खंड ५ - अध्याय ३१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । दक्ष विचारी मुद्‍गलांप्रत । तुलसी वर्ज्य गणेशपूजेंत । ऐसें सांगितलें मजप्रत । पावनी ती कां दोषयुक्त ॥१॥
तुलसीने काय अप्रिय केलें । ज्यानें गणेश तिजवरी कोपले । त्या यशस्विनीस टाकिलें । तें सर्व सांगा मजप्रत ॥२॥
धर्मध्वज नाम एक महिपाल । दाता मान्य अत्यंत विमल । त्याची सुता रूपसुंदरी निर्मल । तिच्यासम अन्य लावण्यवती नसे ॥३॥
वृन्दा नामें ती ख्यात । एकदा ती पित्यास वंदित । नंतर सांगे मनोगत । धीर गंभीर वाणीनें ॥४॥
वृंदा म्हणे धर्मध्वजाप्रत । ताता मीं विष्णूस वांछित । अन्य कोणास न वरीन निश्चित । विवाहीं त्यासच द्यावें मज ॥५॥
धर्मध्वज म्हणे सुतेप्रत । विष्णू भगवान देव साक्षात । विश्वभावन तो लक्षीपति ख्यात । कैसा लाभेल तुज पति ॥६॥
दैवी वराचा ध्यास सोडून । मानवी वर पाही शोधून । आपण मानव आहोंत म्हणून । मानवी वर तूं सुचवावा ॥७॥
तो नारायण भगवन्त । आपण मानव जन्ममृत्युयुक्त । ऐसें नानाविध प्रकारें सांगत । परी तिनें तें न मानिलें ॥८॥
वृंदेनें मंत्रराजाची दीक्षा घेतली । विष्णुवनांत ती गेली । तेथ जप करूं लागली । ध्यान करी चतुर्भुज विष्णूचें ॥९॥
निराहार तपपरायण राहत । उग्र तप ती आचरित । विष्णु मिळावा पति हें ईप्सित । पूर्ण व्हावें म्हणोनी ॥१०॥
तीर्थ क्षेत्रांत माधवा पाहत । वैष्णव क्षेत्रास जात । उग्र तप वृंदा आचरित । नाना मार्ग परायणा ॥११॥
कधीं वाळलेली पानें फळें खात । कधी केवळ पाणी पिऊन राहत । कधीं मूलाहारवरती राहत । कधी राही वायुभक्षणें ॥१२॥
विष्णु देववरा तोषविण्यास । एक लक्ष वर्षें करी सायास । परी जनार्दनाच्या । चित्तास । पाझर न फुटल अल्पही ॥१३॥
परी राजपुत्री वृंदा आचरित । जें उग्र तप एकचित्त । त्याचा प्रभाव होऊन लाभत । अंतर्ज्ञान तिजलागीं ॥१४॥
आत्माकार ती सर्व जग पाहत । आत्मबोध होऊन तृप्त । एकदा वृंदा विघ्नेश्वरासी पाहत । नियमांत मग्न जो होता ॥१५॥
त्या गजमुखास पाहून विस्मित । शिवपुत्र जो अद्‍भुत । भागीरथीतीरीं ध्यानस्थित । गणनाथ तेव्हां आत्मानंदें ॥१६॥
वृंदा गणेशास पाहत । तत्क्षणीं झाली मोहित । ह्रदयांत विचारी हा साक्षात । ब्रह्मांचा नायक सुप्रसिद्ध ॥१७॥
हयाच्या कलांशानें उत्पन्न । शिव विष्णू आदि देव प्रसन्न । पूर्ण भावात्मक हा देव महान । गणेश यांत कांहीं संशय नसे ॥१८॥
शिवानें उग्र तप करून । आराधिला गणेश गजानन । भक्तभक्तिप्रद तैं प्रसन्न । जाहला पुत्र तयाचा ॥१९॥
योगशांतिस्थ तो खेळत । आपणास चतुर्धा विभागूनि अन्य भावांत । हाच विष्णु शंभु शक्ति सूर्य असत । यांत संशय कांहीं नसे ॥२०॥
याचा पूर्णभाव न जाणून । विष्णुस वांछिलें हें अज्ञान । आतां यास प्रत्यक्ष पाहून । ज्ञान मजला जाहलें ॥२१॥
तपाच्या प्रभावानें वरीन । या गणनायकास मी तन्मन । व्यभिचार हा न होईल कारण । विष्णुरूपही हाच असे ॥२२॥
ऐसा विचार करुन । वृंदा विघ्नेश्वरा समीप जाऊन । पहात राहिली त्याचें वदन । ध्यानमग्न जो तेथ होता ॥२३॥
त्याचा ध्यानभंग करण्या उद्युक्त । वृंदा म्हणे तयाप्रत । तूं साक्षात्‍ गणराज माझ्या पुढयांत । तप करून आराधिलें तुला ॥२४॥
शिवपुत्रत्व स्वीकारून । कोणाचें तूं करिसी ध्यान । शिवविष्णु आदि देव महान । निरंतर तुलाच भजती जगीं ॥२५॥
तूं सर्वांचें कुलदैवत । सर्वसिद्धिप्रदाता विश्वांत । गणेश्वरा स्थापन करित । गणेश्वराचें तूं ध्यान करिशी ॥२६॥
अहो मी आश्चर्य पहात । गणेश शिवपुत्र होऊन भजत । आपुल्याच प्रतिमेस एकचित्त । गणनायका हें कसें ? ॥२७॥
स्वामी तूं शिवसुत नसत । न तुझा विघ्नेश्वर कुलदैवत । तथापि गणपासी तूं ध्यात । कोणत्या कारणें मज सांगा ॥२८॥
तुझ्या स्मरणमात्रें जगतीं । देव मुनि नर ब्रह्मत्व लाभती । योगी वेदादी ब्रह्मरूप होती । स्वयं शांतिप्रदाता तूं ॥२९॥
गणेश्वराचें कां ध्यान करिसी । देवा सांग हें रहस्य मजसी । सगुण निर्गुणा या वृंदेसी । कृपापात्र तूं मानावें ॥३०॥
कामबाणें व्याकुळ होऊन । वृंदा बोले बहुविध वचन । परी विघ्नेशाचें ध्यान । तैसेच चाललें एकनिष्ठ ॥३१॥
तो जराही न ये जागृतींत । वृंदा तेव्हां कामसंतप्त । पाणी शिंपडून अंगावर करित । प्रयत्न घ्यानभंगाचा ॥३२॥
तथापि ध्यानमग्न गजानन । उघडीना आपुले लोचन । तेव्हां मोहवश होऊन । अंगुलीनें त्यास चाळवी ती ॥३३॥
ऐसें बहुत समय ती करित । तेव्हां गणेशाचें ध्यान भंगत । ध्यान सोडून तिज पाहत । समोर उभी जी होती ॥३४॥
गणेशाय नमः हा मंत्र जपून । त्या कामार्तेसी बोले वचन । गणाधीश तो निष्काम । स्वयं गणपाच्या ध्यानीं रत ॥३५॥
श्रीमहागणपति तिज विचारित । कोण तूं ते सांग मजप्रत । चापल्य तुझें अपूर्व असत । ध्यानभंग सज्जन न करिती ॥३६॥
जो गणेशउपासनेंत एकचित्त । त्याची एकाग्रता जो भंग करित । प्रश्न विचारी वा चाळवी दुष्टचित्त । तो नराधम नरकांत जाई ॥३७॥
माझ्या ध्यानभंगाचा दोष तुजप्रत । बाळे सुलक्षणे न लागो सांप्रत । ऐसें चापल्य करूं नको द्विरुक्त । तू येथें कां आलीस ? ॥३८॥
तू काममोहित मी कामरहित । जाई जेथ तुज इष्ट वाटत । माझ्या तपश्चर्या विधानांत । भंग आणूं नको पुनः ॥३९॥
वृंदा तेव्हां त्यास सांगत । मी धर्मध्वजाची सुता प्रख्यात । नाना तपांच्या प्रभावयुक्त । स्वामी माझा वर होई ॥४०॥
सर्वनायका माझा भर्ता । होई तूं मम सुखकर्ता । सर्वांत तूं विशेष भर्ता । तथापि मजला स्वीकारी ॥४१॥
मी तुझें करित भजन । तूंच व्हावा पति गजानन । तिचें तें ऐकून वचन । हंसून म्हणे गणनायक ॥४२॥
कामबाणांनी ताडितेस । बोले विघ्नेश्वर तियेस । मी मोहयुत होऊन स्त्रियेस । शांतिहून अन्येस भुलणे न संभवे ॥४३॥
तरी तुझ्या तपास तुल्यबळ । ऐसा इष्ट वर सबल । सकाम जो असेल व्याकुळ । त्यास वरी तूं निश्चित ॥४४॥
मी गणेश्वराचा दास । रात्रंदिन भजत तयास । त्याच्या ऐकूनिया या बोलांस । पुनरपि वृन्दा म्हणतसे ॥४५॥
दयानिधे मी शांति युक्त । स्वीकारी मजला त्वरित । तें ऐकता तिज गणेश निन्दित । निर्लज्जे वारांगने जाय येथूनी ॥४६॥
तथापि वृंदा न ऐकली । गणेशासन्निध जाती झाली । सुविह्वल होऊन मिठी मारिली । गणेशासी अचानक ॥४७॥
गणनाथाचें धोतर ओढित । नग्न त्यास करण्या उद्युक्त । तेव्हां क्रुद्ध होऊन शापित । गणेशप्रभू वृंदेला ॥४८॥
दुर्बुद्धि तूं दैत्यग्रस्त । होशील निःसंशय जगांत । असुरस्त्रीसम बळेंचि मजप्रत । आलिंगन तूं दिलेस ॥४९॥
मूढ होऊन मज जवळ ओढून । करू पाहिलेंस तूं नग्न । म्हणून वृक्ष होऊन । मूढ योनीत पडशील ॥५०॥
गणेशाचा दारुण शाप ऐकत । तैं वृंदा भयग्रस्त । त्यास सोडून थरथर कापत । रडत रडत प्रणाम करी ॥५१॥
म्हणे गणाधीशा क्षमा करी । मी पापिणी दुराचारी । तुज न मी योग्य नवरी । डाव्या अंगाचीही न मला सर ॥५२॥
तिज रडतांना पाहत । थरथरा ती कापत । तेव्हां होऊन दयायुक्त । तिजसी म्हणे गजानन ॥५३॥
तिची तपश्चर्या मनीं आणून । दक्षा प्रजानाथा म्हणे करूणवचन । देवी तूं जाई येथून । दुःख तुजला न होईल ॥५४॥
असुर तुजलवनांत । भेटेल त्यावरी होशील आसक्त । तेव्हां शंखचूड स्वरूप विष्णु अवचित । फसवून तुज उपभोगील ॥५५॥
त्यायोगें दैत्य शंभुहस्तें । सत्वर मरेल पतिव्रते । तें जाणून आपुल्या देहातें । त्यागशील तूं अग्नींत ॥५६॥
पुनरपि वृक्षरूप होशील । महाविष्णूस तैं शाप देशील । त्यायोगें तो होईल । शाळिग्राम शिळारूप ॥५७॥
त्याच्यासंगे तूं निरंतर । तेव्हां रममाण होशील । विष्णु तुझा पति सुखकर । होईल भावी काळांत ॥५८॥
माझ्या कृपेनें सर्वमान्य । देवि होशील तूं धन्य । देवांसी पत्रपुष्पें मान्य । होतील तुझी सर्वदा ॥५९॥
तुझ्या काष्ठांच्या माळा । पवित्र जन घालतील गळां । अन्य काष्ठासम साधारण तुजला । त्रैलोक्यांत न कोणी मानील ॥६०॥
हे भामिनी तूं करू नको चिंता । देवांसी तूं प्रिय तत्त्वतां । विष्णूची विशेषें कान्ता । मानव तुजला पुजतील ॥६१॥
परी मजला वर्ज्य होशील । यांत संशय अल्पही नसेल । आतां स्वच्छंदें तूं जा विमल । चिंता सारी सोडून ॥६२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते तुलसीवर्जनकारणं नामैकत्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP