खंड ५ - अध्याय २८
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः । मुद्गल अन्य इतिहास पुरातन । सांगती दक्षासी पावन । दूर्वेचा महिमा शोभन । जेणें कळेल मानवांसी ॥१॥
दंडकारण्य देशांत । एक अंत्यज होता रहात । पिशुन नांवाचात तो असत । नांवासम दुष्टबुद्धि ॥२॥
चोरी करी वनांत जाऊन । मार्गस्था मारून द्रव्यहरण । क्वचित् परस्त्री पाहता भोगून । भ्रष्ट तिजला करि तो ॥३॥
शिश्नउदरपर होऊन । वनांतरीं सतत हिंडून । शस्त्रधारी करी जनांचें हनन । गांवात तैसें नगरांत ॥४॥
बह्महत्यादि पापें अपार । केली अवर्णनीय सर्वत्र । एके दिनीं तो शूद्र । बैसला होता वनांत ॥५॥
एका झाडाच्या ढोलींत । वाटसरूंची वाट पाहत । तों त्यात एक ब्राह्मण दिसत । शस्त्रधारी तैं बाहेर गैला ॥६॥
जणू काळ दंडधर । ऐश्या त्यास पाहून उग्र । ब्राह्मण करी हाहाकार । भयें पळूं लागला ॥७॥
द्विजांचा आकान्त ऐकती । तेव्हां कांहीं क्षत्रिय येती । दैवयोगें पांच असती । वाटसरू ते क्षत्रिय ॥८॥
त्यांनी आपुल्या शस्त्रानें ताडिला । तो शूद्र पापी मेला । ब्राह्मण पथिक आनंदें गेला । परत आपुल्या आश्रमीं ॥९॥
तदनंतर त्या दुष्ट शूद्रा नेत । यमदूत तेथून त्वरित । टाकून प्रथम रौरव नरकांत । नंतर त्यास शिजविती ते ॥१०॥
पांचव्या दिवशीं अद्भुत । एक घटना तेथें घडत । नरक जाहला शांत । यातनावर्जित सर्वत्र ॥११॥
ते परम आश्चर्य पाहती । यमदूत निवेदिती । नरक जाहला शांत म्हणती । वृत्तान्त हा विस्मय कारी ॥१२॥
तें ऐकून ध्यान लावित । यमधर्म तैं सर्व जाणत । लंबोदर प्रभूसी स्मरत । सांगे आपल्या दूतांसी ॥१३॥
हा दुष्ट महापापी चांडाळ असत । यांत अल्पही संशय नसत । परी नरकांत राहण्या सांप्रत । योग्य नसे राहिला ॥१४॥
कारण याला पुण्य लाभलें । अकल्पित परी यास न कळलें । हा मृत होतां जाहलें । स्पर्शन याला दूर्वेचें ॥१५॥
कोणी गाणपत्य येऊन । याच्या जवळी तत्क्षण । एक दूर्वा मस्तकावरून । पडली याच्या प्रेतावरी ॥१६॥
दूतांनो दूर्वेचा स्पर्श होत । जिवंत अथवा असो मृत । त्याची सर्व पापें विलया जात । यांत कांहीं न संशय ॥१७॥
तो पुण्यराशी होईल । सर्वमान्य सर्वकाल । म्हणून त्यास ओढून या वेळ । आणा माझ्यासमोर ॥१८॥
यमाचें वचन ऐकून । दूत झाले विस्मितमन । त्या दुष्टास ओढून । काढण्या ते प्रत्न करिती ॥१९॥
तव तेथ एक आश्चर्य होत । विमानांतून गणेशदूत । आले त्यास नेण्या अवचित । स्वानंदपुरा त्या ते नेती ॥२०॥
त्या दुष्ट पाप्यास । ब्रह्मगति देती सरस । पूर्वदेहीं दूर्वेचा स्पर्श । होतां ऐसें पुण्य लाभलें ॥२१॥
तो जाणून वृत्तान्त । धर्म म्हणे स्वसेवकांप्रत । दूतांनो पहा माहात्म्य उदात्त । दूर्वेचें केवढें हें ॥२२॥
धन्य हा पिशून जगांत । ज्याच्या देहाजवळी येत । कोणी योगी अवचित । दूर्वा पडली देहावर ॥२३॥
दूर्वा पडतां प्रेतावर । जरी ब्रह्मपद लाभला दुष्ट नर । या दूर्वेचें माहात्म्य कुठवर । वर्णन करावें सांगा मीं ॥२४॥
दूर्वेचें समग्र महिमान । कोणास ज्ञात महान । ऐसें सांगून लोचन । भरून आले रविनंदनाचे ॥२५॥
यमधर्म गणेशास ध्यात । नित्यनेमीं त्यास भजत । ऐसा तो भक्तियुक्त । सदैव स्मरे गजाननासी ॥२६॥
हें दूर्वेचें महिमान । जो ऐकेल किंवा करील वाचन । त्याचे वांछित जजानन । विघ्नेश सारे पुरवील ॥२७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते दूर्वापत्रस्पर्शमहिमावर्णनं नामाष्टाविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP