खंड ५ - अध्याय १०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । नैध्रुव म्हणे असिताप्रत । ऐकिली कथा अद्‍भुत । क्रोधासुराची शांती होत । अवीट गोडी या कथेची ॥१॥
विघ्नेशाचें चरित । ऐकून तृप्ति न होत । ऐसें आपण सांगत । ब्रह्मदेव तैं काय म्हणाले ? ॥२॥
तो योगप्रद वृत्तान्त । ताता असिता मजप्रत । दयासिंधो सांगा सांप्रत । जेणें तृप्त हो मन माझें ॥३॥
मुद्‍गल म्हणती दक्षाप्रत । ऐसें नैध्रुव विचारित । तेव्हां पितृव्य असित त्यास सांगत । अन्य कथा गणेशाची ॥४॥
असित म्हणे पुत्रा सांगेन । योगशांतिप्रद कथा पावन । गणेशाचें ज्यांत महिमान । ब्रह्मेशाचें विचक्षण ॥५॥
ब्रह्मदेवास पणास करून । मीं विचारी विनम्र मन । ताता महायोग शांतिप्रद प्रसन्न । सर्व तारक मज सांगा ॥६॥
सहज स्थितींत स्वाधीनता । स्वेच्छेनें कैसी येत हाता । महायोग्या तें तत्त्वता । सांगा मज वंदन तुम्हां ॥७॥
मी आणिक वत्सर असत । शांति विहीन स्वपीडित । शांति प्राप्त्यर्थ सांप्रत । काय करूं तें आज्ञापावें ॥८॥
असें आम्ही प्रार्थिलें । तेव्हां प्रेमें पितामह म्हणाले । गाणपत्य जें भले । गणेशज्ञानाचें रहस्य ॥९॥
कर्म ज्ञानासम ब्रह्म असत । सहज तें चौथे वर्तन । त्यांच्या संयोगानें प्रकटत । स्वानंद जो मौनधारी ॥१०॥
तेथ ब्रह्म तैं स्वाधीन । त्रिधा कोठलें पराधीन । स्वसंवेद्यमयें शोभन । योगसाहाय्यें सुना लाभे ॥११॥
संयोग मायेनें युक्त । सर्व संयोग भावें होत । अयोगानें सर्व संयोग नाश पावत । व्यतिरेकानें सर्वदा ॥१२॥
निवृत्तीनें स्वधीयुक्त । ब्रह्म न अन्यथा होय प्राप्त । स्वकीया अभेदें धारण करित । निवृत्ति योगिजन सदा ॥१३॥
संयोग अयोगांच्या योगें होत । योग शांतिप्रदायक जगांत । शांतीनें तो लाभत । अन्यथा तो न लाभे ॥१४॥
शांतिरूपधर पूर्ण वर्तत । गणेश ऐसें ज्ञाते सांगत । वेदही ऐसें वर्णन करित । त्याचें भजन कराल जरी ॥१५॥
तरी तुम्ही उभयता व्हाल । शांतियुक्त योगी अमल । योगि संमत महाबळ । यात असत्य कांहीं नसे ॥१६॥
संप्रदानमय याचा देह असत । शिर तें असे प्रज्ञात । त्याच्या योगें गजाकार दिसत । गणेश देहधारक ॥१७॥
गण ते समूह रूप ख्यात । समूह ब्रह्मवाचक ज्ञात । त्यांचा स्वामी गणेश निश्चित । यात संदेह कांहीं नसे ॥१८॥
चित्तरूप महाबुद्धि वर्तत । चित्तातें सिद्धी मोह पाडित । त्यांचा पति तो साक्षात । गणेश ऐसें वेद सांगती ॥१९॥
मोहयुत चित्त त्यागून । करा चिंतामणीचें भजन । योग शांतीनें सतत स्मरून । योगरूपा त्या महाभागांनो ॥२०॥
असित म्हणे ऐसें बोलून । ब्रह्मदेवें धरिलें मौन । त्यास प्रणाम करून । वत्सरासह वनीं गेली ॥२१॥
आम्हीं दोघांनी प्राप्त केली । शमदमयोगें शांति भली । जैसी ब्रह्मदेवें सांगितली । तैशाचि परी सुनिश्चल ॥२२॥
परी गणराजाच्या भजनांत । आम्हीं सदा होतो निरत । ऐसें एक वर्ष उलटतां प्रकटत । गणाध्यक्ष वरदाता ॥२३॥
त्यास पाहून आम्हीं प्रणत । त्या देवासी यथाविधि पूजित । भक्तीनें मान लववून स्तवित । गणेशासी त्या वेळीं ॥२४॥
लंबोदरासी, सतत योगरूपासी । योगाकारशरीरासी । योगशांतिप्रदासी । लंबोदरा पुज नमन ॥२५॥
विघ्नेशासी महाभक्तासी । विघ्नहर्त्यासी स्वानंदवासीसी । अभक्तांसी विघ्नकर्त्यासी । मूषकवाहना नमन तुला ॥२६॥
मूषकध्वजासी अनाथासी । गणेशासी सर्वनाथासी । नाथांच्या नाथरूपासी । विनायका तुज नमन ॥२७॥
हेरंबासी सर्वांच्या मातापित्यासी । ज्येष्ठराजासी ज्येष्ठज्येष्ठासी । अमेयासी अप्रमेयासी । अनंत खेळकर्त्या नमन तुला ॥२८॥
अनंतासी अनंतरूपासी । अनंतदासी सिद्धिबुद्धिपतीसी । नाथासी भक्तसंरक्षकासी । गजवक्त्रा तुज नमन असो ॥२९॥
नानाशक्ति प्रपालकासी । अनंत माया विहारीसी । सर्वांच्या आदिपूजनासी । सर्वांस सिद्धिप्रदा नमन ॥३०॥
सर्वपूज्यासी वक्रतुंडासी । धीरासी एकदंतासी । महोदरासी देवासी । देवदेवेशा तुज नमन ॥३१॥
असुरांच्या सहायासी । नाना वरप्रदात्यासी । असुरांच्या हननकर्त्यासी । आसुरा तुज नमोनमः ॥३२॥
ब्रह्मपतीसी ब्रह्मवाद्यासी । ब्रह्माकारासी ढुंढीसी । वेदवेद्यासी मनोवाणी विहीनासी । योगेशासी नमन असो ॥३३॥
मनोवाणिमयासी । परेशासी सर्व रोगवर्जितासी । किती स्तवन करावें तव गुणासी । गणाधीशा तुज नमन ॥३४॥
वेद योगींद्रही थकले । तुझी स्तुति करूं न शकले । पूर्णत्वें त्या तुज केलें । विनम्रपणे आम्ही वंदन ॥३५॥
ऐसी ऐकता स्तुति । गणाधीश त्या मुनिद्वया म्हणती । विप्रांनो वर मागा सांप्रती । भक्तितुष्ट मीं असे ॥३६॥
आपण रचिलेलें हें स्तोत्र सतत । मातें प्रिय होय जगांत । सर्वसिद्धिप्रद अद्‍भुत । माझी भक्ति देई जें ॥३७॥
ऐसें वदला गजानन । तैं मुनिद्वय म्हणती विनम्र मन । गणाध्यक्षा तव पदीं रक्षावें मन । भक्ति आमुची दृढ व्हावी ॥३८॥
गाणपत्यप्रियता आम्हां द्यावी । अन्य वराची इच्छा नाहीं । आमुची वंदना स्वीकारावी । हीच आमुची प्रार्थना ॥३९॥
तथास्तु म्हणोनि अंतर्धान । पावले नंतर गजवदन । तेव्हांपासून एकनिष्ठमन । भक्तिभावें पूजितो तया ॥४०॥
नैध्रुवा तुज गणेशान । ऐसें हें कथिलें महान । शमदमपर होऊन । गणनायका त्या भजावें ॥४१॥
ऐसें सांगून नैध्रुवाप्रत । गणपती मंत्र देत । एकाक्षर जो पुनीत । असितयोगी  त्या समयीं ॥४२॥
तदनंतर अंतर्धान पावत । असितयोगी परमार्थहा त्वरित । नैध्रुव तपश्चर्या करित । गणेशाची सर्व यत्नें ॥४३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते वत्सराऽसितशांतिवर्णनं नाम दशमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP