मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ५| अध्याय १८ खंड ५ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ खंड ५ - अध्याय १८ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय १८ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः । मुद्गल कथा पुढे सांगत । शेष स्वयं तेथ आचरित । उत्तम तप दृढ भक्तियुक्त । शमदम परायण त्या जागीं ॥१॥क्रमानें पंचभूमीच्या पार जात । चित्तांच्याही तो अतीत । महानाग गणनायका भजत । शांतिलाभ तेणें त्यास ॥२॥गाणपत्यस्वभावें भक्तिसंयुत । पूजित होता सतत । त्या तपाच्या प्रभावें होत । संतुष्ट त्यावरी गजानन ॥३॥ध्यान करीत बैसला । शेष नाग डोळें मिटून त्या वेळा । त्याच्यापुढें प्रकटला । म्हणे वर माग इच्छित ॥४॥सुदुर्लभ जरी असला वर । तरी तो मी देईन उदार । त्याच्या आवाज ऐकता सत्वर । ध्यानांतून जागृत झाला ॥५॥गणनायका लंबोदरा पाहत । आदरें तयास वंदित । विघ्नपासी भक्तिसंयुक्त । पूजिलें त्यानें पुनः पुन्हा ॥६॥हात जोडून स्ववन क्ररित । गणेशा तुज मी नमित । सिद्धिबुद्धिपते तुज वंदित । चिंतामणे नमन तुला ॥७॥महाविघ्नेशासी सर्वांदिपूज्यरूपासी । ज्येष्ठराजासी ज्येष्ठासी । मातापितृरूपा तुजसी । नमस्कार पुनःपुन्हा ॥८॥विनायकासी सर्वनायकासी । नायकांच्या प्रचालकासी । नायक सेविती जयासी । विघ्नेशा त्या नमन असो ॥९॥सर्वांचा पदभ्रंश करिसी । अभक्तांसी विघ्न करिसी । सुभक्तांचें विघ्न हरिसी । ढुंढिराजा तुज नमन असो ॥१०॥सर्व जन ढुंढिती ज्यासी । ढुंढितांच्या त्या महाराजासी । सुसिद्धिकासी ब्रह्मपतीसी । ब्रह्मांसी सुखदात्या नमन तुला ॥११॥शांतिरूपासी स्वानंदवासीसी । सदा स्वानंदमूर्तीसी । नाना विहार कर्त्यासी । समाधिपूर्णा नमन असो ॥१२॥मूषकवाहनासी मूषकप्रियमूर्तीसी । मूषकध्वजा स्तेयरूपासी । अयोगासी सदा ब्रह्मासी । ब्रह्मासी । ब्रह्ममूर्तीसी नमन असो ॥१३॥असमाधिस्थासी हेरंबासी । मायाहीनासी योगासी । योगनाथासी चित्तवृत्तिहिनासी । योग्यांसी योगदात्या नमन ॥१४॥गणेशासी गणाधीशासी । मनोवाणी विवर्जितासी । मनोवाणीमय स्वामीसी । दोन्ही विरहितासी नमन असो ॥१५॥काय स्तवूं मीं तुजसी । वेदादीसी मति कुंठित तूं करिसी । योगी शुकमुख्यादी स्तुतीसी । करिती परी सारे थकले ॥१६॥ऐशा तुज मीं प्रत्यक्ष पाहत । केवढें माझें भाग्य उदात्त । ऐसी स्तुति गातां चित्तांत । भक्तिरस तैं समुद्भवला ॥१७॥त्यायोगें काया रोमांचित । नाचे बेभान आनंदांत । डोळयांतून अश्रू वाहत । तेव्हां गणराज सांगे तया ॥१८॥श्रेष्ठ भक्तोत्तमा माग इच्छित । वर जो मी देईन त्वरित । तुझ्या भक्तिभावें तोषित । तुझें हे स्तोत्र प्रिय मजला ॥१९॥हें शांतियोगप्रद होईल । धर्मार्थ मोक्षही देईल । जें जें मनीं इच्छील । तें तें देईन स्तोत्रपाठकासी ॥२०॥याच्या श्रवणें वाढत । माझी दृढ भक्ति चित्तांत । ऐसें ऐकून हितकर वचन म्हणत । नागराज गणेशासी ॥२१॥भावसंयुक्त करि नमन । भक्तिलालस नंतर बोले वचन । गणाधीशा मज वरदान । देईअ तुझ्या दृढ भक्तीचें ॥२२॥तुझ्या पादांबुनीं जडावें । चित्त माझें स्वभावें । सदा शांति स्थित मीं असावें । ऐसें करी गणनायका ॥२३॥चित्त पंचविध असत । त्यांत तूं राहसी सतत । स्फूर्तिरूपें माझ्या चित्तांत । राहून भ्रम दूर करी ॥२४॥मन माझें चंचलभावें रत । सदैव प्रभो संसारविषयांत । होईल त्यांत संदेह नसत । म्हणोनि माझा पुत्र तूं होई ॥२५॥संसारीं पुत्रभावानें भजेन । कुलदैवतरूपी देवा तुज प्रणाम । ह्रदयांत शांति विलसून । येथेंच गणेशक्षेत्र होवो ॥२६॥तुझ्या प्रसादें सर्वसिद्धिप्रद । नाथा भक्तांसी जें शांतिद । चित्तभूमिधरा पाहून सुखद । शांत मीं येथ गजानना ॥२७॥धरणीधर ऐसें तुज म्हणती । जन सारे या जगतीं । ज्यायोगें गणाध्यक्षा माझ्यातचि अभेदोक्ति । तुझी झाली निःसंशय ॥२८॥म्हणून माझ्या नांवें तूं धरणीधर । मज म्हणती धराधर । स्थूल शब्द प्रधारक अमर । तूं चित्तभूमिस्थ स्वामी ॥२९॥योगानें तूं धरणीधर । ऐसें बोलून वचन विनम्र । थांबला कश्यपाचा पुत्र । त्यास म्हणे गणाधीश ॥३०॥भक्तवत्सल संतोषला । शेषासी तैं म्हणाला । तूं मागितलेस त्या वराला । सकल मीं निश्चित देईन ॥३१॥सदा शांतिस्वरूपीं निमग्न । मज भजशील तूं एकनिष्ठ मन । योगशास्त्राचा कर्ता होऊन । मानसन्मान तुज लाभेल ॥३२॥तुझ्यासम योगांत । कोणी नसेल पारंगत । सदा भक्तियोगयुक्त । रहा माझ्या नाभीवरती ॥३३॥भ्रमहीन स्वभावें भज मजसी । तरी पृथ्वी धारणाचे दुःख तुजसी । काहींच न वाटेल निश्चयेसी । तिळाप्रमाणें भारहीन ॥३४॥तुझ्या शरीरावर शयन करील । विष्णु नित्य आदरें संतोषेल । पुष्पतुल्य तुज वाटेल । तो ब्रह्मांडनायक देवही ॥३५॥तुज यज्ञांत भाग मिळेल । दिक्पालत्वही लाभेल । महाभागा तूं सर्वमान्य़ होशील । यांत सशय कांहीं नसे ॥३६॥ऐसें बोलून गणाधीश । नानाविध रूपें दाखवी सुरेश । नाना योगधर परेश । शेषनागासी त्या वेळीं ॥३७॥समष्टि व्यष्टि रूप पाहत । नादबिंदु सोहं बघत । बोध विदेहही । प्रत्यक्षांत । नागराजा त्या समयीं ॥३८॥स्वरूपस्थ अयोगस्थ पाहत । तैसा योगशांतिमय साक्षात् । पाहूनिया झाला विस्मित । शेष संशयवर्जित तैं ॥३९॥तदनंतर अंतर्धान । पावला ब्रह्मनायक गजानन । शेष करी तेथ संस्थापन । गणेशाचें विप्रहस्तें ॥४०॥धरणीधर विघ्नेश संस्थित । तेथ सिद्धिदाता प्रख्यात । यात्रामात्रें निश्चित । भक्तांसी तो फळ देई ॥४१॥शेष स्वभवनाप्रत जात । होऊनियां हर्षभरित । दक्ष तेव्हांपासून वसत । विघ्नेशाच्या नाभीवरती ॥४२॥अनन्यभावें गणनायका भजत । तदनंतर व्यासरूपें अवत रत । धर्मपालक मूर्तिमंत । ब्रह्मदेवास शरण जाई ॥४३॥गणेशाचें पुराण ऐकत । त्या देवासी प्रेमे भजत । तपश्चर्या भक्तियुक्त । प्रसन्न गणराज तयावरी ॥४४॥त्यास वरदान देत । वेदशास्त्रांच्या संहिता करवित । तदनंतर काळ बहु लोटत । व्यासासी भ्रांति जाहली ॥४५॥मायेच्या प्रभावें होत । योगभ्रष्ट तो चंचलचित्त । एकदां नदी जळांत । व्यास नित्य तर्पण करित होता ॥४६॥त्यांच्या ओंजळींत तैं येत । सूक्ष्मरूप धरून शेष साक्षात । त्यास पाहून झाला विस्मित । सोडून देई भये त्यासी ॥४७॥तेव्हां जळांतून तो वदत । आंगठया एवढा शेष तयाप्रत । महा उग्र जलचर मजप्रत । पीडतील हे व्यासप्रभो ॥४८॥रक्षी तू महाभागा मजसी । शरण आलों मी तुजसी । व्यास विचारी तयासी । कोण तूं आलास ओजळींत ॥४९॥तूं नाग असोनी नरासम बोलसी । मी न जाणतों तुजसी । तें ऐकून सांगे तयासी । पतंजली हेतुगर्भ वाक्यांनी ॥५०॥जरी चिंतन संत्यक्त । मुनिशार्दूला सांप्रत । मायाप्रभावें विचारिसी मजप्रत । कोण मीं हा प्रश्न ऐसा ॥५१॥मायेनें सर्पजातींत असून । करीतसे नरासम वचन । त्यांत दुर्लभ कांहीं नसून । कां न जाणसी स्वप्रभावें ॥५२॥त्याचें तें वचन ऐकून । व्यासमुनि करी अभिवादन । म्हणे स्वरूप आपुलें दाखवून । कृपा करी मजवरी ॥५३॥तेव्हां घेऊन नराकृति । स्वयं ब्राह्मणरूपें पुढती । शेष त्या महामुनीप्रती । पतंजलि रूपें बोलतसे ॥५४॥महाभागा तुझ्या ओंजळींत । तुझ्या हितास्तव पडलों असत । मज पतंजली ऐसें जाण निश्चित । धराधर शेषावतार मीं ॥५५॥गणेशानें मज प्रेरिलें । भ्रांतिनाशार्थ पाठविलें । तरी सहसा तूं जाणिलें । पहिले माझें यथार्थ रूप ॥५६॥हें जाणून अति हर्षित । व्यास प्रणाम करी विनत । म्हणे चिंतन कैसें सोडावें जगांत । चित्तधारी असे त्यानें ॥५७॥नानाभाव हें पाहत । तें त्या त्या सदृश होत । नागेंद्रवंद्या तूं मजप्रत । चित्तस्वरूप वर्णन करी ॥५८॥तेव्हां योगशास्त्र अति अद्भुत । स्वयं त्यांस सांगत । जैसें विघ्नेश्वरें दाखविलें तयाप्रत । तैसेंची तैं पतंजली ॥५९॥तदनंतर विप्रेश अंतर्हित । योगी शेष सर्वार्थद जगांत । व्यास प्रजानाथा खेदयुक्त । जाहला क्षणैक विचारमग्न ॥६०॥शेषमुखांतून ऐकलें । योगशास्त्र त्यानें भलें । तदनुसार चित्त जिंकलें । योगीवंद्य स्वयं झाला ॥६१॥पंचधा चित्तभूमिस्थ त्यागित । त्याचें चिंतन स्वयं क्षणांत । चिंतामणिरूप आधार लाभत । मुनिसत्तमा त्यायोगे ॥६२॥त्या पतंजलिशास्त्राचें भाष्य लिहीत । गूढ अथै स्पष्ट करित । लोकांच्या हितास्तव यत्न करित । दक्ष प्रजापते प्रेमानें ॥६३॥हें शेषाचें महिमान । कथिलें तुज पावन । योगशांतिप्रद कथानक शोभन । सांप्रत ऐक दक्षा तूं ॥६४॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते शेषाख्यानवर्णनं नामाष्टादशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP