खंड ५ - अध्याय २५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्ष म्हणे मुद्‍गलाप्रत । शमी मंदारांचा महिमा मजप्रत । करुनानिघे सांगा सांप्रत । विघ्नेश्वरास ते का प्रिय झाले ? ॥१॥
मुद्‍गल सांगती पूर्ववृत्तान्त । और्व नाम विप्र असत । श्रौत स्मार्त क्रियारत । स्वधर्मनिष्ठ ब्रह्मनिष्ठ ॥२॥
त्याची पत्नी धर्मयुक्त । कालांतरानें त्यास होत । एक कन्या तेजस्विनी अत्यंत । शमीका हें तिचें नाव ॥३॥
ती पुत्री रूपयुक्त । तैसीच होती गुणयुक्त । सात वर्षांची जेव्हा होत । तेव्हां पिता विचार करी ॥४॥
हिला पहावा अनुरूप वर । म्हणोनी और्व यात्रापर । शौनकाच्या आश्रमीं थोर । जाता झाला मार्गांत ॥५॥
शौनकानें त्यास पूजिलें । आदरातिथ्य उत्तम केलें । तेथ और्वानें पाहिलें । शौनकाच्या शिष्यास ॥६॥
मंदार नांवाचा तो असत । धौम्याचा सुत विद्यावंत । सुशील सदा गुरुसेवी निरत । धर्मलालस आनंदी ॥७॥
हयास जावई करावें । ऐसें ठरवून गमन केलें । स्वगृहीं जाऊन निवेदिलें । सर्व वृत्त भार्येसी ॥८॥
शौनकासी सर्व सांगत । सुदिनीं मुहूर्त पाहून देत । आपुली शमीका कन्या मंदाराप्रत । विवाह विधियुक्त करिती तैं ॥९॥
तदनंतर मंदाराच्या संगतीत । शमी शोभली रूपसंयुत । रत्नकांचन योग वाटत । वधूवरा त्या पाहूनी ॥१०॥
तदनंतर माहेरी जात । शमीका कांहीं कालपर्यंत । यौवनांत पदार्पण करित । तैं तिज नेण्या पति आला ॥११॥
मंदारानें श्वशुरास नमून । शमीकेस घेऊन केलें निर्गमन । मार्गस्थ झाला विन्म्र मन । रूपमती कान्तेसहित ॥१२॥
प्रवासांत एका आश्रमांत । विश्रांति घेण्या थांबत । भ्रूशुंडीचा तो आश्रम पुनीत । गणेशभक्त जो थोर ॥१३॥
आश्रमी शमीमंदार वर्तत । तेथ भ्रुशुंडी स्वयं येत । त्याच्या भ्रुमध्यांत । प्रत्यक्ष सोंड लोंबत होती ॥१४॥
ऐशा भ्रुशुंडीस पाहती । पतिपत्नी विनोदें हसती । मूर्खपणा उभय करिती । सोंडेवी थट्टा करोनी ॥१५॥
तो अपमान घडतां लाभत । पाप त्यांना महाअद्‍भुत । त्यायोगें होऊन प्रेरित । योगी भ्रुशुंडी कोपला ॥१६॥
त्याचें झाले आरक्त नयन । तो क्रोधवश बोले वचन । त्या दोघांस उद्देशून । द्विजाधमांनो ऐका शाप ॥१७॥
माझी सोंड पाहून । हंसलांत तुम्ही नादान । थट्टा केलीत म्हणून । वृक्षजन्म तुम्हां येवो ॥१८॥
गजाननाच्या मुखाचा अपमान । सोंड पाहून । हंसलांत तुम्ही नादान । थट्टा केलीत म्हणून । वृक्षजन्म तुम्हां येवो ॥१८॥
गजाननाच्या मुखाचा अपमान । सोंडेसी हंसुनी केलात दुर्मन । ऐसा जो कोणी प्राणी दुर्मन । तो माझा शत्रू असे ॥१९॥
तेव्हां ती पतिपत्नी वंदित । मानसीं होऊन अति दुःखित । म्हणती अज्ञानानें घडलें अवचित । क्षमा करावी आम्हांसी ॥२०॥
उःशाप द्यावा आम्हांप्रत । द्विजश्रेष्ठा दास आम्हीं विनत । गणराजाचे भक्त वर्तत । कृपा करी दयाळा ॥२१॥
तेव्हां अतिकरुणायुक्त । मुनिसत्तम म्हणे तयांप्रत । सोंडेचा अपमान केलात । म्हणोनि शापिलें तुम्हांसी ॥२२॥
तरी आतां देव शुंडाधर । प्रसन्न होतां उद्धार । होईल सर्व शुभ सुखकर । शाप माझा दूर तेव्हां ॥२३॥
आतां कांहीं न माझ्या अधीन । शापदाता गजानन । जरी मी स्वभावें क्रोधहीन । त्यानें क्रोध प्रेरिला ॥२४॥
ऐसें बोलून महायोगी बैसत । आपुल्या आसनीं ध्यानस्थित । ती पतिपत्नी तैं जन्मत । वृक्षयोनींत शापानुसार ॥२५॥
ऐसा एक महिना जात । परी शिष्य न परतला आश्रमांत । म्हणोनि शौनक चिंताक्रांत । और्वास भेटण्या तें गेला ॥२६॥
अन्य शिष्य त्याच्या समवेत । गेले होते गुरुभक्त । शौनक म्हणे मंदार असत । केठें तें मज सांगावें ॥२७॥
शमीकेला आणण्यास । पाठविले होतें तयास । काय झालें माझ्या शिष्यास । तें सत्यार्थें मज सांग ॥२८॥
तेव्हां होऊनी विस्मित । और्व म्हणे शौनकाप्रत । कन्या देऊन पाठविला संमानित । मासापूर्वीं जावयाला ॥२९॥
तरी अद्यापि कैसा न पोहोंचला । शौनकश्रेष्ठा आश्रमाला । हे ऐकून झाला । भयभीत आमुचाही जीव ॥३०॥
शोकसंयुक्त सारे होत । और्व शौनक शोधण्या निघत । हृदयीं चिंता पीडित । तपास करिता जागोजागीं ॥३१॥
गांवोगांवी ते जाती । ग्रामस्थांसी विचारिती । रानावनांत हिंडती । शमीमंदारा शोधण्यासी ॥३२॥
कोणी म्हणती पाहिले होते । परी मासापर्वी अवचिते । आता त्यांचें वृत काय तें । न जाणों आम्ही पांथस्थ ॥३३॥
ऐसा शोढ ते करित । भ्रुशुंडीच्या आश्रमीं जात । तेथ माध्यान्हीं ते बैसत । विश्रांती घेण्या त्या स्थलीं ॥३४॥
दोन झाडांच्या सावलींत । और्व शौनकादी विसावत । शौनक जाहला ध्यानस्थित । तैं कळला वृत्तांत सारा ॥३५॥
भ्रुशुंडीच्या शापें मंदार भार्येंसहित । वृक्षरूप येथ उपस्थित । वृत सांगून सर्वांप्रत । निरोप देई तयांसी ॥३६॥
स्वयं तप करण्या बैसत । शौनकासवें और्वही दुःखित । गणेशाच्या आराधनांत । निमग्न झाले दोघेही ॥३७॥
वायुभक्षणही न करिती । गणनायका दोघे ध्याती । परमभक्तीनें तोषविती । शमी मंदारांसी सोडविण्यां ॥३८॥
ऐसी बारा वर्षे जात । तेव्हां द्विरदानन प्रसन्न होत । त्यांस वर देण्य प्रकटत । क्लेश त्यांचे पाहून ॥३९॥
विघ्नेश्वरास पाहतीं । तैं तें दोघे हर्षितमती । प्रणाम करूनी पुजिती । गणाध्यक्षा स्तविती ते ॥४०॥
गजवक्त्रासी विघ्नेशासी । परात्म्यासी अपारासी । महेशासी हेरंबासी । ब्रह्मेशासी नमन असो ॥४१॥
संसारसागरीं तारकासी । मायामोहहारकासी । शिवादींसी योगदात्यासी । ज्येष्ठराजास नमो नमः ॥४२॥
सर्वांसी पूज्य मूर्तीसी । आदिपूज्यासी देवासी । अंतःस्थासी अनादीसी । परात्म्यासी नमो नमः ॥४३॥
सर्वांच्या मातापित्यासी । स्वानंदवासीसी गणेशासी । शूर्पकर्णासी शूरासी । लंबोदरा तुज नमन असो ॥४४॥
ढुंढीसी भक्तविघ्नहर्त्यासी । अभक्तांना विघ्नकर्त्यासी । ब्रह्मेशासी ब्रह्मभूतप्रदासी । योगेशासी नमन असो ॥४५॥
सुशांतासी शांतिदासी ॥ विश्वकर्त्यासी देवासी । शिवविष्णु आदि देवासी । ज्याचा गुणांत न उमजला ॥४६॥
सगुणरूपाचें रहस्य न जाणत । योगीजनही जगांत । निर्गुणरूपची कथा अद्‍भुत । कोण ती जाणूं शकेल ॥४७॥
स्वामी गजानना व्हावें प्रसन्न । द्यावें आम्हांसी वरदान । धौम्य पुत्र मंदार शिष्य सुमन । त्याचा उद्धार करावा ॥४८॥
और्व कन्या शमी त्याची कांता । तिलाही तारावें दीनार्ता । वृक्ष योनींत उभयता । भ्रुशुंडीच्या शापें तीं ॥४९॥
मनुष्यरूप पुनरपि द्यावें । त्या उभयतांसी तारावें । हेरंबा तुझ्या भक्तीनें व्हावें । भ्रांतिजन्य अज्ञान ॥५०॥
तुझ्या चरणकमलांचे दास । पुरवी आमुच्या वांछितास । त्यांचें वचन ऐकून तयास । गणनायक सांगती ॥५१॥
ते दोघे भक्तियुक्त । तपाचरणें पुनीत । श्रीगजानन त्यांस म्हण्त । भ्रुशुंडीनें त्यांसी शापिलें ॥५२॥
माझ्या सोंडेचा अपमान । त्या दांपत्यें केला म्हणून । भ्रुशुंडी माझा परमभक्त पावन । त्याचें वचन न मिथ्या होय ॥५३॥
तो माझ्या देहाहून अधिक असत । प्रिय मजसी जगतात । त्याचा अपमान कोणी करित । तरी तो क्रोध ना करी ॥५४॥
परी माझा अपमान । कदापि त्यास न होय सहन । म्हणोनि त्याचा शाप अर्थहीन । करूं न शके मी मुनिश्रेष्ठा ॥५५॥
परी तुमच्या तपानें मी जित । करीत तुमचें जें हित । ऐका माझें वचन निश्चित । मुख्य वर तुम्हां देईन ॥५६॥
मंदार शमी वृक्षांच्या मुळांत । राहीन मी सदा प्रेमयुक्त । सर्व वृक्षांच्या जातींत । सर्व वंद्य ते मद्रूप ॥५७॥
देवही त्यांना वंदतील । मग अन्यांची काय कथा असेल । हया वृक्षांच्या स्पर्शाने होईल । दर्शनेंही पापनाश ॥५८॥
माझे प्रिय सर्वभावें होतील । देवांना प्रियरूप अमल । महामुनींनो विशेषें विमल । वृक्षराज हे होतील ॥५९॥
शमीपत्रानें जि विप्र जन । माझे करतील पूजन । त्यांचे मनोरथ संपूर्ण । करीन मी सर्वदा ॥६०॥
मंदाराचें एक पुष्प मजप्रत । समर्पत करीत जो भक्तियुक्त । त्यानें होऊन मी तुष्टचित्त । देईन वांछित फल त्यासी ॥६१॥
माझें नानाविध पूजन । वृथा होय जरी दूर्वाहीन । तैसेंचि आजपासून । शमीमंदारहीन वृथा ॥६२॥
शमीचें पान मंदारकुसुम । पूजेंत वाहील जो अनुपम । त्याची पूजा सफल होऊन । माझी कृपा प्राप्त होय ॥६३॥
मज वाहिलें शमीचें पान । शंभर यज्ञांच्या ते पुण्यासमान । शमीपत्रें मंदारपुष्पें प्रसन्न । सदैव मी होईन ॥६४॥
नित्य जो शमीसी वंदील । अथवा पूजन करून स्पशींल । तो सात कुळांसह लाभेल । स्वानंदलोकीं निवास माझ्या ॥६५॥
तैसेचि मंदारवृक्षा करील नमन । भक्तिभावें पूजून । त्यासी स्पर्श करितां पावन । स्वानंदवास सात पिढयांना ॥६६॥
शमी मंदारास प्रदक्षिणा घालित । तरी पृथ्वीप्रदक्षिणा घडत । सप्तद्वीपयुक्त पृथ्वी असत । परी तीही सान त्यापुढें ॥६७॥
जरी  भावयुक्तमनें प्रदक्षिणा करील । शतभूमि प्रदक्षिणासम पुण्य लाभेल । बहु काय सांगावें निर्मल । श्रेष्ठ मद्रूप हे वृक्ष ॥६८॥
वृक्षजातींत श्रेष्ठ पावन । कोण वर्णू शके महिमान । शमी मंदारा वृक्षा मानून । पाहील तो नरकीं जाय ॥६९॥
शमी मंदार दृष्टीस पडत । परी त्यांसी जो नर न वंदित । प्रदक्षिणा न घालित । नराधम तो नष्टपुण्य ॥७०॥
शमी वा मंदार वृक्ष तोडित । तरी तो नर महापापी होत । अंतीं पडेल नरकांत । यांत संशय कांहीं नसे ॥७१॥
या वृक्षांच्या फांद्या पानें तोडील । तोडी नरकपात्र होईल । त्याच्या दर्शनें लागेल । पाहणारासही महत्पाप ॥७२॥
शमी स जो नर निंदील । अथवा मंदारवृक्षा अवमानील । तो सर्वभावे हीन होईल । नरकांत अंती गती त्याची ॥७३॥
जो माझ्या रूपयुक्त । शमीमंदारास पाहत । तो विविध भोग हया लोकांत । भोगून अंतीं मुक्त होय ॥७४॥
स्वानंदलोक त्यास लाभेल । हें वरदान माझें अचल । मंदारमुळांत स्थापील । जो नर माझी सगुणमूर्ती ॥७५॥
त्या मूर्तीसि पूजील । तैसेचि अन्य नरही जे भजतील । त्या माझ्या भक्तां लाभेल । त्वरित माझें दर्शन ॥७६॥
मंदारमुळीं जी असत । ती माझी मूर्ति जगांत । सिद्धिप्रद होईल त्वरित । तैसी अन्य मूर्ति नसे ॥७७॥
मंदारतळीं जी माझी मूर्ती । तिसी शमीपत्रानें पूजिती । दूर्वा मंदार शमी यांची संगती । सुदुर्लभ ही जगतांत ॥७८॥
जो हया तीन पूजासाधनानें पूजित । तो भक्त माझ्या तुल्य होत । शमी मंदाराची माला करित । त्या मालेनें जप करी ॥७९॥
तरी तो अनंत फलभोक्त होईल । माझी भक्ति दृढ निश्चल । शमी मंदार माला गळा घालील । त्याच्या दर्शनें विघ्नें टळती ॥८०॥
जो माझा भक्त स्वकरांत । अन्तकाळीं श्रद्धेनें धरित । शमीपत्र वा मंदारपुष्प पूजित । दूर्वाकुर तैसाची ॥८१॥
त्यासी यम ना धरील । तोअ नर माझ्या लोकीं येईल । शमीमंदारासमीप पूजिल । जो मानव मज भक्तीनें ॥८२॥
त्याचें पूजन असंख्यात । त्यायोगें होय ज्ञात । त्यास सर्व सौख्यें लाभत । यात संशय कांहीं नसे ॥८३॥
ऐसें बोलून त्या दोघांप्रत । गणनायक पुढती सांगत ॥ माझी भक्ति भावयुक्त । तुम्ही जरी इच्छिली असे ॥८४॥
तरी मंदारवृक्षाच्या मुळांत । स्थापिली जी मम मूर्ति पुनीत । तिची पूजा करा विधियुक्त । तेणें इच्छित लाभाल ॥८५॥
शमी मंदार दूर्वाकुरांनी जगांत । माझी पूर्ण तृप्ति होत । अन्यथा पूर्णभावें संतुष्ट न होत । अन्य पूजोपचारानें ॥८६॥
माझी पूजा तुलसी वर्जित । करावी भक्तांनी जगांत । शमीमंदार माळा जपांत । सदैव तुम्हीं ठेवाव्या ॥८७॥
ऐसें बोलून गणाधीश त्वरित । तेथेचि झाला दर्शनातीत । शौनक और्व हर्षयुक्त । जाहले त्याच्या वरदानानें ॥८८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणें पंचमे खण्डे लंबोदरचरिते शमीमंदारवरप्रदानं नाम पंचविंशतितमोऽध्यायः समाप्त । श्रीगजाननार्पनमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP