मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ५| अध्याय ३० खंड ५ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ खंड ५ - अध्याय ३० मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३० Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः । दूर्वार्पणाचें माहात्म्य ऐकलें । परि चित्त ना पूर्ण तोषलें । दूर्वेसम अन्य न त्रिभुवनीं असलें । सर्वसिद्धिप्रद साधन ॥१॥योगामृत परायण मी असत । म्हणोनि अद्यापि न तृप्त । दक्ष म्हणे मुद्गलाप्त । जनककथा आणखी सांगावी ॥२॥वृद्ध ब्राह्मणाचें रूप घेऊन । जनकाचा गर्व हरण । करून गेला गजानन । तदनंतर त्यानें काय केलें ॥३॥मुद्गल सांगती दक्षाप्रत । ऐक जनकाचें चरित्र सांप्रत । गणेश्वर निघून जातां होत । दुःखयुक्त जनक राजा ॥४॥ह्रदयांत शोक करी बहुत । नारदें कथिलें तें सत्य वाटत । गर्व दाटला मम वित्तांत । म्हणोनी दुःख पावलों मीं ॥५॥नरदेह भक्तिसाधन प्रख्यात । तो लाभतां गणेशास न भजत । ऐसा जाणावा नर वंचित । मायाप्रभावे या जगीं ॥६॥स्वहित साधण्या कर्मनिष्ठांनी । तपफल लाभण्या तपोनिष्ठांनी । ज्ञान संपादण्या ज्ञाननिष्ठांनी । सेवावा श्रीगजानन ॥७॥योग्यांनीं योगसिद्धीस्तव । सेवावा हा ब्रह्ममय देव । ब्रह्मणस्पति वाचक अपूर्व । देहधारी हा साक्षात ॥८॥ऐसे वेदांत असे कथित । यांत संशय तिळमात्र नसत । त्या गणेशास विसरून भ्रांत । मूर्खासम मी जाहलों ॥९॥योगप्रभावें मदोन्मत्त । मनुजासम गणेशास मानत । मीच गणेश ऐसे म्हणत । अज्ञानीं मी मूढमति ॥१०॥गणेशभजन मुख्य मानित । तेंच सदैव जो करित । तो योगींद्र गुरु साक्षात । त्यासम अन्य कोणी नसे ॥११॥ऐसा चित्तक्षोभ सहन करित । जनक राहिला स्वगृहांत । तेथ नऊ योगींद्र येत । ऋषभनंदन प्रख्यात ॥१२॥ते सर्वही योगसंपन्न । अनुभवती सदा यौवन । सदा फिरती ते नग्न । त्रैलोक्यांत स्वेच्छेनें ॥१३॥सर्ववंद्य ते पूजनीय असती । ब्रह्मरूपधर साक्षात जगतीं । विधिनिषेधहीन वर्तती । योगरूपधर सर्वही ॥१४॥गणेशाची चरित्रें परस्परांस । सांगती ते अतिसुरा । तद्रूप ते हर्षभरें जयघोष । करिती गणेश नांवाचा ॥१५॥स्वपर ऐसी भ्रांति नसत । मृत्तिका काष्ठ कांचन सम लेखित । भेदाभेदविहीन वर्तत । वर्णाश्रम विवर्जित ॥१६॥स्वेच्छापूर्वक कर्म करिती । स्वेच्छेनें ज्ञानधारक होती । स्वच्छंदें समशील असती । स्वेच्छेनें तें सहज प्रिय ॥१७॥स्वेच्छेनें स्वस्त्ररूपस्थ राहती । स्वेच्छेनें योगतत्पर जगतीं । स्वेच्छेनें पूर्ण योगस्थ वर्तती । स्वेच्छेनें ते वर्णवंत ॥१८॥स्वेच्छेनें आश्रम संयुक्त । स्वेच्छेनें विधिधारक समस्त । स्वेच्छेनें ते निषेधयुक्त । ऐसे स्वाधीन ते योगी ॥१९॥विधिनिषेधहीन ते असत । स्वेच्छेनें विनायक सतत । दंडादींनी विहीन वर्तत । गणेशगायनीं तत्पर सदा ॥२०॥त्यांस पाहून जनक नृपति । संभ्रमाकुल जाहला चित्तीं । वरती उठून विनम्र रीती । घाली साष्टांग नमस्कार ॥२१॥मग पूजोपचार आणून । विधियुक्त केलें पूजन । आतृप्ति जेवूं घालून । पाय चुरी भक्तीनें ॥२२॥तदनंतर वचन हितयुक्त । जनक म्हणे तयांप्रत । धन्य माझी मातापिता वाटत । विद्या तप स्वाध्यायादी ॥२३॥ब्रह्मणस्पति रूप तुमचें दर्शन । घडलें मजला पावन । निस्पृह सर्व भावांत । निरभिमात । निःसंशय आपण सारे ॥२४॥तथापि जी आज्ञा कराल । ती पाळण्या मी उत्सुक अमल । तुम्हां योग्यांची जो आज्ञा पाळील । त्यास पुनर्जन्म ना मिळे ॥२५॥परी करितां तुमचा अवमान । नरकयोग्य होतो जन । तुम्हीं साक्षात योगस्वरूप योगीजन । कृपा करून आलात ॥२६॥माझ्या सम ना त्रैलोक्यांत । आपुल्या दर्शनें मी पुनीत । कृतकृत्य जाहलों सांप्रत । परम सद्भाग्यें माझिया ॥२७॥मुद्गल म्हणती दक्षाप्रत । जनकाचें वचन ऐकून बोलत । प्रह्रष्ट भावें त्या नृपाप्रत । शांतिप्रदायक ते सारे ॥२८॥नव योगी म्हणती जनकाप्रत । धन्य तूं मानवराजा वाटत । देहधारी असून विदेही वर्तत । यांत आश्चर्य कांहीं नसे ॥२९॥साधुदर्शन लालस आलों । तुझ्या घरीं विसावलों । तुज पूर्ण योग्यास पाहून झालों । श्रुतकीर्ति पूर्ण तृप्त ॥३०॥आता आम्हीं निरोप घेतों । राजशार्दूला कांहीं न वांछितों । तूं केलेली स्वीकारितों । पूजा तेणें संतुष्ट सारे ॥३१॥त्यांचें हें बचन ऐकून । नृप पुनरपि बोले वचन । भक्तिभावें त्यास नमून । सर्वजनप्रिय हितकारक ॥३२॥योगींद्रहो सांगा मजप्रत । योगसिद्धि कैशी होत । जनांनी काय करावें जगांत । जेणें वंद्य पंडित होती ॥३३॥कवि हरि अंतरिक्ष प्रबुद्ध । पिप्पलायन अविहोत्री सुबुद्ध । द्रुमिल चमस करभाजन अनिर्बंध । नवयोगी तैं उपदेशिती ॥३४॥प्रथम कवि म्हणे जनकाप्रत । योग परायण स्वधर्म पाळित । रजतमा तें तिरस्कारित । सत्त्वयुक्त मुमुक्षू ॥३५॥गणेशार्पण बुद्धीनें करित । ऐसा नर कर्में सतत । श्रौत स्मार्त व्रतादिक आचरित । आंतर वायु साधनकें ॥३६॥स्मृतिप्रणीत तीं सर्व करित । ध्यानपरायण राहत । गणेशाचें सदा ध्यान करित । ऐसा योगी ह्रदयांत ॥३७॥एकाक्षरादि मंत्र असती । त्यातील एक जपे भक्ति । संप्रज्ञात समधिस्थ स्थिति । जरी संभवली नृपा ॥३८॥तथापि गणराजाचें ध्यान । कधीं न सोडावें हें सत्य ज्ञान । असंप्रज्ञात योगस्थही होऊन । विघ्नराजास सदा ध्यावें ॥३९॥गणेश ध्यानानें युक्त । योगभूमी तैं उल्लांघित । विघ्नें नष्ट होत स्वल्प काळांत । नृपात्मजा तो योगींद्रा ॥४०॥तेव्हां तो योगी होईल । खरोखर शांतिपरायण अमल । चित्तांत चिंतामणिपर सबळ । तदाकार सुसाधानानें ॥४१॥गणेशासम जग्तांत । कांहीं ब्रह्मद नसत । सर्वांस योगदानार्थ होत । देहधारी गजानन ॥४२॥हें भूपा तुज कथिलें । योगप्राप्त्यर्थ सुसिद्ध चांगलें । भजन सिद्धिनाथाचें वर्णिलें । योगसिद्धि जें देई ॥४३॥जनक विचारी तयांप्रत । चिंतामणि कैसा ख्यात । कैसें त्याचें रूप चित्तांत । जाणावें विशेषे नरानें ॥४४॥दुसरा हरि योगी तैं सांगत । चित्त पंचविध ख्यात । तेथ चिंतामणि स्थित । चित्त प्रकाशक तो असे ॥४५॥म्हणोनि विघ्नेशान त्यास म्हणती । आतां ऐक चित्ताची पंचविध स्थिति । क्षिप्त मूढ विक्षिप्तरीती । एकाग्र तैसें निरोधक ॥४६॥ऐसें पंचविध चित्त । त्याचें वर्णन विस्तृत । आतां भूमिपा ऐक पुनीत । जें जाणतां ज्ञानोदय ॥४७॥जेथ सर्वांशीं मन क्षिप्त । तेथ राहील ज्ञानयुत । समान्यांसम तेच कर्म करण्या उद्युक्त । समर्थ कैसा होईल ॥४८॥क्षिप्त चित्त तें जाणून । प्रकाशक तेथ चिंतामणि तरी म्हणून । गणाधीशाचें करी भजन । महामते सर्वदा ॥४९॥जेथ जरी क्षेपिलें तरी न जात । नरें आपुलें हो चित्त । ज्ञानहीनतेनें मूढ संज्ञित । मूढासम त्या नराचें ॥५०॥दुसरें भ्रांतियुक्तांचें चित्त । पिशाचासम सर्वदा वर्तत । तेंच जाणावें मूढ जगांत । जनवत्सला जनकनृपा ॥५१॥तेथ प्रकाशदाता तोच असत । नाना क्रौडापर चिंतामणि पुनीत । गणाध्यक्ष ऐसा वर्तत । त्यासी भजावें नृपाळा ॥५२॥सत्त्वभावें समायुक्त । मानव जो मोक्ष कामुक असत । ब्रह्मार्पणभावें कर्म करित । नित्य तो सर्वही जीवनीं ॥५३॥ब्रह्माच्या अणुभावें हीन । सुखलालस नसे जगीं म्हणून । ब्रह्मार्थ त्याचें चित्त सुमन । विक्षिप्त म्हणती बुध तेव्हां ॥५४॥संसरांत क्षिप्तभाव वर्तत । म्हणोनि विगत क्षेपण कर्ण्या उद्युक्त । सदा साधन तत्पर राहत । तदा चित्त विक्षिप्त म्हणती ॥५५॥तेथ प्रकाश देईअ सतत । चिंतामणि देव ह्रदयांत । त्यास भज तूं एकचित्त । आता एकाग्र स्थिति वर्णितों ॥५६॥ज्ञानदृष्टि समुत्पन्न । होतां सर्वत्र नृपा समान । साक्षात् भावें युक्त असून । अवयवादिकांनी वर्जित तैं ॥५७॥त्या दृष्टीनें जो नर पाहत । योगज्ञ त्यास तेथ दिसत । सर्व विश्वआकाररहित । यांत संशाय मुळीं नसे ॥५८॥अष्टधा तों समाख्यात । संप्रज्ञात स्वरूपयुक्त । एकभावकरा वृत्ति ख्यात । एकाग्रनामा चित्ताची ॥५९॥तेथही चिंतामणी साक्षात । प्रकाशकारक असे ज्ञात । त्यास भज तूं विधियुक्त । सर्वसिद्धिप्रदायकासी ॥६०॥हें जगदादि अवयवयुक्त । चतुर्देहमय असत । बिंदु त्याची पराकाष्ठा ख्यात । ब्रह्ममाया प्रधारक ॥६१॥देही भेदविहीन असत । देहचालक त्यास म्हणत । तो मीं मात्रात्मक वर्तत । वेदवादी ’सोऽहं’ शब्दें ॥६२॥त्यांच्या योगें विरोध होत । सदा चित्ताचा जगांत । त्याचे दोन भेद उक्त । संयोग अयोग नांवानें ॥६३॥स्वतः उत्थान परतः उत्थान । ब्रह्म त्या उभय वर्जित असून । हें संयोगक महान । समाधिधारक तें पर ॥६४॥सर्वांचा तेथ संयोग घडत । ब्रह्माकारें जगांत । दुसरें अयोगरूप वर्तत । निवृत्तिधारक जें परम ॥६५॥ब्रह्म मायाविहीन । व्यतिरेक प्रभावें मान । कोणाच्या मतें संयोग उत्पन्न । ब्रह्मांचा व जगतांचा ॥६६॥कोणी म्हणती ब्रह्मयोग न घडत । स्वकीय भेद नष्ट होत । यात संशय कांहीं नसत । तेंच ब्रह्मभूतत्व निरोधज ॥६७॥जेव्हां निरोधपर चित्त । प्रकाशवित गणेश्वर सतत । त्या चिंतामणीस भज निश्चित । खेळण्या लालस जो असतो ॥६८॥पंचधाभूमिस्थ त्यागून । योगपर व्हावें जाणून । चित्तनाश होतां सुजाण । साक्षात् चिंतामणि होतो ॥६९॥सर्व चिंतन त्वरित सोडित । तेव्हां शांति विराजे चित्तांत । नित्य आदरें तेव्हां लाभत । चिंतामणि रहस्य नरातें ॥७०॥हें सर्व तुज पूर्ण कथिलें । चिंतामणि स्वरूप भलें । त्यानें भजन विधानें केलें । तरी शांतिसाहाय्यें योगलाभ ॥७१॥जनक विचारी तयाप्रत । ऐसा गणेश जो असत । तो देहधारी कैसा होत । श्रद्धादिक तैशी कशी उपजे ॥७२॥तेव्हां तिसरा अंतरिक्ष योगी सांगत । तो वामभागीं राजस असत । दक्षिण भागीं तामस ख्यात । मध्यांत सत्त्वपराय़ण ॥७३॥त्यांचा होता संयोग । तुरीयक भाव होत सुभग । चतुर्विध पद देहयोग । तेथ अहंकार धारक असे ॥७४॥देही तन्मय साक्षात । कंठाखालीं गणनायक ज्ञात । ज्यापासून सर्व उत्पन्न होत । अन्तीं सारे जेथ जाई ॥७५॥महा उग्र समाधीनें संहारित । तोच गज जाणावा प्रख्यात । कधीं न जन्मे न लय पावत । गजशब्द ब्रह्मपर जगती ॥७६॥तेंच त्या गणेशाचें मस्तक । महात्म्याचें असे ज्ञापक । त्यांच्या संयोगें गणाध्यक्षक । साकार होतो जगामाजीं ॥७७॥कंठाखालतीं संप्रज्ञानमय । कंठावरतीं असंप्रज्ञात होय । देहाचें शिर तें महात्त्वमय । कंठावरती विराजतें विराजतें ॥७८॥त्या दोघांच्या संयोगें होत । भक्तावर अनुग्रह करण्या वांछित । म्हणोनि देहधारी । ब्रह्मनायक पुनीत । गणेश या जगतांत ॥७९॥त्या महात्म्याचा देह नसत । सर्वसम भावाख्य जगांत । देहधारी गणाधीश होत । भक्तिभोगार्थ त्वरेनें ॥८०॥भक्तिसम प्रिय अन्य त्या न वाटत । म्हणोनि सकळ सोडून भक्तियुक्त । व्हावें राजेंद्रा भक्ताधीन तो असत । देव गणेश सर्वदा ॥८१॥भ्रांतचित्तांस देहधारी भासत । माया प्रभावें तो जगांत । साक्षात् योगस्वरूपधारक वर्तत । जनक विचारी त्यावरी ॥८२॥कैसी गणराजाची माया । भ्रांतिकरी सांग सदया । योगींद्रा ब्रह्मज्ञान व्हाया । मति कैशी योग्य व्हावी ॥८३॥तेव्हां चवथा प्रबुद्धयोगी म्हणत । वामांगापासून उत्पन्न होत । सिद्धि शक्ति साक्षात । वामभाग प्रकाशिनी ॥८४॥गणेशाच्या दक्षिणांगापासून । बुद्धि उत्पन्न झाली पावन । दक्षिणांगधरा म्हणून । ख्यात जगतीं ती असे ॥८५॥सिद्धिसुत लक्ष नामक असत । बुद्धीचा पुत्र लभ ख्यात । चित्तापासून ते जन्मत । खेळकर जे परम ॥८६॥मायामोहित ज्यांचें चित्त । त्यांना भ्रम पाडिती हें सतत । त्यांचें रूप वर्णन करित । लोकहितार्थ जनक नृपा ॥८७॥जेव्हां पापांत लक्ष लागत । तेव्हां नरकप्रद लाभ होत । परी पुण्यांत लक्ष केंद्रित । तेव्हा स्वर्गप्रद ॥८८॥परी ब्रह्मांत लक्ष लावी नर । तेव्हां योगमय लाभ उदार । ह्रदयांत सर्वदा लक्ष स्थिर । लयदायक सर्वत्र ॥८९॥पदार्थावर स्थित लाभ संमत । नाना फलें तो देत । हया दोन युवराजांच्या सहित । विघ्नेश मायेसह संचरे ॥९०॥बंधहीन तो क्रोडा करित । स्वेच्छाचारी स्वरूपयुक्त । सिद्धि भ्रांतिकरी ख्यात । सर्वत्र वर्ततसे ती ॥९१॥सिद्धीसाठीं सर्व जन । भ्रमण करिती सकाम । धर्मसिद्धि अर्थसिद्धि परम । कामप्रदायक विख्यात ॥९२॥मोक्षसिद्धि ब्रह्मप्रदायिनी । ही गणेशरूप तरी मनीं । हीं भ्रांति उपजे कोठेनि । सिद्धिभ्रांति ति निर्मितसे ॥९३॥भुक्तिमुक्ति ब्रह्मभूय असत । भ्रांतिधारक रूपबुद्धी सतत । बुद्धीनें जाणता निवर्तत । राजेंद्रा मोह तदनंतर ॥९४॥पंचचित्तमयी बुद्धि ख्यात । स्वयं विश्वात्मिका ज्ञात । ब्रह्माकारा भिन्नपद इच्छित । दुःखदात्री ती सदा ॥९५॥सकाम निष्काम ब्रह्मपरायण । बुद्धिभ्रांति करी जाण । नाना भ्रांतिकर सर्व निर्माण । सिद्धि शक्ति करीतसे ॥९६॥नाना मोहयुक्त जें असत । तो बुद्धीचा खेळ निश्चित । त्या दोघींनी स्वंमोहित । लक्ष लाभयुत जग होतें ॥९७॥नान लक्ष समायुक्त । नाना लाभ फळांनी संयुत । म्हणून मायायुत तो गणेश खेळत । बिंबी जैसा बिंबांत ॥९८॥नृपसत्तमा तो ब्रह्मनायक असत । सांगितलें मायास्वरूप मोहयुक्त । जें जाणतां योगिवंद्य होत । क्षणांत मानव या जगीं ॥९९॥जनक त्यानंतर विचारित । भक्तिप्रिय गणेश असत । तरी तो जनांस करी मोहयुत । स्वभक्ता वाचवी हें कैसें ॥१००॥गणनायका पराधीनता नसत । स्वप्रिय तो सर्वदा वर्तदा । पराधीन समान न करित । महाअद्भुत तो कैसा ? ॥१०१॥पिप्पलायन पाचवा योगी सांगत । गणेशानें हें रचिलें असत । मायामय नामा खेलयुक्त । केवळ मनोविनोदानसाठीं ॥१०२॥तेथ प्रथम द्विविध रचिलें । त्यानें विश्व हें नटविलें । विधान पूर्वक ऐकता भलें । सर्व संशय नष्ट होय ॥१०३॥स्वस्वस्वार्थयुत माया सुखकर । त्यासाठीं सर्व लोक उत्कंठित फार । ब्रह्मात करिती संचार । योगमार्ग तो शांतिप्रद ॥१०४॥राजा हा गाणेश मार्ग रचित । मोहनाशार्थ उपयुक्त । मायानाशकर असत । ऐसें शास्त्र सांगतसे ॥१०५॥योगानें गणपास जाणून । नर होतसे परिपूर्ण । तदनंतर अनन्याभावें भजन । करूण तन्निष्ठ तत्परायण ॥१०६॥ज्याचा भाव जेथ असेल । तैसें तो आचरेल । तेथ विघ्नेश्वर साक्षात् विमल । आग्रह न धरी कसलाही ॥१०७॥जरी गणेश्वर विश्वास करित । निरंतर भक्तियुक्त । तरी गणेशाचा खेळ जगांत । तदनंतर कैसा संभवेल ? ॥१०८॥हें सर्व तुज कथिलें । राजा आणखी इच्छिसी भलें । स्वाधीन तें पराधीन झालें ॥ पाहतां मायादृष्टीनें ॥१०९॥जनक विचारी तयाप्रत । कर्मा अकर्म विकर्म जगांत । कर्मयोग कैसा असत । तें सांगा मज विप्रेंद्रही ॥११०॥तेव्हां सहावा आविहोत्र सांगत । स्वधर्मयुक्त कर्म विधियुक्त । देहसौख्यप्रद प्रख्यात । जन्ममृत्युप्रद तो असे ॥१११॥स्वधर्मविहीन जें विधिहीन । विकर्म राजेंद्रा तें असून । पापरूप जाणावें उन्मन । देहह्दूःखकर परिणामीं ॥११२॥पापाचरणमात्रें लाभत । दुर्गति मनुष्यप्राण्या जगांत । सत्कर्म मुक्तिकाम जें असत । नित्य आदरें जे करिती ॥११३॥ब्रह्मणि स्वभावें कर्म अकर्म । ऐसें महामते जाण कर्म । शुक्ल गतीनें जाता अभिराम । नरास शाश्वत मुक्ति लाभे ॥११४॥अकर्माच्या प्रभावें होत । निष्काम सत्यार्थ जगांत । कर्मयोगमय विश्व समस्त । जाणावें नृपा जनका हें ॥११५॥क्रियेत जें ब्रह्म स्थित । तोच कर्मयोग ज्ञात । क्रियमाण जें असत । तेंच कर्म तूं जाणावें ॥११६॥त्याचें भेद आता वर्णित । ऐक तें तूं एकचित । जरी मौनही धारण करित । तरीही घडतें कर्म सदा ॥११७॥धारणानें कर्ममय जाणावें । निःसंशय हें आघवें । वायुबंध योगें न्यावे । प्राण आपुल्या मस्तकांत ॥११८॥वायुचालनामुळें कर्मरूप होत । तीच क्रिया योगांत । ध्यान करितां चित्तांत । दमन करून मनाचें ॥११९॥तेही कर्मच जाण जगांत । मनोनिग्रह तें कार्य असत । जागृति जागरण कर्म वर्तत । स्वप्नांत सुप्तमय कर्म ॥१२०॥अज्ञान तें सुषुप्तीत । कर्मरूप संशयातीत । ऐसे बहुत भेद असत । सर्वांचें वर्णन अशक्य वाटे ॥१२१॥जो जो नामरूपें युक्त । तो तो कर्महीन न वर्तत । उत्पत्ति स्थिति संहारयुक्त । त्रिविधकर्म जाण कर्मयोगज ॥१२२॥असत् ब्रह्म वेदोक्त । ते मायेनें विनिर्मित । कर्मरूप यांत संदेह नसत । नामरूप धारणामुळें ॥१२३॥नामरूप त्यागितां होत । असत् तें स्वानंदग पुनीत । मानव ब्रह्मरूप ख्यात । कर्मौयोगी तेधवां ॥१२४॥ऐसें कर्मस्वरूप वर्णिलें । ब्रह्मवाचक तुज भलें । कर्माधीन जग झालें । समस्त ब्रह्म नानाविध ॥१२५॥जनक तदनंतर पृच्छा करित । ज्ञान कैसें तें सांगा मजप्रत । ज्यानें योगी नर होत । ज्ञानयोग परायण ॥१२६॥तैं द्रूमिल सातवा योगी सांगत । स्फूर्तिमय ज्ञान ह्रदयांत । जाणावें विबुधीं समस्त । वसे स्फूर्तिदातृस्वरूपें ब्रह्म तेथें ॥१२७॥जें जें नामरूपविहीन । सदा अमृतमय आद्यंतभावहीन । तें जाण ज्ञान उत्तम । ज्ञानचक्षूनें ब्रह्मानुभ्व ॥१२८॥नाना ज्ञानांचा लय करून । ज्ञानयोगी होती जन । सत्य स्वानंदरूप महान । जाण तूं ज्ञानमूलक जें ॥१२९॥ज्ञानांच्या योगभावें लाभत । योगसेवेनें तें जगांत । तदनंतर जनक म्हणत । आनंदाचें वर्णन करा ॥१३०॥सहज आनंद कैसा असत । ब्रह्मभूय तें कैसें असत । तें सर्वही मजला सांप्रत । सांगावें योगींद्रांनो तुम्ही ॥१३१॥तेव्हा आठवा योगी चमस बोलत । आंतरबाहय भेदें वर्तत । आनंद सर्वत्र जगांत । उभायात्मक भाव समरूप ॥१३२॥नाना द्वंद्वांत राजेंद्रा स्थित । आनंदरूप विश्वांत । सम आनंद तो सर्वत्र दिसत । परानंद तो ब्रह्मांत ॥१३३॥सत्यासत्यमय तें जाण । समस्वानंदग प्रसन्न । ब्रह्म सदानंदरूप सुजाण । जनका संमत शास्त्रांत ॥१३४॥द्वंद्वांत करी नंदन । आनंद तो परमानंद महान । ब्रह्मानंद त्यास अभिधान । समभावस्थां ब्रह्म लाभे ॥१३५॥आनंदाख्य तें ब्रह्म प्राप्त । योगसाधनें जगतांत । ऐसें हें पूर्णानंद स्वरूप उक्त । आनंदसंयोगें समस्वानंद ॥१३६॥त्याची द्विविध माया असत । द्वंद्वभाव ती पसरवित । त्यांच्या संयोगभावें ख्यात । उभयात्मक आनंद ॥१३७॥तेच द्विविध भावांत । नराधिपा हो मोहयुक्त । सम तें सर्वत्र असत । द्वंद्व मोहादिदायक ॥१३८॥तिन्हींत मोहविहीन । जे सदा नेति स्वरूपयुक्त स्वाधीन । सहज तें चतुर्थ जाण । राजसत्तमा ब्रह्म जगीं ॥१३९॥स्वेच्छेनें जें सत् समायुक्त । स्वेच्छया सत्परायण वर्तत । स्वेच्छया आनंदसंयुक्त । स्वेच्छेनें या त्रितयहीन ॥१४०॥आज्ञेनें त्रिविध ब्रह्म । वर्तते सर्वत्र तें परम । सर्वांचा नाश करी तें तुर्य सर्वोत्तम । सहज नेति भावामुळें ॥१४१॥त्याचा कर्ता कोणी नसत । योगभावें तें विलसत । म्हणोनि नेतिमय स्वच्छंदग ख्यात । ऐसें नसें हें सनातन ॥१४२॥स्वेच्छेनें होई बंधयुक्त । स्वेच्छेनें बंधवर्जित । स्वेच्छेनें समभावयुत । सहजाख्य ब्रह्म तें ॥१४३॥अव्यक्तानें त्रिभावांत । त्या योगानें तें लाभत । सहज ब्रह्म ऐसें वर्णित । वेदवादी वेदांत ॥१४४॥स्वाधीनांच्या संयोगें व्यक्त । स्वानंद त्यास नाम असत । अव्यक्त योगभावें विश्वांत । निराकरण अशक्य त्याचें ॥१४५॥ऐसें हें कथिलें सहज मोहवर्जित । आता ऐक तूं सांप्रत । योग ब्रह्मभूय प्रकाशक पुनीत । जनक नृपा सावधान ॥१४६॥स्वानंद सर्व संयोगें होत । ब्रह्मधारक जगतांत । चारांचा संयोग करावा उचित । आपुल्या समाधीनें तेथें ॥१४७॥विविध तें मोहयुक्त । चवथें मोहहीन असत । ब्रह्मांत ऐसें नसत । राजेंद्रा तें मोहयुक्त विहीन ॥१४८॥तें स्वाधीन वा पराधीन । ब्रह्मांचा जगांचा तेथ संगम पावन । स्वसंवेद्यमय जेथ मानव होऊन । राहे तेथ काय भिन्नभाव ॥१४९॥संयोग नाश होता प्रकीर्तित । ब्रह्मयोग तेथ त्वरित । तेथ जगब्रह्मांचा नाश न होत । संयोग तेथें त्यानंतर ॥१५०॥अयोगाचा संयोग न होत । कुठल्याही ब्रह्मांत न उक्त । योग्यांनी योगप्राप्त्यर्थ जगांत । व्यतिरेकानें विचार करी ॥१५१॥संयोगांत मायेनें युक्त । गणनायक सदा होत । मायाधीन स्वरूपांत । सदा अयोग प्रवर्ततो ॥१५२॥मायेनें सर्व भावयुक्त । द्विरदानन तो होत । संयोग अभेदभावें स्मृत । निजमायामय तोही ॥१५३॥स्वानंदीं गणनाथाचें दर्शन । योग्यांसी होतसे पावन । संयोग अभेदक म्हणून । म्हणती स्वानंदवासी त्यासी ॥१५४॥अयोगांत मायाहीन । गणेश सर्वदा असे प्रसन्न । जैसा असेल तैसा असून । न आगमन वा निर्गमन करी ॥१५५॥वृथा भ्रांतिमय सर्व भासत । मायेनें या जगांत । भ्रान्तांसी निवृत्ति उपजत । सर्वत्र परा कोटीची ॥१५६॥स्वकीया भेदभावापासून । निवृत्ति व्यतिरेकें स्थापन । स्वीकारितां अयोग योगपावन । स्वयं होतो मानव ॥१५७॥ अयोगांत मायाहीन । संयोगांत मायासहित होऊन । नर होतो राजेंद्रा तन्मन । पंच पंच स्वरूपानें ॥१५८॥ब्रह्मांत जो ब्रह्मभूत । त्याचा संयोग कैसा वर्तत । अयोग महीपाला नसत । अन्वयव्यतिरेक संबंधें ॥१५९॥चित्त पंचविध त्यागून । पंचधा चित्तभ्रांति सोडून । स्वयं चिंतामणि भगवान् । साक्षात् ब्रह्मभूत नर होय ॥१६०॥संयोगात्मा तो गकार । अयोगवाचक णकार । त्यांचा स्वामी गणाधीश थोर । संयोग अयोग वर्जित ॥१६१॥ऐसें हें ब्रह्मभूत स्वरूप वर्णिलें । आतां आणखी काय उरलें । आणखी काय ऐकण्या राहिलें । मनोरथ तुझे सांग प्राज्ञा ॥१६२॥अन्यथा यदृच्छेनें निरोप घेतों । स्वच्छंदानें आम्हीं जातों । तें ऐकतां जनक विचारिती । आणखी एक शंका असे ॥१६३॥गणेश भक्तिभावें नराधीन । स्वयं होतसे तो गजानन । भक्तिसदृश त्या मोहद होऊन । भुलवी हें कैसें संभवेल ॥१६४॥म्हणोनि भक्तीचें स्वरूप मजप्रत । सांगा आपण सांप्रत । योगिसत्तमहो तें होतां ज्ञात । विघ्नेश्वरा नित्य भजेन मी ॥१६५॥तैं नववा योगी करभाजन । जनकासी सांगे वचन । नवधा भक्ति ह्रदयीं पावन । रसधारिणी कथिली असे ॥१६६॥संक्षेपानें रसदायक कथीन । स्वरूप भक्तीचें महान । श्रवण कीर्तन त्याचें स्मरण । पादसेवन ही चवथी भक्ति ॥१६७॥अर्चन वंदन दास्य असत । सख्य आत्मनिवेदन पुनीत । ऐसा या नवधा भक्ति वर्तत । मानसी गति सर्वत्र ॥१६८॥भावांत रससंयुक्त । दहावी भक्ति न ज्ञात । जेव्हा पूर्ण रस प्रकटत । मानवाच्या भक्तींत ॥१६९॥तेव्हां त्याचें नवधा वसत । चित्त नित्यही भक्तींत । तैसेंचि जरी मुक्तींत । तरी नवधा मुक्तींत तें ॥१७०॥जेव्हां ब्रह्मभूतांत वाटत । रस नराला एकचित्त । तेव्हां नवधा योगांत । चित्त त्याचें रममाण ॥१७१॥योगी होऊन गणनायका भजत । जी नर भक्तिभावयुक्त । त्याचें चित्त गणेशांत । नवधा सर्वदा निमग्न ॥१७२॥योग्यांच्या हृदयीं विघ्नेश । पूर्णरूपधर सविशेष । योगहीनांच्या तो सर्वेश । कलांशानें राहतसे ॥१७३॥म्हणोनि योगी नरें व्हावें । आणि गणेशभजनीं रमावें । पूर्णभावें तरी चाखविं । रसाचें अमृत निःसंदेह ॥१७४॥गणेश गुणवादांचें स्मरण । संपूर्ण भावें करावें म्हणून । रससंयुत नरें होऊन । श्रवणभक्ति श्रेष्ठ होते ॥१७५॥गणेशगुण श्रवणांत । पूर्ण रस त्यास वाटत । तेव्हां श्रवणभक्ति प्राप्त । जाहली ऐसें जाण नृपा ॥१७६॥ऐसी श्रवणभक्ति होता प्राप्त । योग्यांत श्रेष्ठत्व तयाप्रत । कीर्तनभाव उत्पन्न होत । तेव्हां भक्ति गणेशकीर्तनीं ॥१७७॥गणेशार्थ जें जें असत । त्याची विस्वमृति कदापि न होत । ती स्मरणभक्ति ख्यात । प्राप्त संपूर्ण भावानें ॥१७८॥गणेश पादपद्मास मानित । जो शाश्वत पर विश्वांत । सकल यन्तें ते सेवित । ती भक्ति जाण पादसेवन ॥१७९॥सर्वांग विधिपूर्वक करित । नित्य आदरें पूजन भक्त । ती अर्चनात्मक भक्ति ख्यात । पाचवी भक्ति ही थोर ॥१८०॥गणेशाहून अन्य नसत । श्रेष्ठ कोणी या विश्वांत । वेदशास्त्र विचारें संमत । य विचारांत जो सुदृढ ॥१८१॥ती वंदन भक्ति प्रख्यात । गाणपत्य चिन्हें धारण करित । ती दास्य भक्ति ज्ञात । आता सख्य भक्ति निवेदितो ॥१८२॥अंतर्बाह्म जें कर्म करित । तेथ साक्षी गणेश्वर असत । ऐसें भय अंतरीं बाळगून करित । सख्यरूपिणी ती भक्ति ॥१८३॥पंचधा मोहयुक्त चित्त सोडून । योग साहाय्यें अभेद जाणून । गणेशाहून न मी भिन्न । ऐसें वाटता आत्मनिवेदन भक्ति ॥१८४॥मन जाय प्राज्ञा जेथ । तेथ विश्वेश्वरा स्मरत । भजे त्यास रसयुक्त । तो भक्त गणेशाचा ॥१८५॥रसरूपा स्वयं भक्ति विलसत । पूर्ण स्वभावें मनांत । तो प्राणी खरा भक्त । ऐसें जाण जनकनृपा ॥१८६॥अन्य भोगांत न रसोत्पत्ति । ब्रह्मभूयसी मुक्ति लाभत जगतीं । गणेश भक्तिभावें भक्तचित्तीं । रसोत्पत्ति सदा वसते ॥१८७॥प्रथम गणेशाचें स्वरूप तुजप्रत । सांगितलें आम्ही योगयुक्त । ब्रह्माकारें महाचिन्हांनी संयुक्त । तेथ विश्वास ठेवावा ॥१८८॥ऐश्या विश्वासें रस उत्पन्न । होई तेव्हां भक्त पावन । योगिवंद्य तो होऊन । महाराजा शोभतसे ॥१८९॥नारदें राजेंद्रा बोध दिला । परी तो तुज नाहीं उमजला । तुझ्या भावपरीक्षेस्तव केला । भक्तिदान प्रयोग ॥१९०॥त्यानें पाठवलें तुजप्रत । वृद्ध ब्राह्मण रूप कुष्ठयुक्त । विघ्नेशदेव तो छळत । सर्वभक्षी तुजला तैं ॥१९१॥नरदेह प्राप्त होऊन । जो नर न करि गजाननाचें भजन । पशुतुल्य तो राजेंद्रा दुर्मन । धिक्कार त्याच्या जन्माचा ॥१९२॥मुद्गल सांगती दक्षाप्रत । ऐसें सांगून विदेह जनकाप्रत । ते नऊ योगी स्वेच्छेनें जात । अन्यत्र स्थळीं गणेशनिष्ठ ॥१९३॥जनक त्यांस वंदून । स्वगृहांत परतला प्रसन्न । नवविधा भक्ति गणेशावर करून । अहर्निश भजे गणनायका ॥१९४॥अनन्यभावें गणेशास भजत । सर्वभावें तैं जनक होत । योगिवंद्य सर्व योग्यांप्रत । सदा सर्वदा गणेशा स्मरे ॥१९५॥चालता बसता खाता पितां । झोपतां तैसाची बोलतां । विघ्नेश्वरासी स्मरे तत्त्वतां । सदैव रमला त्याच्यांत ॥१९६॥गणेशसंतोषें त्याच्या वंशांत । सर्वज्ञान समायुक्त प्रजा होत । शोभन गुणांनी युक्त । गणेश भजनीं आसक्त सदा ॥१९७॥नवयोगी जातां ऐकत । त्रिशिरविषयक वृत्तान्त । जनक तैं गणेश गमनात्मक जात । स्वयं त्याच्या घराकडे ॥१९८॥तेथ जाऊन मुनिपुंगवा नमत । दैवी समृद्धि संयुक्त । योग पारंगत जो परम पुनीत । त्यास त्यानें उपदेशिलें ॥१९९॥दूर्वा महात्म्य जाणून । जनकराजा दूर्वापरायण । होऊन करी गणनाथ पूजन । सदा भक्तिसमन्वित ॥२००॥दूर्वाहीन न केलें पूजन । आमरण त्यानें रहस्य जाणून । अंतीं स्वानंदलोकीं जाऊन । भजतसे तो गणनायका ॥२०१॥हें जनक राजाचें माहात्म्य । कथिलें तुज प्रजापते रम्य । भुक्तिमुक्तिप्रद काम्य । श्रवणें पठनें सिद्धिलाभ ॥२०२॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते दूर्वामाहात्म्यवर्णनं नाम त्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP