खंड ५ - अध्याय १५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल कथा पुढती सांगती । सुरथ नाम राजा जगतीं । प्रधान नयहीन त्यास पीडिती । तेणें संतप्त तो जाहला ॥१॥
राज्य सोडून गेला वनांत । तेथ मुनिश्रेष्ठ त्यास उपदेशित । तदनुसार राजा शक्तीस भजत । तिची कृपा प्राप्त करी ॥२॥
त्यायोगें तो समर्थ झाला । स्वराज्यांत परतला । धर्मनीतीने प्रजेला । सुखी केलें तयानें ॥३॥
भावयुक्त चित्तें भजत । शक्तीसी तो सतत । मृत्यूनंतर तो होत । पुनरपि सावर्णि मनुश्रेष्ठ ॥४॥
सूर्यपुत्र तो सर्वसंमत । उदारधी पूर्वसंस्कारयुक्त । जाहला शक्तीचा भक्त । वनांत जाऊन पूजी तियेसी ॥५॥
उपोषण समायुक्त आचरित । तो तप अति उत्तम पुनीत । ह्रदयीं महामायेस ध्यात । नवार्ण जप जपोनी ॥६॥
ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुंडायै विच्ये जपत । देवीचें माहात्म्य नित्य वाचित । भक्तिभावपूर्ण चित्त । ऐसी शंभर वर्षें झालीं ॥७॥
महासती शक्ती तैं प्रसन्न होत । तो सावर्णि मनुअ तपेंयुक्त । ज्ञानमार्गपरायण होत । तें जाणून आला लंबोदर ॥८॥
तेथ वरदाता प्रकटत । त्याच्या चित्तीं अद्‍भुत । शक्तीचें रूप जाऊन पाहत । लंबोदरासी त्या जागीं ॥९॥
पुनरपि शक्तीसी पाहत । अन्यक्षणीं गणेश्वर दिसत । रक्तवर्णयुक्त शोभिवंत । ऐसें नवल तेथ झालें ॥१०॥
एकदा देवी दिसत । अन्य क्षणीं गणेश प्रकटत । वामांगीं ज्याच्या संस्थित । शक्ति हावभावयुक्ता ॥११॥
भक्तियुक्त तो गणोशास नमत । तें पाहून अति विस्मित । लंबोदराचें सत्य ज्ञान स्फुरत । मनूच्या ह्रदयीं शक्तिकृपेनें ॥१२॥
तदनंतर भक्तिभावयुक्त । विशेषें विचार करी मनांत । तो तूं ऐक प्रजापते सांप्रत । तेणें लाभेल तुजही ज्ञान ॥१३॥
लंबोदर स्वयं शक्ति असत । लंबोदरात्मिका ती वर्तत । शक्ति आणिक लंबोदरांत । अंतर कांहीं असेना ॥१४॥
वामांगापासून शक्ति संभूत । दक्षिणांगापासून गणेश्वर प्रकटत । त्यांचा अभेदरूप जें ब्रह्म असत । त्याचें नाव स्वानंद ॥१५॥
दोघांनी क्रोडेस्तव घेतला । भक्तरक्षणार्थ देह त्या वेळा । हें सर्व जाहलें व्यक्त याला । आधार असे शास्त्राचा ॥१६॥
यांत संदेह कांहीं नसत । ऐसा विचार करी मनांत । मनू तो प्रतापवंत । तोवरी शक्तिगणेश प्रकटले ॥१७॥
त्याच्या ह्रदयांतून बाहेर । आले तया देण्या वर । ह्रदयांत शोध करिता तदनंतर । शक्तिविघ्नप त्या न दिसती ॥१८॥
पुनरपि ध्यानबळें पाहत । तेव्हां त्यासी ते दिसत । वर माग सुव्रता आम्हीं तुष्ट । तुझ्या तपश्चर्येनें ॥१९॥
तुझा भक्तिभावें संतोषित । देऊं तुज मनोवांछित । त्यांचें वचन ऐंकून डोळे उघडित । तो समोर पाही तयांसी ॥२०॥
शक्तियुक्त देवास पाहून । करी मोद वंदन । विधिपूर्वक करी पूजन । भक्तिभावें तोषवी ॥२१॥
पुनःपुन्हा त्यांसी वंदित । कर जोडून स्तुति गात । गणनाथासी मीं नमित । गणपालका नमन तुला ॥२२॥
चार बाहुधारिकेसी । चार बाहुधारकासी । अनादी ऐशा शक्तीसी । अनादी गणेशा तैसें नमन ॥२३॥
परेशासी परमात्म्यासी । भक्तिविघ्नहारिकेसी । तैसेंचि भक्तविघ्नहर्त्यासी । नमन असो पुनःपुन्हां ॥२४॥
हेरंबेस हेरंबास । लंबोदरस्वपेसी लंबोदरास । नाना रूपधरेसी नानारूपधरास । नमन असो सर्वदा ॥२५॥
महादेवीस देवाधिपतीस । गजवक्त्रधरेसी गजवक्त्रधरास । शूपकर्णस्वरूपेसी शूर्पकर्णास । उभयतांसी माझें नमन ॥२६॥
एकदंतधरेसी एकदंतासी । मायामोहहारिकेसी मोहहर्त्यासी । स्वानंदपुरसंस्थेसी स्वानंदवासीसी । उभयतांसी नमन माझें ॥२७॥
परशुआदि धारिकेसी । परशुआदिधारकासी । सर्वप्रबोधेसी सर्वप्रबोधकासी । उभयतांसी नमन माझें ॥२८॥
मायिकां मोहदात्रीसी । मायिकां मोहदात्या तुजसी ढुंढिराज्ञीसी ढुंढिराजासी । उभयतांसी मी नमितों ॥२९॥
वक्रतुंडधारिकेसी । वक्रतुंडा नमन तुजसी । सर्वादिपूज्येसी सर्वादिपूज्यासी । उभयतांसी मी नमितों ॥३०॥
सर्वादिपूज्यकेसी सर्वादिपूज्यकासी । अनंत खेळकर्त्रींसी । अनंत खेळ कर्त्यासी । उभयतांसी नमन माझें ॥३१॥
महाशक्तीसी शक्तिधरासी । नानाभेदकर्त्रीसी । नानाभेदमयासी । उभयतांसी नमन माझें ॥३२॥
परेशेसी परेशासी । नमन माझें उभयतांसी । जी शक्ति तीच अससी । विघ्नेशा भेद मुळीं नसे ॥३३॥
अज्ञानकारणें वाटत । स्त्रीपुरुष भाव व्यक्त । जेथ वेदादी योगीही विस्मित । तेथ मीं काय स्तुति करूं ॥३४॥
मी अल्पज्ञानयुक्त । परी तुमच्या दर्शने बोध प्राप्त । त्यायोगें तुम्हां उभयतां स्तवित । गणाध्यक्ष तुम्हीं दोघें ॥३५॥
योगशांतिप्रद तुम्ही जगांत । मज महायोग शिकवावा सांप्रत । तुम्हां भक्तिभावें मीं नमित । भक्ति माझी दृढ करावी ॥३६॥
ऐसें द्यावें वरदान । इतकें बोलून साष्टांग वंदन । करूनिया पुनरपि प्रार्थून । तोषविलें तयांसी ॥३७॥
ती दोघें हर्षयुक्त । त्या मनुराजास म्हणत । शांतियोग लाभेल तुजप्रत । योग सेवेनें महाभागा ॥३८॥
दृढ भक्ति आमुच्या चरणीं । होईल आदित्यसुता झणीं । मन्वंतर पूर्ण भोगोनी । त्रिजगतीं यश पसरेल ॥३९॥
अंतीं स्वानंदांत निमग्न । होशील ब्रह्मभूत तूं पावन । तूं रचिलेलें हें स्तोत्र प्रसन्न । सर्वसिद्धिद जगतांत ॥४०॥
वाचक श्रोत्या सिद्धि लाभेल । यांत संशय नसेल । ऐसें बोलून ती निर्मल । दोघेही अदृश्य जाहलीं ॥४१॥
गणाध्यक्ष होतां अन्तर्धान । मनू स्वगृहीं जाऊन । करी त्या उभयतांचें पूजन । भावबळें सर्वदा ॥४२॥
पूर्ण मन्वेंतर भोगून । अंतीं ब्रह्मभूत होऊन । गाणपत्य म्हाभागा रविनन्दन । प्रसिद्ध झाला जगांत ॥४३॥
हा जो अवतार कथिला । शक्तिविनायक नाम त्याला । सर्वसिद्धिप्रद लंबोदराला । प्रणाम करी भक्तिभावें ॥४४॥
मायेनें जे मोहित । त्यांना शक्ती भिन्न वाटत । परी जी शक्ती तोच लंबोदर असत । दक्षा यांत ना संशय ॥४५॥
स्त्रीपुरुषाची माया सोडावी । योगसेवेनें आघवी । तेव्हांची लंबोदराची प्राप्ति इच्छावी । योग्यांनी या जगांत ॥४६॥
ब्रह्मनायकाचें हें महिमान । कोणी म्हणती शक्ती प्रसन्न । कोणी लंबोदर अभिधान । आपापल्या रुचीनुसार ॥४७॥
असत्स्वानंदरूपा वेदांत । शक्ति ऐसी असे कीर्तित । तोच लंबोदर वर्णिला असत । गणेशाचा अवतार घेई ॥४८॥
शक्ति विनायकाचें हें चरित । जो ऐकत अथवा वाचित । त्यास भुक्ति मुक्ती लाभत । यात संशय अल्प नसे ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचचे खंडे लंबोदरचरिते शक्तिविनायकमाहात्म्ये पंचदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP