स्वात्मसुख - आरंभ

’ स्वात्मसुख ’ या काव्यात, गुरूविषयी भाव असला म्हणजे गुरूची अनन्यभक्ति होते व नंतर केवळ निष्कलंक भावानेंच स्वात्मसुखाची प्राप्ति होते असे प्रतिपादन केले आहे.


श्रीगणेशाय नमः

। श्रीकृष्णपरमात्मने नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।

ॐ नमोजी सच्चिदानंदा । जय जय जगदादि आनंदकंदा । निजागें अभयवरदा । श्रीगुरुराया ॥१॥

जयाचेनि अवलोकनें । हारपे एका एकपणें । केले सर्वांगचि देखणें । अनंगें देवें ॥२॥

एकपणीं अनेक । अनेकीं दावी एक । नकळे कैसे कवतुक । दुजेनविण ॥३॥

जेथें दुजेंचि नाहीं । तेथे स्तुतिस्तव्य तें काई । शब्दासीचि ठाव नाहीं । मा स्तवन तें काइसें ॥४॥

पहातां रुपाचा दुकाळ । नामाचा विटाळ । तेथें स्तवनाचा गोंधळ । रिघेल कोठें ॥५॥

तेथें एकपणेंवीण एका । जो कां जनार्दन निजसखा । स्तवावया देखा । निःशंक ऐसा ॥६॥

जैसें वेदें आपुलें आपण । सामर्थ्य कींजे निरुपण । ते स्तवनी दुजेपण । लागेल कैचें ॥७॥

नातरी शब्दाची पदवी । शब्देंचि लागे बोलावी । कां जीवाची एकोपजीवीं । जीवचि जाण ॥८॥

आतां गुरुशिष्य दोन्ही । आणोनि एकपणीं । रिघालों जी स्तवनीं । स्तवावया ॥९॥

तरी देऊनी आपुली पुष्टी । मज सामाविलें आपुला पोटीं । याहीवरी कृपादृष्टी । याचिलागीं करी ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP