श्रीगणेशाय नमः
वैशंपायन वेदमूर्ती ॥ तयांसि पुसे भूपती ॥ कीं चारी आश्रम जे ह्नणती ॥ ते कोणकोण ॥१॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ राया बरवा पुसिल प्रश्न ॥ कीं जो ऐकतां सुखावे मन ॥ श्रोतयांचे ॥२॥
तरी प्रथम आश्रम ब्रह्मचर्य ॥ साधे वेदाध्ययन कार्य ॥ दुजा गृहस्थाश्रम तो आर्य ॥ सकळांमाजी ॥३॥
तिसरा आश्रम वानप्रस्थ ॥ चौथा संन्यासाश्रम यथार्थ ॥ जो घडलिया होय समर्थ ॥ कैवल्यपदीं ॥४॥
ऐसे हे चारी आश्रम ॥ धर्मशास्त्रींचा अनुक्रम ॥ परि श्रेष्ठपणें गृहस्थाश्रम ॥ सकळां जनांसी ॥५॥
घडती पंचमहायज्ञ ॥ हरिहरांचें भजनपूजन ॥ अतीतां अभ्यागतां अन्न ॥ प्राप्तहोय ॥६॥
सर्वाभूतीं दयापर ॥ अन्नें तोषवावें निरंतर ॥ तेणें दातया स्वर्गद्वार । मुक्त होय ॥७॥
तरी अतीता अभ्यागतां ॥ अन्नदान कीजे सर्वथा ॥ ब्राह्मणां सहस्त्रां कीं शतां ॥ दीजे भोजन ॥८॥
विप्र पांच अथवा तीनी ॥ पंचवीस अथवा दोनी ॥ स्वशक्तिसारिखा मनीं ॥ कीजे भाव ॥९॥
नातरी वैदर्भराजा परिस ॥ तो स्वयें करी आपुला ग्रास ॥ कांहीं ब्राह्मण अतीतास ॥ भोजन नेदीच ॥१०॥
देवधर्मासि नेणे जीवेंभावें ॥ प्रधानांवरी कोपे स्वभावें ॥ ऐसें सदा जें करावें ॥ तें अंगिकारी तो ॥११॥
भारता मग काळसंकेतें ॥ मृत्यु जाहला तयातें ॥ परि विष्णुभुवनीं क्षुधेतें ॥ पावला थोर ॥१२॥
तया विष्णूनें आज्ञा दीधली ॥ कीं अन्नदानें असतील केलीं ॥ तीं स्मरावी ये काळीं ॥ आपुलीं तुवां ॥१३॥
मनीं विचारी विदर्भनाथ ॥ तंव अन्नदान घडलें नाहीं किंचित ॥ ह्नणोनि आपुलें शरीर खात ॥ आपणचि देखा ॥१४॥
तरी जो स्वभावें येईल प्राणी ॥ तया अन्न देईजे संतोषमनीं ॥ ऐसें केलिया मोक्षदानी ॥ प्रसन्न होय ॥१५॥
अन्नदानें करुनि भारता ॥ सकळकर्माची होय सांगता ॥ तंव मागुती जाहला तव मागुती जाहला विनविता ॥ जन्मेजयो ॥१६॥
ह्नणे जी वाटते नवल मात ॥ आपुलेंचि आपण नृपनाथ ॥ शरीर भक्षी तो वृत्तांत ॥ सांगा मज ॥१७॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ उत्तम पुसिला गा प्रश्न ॥ जो ऐकतां संतुष्टे मन ॥ श्रोतयांचें ॥१८॥
तरी त्रेतायुगाचिये अंतीं ॥ सातवा अवतार श्रीराममूर्ती ॥ रावण वधोनि अयोध्येप्रती ॥ पुष्पकीं बैसोनि पातले ॥१९॥
पुढें अकरासहस्स्त्र वर्षे ॥ राज्य केलें आदिपुरुषें ॥ सकळ जन अतिसंतोषें ॥ रामराज्यांत ॥ ॥२०॥
असो येकदां रामराणा ॥ आला अगस्तीच्या दर्शना ॥ तंव रामासवें लक्ष्मणा ॥ जाहली भेटी ॥२१॥
नानाआदरें करोनि भेटी ॥ ऋषीनें ठेविल्या रत्नकोटी ॥ मग सांगों आरंभिल्या गोष्टी ॥ रामअगस्तीनीं ॥२२॥
सांगावें तें सांगितलें ॥ रामराज्यीं जें वर्तलें ॥ मग रामकरीं घातलें ॥ दिव्यकंकण अगस्तीनें ॥२३॥
श्रीराम ह्नणे विपरीत जाहलें ॥ म्यां अर्पावें तें राहिलें ॥ तंव अगस्तीनें ह्नणितलें ॥ ऐकें रामा ॥२४॥
आह्मां तापसां अवधारीं ॥ येवढें रत्न काय तरी ॥ तूं विष्णुअवतार तुझ्या करीं ॥ दिसेल बरवें ॥२५॥
यामाजी असती नानागुण ॥ केलिय पवित्रपणें पूजन ॥ प्रसवे अमितभार सुवर्ण ॥ आणि कल्पिलें देत ॥२६॥
तंव राम ह्नणे हो महाऋषी ॥ हें कंकण कैसें तुह्मापाशी ॥ तें कृपा करोनि आह्मासी ॥ कीजे ज्ञान ॥२७॥
हें कंकण तुह्मांलागुनी ॥ प्राप्त जाहलें जी कोठुनी ॥ ऐसा बोल परिसोनी ॥ मुनी बोलता जाहला ॥२८॥
भारतवैशंपायनसंवाद ॥ मुनीसि पुसे राम अभेद ॥ तो दुजा ऐकावा अनुवाद ॥ श्रोतेजनीं ॥२९॥
श्रीरामा ऐकें अलोलिक ॥ विपरीत आश्वर्य येक ॥ म्यां देखिलें गा कौतुक ॥ स्त्रान करितां ॥३०॥
आश्रमाआरुतें सरोवर ॥ येक असे जी सविस्तार ॥ तेथें मी स्त्रानासि परिकर ॥ बैसलों होतों ॥ ॥३१॥
संविता प्राप्त जाहला माथां ॥ वेळ लोटला जप करितां ॥ तंव येक उतरला अवचिता ॥ दिव्यपुरुष तेथें ॥ ॥३२॥
घंटानादें विमान ॥ व्योमीहूनि उतरलें सगुण ॥ तें कौतुक पहावया मन ॥ उदित माझें ॥३३॥
विमान सरोवरीं आलें ॥ तेथें आपणचि स्थिरावलें ॥ त्या दिव्यपुरुषें स्त्रान केलें ॥ तये सरोवरीं ॥३४॥
तेथें येक प्रेत पतित होतें ॥ दिव्यपुरुष जावोनि तेथें ॥ तेणें अवलोकिलें प्रेतातें ॥ वेळोवेळां ॥३५॥
जाणों आपणिया आपण न्याहाळी ॥ सजीव निर्जीव तये पाळीं ॥ दिव्यपुरुष तया जवळी ॥ उभा असे ॥३६॥
तोचि प्रेतरुपें राजा ॥ आडवा पडिला असे वोजा ॥ मी ह्नणे काय आतां पूजा ॥ करील याची ॥३७॥
परि शिरापासोनि तों चरणी ॥ तेणें खादलें मिठी देवोनी ॥ मग विमानीं आरुढोनी ॥ गेला स्वर्गभुवना ॥३८॥
राधवा मी दुसरे दिवशीं ॥ स्त्रानार्थ गेलों सरोवरासी ॥ तंव त्या पूर्वीलचि प्रेतासी ॥ देखिलें संपूर्ण ॥३९॥
सरोवरीं जैसेंचि तैसें ॥ कालचें तेंचि प्रेत असे ॥ मग राहोनि झाडा आडवसें ॥ बैसलों पाहूं ॥४०॥
तंव मागुता तेचि अवसरीं ॥ दिव्यपुरुष आला सरोवरीं ॥ होवोनियां सुस्नात झडकरी ॥ खादलें प्रेत ॥४१॥
शिरापासोनि तों चरणीं ॥ सर्वही अंगें भक्षूनी ॥ मग विमानीं आरुढोनी ॥ गेला गगनमार्गे ॥४२॥
तैसेंचि तिसरे दिनीं सरोवरा ॥ विमान आलें त्या अवसरा ॥ तो स्त्रान करोनि माघारां ॥ खात प्रेतासी ॥४३॥
तया बैसोनि जातां विमानीं ॥ मी पडखळलो दुरोनी ॥ पुसिलें तूं कवण ह्नणोनी ॥ कवणजाती ॥४४॥
भूत पिशाच अथवा खेचर ॥ कीं मनुष्याचा अवतार ॥ प्रेता भक्षिसी निरंतर ॥ कवणहेतु ॥४५॥
श्रीरामा मी जंव ऐसे ह्नणें ॥ तंव चरणीं धांव घेतली तेणें ॥ ह्नणे सांगतां श्लाध्यवाणें ॥ वाटे मज ॥४६॥
माथा ठेविला चरणावरी ॥ ह्नणे अधोगती पासोनि तारीं ॥ तंव म्यां उचलिला वरिच्यावरी ॥ दिव्यपुरुष तो ॥४७॥
ह्नणितलें तुझा वंश कवण ॥ येरु ह्नणे मी विदर्भनंदन ॥ म्यां केलें नाहीं अन्नदान ॥ भूपती असोनी ॥४८॥
ह्नणोनि क्षुधा पीडी मातें ॥ स्वर्गभुवनीं असतां तेथें ॥ रामा लटिकें वाटे मजप्रती तें ॥ ह्नणोनि मान हालवीं ॥४९॥
कीं क्षुधा लागे स्वर्गभुवनीं ॥ हें अपूर्व ऐकिलें कानीं ॥ तूं सांगसी परि आमुचे मनीं ॥ येत नाहीं ॥५०॥
हें हीनकर्म मृत्युलोकीं ॥ जें आचरिजे राक्षसादिकीं ॥ तें आचरिजे दिव्यपुरुषीं ॥ हें थोर विपरीत ॥५१॥
तंव तो पुरुष ह्नणे हो ऋषी ॥ मी पुण्यवंत परि येकदेशी ॥ बीज टाकोनि काबाडासी ॥ प्रवर्तलो मी ॥५२॥
मी विदर्भदेशीचें केलें राज्य ॥ जें धर्मशास्त्रीं असे पूज्य ॥ परि न देयीच भक्ष्यभोज्य ॥ अन्नदान ब्राह्मणां ॥५३॥
जेंजें आवडे माझिये मना ॥ तें तें न अर्पी याचकजना ॥ क्षुधा लागलिया अन्ना ॥ मीचि भक्षीं येकला ॥५४॥
नाहीं धर्म दयापर ॥ कोणा न देई अन्नमात्र ॥ बंधु सज्जन आप्तपर ॥ अन्नें तृप्त नाहीं केले ॥५५॥
राज्य नीतीनें प्रतिमाळीं ॥ नित्यानित्य यथोक्त काळीं ॥ परि अन्नदान कदा काळीं ॥ केलें नाहींच ॥५६॥
अतीतासी समर्पिजे अन्न ॥ ऐसें न घे माझें मन ॥ सकल भोगांचे सेवन करुन ॥ शरीर आपुलें पोशिलें ॥५७॥
तैसेंचि गा भावें देवातें ॥ स्मरिलें नाहीं येकचित्तें ॥ ह्नणोनियां पूर्वकर्मार्तें ॥ नाडलों देखा ॥५८॥
मग कोणैककाळीं देखा ॥ आयुष्य सरलें ब्रह्मलेखा ॥ तंव मज नेलें प्रेतलोका ॥ यमकिंकरीं ॥ ॥५९॥
तेथें पुण्य अथवा पाप ॥ गुप्त स्मरें आपुलें आप ॥ ऐसी ध्वनी उठिली उमोप ॥ यमरायाची ॥६०॥
चित्रगुप्त ह्नणती हा राजा ॥ न्यायनीतीं पालक प्रजां ॥ यासारिखा आणिक दुजा ॥ नाहीं मृत्युलोकीं ॥६१॥
राजनीतीच्या पुण्यप्रभावीं ॥ दिव्यकांती दीधली देवीं ॥ तंव इच्छा उपजली जीवीं ॥ अन्नभक्षणाची ॥६२॥
मी ते क्षुधा सांगें येरां ॥ तंव आश्वर्य वर्तलें ऋषीश्वरा ॥ ह्नणती येथें जीवमात्रां ॥ नाहीं अन्नसंबंध ॥६३॥
परि मज क्षुधा लागली ॥ ह्नणोनि देव पुसे बोलीं ॥ कीं त्वां अन्नदानें असतील केलीं ॥ तीं स्मरावीं आतां ॥६४॥
तुवां अन्नदानाची वेली ॥ समर्थ असोनि नाहीं लाविली ॥ आतां पाविजे केविं फळीं ॥ संतुष्टीचे ॥६५॥
जेवीं हल भूमिक्षेत्रीं ॥ फिरविजे गा परोपरी ॥ माजी बीज न पेरिजे तरी ॥ न फुटे अंकुर ॥६६॥
भूमीं न पडतां बीजांश ॥ कैसा विस्तारे सौरस ॥ ह्नणोनि अन्नदानप्रकाश ॥ विस्तारे जगीं ॥६७॥
भूमिये बीज येकवटलें ॥ परि तें उदकेंवीण वाळलें ॥ तैसें पुण्याचे ठायीं पडिलें ॥ पाप मुरवण ॥६८॥
आणिक ह्नणती मजप्रती ॥ कीं आतां जावोनि वैकुंठाप्रती ॥ तुवां प्रार्थावा श्रीपती ॥ तो उपाय सांगेल ॥६९॥
ऐसें निरविलें विष्णुतें ॥ मग म्यां गमन करोनि तेथें ॥ कथिलें क्षुधेचे आर्ते ॥ जगदात्मयासी ॥७०॥
अगा ये विश्वपती नारायणा ॥ म्यां तोषविलें नाहीं अन्नदाना ॥ परि माझिये आणिका पुण्या नाहीं मिती ॥७१॥
अन्नें पोशिलें आपुलेंचि शरीर ॥ याचका दिलें नाही अणुमात्र ॥ ह्नणोनि आतां क्षुधा अपार ॥ लागली देवा ॥७२॥
आतां यासी करणें काई ॥ देव ह्नणे मृत्युलोकीं जाई ॥ पडिलें आहे तें शव खाई ॥ तुझें तूंची ॥७३॥
येरवीं तुझी न जाय भूक ॥ आणि तूं थोर पावसी दुःख ॥ शवभक्षणावांचोनि सुख ॥ नव्हे तुज ॥७४॥
देवासि ह्नणें प्रार्थनावचनें ॥ कीं येकवेळां शव खाणें ॥ मग सरलिया काय करणें ॥ सांगा जी मज ॥७५॥
ऐसें ऐकोनि ह्नणे देव ॥ खासी तेवढेचि वाढेल शव ॥ क्षुधा लागलिया नित्यमेव ॥ खात जावें ॥७६॥
ह्नणोनियां हो अगस्तिमुनी ॥ मी येतसें मृत्युभुवनीं ॥ हें शव धरोनियां मनीं ॥ भक्षावया ॥७७॥
मी ह्नणे शव भक्षणें तुज ॥ परी हा अपराध पाहतां मज ॥ आतां क्षुधा न लागे तें बीज ॥ करणें वहिलें ॥७८॥
मग सुस्त्रात होवोनि पाणी ॥ त्याचे करीं घातलें मंत्रोनी ॥ क्षुधा वारिली तेणेंकरोनी ॥ त्या राजयाची ॥७९॥
तंव दिव्यकंकण होतें करीं ॥ तें ठेविलें ममचरणावरी ॥ तरी रामा हें पूजिलियावरी ॥ अमित सुवर्ण प्रसवत असे ॥८०॥
ऐसी हरिली तयाची क्षुधा ॥ मग दिव्यपुरुष जाहला सुधा ॥ तैं स्वर्गलोकासी नवविधा ॥ जाहलें दिव्यनगर ॥८१॥
वैशंपायन ह्नणती भारता ॥ तुवा पुसिली अन्नदानकथा ॥ तरी हे रामायणींची वार्ता ॥ कथिली तुज ॥८२॥
राव ह्नने तूं धर्माची राशी ॥ सत्कर्में मज आचरविसी ॥ मुने तुझिया अंतःकरणासी ॥ नसे मलिनत्व ॥८३॥
तूं अठरापुराणांचा गाभा ॥ जाणों कोटियज्ञांची प्रभा ॥ तुझी उपमा त्रिभुवननभा ॥ साक्ष देखों ॥८४॥
जन्मेजयो ह्नणे हो मुनी ॥ तूं माझी कुळस्वामिणी ॥ शुद्ध जाहलों तुझे वचनीं ॥ सर्व प्रकारें ॥८५॥
ऐसी कथा पुण्यपावन ॥ मृत्युलोकीं आलें रत्न ॥ कथाकल्पतरु नामाभीधान ॥ अति पवित्र जें ॥८६॥
निर्धनासी जोडे धन ॥ अपुत्रिकांसी पुत्रपण ॥ सकल व्याधींचें होय हरण ॥ श्रवणमात्रें ॥८७॥
आतां असो हें जन्मेजया ॥ अग्रकथा परिसावय ॥ श्रवणमात्रें देव ठाया ॥ पाविजे येकचित्तें ॥८८॥
येथें अधिक अथवा उणें ॥ ग्रंथीं न पहावें शाहणपणें ॥ पुढें कल्पतरु ऐकणें ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥८९॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ सप्तमस्तबक मनोहरु ॥ अन्नदानकधाप्रकारु ॥ सप्तदशाऽध्यायीं कथियेला ॥९०॥ ॥ ॥