श्रोत्यांशी सलगीचें बोलणें
तुमच्या लळेयाचे लळिवाडें । निःशब्दवादें बोलीगडें । केलें तें तुह्मापुढें । पढिन्नलो स्वामी ॥६२॥
बाळक बोले बोबडें । तेणें मातेसी प्रीती वाढे । तेवीं येहि बोली वाडे कोडे । रिझाल तुह्मी ॥६३॥
संती अवधान द्यावें । सज्जनीं सन्मुख व्हावें । ग्रंथू केला येणें भावें । भावार्थेसी ॥६४॥
हा ग्रंथू येणें भावें जे संतीं सदा संतोषावें । संतोषोनिया ह्नणावें । आपुलें मज ॥६५॥
समथ ज्याकडे पाहे । त्याचें दरिद्र विच्छिन्न होये । तेवी संतकृपा जे होये । ते सनाथ जी मी ॥६६॥
या ग्रंथाची उपयुक्तता
जे सिद्धांचे सिद्धस्थान । जें साधकाचें साधन । ये ग्रंथींचे संरक्षण । ऐसेंचि आहे ॥६७॥
यालागीं सिद्धां आणि साधकां । ये ग्रंथीं लाभे अवांका । हा दोहीचिया निजसुखा । सुखसंतोष ॥६८॥
ह्नणोनी मुक्त आणि मुमुक्षा । अहा अर्थ लाभे निजापेक्षां । साध्यसाधनलक्षा । साधिकारें दावी ॥६९॥
जैसे आपुलिया भावना । भजन पाववी त्या त्या स्थाना । तैसा हा ग्रंथ जाणा । स्वधिकारें निववी ॥४७०॥
हो कां आपुलेनि संकल्पवशें । देवदेवित्वें वस्तु भासे । तेवीं ग्रंथू हा अधिकारवशें । फळोनि दावी ॥७१॥
ग्रंथाची अमृतोपम गोडी व त्याचें महिमान
ये ग्रंथीचें निरुपण । वरिवरि पहातां कठिण । परी अभ्यंतरी गोडी जाण । अमृता ऐसी ॥७२॥
परी हेही उपमा थोडी । अमृतपानें अमर कोडी । मरणार्णवीं बुडी । देऊनि मरती ॥७३॥
तैसें नव्हे हें अमृत । जीवेंवीण जीववित । शिवेंवीण सामर्थ्य । समर्थून दावी ॥७४॥
हें पानेंवीण अमृतपान । कीं विदेहा तृप्तीचें भोजन । संतभ्रमराचें निजसुमन । सदा आमोद बहळ ॥७५॥
हा निर्गुणाचा शृंगारु । देहातीताचा अळंकारु । हा अवेवावीण सनागरु । स्वरुप तें हें ॥७६॥
हें डोळेवीण देखतें । श्रोत्रेवीण ऐकतें । रसनेंवीण चाखतें । स्वादासि हें ॥७७॥
हें चरणेंवीण चालतें । वदनेंवीण बोलतें । क्रियेवीण कर्ते । अकर्तेपणें ॥७८॥
हें अमृतातें जीववितें । कीं कल्पतरु याचें मागेतें । चिंतामणीचे पुरविते । मनोरथ हें ॥७९॥
हें परिसाची काळिमा फेडी । दशेचें दैन्य दवडी । लक्ष्मीची अवकळा काढी । करी कळायुक्त ॥४८०॥
हें श्रुतीतें पढवितें । सकळशास्त्रां बुद्धिदातें । कीं नानामतें बुझावितें । स्वरुप तें हें ॥८१॥
हें देवाचें देवार्चन । हें जीवाचें जीवस्थान । सकळ साध्याचें साधन । हेंचि एक ॥८२॥
हें अव्ययाचें आयुष्य । हें अद्वयाचें रहस्य । हें सामरस्याचें सामरस्य । सहजान्वयें ॥८३॥
हें अजन्माचें जन्मपत्र । हें क्षेत्रविहीनाचें सुक्षेत्र । हें अनादीचें आदिसूत्र । अभंगत्वें ॥८४॥
दया येणें दयालुत्व । कृपा येणें कृपालुत्व । साम्यासि सत्यत्व । येणें एकें ॥८५॥
येणें प्रकाशें प्रकाश भासे । येणें देखणें नित्यत्व दिसे । येणें सुखें सुख उल्हासे । उचंबळत ॥८६॥
येणें नाठवे देह गेह । येणें तुटती संदेह । हे देही देह विदेह । याचेनि होये ॥८७॥
हे निजांगाची गोडी । गुरुकृपा उपलब्धी फुडी । तेथ नीच नवी गोडी । होय तें कळे ॥८८॥
हो कां वत्साचे मनीं । आवडी जैशी स्तनपानीं । कां दुकळलें भोजनीं । सादर जैसें ॥८९॥
नातरी निराळीच्या पाउसा । झेलूं जाने चातक जैसा । गुरुवचनालागीं तैसा । स्वानंदें सादरु ॥४९०॥
नवघनगर्जनेसरिसा । उल्हास न धरवे मयूरा जैसा । परमार्थालागी तैसा । उत्सावो असे ॥९१॥
धनदायें बद्धक । कां कामलाभें कामिक । तैसा नित्य नवा हरिख । सदगुरुभजनीं ॥९२॥
सदगुरुभजनी साधकाला हा ग्रंथ म्हणजे पुरुषोत्तमाचे साक्षात् निजधामच आहे
ऐसें गुरुचरणी ज्याचें प्रेम । तेणेंचि केले सकळ नेम । परमार्थाचें वर्म । फावले त्यासी ॥९३॥
त्यासीच योग आकळे । त्यासीच तत्त्व कळे । सकळ साधनांची फळें । त्यासीच फळतीं ॥९४॥
यापरी जो साधक । गुरुवचनचातक । त्यासी हा ग्रंथ विवेक । सफळित फळे ॥९५॥
नवल या फळाचें निज । वरी त्वचा ना आंत बीज । नुसतिया रसाचेंचि रसफुंज । फळरुपें फळलें ॥९६॥
तें हें कवित्व मुद्रेची फळें । चिन्मात्रैक निर्मळें । घमघमिताति परिमळें । स्वानंदबोधें ॥९७॥
दुरुनि येतांचि वास । धांवती विवेकराजहंस । मुमुक्षु सारंगाचे बहुवस । रुंजी करिती समुदाये ॥९८॥
तेथ शुकादि संतृप्त झाले । सुभाषित बोलती ते बोलें । तेहि वचनी संतोषले । श्रीमंत साधू ॥९९॥
शुकमुखींचीं गळित फळें । प्राप्ती प्राप्त भावबळें । ते गोडियेची रसाळें । अक्षरें लिहिलीं ॥५००॥
अक्षरीं अक्षर अक्षरांतर । अक्षरी अक्षर अपरांपर । अक्षरीं अक्षर निर्धार । धरिता हा ग्रंथ ॥१॥
स्वात्मसुख ग्रंथाक्षर । तें क्षराक्षरातीत पर । पुरुषोत्तमाचें साचार । निजधाम हें ॥२॥
मूळ डाळ शखा प्रवाळ । वन उद्यान द्रुम सकळ । अवघी वाढी एकचि फळ । सुखरुपें स्वादिष्ट ॥३॥
हे जीवा आंतुली गोडी । अनिर्वाच्य चोखडी । ते लाविली कवित्व वाढी । वाचेच्या आळां ॥४॥
तेथ जनार्दन कृपाधन । वर्षताहे जीवन । तेणें एकाकी कविता वन । सफळित सदा ॥५॥