खंड ५ - अध्याय ६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । ब्रह्मा वर्णन पुढें करित । विश्वामित्र वसिष्ठांनो परम अद्‍भुत । ऐका गणनाथाचें चरित । महा शांतिप्रदायक जें ॥१॥
एकदा क्रोधासुर सभेंत । विराजला होता आसनीं निवांत । तोंच आकाशवाणी ऐकत । भयदायिनी त्या समयीं ॥२॥
देवांनी मुनींनी जगांत । लंबोदर प्रार्थिला भगवंत । तुझ्या वधार्य निश्चित । ठार मारील तो तुजला ॥३॥
तेणें जग सुखी करील । शमवील सारें तुझें बळ । हें वचन ऐकतां अति विकल । क्रोधासुर जाहला ॥४॥
रागाच्या आवेशांत । क्रोध पडला मूर्च्छित । आकाशवाणीनें त्या भयभीत । दैत्येंद्र सावध करिती तया ॥५॥
विप्रर्षीही उत्तेजन । देऊन म्हणती वचत । बली आदी असुर उन्मत्त । कसली वाटली एवढी भीती ॥६॥
हे मानदा तें सांग आम्हांप्रत । दैत्येशांचें वचन ऐकून सांगत । क्रोधासुर तैं भययुक्त । वृत्तान्त आकाशवाणीचा ॥७॥
तो वृत्तान्त ऐकती । तैं दैत्य समस्त कुद्ध होती । मदोन्मत्त ते म्हणती । संहार करूं देवमुनींचा ॥८॥
आमुचे देव शत्रू असत । त्यांनी दारुण संकल्प केला निश्चित । महाभागा आज्ञा द्यावी त्वरित । सर्व देवांचें हनन करूं ॥९॥
तेव्हां क्रोधासुर अति हर्षित । युद्धासाठीं सज्ज होत । असुरगणांनी तो युक्त । गेला शैलेंद्र मुख्यांकडे ॥१०॥
दैत्य वीरांमवेत । आला महाक्रोध युद्धीद्यत । हें जाणतां भयभीत । देव स्मरती गणनायकासी ॥११॥
त्यांनी स्मरण करिताच प्रकटत । लंबोदर तैं प्रतापवंत । मूषकवाहन महाप्रभू सिद्धिबुद्धिसहित । पाशादि शस्त्रें धरून करीं ॥१२॥
त्याच्या नाभीवरी शेष रुळत । तीन नयन त्याचे विलसत । ऐसें त्याचें रूप पाहत । देव तैसे ऋषिगण ॥१३॥
नंतर भय सारें सोडून । मुनि करिती प्रसन्न मन । दारुण वृत्तान्त सांगून । विनयपूर्वक प्रार्थिती ॥१४॥
तो भयंकर वृत्तान्त । ऐकून सुराधिपां तैसें मुनीस म्हणत । लंबोदर तेव्हां प्रसन्नचित्त । राग दैत्याचा वाटूनियां ॥१५॥
अहो प्राज्ञ देवमुनींनो चित्तांत । भय नका धरूं सांप्रत । त्या महा असुरा मारीन निश्चित । धर्मस्थापना करीन मी ॥१६॥
तितुक्या माजीं जवळी येत । तेथ क्रोधासुर अवचित । परी लंबोदरास पाहून भयभीत । असुरेंद्र तो जाहला ॥१७॥
दैत्यवीरांस म्हणत । ती आकाशवाणी सत्य वाटत । त्यांत संशय अल्पही नसत । हाच तो लंबोदर देव ॥१८॥
हयास देवगण हे प्रार्थिती । ऐसी ऐकता क्रोधोक्ती । खदिरांगारासम होती । लाल नयन दैत्यांचे ॥१९॥
ते गर्वशाली बलवंत । दैत्यनाथासी प्रार्थिती । देवांसी लंबोदरासहित । आम्हीं मारूं निःसंशय ॥२०॥
वृथा चिंता न करावी । महामते मही रक्षावी । गणाध्यक्ष हा देहधारी भावी । आला येथ यांत न संशय ॥२१॥
उत्पत्ति नाशानें युक्त । हा काय तुमचें अशुभ करित । ऐसें आश्वासून भक्तियुक्त । दैत्य स्मरती शुक्रासी ॥२२॥
त्यांनी स्मरण करताच येत । शुक्राचार्य त्यांच्या पुढयांत । त्या गुरूस दैत्य नमित । वृत्तान्त कथिती नम्रभावें ॥२३॥
तो ऐकून शुक्र म्हणत । त्या समस्त दैत्यांप्रत । सिद्धिपतीस जो त्यागित । दुर्मती त्यास सिद्धि कैसी ॥२४॥
बुद्धिपतीचा त्याग करून । स्फूर्ति वांच्छी मूर्खासम । विघ्नराजास त्या त्यागितां विघ्न । कैसें टळेल दैत्येंद्रहो ॥२५॥
म्हणोनि युद्ध सोडून । शरण जाणे त्यास शोभन । होईल हें संदेहातीत असून । अन्यथा मृत्यु क्रोधाचा ॥२६॥
शुक्राचें ऐकून वचन । बलि म्हणे तयास तत्क्षण । कर्मांनी सिद्धि देई हा पावन । स्फूर्तिदाता कर्मानें ॥२७॥
कर्मेंच विघ्नहीनता । अथवा करी विघ्नयुक्तता । म्हणोनि महायोग्या तयास आता । जिंकूं कर्मप्रभावें ॥२८॥
त्याचें तें ऐकून वचन । ऐत्येंद्र सारे आनंदून । वाहवा वाहवा म्हणून । युद्ध करण्या सज्ज झाले ॥२९॥
तेव्हां नीतीचें बळ जाणून । शूक्राचार्य धरी मौन । योगवेत्ता तो महान । होणार तें कैसें टळेल ? ॥३०॥
महा अस्त्रें घेऊन करांत । देव क्रोधयुक्त चित्तांत । रणभूमीवरी तैं येत । दैत्यही पातले त्या ठायीं ॥३१॥
तदनंनर त्या उभयतांत । दारुण युद्ध चालत । परस्परांचा विनाश करण्या झटत । देव तैसे दानव ॥३२॥
जिंकूं किंवा मरूं ऐसा करिती । निश्चय ते स्वचित्तीं । शस्त्रास्त्र बळें गर्व वाहती । माज चढला युद्धाचा ॥३३॥
उभयवीर आरोळया ठोकिती । रणवाद्यांचें नाव घुमती । शंख भेरींचे निनाद पसरती । दशदिशांत त्या वेळीं ॥३४॥
सेना जैं संचालन करित । तेव्हां जी धूळ उसळत । त्यायोगें सूर्य झाकत । आपुला दुजा कळेना ॥३५॥
तरी परस्परांसी ते मारिती । रक्ताच्या नद्या वाहती । शस्त्राघातें शरीरें पडती । धूळिकण माखले रक्तानें ॥३६॥
परस्परांस पाहून ठार मारिती । क्रोध बहुत त्यांचा चित्तीं । परस्परांस जिंकण्या मती । देव दानवांची तैं दृढ ॥३७॥
तीन दिवस युद्ध घोर । भयावह झालें तैं असुर । पळून गेले संत्रस्त फार । देव जाहले हर्षित ॥३८॥
जय लंबोदर जय परमेश । जय प्रभू तूं जगदीश । ऐसा ते करिती जयघोष । तोच दैत्येश हल्ला करिती ॥३९॥
बलि रावण जृंभ येत । माल्यवान्‍ कुंभकर्ण राहु युक्त । अन्यही महावीर असंख्यात । आले युद्धभूमीवरी ॥४०॥
त्यांनी शस्त्रांचा मारा करून । देवास ताडिलें दारुण । तेव्हां देव करिती पलायन । संग्रामभूमी सोडुनी ॥४१॥
छिन्न भिन्न ते पळत । तैं इंद्र तेथ येत । शंकर विष्णु सूय चंद्र समस्त । देवेंद्र क्रोधें लढण्यासी ॥४२॥
त्यांनी अस्त्रांची महावृष्टी । करून दैत्यगण केले कष्टी । दशदिशांत ते उठाउठी । पळाले दैत्यवीर प्राणभयें ॥४३॥
रावणादि तैं रागावत । द्वद्वंयुद्धास प्रारंभ करित । भयदायक तेव्हां चालत । द्वंद्व देव दानवांत ॥४४॥
जृंभ लढे महेंद्रासंगें । राहू सूर्यासवें वेगें । बलिदानव विष्णूस रागें । आव्हान देई रणभूमीवरी ॥४५॥
क्रोध संतप्त रावण लढत । श्रीशंकरासमवेत । कुंभकर्ण चंद्रासवें झुंजत । ऐश्या जोडया असंख्य ॥४६॥
नाना दैत्येंद्रास देवेंद्रास । आव्हान देती वायुमुख्यांस । प्रयत्न करिती जय मिळण्यास । घोर युद्ध करूनियां ॥४७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते देवासुरयुद्धवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः समाप्तः
। श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP