खंड ५ - अध्याय ११

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल कथा पुढें सांगतो । नैध्रुवास योगमागों भक्ति । शमदमपरायण स्वचित्तीं । क्रमें शांति लाभली तया ॥१॥
योगिवंद्य तो जगांत । झाला परी तप न त्यागित । गणाधीशासी सतत सेवित । गाणपत्यप्रियतेसाठीं ॥२॥
ऐसें त्याचें तप जाणून । प्रकटला पुढें गजानन । त्यास पाहता वरती उठून । कृतांजली नमित नैध्रव तैं ॥३॥
त्याच्या नेत्रांतून ओघळत । आनंदाश्रू भक्तियुक्त । रोमांच अंगावरी फुलत । गाणेश सूक्तें स्तुति करी ॥४॥
तदनंतर गणाधीश देत । संतुष्ट होऊन दृढ भक्ति तयाप्रत । गाणपत्यप्रिय करून होत । अंतर्धान गजानन ॥५॥
तेव्हांपासून नैध्रव योगी होत । गाणपत्य थोर प्रख्यात । तो गणनाथा भजत सांप्रत । सर्वत्र ऐसें हें चरित्र असे ॥६॥
दक्षा हें सर्वद परम चरित । लंबोदर महिमान युक्त । सर्व शांतिप्रद तुजप्रत । कथिलें असे यथाशक्ति ॥७॥
क्रोधासुराचाही वृतान्त । सांगितला तुज मी पुनीत । तो ऐकतां क्रोध शमत । यांत संशय अल्प नसे ॥८॥
अपापल्या खंडांत । पश्चिम दिशांतरीं स्थापित । मुनिजन लंबोदर मूर्ति सुशांत । तिच्या दर्शनें इच्छित लाभे ॥९॥
समुद्रतीर संस्थित । मूषकावरी बैसला असत । त्या लंबोदराच्या दर्शनें प्राप्त । सर्व अर्थ गणेशभक्तासी ॥१०॥
ऐसें लंबोदराचे अंश अनंत । विविध झाले जगतों ख्यात । स्वधर्म रक्षण करण्या उदात्त । जनांस सर्वकामप्रदायक जें ॥११॥
त्या चरित्राचा कोटयंश वाटत । ब्रह्मादिकांस वर्णनातीत । मी तर पामर मानव असत । बळ माझें काय पुरेल ? ॥१२॥
जगद्‍ब्रह्माच्या कार्यास्तव । याचना करितां देव । शक्तिरूप अवतार अभिनव । घेऊन देई सर्व अर्थ ॥१३॥
महिषासुर नाशास्तव याचित । माया जेव्हां विघ्नराजाप्रत । तेव्हां तो स्वयं ती इच्छा पुरवीत । धर्मपालक गजानन ॥१४॥
मायाकर विनाशार्थ होत । शेषपुत्र तो जगांत । लंबोदर स्वयं साक्षात । तोच मूषकवाहन ॥१५॥
सावर्णि मनू त्यास आराधित । गणनायक लंबोदर होत । शक्ति विनायक तो प्रख्यात । ऐसे ब्रह्मावतार बहुविध ॥१६॥
वेद सांगती असंख्यात । प्रजापते त्याचें जग वर्तत । भिन्न भिन्न विहारार्थ ख्यात । त्यांत नांदे लंबोदर ॥१७॥
स्वानंदभावें त्यांत स्थित । ब्रह्मधारक तो उदात्त । संयोग अभेदयोगें होत । लंबोदर जगामाजीं ॥१८॥
संयोग अभेदयोग घडत । समाधानें बहुविध जगें तद्‍गत । त्या ब्रह्मांत विलीन होत ऐसें रहस्य जाणावें ॥१९॥
त्यांचे विविध भेद निर्मित । गणेश त्यांचें पालन करित । अंतीं त्यांचा संहार करित । वेदांत ब्रह्मवाचक तो ॥२०॥
त्यांचे असत्यरूप भेद ख्यात । ब्रह्मरूप ते जगतांत । त्या शक्तीस जाण निश्चित । लंबोदर गजानन ॥२१॥
त्याच्या उदरांतून उत्पन्न । अन्तीं सारे भेद त्यांत विलीन । म्हणोनि लंबोदर हें अभिधान । ऐसें रहस्य जाणावें ॥२२॥
प्रजापते हें लंबोदराचें आख्यान । कथिलें तुज मी पावन । हें वाचितां वा ऐकतां जन । लाभती सर्व मनकामना ॥२३॥
आणखी काय ऐकूं इच्छिसी । तें सांग पुनरपि मजसी । सांगेन मी तें प्रजापते तुजसी । तुझी गणेशभक्ति जाणूनियां ॥२४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते लंबोदरब्रह्मवर्णनं नाम एकादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP