|
वि. १ चांगला ; शाबूत ; अव्यंग ; अखंड ; दोषरहित ; मोडतोड , फुटतूट न झालेला ; कामास उपयोगी असे . कां चिखली रुतली गाये । धड भाकड न पाहे । - ज्ञा १६ . १४२ . अन्योन्य व्द्यंगुलही राहो देती न धड कलेवर ते । - मोद्रोण ३ . ३२ . म्हणे एकही धड नाही त्यांत । दूषणे बहुत दीसती । - ह ३३ . १९३ . २ श्रीमंत ; गबर ; धनसंपन्न . ३ शुद्ध बुद्धीचा ; शहाणा . धडचि पिसे करावे । पिसेचि उमजवावे । - दा ९ . ८ . १५ . [ सं . दृढ ; प्रा . दढ ] ( वाप्र . ) न. १ शिरावेगळे शरीर ; कबंध . घाए हाणौनि धड तुटे । या परिमळाचे । - शिशु ८४२ . देवा ! जयद्रथाचे सांपडले परि नसेचि धड धड ते । - मोस्त्री ५ . १७ . २ गळ्यापासून खालचा शरीराचा भाग . [ हिं . धड ] धडांत टाकणे - घालणे - उतरणे - गिळणे - ( पैसा , लांब इ० ) गिळंकृत करणे . घशाखाली लोटणे . म्ह ० ( व ) धड देवळांत चित्त खेटरांत . न. निरोगीपणा ; प्रकृतीचे स्वास्थ ; आराम . स्त्री. १ ( पदार्थ इ० कांची डावी , उजवी इ० शब्दांनी निर्देशण्यासारखी ) बाजू ; तोंड . २ ( जोते इ० उंचवट्याची ) कड ; कांठ , किनारी . क्रि.वि. स्पष्टपणे ; रोखठोक ; निश्चितपणे ( सांगणे , बोलणे ); स्पष्ट ऐकू जाईल असे ( वाचणे इ० ); चोखपणाने ; सचोटीने ; निर्भीडपणे ( वागणे ; चालणे ); पुरतेपणी ; जसे पाहिजे तसे ; पूर्णपणे ( सामान्यतः अकरणरुपांत य़ोजितात ). गोपहि पडले शवसे , कोणाच्या मनि न धीर धड लेश वसे । - मोकृष्ण १६ . २४ . हा मला धड सांगत नाही , तुम्ही विचारुन घ्या . हा धड लिहित नाही आणि धड पढतहि नाही . हा पुरुष धड मूर्ख नव्हे धड शहाणा नव्हे . क्रि.वि. १ आकस्मित व मोठा धड असा आवाज होईल अशा प्रकारे ; धपकन . ( क्रि० पडणे इ० ). माडीवरुन पोर धड्कन खाली पडले . २ आग , विस्तव एकदम , भडकन पेटतांना होणार्या आवाजाप्रमाणे आवाज होऊन . ( क्रि० पेटणे ; उडणे ). [ ध्व . ] ०मुंडांकित वि. धडे व डोकी यांनी युक्त . धडमुंडांकित धरणी । अर्धक्षणी करतील । - एरुस्व ८ . ५७ . [ धड + सं . मुंड = डोके + सं . अंकित = युक्त ] ०गांडीने क्रिवि . सुरक्षितपणे ; जिवानिशी ; अब्रूदारपणाने , सहीसलामत ; इजा ; नुकसान न होतां . धडाचा गोडाचा वि . १ अगदीच सामान्य प्रतीचा ; भिकार ; निरुपयोगी ; टाकाऊ ; खैराती . २ संदिग्ध ; मोघम ; अनिश्चित . धडांत ना भाकडांत चांगल्या कोटीतीलहि नाही व त्याज्य कोटींतीलहि नाही असा . ( यावरुन ) एखादी गोष्ट , काम , कला , विद्या इ० पूर्णपणे केल्यासच तिचा उपयोग , अनेक अर्धवट केलेल्या गोष्टींचा उपयोग होत नाही असा अर्थ . म्ह ० १ एक ना धड भाराभर चिंध्या = नेसायला एखादे धडच वस्त्र लागते , चिंध्यांच्या भार्याचा नेसायला उपयोग होत नाही . २ धडच कांट्यांवर - कुपणावर घालू नये = चांगल्याची खराबी नाश करुं नये . मुलाला चिखलांत घालून तुडविलांत , धड नेऊन कुंपणावर घातलेत . - नामना १२ . सामाशब्द - ०इकडे तिकडे - क्रिवि . ( कर ) मध्येच लोंबकळत ; भिजत घोंगड्याप्रमाणे ; त्रिशंकूप्रमाणे ; पूर्णपणे कोण त्याच बाजूस नसलेल्या स्थितित . ना तिकडे - क्रिवि . ( कर ) मध्येच लोंबकळत ; भिजत घोंगड्याप्रमाणे ; त्रिशंकूप्रमाणे ; पूर्णपणे कोण त्याच बाजूस नसलेल्या स्थितित . ०गत गति स्त्री . आशाजनक स्थिति , दशा ( अकारण रुपांत प्रयोग ). हा पोर एव्हांपासून भांडू लागला , याची कांही धडगत दिसत नाही . ह्या रोग्याची धडगत दिसत नाही . आपली धडगत लागावयाची नाही . - टि ४ . २३१ . [ धड + गति ] ०धाकट ड वि . १ मोडतोड , फूटतूट , चिरफाड इ० न झालेले ; शाबूद ; अव्यंग ( भांडे , वस्त्र इ० ). २ निकोप , निरोगी प्रकृतीचा ; धट्टाकट्टा ( मनुष्य ). [ धड ] ०धोपधोपट वि. १ धड ; शाबूत ; सुस्थितीत असलेला ; भक्कम ; भरीव ; ऐवजदार ; ठसठसीत ( दागिना , वस्त्र , भांडे , कपडा इ० ) २ ( ल ) धट्टाकट्टा ; सशक्त व निकोप प्रकृतीचा . [ धड ] ०बरे भले न . ( विवाहित मुलगी , व्यवहार इ० कांचे ) स्थिरस्थावर होणे ; सुस्थितीत असणे ; सुरळीतपणे चालणे . [ धड + बरे , भले = चांगले ] ०भले न. १ धडबरे पहा . २ ठीक चिन्ह ; आशाजनक स्थिति ; धडगत . त्या रोग्याचे धडभले दिसत नाही . ०वांकडा वि. स्पष्टास्पष्ट . [ धड + वांकडा ] ०सोबती पु. शेवटपर्यंत टिकणारा मित्र ; अखंड मैत्री बाळगणारा सोबती . तेहि आमचे धड सोबती आहेत . - पेद ३ . १८ . धडाधांगडा वि . जाडाभरडा व टिकाऊ ; दणगट ( कापड , वस्त्र इ० ). [ धड + धोंगडा = जाडेभरडे वस्त्र , कपडा ]
|