खंड ५ - अध्याय २२
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः । मुद्गल सांगती दक्षाप्रत । लंबोदर अवतार प्रकीर्तित । मूषकवाहन जो ख्यात । तोच शक्तीचा सुत झाला ॥१॥
तो समग्र वृत्तान्त । प्रजापते दक्षा ऐक सांप्रत । शक्तिलोकीं देवी वसत । तिनें निर्मिलें सकल जग ॥२॥
आपुल्या मायेनें त्रिधा होत । त्या जगाच्या रक्षणा सतत । महाकाली महालक्ष्मी होत । महासरस्वती तीच असे ॥३॥
हया तीन देवतांपासून । जन्मल्या दुर्यादिक देवता पावन । देवींसहित तप उत्तम । एकाक्षर विधानें त्या करिती ॥४॥
दिव्य वर्ष सहस्त्र आचरित । खडतर व्रत एकनिष्ठ चित्त । तैं विघ्नेश प्रसन्न होत । वर तेथ प्रकटला ॥५॥
त्यांनी मनोभावें पूजा करून । स्तविला लंबोदर महान । मनोवांछित वर देऊन । तोषविलें त्यानें सर्वांना ॥६॥
तें वरप्रदान अगणित । वर्णन करण्या अमर्याद वर्तत । वरप्रभावें स्वकार्यरत । जाहल्या सर्व देवता ॥७॥
देवी लंबोदरासी नित्य पूजिती । कुलदैवत तो त्यांचें निश्चिती । आदिशक्ति महामाया ती । शांतिलाभ इच्छितसे ॥८॥
तदर्थ पुनः तप करित । दुष्कर शांति ती लाभत । तभापि तप करीनि पूजित । गणनायका आदिशक्ती ॥९॥
तदनंतर शंभर वर्षें पूर्ण होत । तैं गणेश प्रकटे ह्रदयांत । तेव्हां ती विविध स्तोत्रें स्तवित । प्रकटला समोर तेधवां ॥१०॥
बाहेर प्रकटून जगदंविकेप्रत । म्हणे महाभागे ऐक सांप्रत । मी तुझा ध्यानज झालों सुत । यांत संशय कांहीं नसे ॥११॥
मज लंबोदरा बाहेर स्थित । महामाये पहा पुढयांत । ती ध्यान सोडून होत जागृत । पाहे तैं समोर लंबोदर ॥१२॥
अथर्वशीर्षें देवी स्तवित । आनंदाश्रू दाटले डोळयांत । तेव्हां संतोष पावून म्हणत । गणराजा तिजप्रती ॥१३॥
माग देवी मनोवांछित । देईन तें मी प्रसन्न असत । भक्तियुक्ते तुझा पुत्र होत । पालन करी तूं माझें ॥१४॥
शक्ति म्हणे गणेशाप्रत । हया शरीरानें होई स्थित । स्थिर राहून वत्सा शाश्वत । भक्ति देई पदकमलांची ॥१५॥
योग्यांच्या ध्यानांतून । ध्यानज पुत्राचा जन्म । ऐसें वेद सांगती पावन । तरी हें अपूर्व कैसें झालें ॥१६॥
हे आश्चर्य विनायका सांप्रत । काय दाविलें जगताप्रत । ऐकून हें वचन बोलत । हितकारक तैं निर्मळ ॥१७॥
माझी मूर्तिअ करी स्थापन । निरंतर करी माझें पूजन । पुत्रभावत्व कल्पून । कुलदेवही मज मानी ॥१८॥
ऐशापरी करितां पूजत । ब्रह्मभाव लाभशील प्रसन्न । पूजा उपचार सारे करून । कृतकृत्य तूं होशील ॥१९॥
भक्तिभावयुक्त सतत । होशील तूं एकचित्त । ऐसें बोलून अंतर्धान पावत । लंबोदर तैं प्रजापते ॥२०॥
शक्ति तदनंतर पूजित । ब्रह्मनायका तैसेंच ख्यात । ऐसे नाना अवतार घेत । लंबोदर गजानन ॥२१॥
भक्तांच्या सिद्धीसाठी । परम अद्भुत अवतार जगजेठी । भजनकर्त्यास घाली पाठी । ऐसा दयाळू गणराज ॥२२॥
रक्तदंतादि देवी आराधिती । दैत्यवधार्थ त्यास जगतीं । त्यांच्या स्तवनें प्रसन्न चित्तीं । वरद झाला तयांप्रत ॥२३॥
त्याच्या वरप्रभावें मारिले । देवतांनी असुर जे माजले । योगनिष्ठ राहून ध्यायिलें । भजिलें त्यांनी विघ्ननाशा ॥२४॥
कुलदैवत त्यास मानिती । शांतिप्राप्त्यर्थ पूजिती । त्या सर्वांस ब्रह्मपदप्राप्ति । जाहली लंबोदरात्मकांसी ॥२५॥
हें लंबोदराचें अवतार महिमान । जो ऐकेल विनीतमन । त्यास सर्व इच्छित लाभून । कृतार्थजीवन होईल ॥२६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते शक्तिपुत्रचरितं नाम द्वाविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP