खंड ५ - अध्याय १४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल कथिती दक्षाप्रत । ऐक लंबोदराचें चरित । शक्तीच्या अधीन स्वभावोक्त । सर्वसिद्धिप्रद जें असे ॥१॥
एके समयीं देव समस्त । विंध्य देशीं एकत्र येत । गणपाच्या यात्रेस्तव मुदित । तेथ वाद उत्पन्न झाला ॥२॥
सर्व मुनींच्या पुढयांत । विविध मतें प्रकट होत । पांचही देव समान ख्यात । सगुण तैसे निर्गुण ॥३॥
तरी सर्वपूज्य कैसा विघ्नेश्वर । सर्व प्रथम पूजिती सुरनर । चारही अन्य देव संमानिती थोर । हयांत रहस्य काय असे ? ॥४॥
अन्य देवांचे भक्त करिती पूजन । आपापल्या इष्ट देवांचें प्रेमें करून । तेही प्रारंभीं गजाननासी वंदन । करिती हें विपरीत वाटे ॥५॥
गणेशासी प्रसाद दाखविती । त्याचें उच्छिष्ट दुसरे देव भक्षिती । विष्णु रवि शिव शक्ती । ऐसें वेदांत सांगितलें कां ? ॥६॥
गणेशास सर्वांच्या आधी पूजिती । सर्वप्रथम त्यास वंदिती । पाचही देव समान असती । तरी पक्षपात का ऐसा ॥७॥
आपापल्या इष्ट देवांचें विधान । पूजापाठांत पाळिती भक्तजन । आपल्या संप्रदायानुसार पूजन । करावें हें योग्य वाटे ॥८॥
शुभ असो वा अशुभ काम । गणाधीशा पूजिती सर्वप्रथम । हें महत्त्व कां अनुपम । लाभलें सांगा गजाननासी ॥९॥
ऐसा विवाद चालत । तेव्हां शक्ति क्रोधयुक्त । त्या सर्व मुनींसी सांगत । हित चिंतून तयांचें ॥१०॥
लंबोदर हा एकमेव स्तुत । श्रेष्ठ ऐसा वेदांत । आम्हीं अन्य देव नसत । त्याच्या समान कदापी ॥११॥
त्याच्या उदरांतून विश्वें उत्पन्न । त्यांचें तोच करी पालन । अंतीं त्याच्यांतच विलीन । होती ऐसा महा प्रभू हा ॥१२॥
मध्यकाळीं कलांशरूपें खेळत । गणनायक जगतांत । म्हणोनि तो आदिपूज्य सर्वादींत । सर्वांचा तो मातापिता ॥१३॥
तोच सर्वप्रदाता असत । हयांत संशय कां धरितां मनांत । त्या ब्रह्मणस्पतीची महती अनंत । विप्रांनो हें जाणावें ॥१४॥
तिचें ऐसें ऐकून वचन । जगदंबेस म्हणे संतापून । शंकर तैसा विष्णु महान । उभय देव तैं मोहान्ध ॥१५॥
शिवविष्णु जगदंबेस म्हणत । तूं गणेशप्रेमानें युक्त । भारावुन गेलीस सांप्रत । म्हणोनि ऐसें तूं म्हणसी ॥१६॥
आपण पांचही देव समान । नसे कांहीं अधिक न्यून । परस्परांसी आदर सन्मान । सदैव आपण करितों जगतीं ॥१७॥
तरी गणेश्वराचें महिमान । अधिक ऐसें कां सांगसी वचन । सांग शक्ते तूं अनुमान । स्पष्ट करोनी आम्हांप्रती ॥१८॥
लंबोदर एक अद्वितीय जर । देव या विश्वामाजीं समग्र । त्याच्या उदरांतून जन्मलों सुरवर । जगतों त्याच्या आधारें ॥१९॥
त्याच्यांतच होतों लीन । तरी जगद्‍ब्रह्माचें सृजन । कैसें करतों स्वयं स्वाधीन । आपण सारे अन्य देव ॥२०॥
आपण करितों पालन । तैसें संहारितों अन्तीं कोपून । तथापि लंबोदर ऐसा ख्यात न । वेदवाक्यांत कुठेही ॥२१॥
म्हणोनि लंबोदराचें सामर्थ्य अद्‍भुत । कैसें असे तें पाहूं समस्त । तुझ्या सन्निध सांप्रत । नंतर त्याचें पूजन करूं ॥२२॥
जरी सर्व श्रेष्ठत्व त्याचें दिसेल । तरी सर्वादि पूजन संभदेल । अन्यथा न हें संमत होईल । आम्हांस देवी कदापि ॥२३॥
तदनंतर अमाप नैवेद्य ठेवून । पूजा करिती शिवविष्णु उन्मन । एकाच वेळां आसनीं बसून । पूजिती ते गणनायकासी ॥२४॥
महद्‍भक्तीनें पूजिती । परी छलकपट त्यांच्या चित्तीं ॥ सत्यसंकल्पाचा साभास दाविती । उभय देव त्या वेळीं ॥२५॥
गणेश्वर साक्षात तेथ येत । अपार नैवेद्य पाहून विस्मित । ध्यान लावून सर्व जाणत । कौतुक एक दाखवी ॥२६॥
सत्यसंकल्परूप सिद्धि काढून । त्या देवांच्या हृदयीं जी प्रसन्न । विष्णुशिव होती सिद्धिहीन । पूजेत निमग्न परी मिथ्या ॥२७॥
अपरंपार नैवेद्य अर्पिती । तदनंतर ते गणराजाप्रती । एकाच घासांत भक्षिती । गणनायक तो सर्व नैवेद्य ॥२८॥
सर्व नैवेद्य खाऊन । म्हणे तयांसी मी क्षुधित महान । नैवेद्य द्यावा मजसी या क्षण । आणखी तुम्ही उभय देव ॥२९॥
त्याचें तें ऐकून वचन । पुनरपि नैवेद्य अर्पिती तत्क्षण । तथापि त्याची क्षुधा न शमून । खेदखिन्न शिवविष्णू ॥३०॥
ते परस्परांसी म्हणती । आश्चर्य वाटून आपुल्या चित्तीं । आपुलें ऐश्वर्य तैसी शक्ति । आज कोठें लोपली असे ? ॥३१॥
आपण मनुष्यांच्या समान । जाहलों असून पराधीन । सत्य संकल्प भाव लुप्त होऊन । ऐश्वर्यासी मुकलों आपुल्या ॥३२॥
ब्रह्में तैसे ईश्वर जगतीं । सत्यसंकल्प सदैव असती । त्या संकल्पाविरहित वर्तती । त्यांसी संज्ञा नर ऐसी ॥३३॥
तो नरकीं टाकील आम्हांसी । अथवा पाठवील मृत्युलोकासी । ऐसें भय निश्चित या समयासी । कोणा शरण जाऊंया ? ॥३५॥
आपण कपटपरायण । कोण नाथ देईल शरण । शक्तीनें प्रथमचि सत्य ज्ञान । कथिलें होतें आपणांसी ॥३६॥
परी अज्ञानवश होऊन । वाद घातला आपण । सांप्रत प्रकटलें महाविघ्न । आतां एकचि उपाय दिसे ॥३७॥
तोच श्रेष्ठ शरणागतां रक्षित । तत्क्षणीं गजानन क्रोधयुक्त । भक्षिण्या त्यांसी धावला ॥३८॥
घेऊनिया रूप अद्‍भुत । धावे भक्षावया त्वरित । शिवविष्णू पळून जात । शक्तीचे चरण पकडती तैं ॥३९॥
भयविह्रल ते शरण जाती । अभय तिजजवळीं मागती । आश्वासन देऊन तयांप्रती । गणेशासी भेटली ॥४०॥
करांत दूर्वा घेऊन । गणनाथाची करी नमन । आदरें करांजलि जोडून । भक्तिनम्र प्रार्थी तया ॥४१॥
अत्युग्र अपराध क्षमा करावा । तूं कृपेचा सागर देवा । तुझ्या मायेनें गर्व माधवा । तैसाचि शिवशंकरा झाला ॥४२॥
तुझ्या उदरांतून जन्म पावले । तेणें तुझे बालक झाले । शिवविष्णू जरी चुकले । तरी त्यांसी दंड न करी ॥४३॥
गणेशा सर्वाचें पोषन करिसी । तूंच जगतासी पाळिसी । ऐसें बोलून तयासी । दूर्वांकुर अर्पी महामाया ॥४४॥
मनानें चतुर्विध उत्तभ भोजन । कल्पून अर्पिलें विनीत मन । नंतर दूर्वांकुरानें तृप्त होऊन । गणनायक ढेकर देई ॥४५॥
भक्तवत्सल शक्तीस देत । महाभक्ती प्रसन्नचित्त । गणाधीशा पाहतां येत । हरिहर दोघे त्या स्थळीं ॥४६॥
प्रणाम करून विनविती । क्षमा करावी अपराधांची जगतीं । तुझ्या मायेनें मोहित चित्तीं । स्वानंददायका त्यावेळीं ॥४७॥
म्हणोनि तुझें रूप न जाणिलें । परी आतां पूर्ण ज्ञान झालें । महाप्रभु सर्वादिपूज्य भले । आपण एक सर्व पूज्य ॥४८॥
हरिहर ऐसें स्तविती । अथर्वशीर्षाचे पाठ करिती । तेणें होऊन संतुष्ट चित्तीं । गजवदन अत्यंत ॥४९॥
शक्ती तैं भावयुक्त । गणनाथासी प्रार्थित । तेव्हां शिवविष्णूसी करित । पुनरपि पूर्वीसमान ॥५०॥
संकल्प सिद्धियुक्त । ते दोघेही तेव्हां होत । सर्वदा भक्तिसमायुक्त । गणनायकासी ते भजती ॥५१॥
देवर्षि  तैसे इतर जन । संशयविहीन होऊन । पूर्णभावें ढुंढीचें पूजन । मत्सररहित ते करिती ॥५२॥
गणेशाहून अन्य नसत । कोणीही श्रेष्ठ या जगतांत । म्हणोनि आधीं सर्व कार्यांत । गणेश्वरातें पूजिती ॥५३॥
अंतीं तो गणनाथच असे । मध्यें विविधरूपें विलसे । सर्वांचा बीजरूप वर्ततसे । म्हणोनि सर्वादि पूज्य हा ॥५४॥
सर्वपूज्य हा गजानन । ऐसें असें वेदवचन । गाणपत्यभावीं तैं लीन । जाहले पवित्र मुनिजन ते ॥५५॥
जेथ तेथ तदनंतर । भजती गणेशासी सर्वत्र । ऐसें हें लंबोदराचें चरित्र । परम पुनीत मनोहर ॥५६॥
हे जो वाचील अथवा ऐकेल । त्याचीं सर्व विघ्नें निवारील । सर्व कामना पुरवील । सर्वदाता गजानन ॥५७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते शिवविष्णुगर्वहरणं नाम चतुर्दशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पनमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP