूभे ॥५५॥
गिरिपुत्रीने तुज शापिलें । म्हणोनि कदापि न स्पर्थिले । भावबळें अन्यत्र मान्यतेचें लाभलें । लेणें तुजला निःसंशय ॥५६॥
माझी दृढ भक्ति मनांत । सदैव राहील तव अत्यंत । माझ्या प्राणांस मच्चित्त । प्रीतिवर्धिनी सम होशील ॥५७॥
जे नर दूर्वाविरहित । माझें जगीं जगीं पूजन करित । देवी ते पूजनफल न लाभत । ऐसा संकल्प माझा असे ॥५८॥
दूर्वेसम अन्य सुप्रिय नसत । दूर्वेविना मी निराहारी जगांत । दूर्वादल त्यागून पूजित । ते मानव शत्रू माझे ॥५९॥
ते नित्य पडतील नरकांत । परी दूर्वापत्र जो अर्पील । मजला त्यास देत । अपार धन मी विशेषें ॥६०॥
दूर्वापत्रानें संतुष्ट । देईल मी सकल इष्ट । ऐश्वर्यादी प्राजें मी पुष्ट । दूर्वेस अन्य कांहीं नसे ॥६१॥
जे माझे असतील भक्त । त्यांनीं दूर्वांनीं पूजन नियमित । करावें तेणें मी जित । होईन दूर्वाप्रभावानें ॥६२॥
ऐसें सांगून अंतर्धान । क्षणांत जाहले गजानन । दूर्वा हर्षभरित मन । विघ्नेशासी भजतसे ॥६३॥
जैसे लंबोदरें कथिलें । तैसेंचि सारें जाहलें । दूर्वेसी जगांत लाभलें । सर्व मंगलरूप मधुर ॥६४॥
गणेश वरदानानें होत । दूर्वा गाणपत्य जगांत । ऐसें हें दूर्वामाहात्म्य तुजप्रत । संक्षोपानें कथिलें असे ॥६५॥
जो हें वाचील अथावा ऐकेल । त्यास भुक्तिमुक्ति मिळेल । दूर्वोत्पत्तीचें आख्यान अमल । म्हणोनि नेमें वाचावें ॥६६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते दूर्वोत्पत्तिकथनं नाम सप्तविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP