कथाकल्पतरू - स्तबक ७ - अध्याय १६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

जन्मेजय ह्नणे हो वेदमूर्ती ॥ कांही येक आठवलें चित्तीं ॥ तरी सोमवंशीं उत्पती ॥ कांसकरांची केवीं ॥१॥

ते धर्मपाळापासोनि जाहले ॥ तयांसि पांचाळ ह्नणिजे भलें ॥ हें आदिअवसान असे कळलें ॥ तृतीयस्तबकीं ॥२॥

तरी जे शुद्ध कांसकार ॥ यांचा कवणे ठायीं विस्तार ॥ तें सांगावें सविस्तर ॥ कृपा करोनि ॥३॥

यानंतरें ह्नणे ऋषीश्वर ॥ बरवा पुसिला गा विचार ॥ तरी आतां उत्पत्तिविस्तार ॥ सांगों तुज ॥४॥

आरंभी चारी वर्ण जाहले ॥ ते या भूमंडळासि आले ॥ मग परस्परें विस्तारले ॥ संकरजाती ॥५॥

माजी वैश्यकन्येचे कुशीं ॥ ब्रह्मबीजाचे समरसीं ॥ कन्या जाहली ह्नाणिजे तयेसी ॥ अंबष्टा ऐसें ॥६॥

मग त्या अंबष्टेचे उदरीं ॥ ब्रह्मबीजें जन्मला अवधारीं ॥ तोचि बोलिजे निर्धारीं ॥ कांसकर नामें ॥७॥

तंव रावो ह्नणे हो मुनी ॥ हें अपूर्व ऐकिलें श्रवणीं ॥ तरी संकरजातीची उभवणी ॥ सांगा मज ॥८॥

जातिसंकर कैसे जाहले ॥ आणि ते कोणीं उपदेशिले ॥ तें पाहिजे सांगीतलें ॥ कृपा करोनी ॥९॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ बरवा पुसिला गा प्रश्न ॥ कीं जेणें सुखिया होय मन ॥ श्रोतयाचें ॥१०॥

तरी विरंची जो चतुरानन ॥ तो अपरब्रह्मा पासोनि उत्पन्न ॥ मग सकळही त्यापासून ॥ विस्तार जाहला ॥११॥

असो कोणे येके दिनीं ॥ ब्रह्मा होता निजासनीं ॥ तंव तयानें देखिले नयनीं ॥ चारी वर्ण ॥१२॥

मुखापासोनि ब्राह्मण जाहले ॥ बाहूपासोनि क्षेत्री उद्भवले ॥ ऊरुपासाव वैश्य जाहले ॥ चरणीं शूद्र ॥१३॥

ऐसी उत्पत्ति चहूंवणी ॥ मग ते धाडिले मृत्युभुवना ॥ परि आणिक उपजली चतुरानना ॥ श्रद्धा उत्पत्तीची ॥१४॥

ह्नणोनि विश्वकर्मा विंदाणी ॥ तया चतुर्मुख सांगे वचनीं ॥ कीं त्वां मृत्युभुवना जावोनी ॥ करावी रचना ॥१५॥

वृक्षरानें गिरि ग्रामें ॥ देवस्थानें तीर्थे उत्तमें ॥ गगनीं तारा अनुक्रमें ॥ स्थापीं वहिल्या ॥१६॥

आणि हे चारीवर्ण जाणा ॥ गेले असती मृत्युभुवना ॥ त्यांची सर्व करावी रचना ॥ जातिसंकरें पैं ॥१७॥

तयांचा करावा आश्रमनेम ॥ जातिमार्ग अनुक्रम ॥ मग स्थापूनि गृहाश्रम ॥ यावें तुवं ॥१८॥

हें कार्य तुजयोग्य जाण ॥ तुजऐसा कोणी नाहीं प्रवीण ॥ ऐसी तयाची स्तुति करुन ॥ दीधला वर ॥१९॥

तये वरदानाचे बळें ॥ शीघ्र आला महीतळे ॥ मग तयानें बोलाविले ॥ चारी वर्ण ॥२०॥

तंव ते वर्ण पावले शीघ्र ॥ कुमरी आणि कुमर समग्र ॥ तें विश्वकर्मा देखोनि चरित्र ॥ विस्मित जाहला ॥२१॥

ह्नणे विधीची नवल करणी ॥ कैसी हे विस्तारिली मेदिनी ॥ जेवीं पट ततुंगुणीं ॥ विस्तारलासे ॥२२॥

अथवा रवीचिये किरणीं ॥ सकळ व्यापिली मेदिनी ॥ तैसें चहूंवर्णापासुनी ॥ विस्तारलें जग ॥२३॥

मग निवडिले अनुलोम ॥ आणि वेगळे केले प्रतिलोम ॥ उपरी संकरमिश्रित धर्म ॥ विचारिले निजबळें ॥२४॥

अनुलोमाचे सहाजण ॥ तैसेचि प्रतिलोमाचे जाण ॥ आणि कमळ मिश्रित वर्ण ॥ ते मिश्रसंकर ॥२५॥

तंव ह्नणे जन्मेजयो ॥ या दोहों स्तंभांचा कोण भावो ॥ तरी या कथेचा अनुभवो ॥ सांगिजे मज ॥२६॥

मग मुनि ह्नणे आपण ॥ आरसां कां पहावें कंकण ॥ तरी प्रत्यक्ष दिसतें प्रमाण ॥ भारता गा ॥२७॥

आतां अनुलोमाचे सहाजण ॥ माजी ब्रह्मरेतें तीन वर्ण ॥ तरी क्षेत्रिणीसि जाला ब्रह्मनंदन ॥ तो धर्मावेशिक ॥२८॥

तो ह्नणिजे क्षत्रिय मध्यम ॥ तयाचा थोर परक्रम ॥ आणिक जन्मला उत्तम ॥ तो ऐक राया ॥२९॥

वैश्यस्त्रीचे पोटीं जन्मला ॥ तो अंबष्ट ऐसें नाम पावला ॥ स्वर्णविद्ये कुशळ जाहला ॥ आणि चिकित्साज्ञाता ॥३०॥

तोचि ह्नणिजे सोनार ॥ तेणें घडिले अलंकार ॥ आतां क्षत्रियरेताचा विस्तार ॥ पुत्र दोनी ॥३१॥

माजी वैश्यस्त्रियेचे उदरीं ॥ तो माहिष नामें निर्धारी ॥ जो डाकुलता डौलकारी ॥ शकुन जाणे ॥३२॥

क्षत्रियरेताचा दुजा कुमर ॥ जो शूद्रिणीसि जाहला पुत्र ॥ जो उग्र नामें धनुर्धर ॥ रजपुत आणि शस्त्रवृत्तीं ॥३३॥

आतां प्रतिलोमाचे सहामुत्र ॥ त्यांत शूद्ररेताचे तीन कुमर ॥ वैश्यस्त्रीसि तो वणिजकार ॥ वणजारा पैं ॥३५॥

दुजा क्षेत्रिणीचे उदरीं ॥ तो क्षत्ता ह्नणिजे यंत्रधारी ॥ पापर्धिक राजद्वारीं ॥ तिष्ठत असे ॥३६॥

आतां ब्राह्मणीचे उदरीं ॥ शूद्ररेताच्या समसरीं ॥ तो चांडाल गा निर्धारी ॥ स्मशानरक्षक ॥३७॥

चौथा पुत्र वैश्यरेताचा ॥ उदरीं जाहला क्षेत्रिणीच्या ॥ मागध नामें स्तुतिपाठ तयाचा ॥ उदीम बरवा ॥३८॥

पांचवा वैश्याचा अगाध ॥ ब्राह्मणीउदरीं जाहला प्रसिद्ध ॥ तो चतुःषष्टिकेला साध्य ॥ वैदेहक नामें ॥३९॥

साहवा क्षत्रियाचा नंदन ॥ ब्राह्मणीसि जाहला जाण ॥ तो करी गजतुरंगवहन ॥ सूत नामा ॥४०॥

ऐसे हे बाराजण जाहले ॥ आणि चारीवर्ण ते पहिले ॥ या सोळांपासाव सकळें ॥ विस्तारलें जग ॥४१॥

तरी ते कोणापासाव कवण ॥ उपजले सकळही जाण ॥ तें आतां करुं गा श्रवण ॥ श्रोतयांसी ॥४२॥

डाकुलता जो तयाचा कुमरु ॥ चितारिणीसि जाहला सुतारु ॥ आणि कौलकिणीसि करणपुत्रु ॥ तो साळी ह्नाणिजे ॥४३॥

पुढें साळिया पासूनी ॥ क्षेत्रिणीसि जाहला मर्दनी ॥ तो बळिया आणि कुशळ ह्नाणवोनी ॥ करी मर्दना ॥४४॥

आतां त्या मर्दनाचे रेतें ॥ पुत्र जाहला क्षेत्रिणीतें ॥ कोल्हाटी ह्नणती तयातें ॥ पराक्रमी तो ॥४५॥

आतां चितारियाचे कन्येसी ॥ वैश्यरेताचे समरसीं ॥ पुत्र जाहला ह्नणती तयासी ॥ गोवारी नामें ॥४६॥

मर्दिनीसी पुत्र जाहला ॥ जो माळियाचे रेतें जन्मला ॥ तोचि मणियारा बोलिला ॥ सत्य जाण ॥४७॥

असो संकरहीन जो ब्राह्मण ॥ त्याचा पुत्र प्रसवली क्षेत्रीण ॥ तो क्षत्रियविद्ये प्रवीण ॥ राजगुरु तो ॥४८॥

आतां राजगुरुचा बाळ ॥ तो मालविद्या जाणे सकळ ॥ क्षेत्रिणीउदरींचा अळुमाळ ॥ मालविक तो ॥४९॥

सकलकर्मी नाहीं पूर्ण ॥ शिखासूत्र हीन जाण ॥ व्रतबंध नसतां ब्राह्मण ॥ ह्नणिजे पतित ॥५०॥

तरी तयाचेंनि रेत ॥ शूद्रिणीसि जाहलें प्राप्त ॥ तो गुरव नामें अपत्य ॥ जाण राया ॥५१॥

आतां गुरुविणीचा पुत्र ॥ नापिका पासाव परिकर ॥ तो नानापरींचा विस्तार ॥ रंगवी वस्त्रें ॥५२॥

आतां माहिषाची कन्या गोमटी ॥ ते अपत्यें प्रसवली सुटीं ॥ जो ब्रह्मरेतें संभवला पोटीं ॥ तो गौळी येक ॥५३॥

पाथरवटापासाव जाहला ॥ तो कायस्थ पुत्र भला ॥ तिजा नटवियाचें रेतें जन्मला ॥ तो कळावंत पैं ॥५४॥

आतां रजपुताचे कुमर ॥ ते ऐक पां सविस्तर ॥ तीन जातीचें परिकर ॥ जन्मले राया ॥५५॥

तया रजपुतचें रे त ॥ तें नटवीसि जाहलें प्राप्त ॥ तेथें नापिक नामें अपत्य ॥ जादला येक ॥५६॥

आणिक पाथरवटीचे उदरीं ॥ जन्मला तो परोपकारी ॥ मळलीं वस्त्रें शुद्ध करी ॥ रजक नामा ॥५७॥

रणपुताचा पुत्र तिसरा ॥ सोनारणीच्या आला उदरा ॥ मुसळ नाम तथा कुमरा ॥ तो तेली ह्नणिजे ॥५८॥

आतां ब्रह्मरेतेंचा विस्तार ॥ सहाजण जाहले कुमर ॥ ते सांगूं पृथकाकार ॥ भारता तुज गा ॥५९॥

पाथरवटकन्या सुंदर ॥ तिचें ब्रह्मरेतें वाढले उदर ॥ तोचि ह्नणिजे बाबर ॥ निशीयेसी ॥६०॥

आतां ह्नणिजे नामें कोळी ॥ त्याची स्त्री ब्रह्मरेतें प्रसवली ॥ तो शिकारी नावें ओढाळी ॥ उदरपरिपूर्ण ॥६१॥

नटवियाची जे कां कुमरी ॥ कोळी जन्मला तिचे उदरीं ॥ तो ब्रह्मरेताच निर्धारी ॥ जाण राया ॥६२॥

ब्रह्मरेताचे संबंधें ॥ पुत्र जन्मला वणिजारणी मुग्धे ॥ त्यातें ह्नणती नामें शुद्धें ॥ जिनगरु ऐसें ॥६३॥

रजपुताची स्त्री वेल्हाळ ॥ तिये विप्ररेतें जन्मला कुलाल ॥ जो करोनि मृन्मयगोळ ॥ निपजवी पात्रें ॥६४॥

आतां चिकित्सकस्त्री गोमटी ॥ जिये नाम असे अंबष्टी ॥ ते कांसकरातें प्रकटी ॥ विप्ररेतें ॥६५॥

ऐसे हे राया सहाजण ॥ ब्रह्मवीर्ये उपजले नंदन ॥ आतां शूद्ररेताचे नंदन ॥ दोन जाहले ते ऐकें ॥६६॥

कोळिणीसि जाहला टकसाळकर ॥ आणि क्षेत्रिणीसि जाहला पारधीकार ॥ ऐसा शूद्रवीर्याचा विस्तार ॥ पुत्रदोनी ॥६७॥

शूद्रस्त्रियेसी गा जाण ॥ पाथरवटापासोनि रांधवण ॥ तो निपजवी सकल अन्न ॥ षड्रसयुक्त ॥६८॥

शूद्रिणीसि मीनला बणजारा ॥ तेथें उत्पत्ति पालटुकरा ॥ दुजी कोळियास्तब वनचरा ॥ जाणिजे उत्पत्ती ॥६९॥

क्षत्रियाचे वीर्यसमरसीं ॥ तांबट जाहला सोनारणीसी ॥ दुजा जाहल नटवीयेसी ॥ तो लोहार पैं ॥७०॥

आतां पाथरवटापासुनी ॥ पुत्र उपजले रया दोनीं ॥ जो जलमंडपी तयाची जननी ॥ वैद्यस्त्री गा ॥७१॥

पाथरवटाचा पुत्र दुसरा ॥ कोळीण प्रसवली तया कुमरा ॥ तया ह्नणती गा नरेंद्रा ॥ गौड ऐसें ॥७२॥

आतां पाथरवटाचे कांते ॥ आठ जाहलीं गा अपत्यें ॥ कैवर्तकाराचिये रेतें ॥ तो दारवटकारु ॥७३॥

दुजा सोनारापासूनि जाहला ॥ तो भ्रमणकारी असे भला ॥ जासुद बोलती तयाला ॥ सत्य जाण ॥७४॥

तिसरा तो भाट जाण ॥ वणजारेताचा नंदन ॥ आणि चौथा तो रांधवण ॥ साराथियाचा ॥७५॥

पांचवा कोळीरेतें प्रचंड ॥ तो गारुडी जाण गारुड ॥ आणि चांडाळरेताचा बुरुड ॥ पुत्र सहावा ॥७६॥

वैद्यापासूनि जाहला ॥ तो नटभ्रम असे बोलिला ॥ आणि शूद्रापासोनि जन्मला ॥ तो शिंपी ह्नणिजे ॥७७॥

हे आठ पुत्र पाथरवटीसि जाहले ॥ आतां ढीवरस्त्रीसि विस्तारले ॥ तेही तुज सांगों वहिले ॥ पुत्र चारी ॥७८॥

मणिरायाचें रेतें जाहला ॥ तोचि नारा ह्नणती भला ॥ आणि चांडाळरेतें जन्मला ॥ तो खाटिक ह्नणिजे ॥७९॥

आतां तिजा ह्नणिजे कोष्ठी ॥ त्याचें रेत ढीवरीचे पोटीं ॥ तेथे जन्मला तो भामटी ॥ विणी गोणपाट ॥८०॥

गौळियाचें शुक्र साचार ॥ तेथें उपजला तीरकार ॥ ऐसे हे असती चौघे कुमर ॥ ढीवरीचे ॥८१॥

आतां गौळणीचे उदरीं ॥ तिघे पुत्र अवधारीं ॥ पुरुषास्तव पेढरी ॥ पुत्र येक ॥८२॥

टांकसाळकराचे रेतें ॥ दोघे जाहले गौळणीतें ॥ सेगर ह्नणती प्रथमातें ॥ आणि दुसरा निळगुरु ॥८३॥

आतां वणजारिणीचा विस्तार ॥ तिये दोनी जन्मले कुमर ॥ सोनारापासूनि ढीवर ॥ पुत्र येक ॥८४॥

दुजा कायस्थापासुनी ॥ तो ह्नणिजे मर्दनी ॥ हे जाहले वणजारिणी लागुनी ॥ पुत्र दोघे ॥८५॥

आतां क्षेत्रिणीचे उदरीं ॥ वैश्यरेतें जन्मली कुमरी ॥ ते अतिचतुर सुंदरी ॥ कळावंतिण वेश्या ॥८६॥

मग तियेचें उदर वाढलें ॥ तेथें ब्रह्मरेतें बालक जन्मलें ॥ तथासि राया ह्नणितलें ॥ काचंडिया ॥८७॥

मग तो कोणे येके वेळे ॥ कुंभारणीशीं रती खेळें ॥ तंव पुत्र जाहला कुलालबाळे ॥ तो तांबोळी पैं ॥८८॥

विप्रें सन्यास त्यागिला ॥ तो विधवेसवें रतला ॥ तेथें पुत्र जो जन्मला ॥ तो वोडव ह्नणिजे ॥८९॥

राडके ब्राह्मणीचे कुमर ॥ विप्ररेतें जन्मले परिकर ॥ तयांसि ह्नणती अपवित्र ॥ गोळक पैं ॥९०॥

आतां ब्राह्मणीचिये उदरीं ॥ पुत्र जाहले कैशियापरी ॥ तें सांगों सविस्तारीं ॥ भारता तुज ॥९१॥

जीवंत असतां निजपती ॥ परि आणिकांचें रेतें उत्पत्ती ॥ मग तया बाळकासि ह्नणती ॥ कुंड ऐसें ॥९२॥

सकळही कर्मे त्यजूनी ॥ विप्र रातला असे ब्राह्मणी ॥ तो भुनकृदय पासुनी ॥ देवलक ह्नणिजे ॥९३॥

मग तो शेलकाणीसि रमला ॥ तयापासाव पुत्र जाहला ॥ त्यासी धनगर ह्नणती भला ॥ गावडा तोची ॥९४॥

संग करोनि भजकंटक ॥ विप्रस्त्रीचें वाढलें पोट ॥ मग तिये पुत्र जाहला धीट ॥ तो वासुदेव पैं ॥९५॥

वासुदेवस्त्रियेचें उदर ॥ तेथें मल्लरेतें जन्मला कुमर ॥ त्यासी ह्नणती वाळुंजकर ॥ उदीमपणें पैं ॥९६॥

वाळुंजकराचा पुत्र जाहला ॥ ब्राह्मणीचे उदरीं जन्मल ॥ मग ह्नणती तयाला ॥ उष्ट्रराखा ॥९७॥

आतां पुरुष कर्‍हेकर ॥ आणि विप्रस्त्रियेचें उदर ॥ तेथें पुत्र पुल्कसखर ॥ कैकाडिया तो ॥९८॥

मग त्या कैकाडियाचे रेत ॥ द्विजस्त्रियेसि जाहलें प्राप्त ॥ सेलिक नामें जाहलें अपत्य ॥ पुत्र येक ॥९९॥

ऐसे ब्राह्मणास्त्रियेचे जाहले ॥ वंश हे भूमीं विस्तारले ॥ आतां मर्दिनीचे कुशीं जन्मलें ॥ बाळक येक ॥१००॥

तें गा कावडियाचे रेतें ॥ अपत्य जाहलें मर्दिनीकांते ॥ शेजवल ह्नणती तयातें ॥ राजद्वारीचा ॥१॥

तिवासी मुंडे चादरिया ॥ तेणें घालिजे बैसावया ॥ ह्नणोनियां ह्नणती तया ॥ शेजवल कीं फरास ॥ ॥२॥

जासुदस्त्री जासुदीसी ॥ पाहाटगाणाच्या समरसीं ॥ कुमर जाहला तयासी ॥ झारा ह्नणिजे ॥३॥

तेणें कीजे भूमिचाळणें ॥ आणि विप्राची सेवा करणें ॥ ऐसिये रीतीं उदरभरणें ॥ परिपूर्णता ॥४॥

निषादस्त्री कोळिणी ॥ ती पुत्र प्रसवली तीनी ॥ भामटियाच्या रेतापासुनी ॥ काबाडी तो ॥५॥

चांडाळरेताचे दोघेजण ॥ पुत्र प्रसवली काबाडिण ॥ प्रथम बोलिजे डोंब जाण ॥ आणि पांगुळ दूसरा ॥६॥

मोचिणीसि जन्मले तीन पुत्र ॥ वणजाररेताचा डोहार ॥ कोळियापासाव तो चांभार ॥ जाणावा पैं ॥७॥

आणि मोचिणीच्या पुत्रा ॥ भोडवा ह्नणती तया कुमरा ॥ तो कुलालरेताचा तिसरा ॥ जाहला पुत्र ॥८॥

आतां रेत उग्रपुरुषाचें ॥ आणि रक्त अंधस्त्रीचें ॥ त्यास्तव नाम बोलिजे तयाचें ॥ म्लेच्छ ऐसें ॥९॥

आतां चांडाळपुरुषाचे रेतें ॥ दोन जाहलीं गा अपत्यें ॥ तेलीण प्रसवली तयातें ॥ ह्नणिजे महार ॥११०॥

दुसरा पुत्र चांडाळासी ॥ जाहला डोहारणीचे कुशी ॥ मातंग ह्नणती तयासी ॥ सत्य जाण ॥ ॥११॥

पुल्कसखरा पासुनी ॥ पुत्र जाहला चांडाळकामिनी ॥ तो श्वानराखा ह्नणवोनी ॥ तेंचि नाम ॥१२॥

कोळियाचे बीजसमरसीं ॥ गारुडी स्त्रियेचिये कुशी ॥ पुत्र जन्मला तयासी ॥ कैकाडा ह्नणती ॥१३॥

ऐसे हे बहुजातीचे नर ॥ आचरिती स्वधर्म विचार ॥ परि आनमार्गे चालती ते खर ॥ तयां लोक दोषिती ॥१४॥

आतां हे सकळजातीचे नर ॥ अनुलोम प्रतिलोम मिश्र ॥ यांचे मूळमंत्र आचार ॥ कवणकवण ॥१५॥

तरी ते सांगतां सविस्तर ॥ ग्रंथकथा वाढेल अपार ॥ ह्नणोनि शुक्ति सांडोनि सादर ॥ घेइजे मुक्त ॥१६॥

मग आपुलाले आचारें ॥ मृत्युलोकीं असती सारे ॥ बेचाळीसकोटी वसुंधरे ॥ वर्तताती ॥१७॥

परि गा भारता प्रळयाचे अंतीं ॥ सर्वयातींची होय उत्पत्ती ॥ ते अनारिशी वेदश्रुती ॥ बोलिली असे ॥१८॥

हें सत्य मानावें गा श्रोतीं ॥ यातिसंकर आणि उत्पत्ती ॥ ययासि असे संमती ॥ श्रुतिसाक्ष पैं ॥१९॥

मुनि ह्नणे राया भारता ॥ तुवां पुशिली यातिकथा ॥ तरी असे हे अनुमता ॥ यातिविवेकासीं ॥१२०॥

हें जया होय श्रवण ॥ मग त्या न लागे लांछन ॥ आणि भवभयाचें बंधन ॥ न बाधी कदा ॥२१॥

हा जयासि कळला विचार ॥ तो पावेल भवसिंधुपार ॥ ऐहिक आणि परत्र ॥ साधील वहिलें ॥ ॥२२॥

मूळीं असोनि चारीवर्ण ॥ तयांचाचि हा विस्तार पूर्ण ॥ तो कथिला तुजलागुन ॥ भारता गा ॥२३॥

यानंतरें ह्नणे भूपती ॥ चारीआश्रमांची धर्मस्थिती ॥ ते सांगावी मजप्रती ॥ वैशंपायना ॥२४॥

लागतां बालकाचिया लाता ॥ तेणें अधिकचि पान्हावे माता ॥ तैसें मज पुसतां कथा ॥ न मानाल रोष ॥२५॥

ऐसा जाहला प्रश्नप्रसंग ॥ मग मुनी सांगता होय मार्ग ॥ तो जाणिजे पुढील प्रसंग ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥२६॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ सप्तमस्तबक मनोहरु ॥ यातिउत्पत्तिकथनप्रकारु ॥ षोडशोऽध्यायीं कथियेला ॥१२७॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP