श्रीगणेशाय नमः
वैशंपायन महामुनी ॥ तयां राव पुसे विनयवचनीं ॥ कीं अमावास्येचिये दिनीं ॥ चंद्र कोठें राहिला ॥१॥
मग ह्नणे मुनीश्वर ॥ कीं अनुपम्य पुसिला विचार ॥ तरी थोर गा ज्ञानभर ॥ तुझिये ठायीं ॥२॥
आतां ऐकें व्यासवचन । जैं मज जाहलें होतें श्रवण ॥ तेंचि तुज सांगतों कथन ॥ जन्मेजया गा ॥३॥
अमावास्येचिये दिवशीं ॥ रविचंद्र येती येके राशी ॥ ह्नणोनि चंद्र जनमात्रांसी ॥ न दिसे डोळां ॥४॥
तंव ह्नणे जन्मेजयो ॥ येके रथीं यावया कवण उपावो ॥ मग सांगतसे ऋषिरावो ॥ वैशंपायन ॥५॥
कीं अरुण आला सूर्यरथीं ॥ परि तो मांसगोळा थवथविती ॥ अकस्मात रथाप्रती ॥ बैसला सूर्याचे ॥६॥
सूर्यातें ह्नणे जी सहोदरा ॥ मी सारथी तुझा दिनकरा ॥ रथ चालवीन पुढारां ॥ नित्यनेमें ॥७॥
ऐसें ह्नणोनि बैसला रथीं ॥ अरुण जाहला सारथी ॥ परि सूर्याचे तापें क्षितीं ॥ पडिला अरुण ॥८॥
सविता ह्नणे काय जाहलें ॥ हें मज अनुचित असे घडलें ॥ येकवेळ उठवों मग केलें ॥ भलतें चालेल ॥९॥
ह्नणोनि सूर्य जाय जों जवळां ॥ तंव तो अधिकचि होय व्याकुळा ॥ सूर्या पाहों न शके डोळां ॥ तेजास्तव ॥१०॥
ह्नणोनि खेदें सूर्य ह्नणे ॥ आतां काय जी यासी करणें ॥ अरुण जाईल प्राणें मजनिमित्त ॥११॥
असो ऐसा येकमास भरला ॥ तोंवरी सूर्य मावळोनि राहिला ॥ तेणें अंधकार असे पडला ॥ तिहीं लोकीं ॥१२॥
तंव ब्रह्मा विचारी मनीं ॥ कीं सूर्याविण कैसी करणी ॥ रात्रिदिन न कळे ह्नणोनि ॥ निघाला ब्रह्मा ॥ ॥१३॥
मग तो कैलासावरुनी ॥ जातहोता विष्णुभुवनीं ॥ तंव भेटोनि शूळपाणी ॥ पुसती वृत्तांत ॥१४॥
पितामहानें सर्व संकेत ॥ महादेवासि केला श्रुत ॥ मग उभयतां निघाले त्वरित ॥ क्षीरसमुद्रासी ॥१५॥
मनीं देव विचारिती ॥ कैसी करावी आतां मती ॥ कवणा जावें काकुळती ॥ विघ्ननिवारणार्थ ॥१६॥
मग येवोनि श्रीपतीजवळी ॥ जोडोनि ठांकले करकमळीं ॥ स्तुति करिती मुखकमळीं ॥ अनंताची ॥१७॥
सुषुप्तीं राहिलेति हरी ॥ भूतळीं जाहली विपरीत परी ॥ आतां दिनकरु चराचरीं ॥ आथचि ना ॥१८॥
तंव गजबजिले मुरारी ॥ उठोनि बैसले आसनावरी ॥ चरण चुरीतसे कुमरी ॥ सागराची ॥१९॥
मग ब्रह्मा हरु शारंगपाणी ॥ तिघे आले मेदिनी ॥ तेथें देखिला दिनमणी ॥ चिंतातुर ॥२०॥
आणि पुरुष मूर्छागत ॥ अधिकाधिक असे होत ॥ इतुक्यांत आला अनंत ॥ तये स्थानीं ॥२१॥
सविता ह्नणे जी श्रीहरी ॥ आश्वर्याची जाहली परी ॥ अरुण माझिये रथावरी ॥ जाहला सारथी ॥२२॥
तो नुसता मांसगोळा ॥ येवोनि बैसला मजजवळां ॥ थोर तापला माझिये कळां ॥ तेजेंकरोनी ॥२३॥
तरी काय कीजे ह्नणोनि ॥ शरणागत मी चक्रपाणी ॥ ऐसिया अपराधा पासोनी ॥ निवारीं मज ॥२४॥
मग बोलावोनि निशापती ॥ तया मंत्र निवेदी श्रीपती ॥ कीं हा अरुण कवणिये स्थितीं ॥ उठविजे आतां ॥२५॥
तरी तुझी अमृतकळा ॥ ते देवोनि हा मांसगोळा ॥ तुवां उठवावें अरुणबाळा ॥ मग सूर्य कळेनें न तापे ॥२६॥
चंद्र ह्नणे हो शारंगपाणी ॥ माझी अमृतकळा घेतां हिरोनी ॥ मग मी जाईन जी मरणीं ॥ हीनपणास्तव ॥२७॥
तंव देव विचारीं पडिले ॥ ह्नणती हें अनुचित जाहलें ॥ मग ब्रह्मदेवें बोलिलें ॥ युक्तिवाक्य ॥२८॥
कीं चंद्राच्या सोळा कळा असती ॥ तरी जी वनकळा दीजे याप्रती ॥ तेणें अरुण स्वस्थचित्तीं ॥ होईल जाणा ॥२९॥
तापलिया सांडील जीवन ॥ तेणें होईल शीतळपण ॥ ऐसा विचार करिती आपण ॥ ब्रह्माहर ॥३०॥
यानंतरें ह्नणे श्रीहरी ॥ निशापती तूं अवधारीं ॥ जीवनकळा अरुणावरी ॥ दीजे स्पर्शावया ॥३१॥
ऐसा जाणोनियां भावो ॥ जीवनकळे जाहला वर्षावो ॥ तेणें सचेतन अरुणदेवो ॥ फुटले अंकुर ॥३२॥
तंव अठराभार वनस्पती ॥ त्या तेथें आल्या धांवती ॥ ह्नणती आह्मी पीडलों श्रीपती ॥ उदकेंविण ॥३३॥
दरें दरकुटें डोंगर ॥ आडखडकीं पाझर ॥ येत होते आह्मां अंकुर ॥ परि जीवनावांचोनि सूखलों ॥३४॥
आतां अगा ये शारंगपाणी ॥ अमृत स्त्रवविजे चंद्रापासुनी ॥ तेणें आह्मां संजीवनी ॥ नातरी प्राण जाऊं पाहे ॥३५॥
शूळपाणी ह्नणे हो श्रीहरी ॥ सुखी कीजे अठराभारीं ॥ थोर दुःसह दिनकरीं ॥ तापल्या या वनस्पती ॥३६॥
मग चंद्रासि ह्नणे कृपानिधी ॥ अठराभारांची करीं वृद्धी ॥ यांचा तूंचि होयीं संबंधी ॥ प्राण पोषणासी ॥३७॥
यांहीं तुझी आशा केली ॥ तरी यांची होयीं माउली ॥ देयीं शीतळ आपुली साउली ॥ बैसावया यांसी ॥३८॥
येरें कृपावचनीं जाणोनि देवा ॥ ह्नणे स्वदेह अर्पिणे सर्वजीवा ॥ कळेचा केवढासा केवा ॥ तुमची आज्ञा प्रमाण मज ॥३९॥
तुवां इच्छावें मानसा ॥ तें मज देणें हषीकेशा ॥ येथें संदेह कायसा ॥ दीनानाथा ॥४०॥
मग ह्नणे शारंगपाणी ॥ भाष दीजे सत्यवचनीं ॥ तेणें निश्वय आमुचे मनीं ॥ मानेल सत्य ॥४१॥
मग चंद्रें दीधली वाचा ॥ ह्नणे हा पिंड असे तुमचा ॥ चरणीं सत्य भावो आमुचा ॥ अन्यथा केविं होय ॥४२॥
विष्णु ह्नणे गा अवधारीं ॥ वनस्पती गांजल्या शरीरीं ॥ तरी सोळा कळा तयाभीतरीं ॥ सांठवण कीजे ॥४३॥
सोळा कळांची वांटणी ॥ एकी दीजे अरुणालागुनी ॥ सवाई बारा वनस्पतिसि तोडुनी ॥ दीजे तिथिमिश्रित ॥४४॥
ऐसें बोलिलें श्रीहरी ॥ चंद्र तथास्तु ह्नणे उत्तरीं ॥ तंव देवो ह्नणे त्रिपुरारी ॥ कीं येरु दिन पूर्ण असो ॥४५॥
येक पूर्ण सवाई बारा रथ ॥ ऐसा सोळाकळा मिश्रित ॥ सोळाकळांचा संकेत ॥ अंशभेदें ॥४६॥
सवाईपणें बारांमधीं ॥ दीजे येकी कळा आधी ॥ तेणें होय जीवनसिद्धी ॥ अरुणदेवाची ॥४७॥
तंव ह्नणे राजा भारत ॥ आतां तिथिभारांचा वृत्तांत ॥ याचा सविस्तर संकेत ॥ सांगा मज ॥४८॥
अठराभार वनस्पती ॥ तयांची वांटणी कैसे स्थितीं ॥ हें ज्ञान कीजे उचिती ॥ मुनिराय ॥४९॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ भारता तूं गा सर्वज्ञ ॥ चतुरपणें तरी निपुण ॥ श्रोतयांमाजी ॥ ॥५०॥
तूं श्रोतयांमाजी रावो ॥ बहुश्रुत तुझा भावो ॥ तरी कथनीं तवसंदेहो ॥ फेडूं आतां ॥५१॥
प्रथमभार वनस्पती ॥ अरुण ऐसें बोलिजेती ॥ पूर्णकळा पूर्णिमेतिथी ॥ तेथें दिव्यरथ ॥५२॥
ते रथीं चंद्रमा बैसे ॥ तैं सोळाकळांहीं पूर्ण दिसे ॥ अठराभारां माजि उल्हासे ॥ तेज पूर्णकळेचें ॥५३॥
मग प्रतिपदेचिये तिथी ॥ निर्मळ कळा गा भूपती ॥ तेणें पोषितसे वनस्पती ॥ चंद्र बैसोनि श्वेतरथीं ॥५४॥
शुक्ल कळा यानंतरीं ॥ तेथे चंद्र आसन घरी ॥ ते बिजे बोलिजे निर्धारी ॥ भारता गा ॥५५॥
जीर्णकळा पसरी सर्वथा ॥ तृतीयेची ऐसी वार्ता ॥ अनुपम्य तेजें निशानाथा ॥ तृप्त होती वनस्पती ॥५६॥
आणिक चतुर्थीच्या दिवशीं ॥ चंद्र येतसे येकार्णवासी ॥ सगुण कळेनें वनस्पतीसी ॥ संतोषवाया ॥५७॥
पंचमीसी सुषुप्तिरथा ॥ राजकळा ठेवी स्वभावता ॥ तयेच्या नामसंकेता ॥ विभाकर ऐसें ॥५८॥
कळा अर्ध लव वनस्पती ॥ तेथें कळा ठेवी निशापती ॥ सिद्धरथीं षष्ठीतिथी ॥ वसे चंद्र ॥५९॥
सांगों सप्तमी तिथी आतां ॥ चंद्र बैसे आणिके रथा ॥ अमृतकूपिका होय द्रवता ॥ मेदिनीसी ॥६०॥
मग तये अष्टमीचे दिवशीं ॥ अर्धखंड राहे चंद्रासी ॥ ते तिथीचें आसन तयासी ॥ दीधलें असे ॥६१॥
नवमीसि आपुले कळां सहित ॥ चंद्र शोभे तारागणांत ॥ तेथें रथाची अर्धमात ॥ अर्धभार वनस्पती ॥६२॥
नंतरें वज्रकळा उदेती ॥ नागर जाणिजे दशमीतिथी ॥ तये स्थानीं चंद्र बैसती ॥ अर्धभारां दूजिये ॥६३॥
रथ असे निराकार ॥ सूर्यदीप्ती ऐसा विचार ॥ तेथें कळांही उत्तरभार ॥ तिथी येकादशी ॥६४॥
आतां तिथी जे द्वादशी ॥ तैं ज्वाळारथीं बैसे शशी ॥ तया कुमोदिनी कळेसी ॥ जाहलें येणें ॥६५॥
अनुपम्यरथीं तेरसु ॥ तो बोलिलासे शुद्धांशु ॥ कपोलें होय प्रकाशु ॥ तारकांमध्यें ॥६६॥
नंतरें तिथी चतुर्दशी ॥ तैं जीर्ण जाहला असे शशी ॥ मग सूर्यासमीप तयासी ॥ जाहलें येणें ॥६७॥
तैं तेज जीर्णरथावरी ॥ चंद्र आला ते अवसरीं ॥ तामसकळेभीतरीं ॥ स्थावरभारु पोसला ॥६८॥
आतां पुढील अपुर्व कथा ॥ परिसें राया भारता ॥ सकलही पातकांची चिंता ॥ दूरी होय ॥६९॥
असो कला जे कृष्णवर्ण ॥ ते तुजसीं करूं गा कथन ॥ श्रवणमात्रें पातकां दहन ॥ होय निमिषें येकें ॥७०॥
दिनकरु आणि निशापती ॥ अंवसे येके रथीं येती ॥ अमृतकळेनें अरुणाप्रती ॥ स्पर्शावया ॥७१॥
देवें भाष होती घेतली ॥ ह्नणोनि अमृतकळा आपुली ॥ नक्षत्रराजें दीधली ॥ अरुणालागीं ॥७२॥
तये अमृतकळेची छाया ॥ स्पर्शतांचि अरुणाचरा ॥ तेणें अमर जाहली काया ॥ सदाकाळीं ॥७३॥
तेथें अमृतरथ भारता ॥ अमृतकळे होय समता ॥ ह्नणोनि चंद्र जाहला द्रवता ॥ सर्वातिथींसी ॥७४॥
परि राहिलें असे कथन ॥ दोनी भारांचें खंडण ॥ तरी तयांचें शेषज्ञान ॥ सांगों तुज ॥७५॥
निशापती आणी कर्काश ॥ हे दोनी भार समरस ॥ सोळा भारांमध्यें अंश ॥ वाढला दोघांचा ॥७६॥
आणिक ह्नणे वैशंपायन ॥ ऐकें भारत दुजा प्रश्न ॥ तो सांगों तुज सगुण ॥ यये प्रसंगीं ॥७७॥
येथें श्रोता विचारीं पडिला ॥ सोळारथाचा अर्थ कथिला ॥ परि निवडिलें असे बोल । व्यासदेवें ॥७८॥
सूर्याचे रथीं सप्त वारु ॥ पांचांवरी बैसे निशाकरु ॥ तेथें आणिक विचारु ॥ सोळा कळांचा ॥७९॥
ऋषिमतावीण बोलणे ॥ तें वंध्यावल्लीचें फुलणें ॥ कीं अजाकंठींचीं स्तनें ॥ तेथें पय कैसें ॥८०॥
हे भविष्योत्तरींची कथा ॥ व्यासवाक्य असे संस्कृता ॥ तें कथन केलें भारता ॥ तुजलागोनी ॥८१॥
आतां असो हा येथ प्रश्न ॥ सप्तमस्तबका जाहलं अवसान ॥ कथारसाचा ज्ञानघन ॥ कल्पतरु हा ॥८२॥
हा अभिनव कल्पतरु ॥ अमृतरसाचा सागरु ॥ आला कराया पाहूणेरु ॥ श्रोतयांसी ॥८३॥
अनंतकथा कल्पतरु ॥ जाणों दुसरा पुरंदरु ॥ कथारुपे याचा परिवारु ॥ अमर जैसे ॥८४॥
श्रीहरीची गुणवाणी ॥ मज उपदेशिली स्वप्नीं ॥ करीं देवोनि लेखणी ॥ दाविलें तेणें ॥८५॥
अनंताचा प्रसाद जाहला ॥ तेणें मज वर दीधला ॥ ह्नणोनीच हा विस्तारला ॥ ग्रंथराज ॥८६॥
ग्रंथा नाम कल्पतरु ॥ हा पापदहनाचा अंगारु ॥ नानाव्याधी रोगहारु ॥ पुत्र लक्ष्मी प्राप्त होय ॥८७॥
कीं तुंबिनीचें बक्रफळ ॥ आपण तरे तें काय नवल ॥ परि आणिका तारी कल्लोळ ॥ महापूराचे ॥८८॥
तैसे हरिहरांचे नामें ॥ महादोष जाती नेमें ॥ तेवीं हे ऐकता मनोधर्मे ॥ नासती दोष ॥८९॥
कष्ट हरतील दारुण ॥ रोग जातील फिटोन ॥ हें कथाकल्पतरु रत्न ॥ असे भूतळीं ॥९०॥
आणिक ह्नणती वैशंपायन ॥ चंद्र हा अवतरला अभिमन्य ॥ तये कथेंचें विस्तरण ॥ सांगों तुज ॥९१॥
तंव बोलिला जन्मेजयो ॥ अभिमन्यु वत्सला विवाहो ॥ तये कथेचा गर्भभावो ॥ सांगिजे आतां ॥९२॥
आणि तो चंद्राचा अवतार ॥ कोणी ह्नणती सहस्त्रकर ॥ तरी सांगा जी विचार ॥ निश्वयाचा ॥९३॥
मग बोलिले वैशंपायन ॥ राया हें कल्पपरत्वें भिन्न ॥ परि नव्हे अप्रमाण ॥ दोहीं मतांसीं ॥९४॥
जेवीं तडाग आणि सरिता ॥ दोहींसि उदकपणें अभिन्नत ॥ परि नाममात्रें विषमता ॥ लोकाचारीं ॥९५॥
तेविं कथांतरे वेगळेपण ॥ परि कृष्णकृपेचें सांठवण ॥ असो अभिमन्यूचे चरित्रकथन ॥ सांगों तुज ॥९६॥
चंद्रें भोगिली गुरुदारा ॥ ह्नणोन युद्ध जाहलें देवां सम्रगां ॥ शेवटी पराभव जाहला इंद्रा ॥ सकळदेवेंसी ॥९७॥
चंद्रें पुरंदर पळविला रणीं । हें श्रुत जाहलें चक्रपाणी ॥ मग देव आला धांवोनी ॥ युद्धार्थ तेथें ॥९८॥
नारदपुराणीच्या अनुमता ॥ नारदें कथिलें जगन्नाथा ॥ तंव तो आला गाभाला धांवोनी ॥ दुद्धार्थ तेथें ॥९९॥
युद्ध जाहलें तुंभळ ॥ हरिहरा वर्तला कल्लोळ ॥ शंकरें घेवोनि शिशूळ ॥ चंद्रावरी चालिला ।१००॥
ऐसी जाहली युद्धस्थिती ॥ ह्नणोनि धांवला प्रजापती ॥ तेणें उभयतां केली शांती ॥ देवां आणि शीतकरा ॥१॥
बोधोनिया अत्रिनंदना ॥ तारा मागितली अंगना ॥ मग ते दीधली ब्राह्मणा ॥ गुरुदेवासी ॥२॥
परि व्यभिचारी चंद्र जाहला ॥ आणि तो बृहस्पतीनें शापिला ॥ कीं मानवदेहीं विपत्तीला ॥ पावसील चंद्रा तूं ॥३॥
तोचि अवतरला सुभद्रासुत ॥ जो पार्थाचा रेतजात ॥ हा कथिला असे वृत्तांत ॥ प्रथमस्तबकीं ॥४॥
असो एके दिवशीं सुभद्रा ॥ भीमकीगृहीं करितां निद्रा ॥ कृष्णासि ह्नणे जी सहोदरा ॥ सांगें कथा भारती ॥५॥
देवें कथितां व्युहभेदन ॥ सुभद्रा निजेली आपण ॥ तंव गर्भीहूनि केलें अनुसरण ॥ तेणें गर्भे ॥६॥
दचकोनि उठिला शारंगधर ॥ गर्भीचा जाणितला शीतकर ॥ भविष्य जाणोनि पाजिलें नीर ॥ सुदर्शनाचें भगिनीसी ॥७॥
तेणें कर्तन जाहल्या भुजा ॥ आणि नायकिलें व्यूहभेदन बीजा ॥ हेंही कथिलेसे भूपात्मजा ॥ पंचमस्तबकीं ॥८॥
असो पूर्णदिनीं सुभद्रामाता ॥ सुदिनीं प्रसवली त्या सुता ॥ तो रुपें गुणें गा भारता ॥ अजिंक्य विश्वा ॥९॥
उभयकुळींचा विख्यात ॥ जाणों मन्मथ मूर्तिमंत ॥ पांडवांसी प्रिय अत्यंत ॥ वरिष्ठपणेंसीं ॥११०॥
आतां असो हा येथ प्रश्न ॥ पुढिले प्रसंगीं वत्सलाहरण ॥ तें ऐकिजे चित्त देऊन ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥११॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ सप्तमस्तबक मनोहरु ॥ चंद्रकला अभिमन्युप्रकारु ॥ अष्टादशोऽध्यायीं कथियेला ॥११२॥ ॥ ॥ ॥