॥ श्रीगणेशाय नमः ॥
मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ कोण कोठील सत्वाचा रावो ॥ सत्वरक्षणीं कवण उपावो ॥ कैसा केला सांगिजे ॥१॥
मग ह्मणे वैशंपायन ॥ राया बरवा पुशिला प्रश्न ॥ जेणें सुखीं होय मन ॥ श्रोतयांचें ॥२॥
तरी सत्वशील ह्मणिजे श्रियाळ ॥ जेणें दीधली आपुला बाळ ॥ समयो जाणोनि भूपाळ ॥ नसरेचि मागें ॥३॥
सत्व रक्षिलें रुक्मांगदें ॥ एकाद्शी केली आनंदें ॥ तेणे भावें हरिगोविंदें ॥ धांवणे केलें ॥४॥
आणिक सत्वधीर भूपती ॥ शिबी जाणिजे चक्रवतीं ॥ जेणें कापिलें स्वहातीं ॥ आपुलें मांस ॥५॥
हरिश्वंद्र तरी सूर्यवंशीं ॥ सत्त्वाधिक परियेसीं ॥ कष्ट जाहले तयासी ॥ अपार पैं ॥६॥
सत्वरक्षणा कारणें ॥ राज्यलक्ष्मी दवाडिली तेणें ॥ अयोध्या सोडोनि तिघें जेणें ॥ गेलीं वाराणसीसी ॥७॥
तंव जन्मेजयें ह्मणितलें ॥ कीं राज्य कैसें दवडिलें ॥ आणि तेणें सत्व राखिलें ॥ कवणेपरी ॥८॥
तरी तयाचें सकळ चरित ॥ केलें पाहिजे विदित ॥ जें पूर्वील ऋषिमत ॥ व्यासादिकांचें ॥९॥
मग ह्मणे वैशंपायन ॥ ऐकें राया चित्त देऊन ॥ सूर्यवंशीं पुण्यवर्धन ॥ सत्वधीर हरिश्चंद्र ॥१०॥
असो एकदा अमरावती ॥ तेतीसकोटी देवांसहितीं ॥ सभे बैसला अमरपती ॥ ऋषींसहित ॥११॥
तेथें आनंद मांडिला स्वयंभा ॥ नृत्य होतसे उर्वशी रंभा ॥ पेखणें घनवटिली सभा ॥ शोभारंगीं ॥१२॥
तेचि समयीं इंद्रभुवनीं ॥ भ्रमत आले नारदमुनी ॥ तंव इंद्रसभा गजबजोनी ॥ बैसकार दीधला ॥१३॥
नारद ह्मणे अमरनाथा ॥ त्वां न पुरिजे हरिश्वंद्राच्या सत्वार्था ॥ पुण्यवासना धर्मार्थता ॥ तयाचे ठायीं ॥१४॥
रोहिदास पुत्र तारामती राणी ॥ ऐसी नांदती आयोध्याभुवनीं ॥ शोभा पाहतां दिसें ठेंगणी ॥ अमरावतीची ॥१५॥
काय कीजे हे इंद्रपुरी ॥ ऐसी असे अयोध्या नगरी ॥ वानुं जरी विष्णुनगरी ॥ तेही उपमे पुरेना ॥१६॥
कैलास जरी वानिला ॥ सत्यलोक म्यां देखिला ॥ स्वपित्याचा आश्रम पाहिला ॥ तोहि न पुरे तुलनेसी ॥१७॥
मग आणिक उपमा केविं दीजे ॥ ऐसे दुजी कोठें न साजे ॥ एकचि अयोध्या उपमिजे ॥ त्रिभुवनीं या ॥१८॥
वसिष्ठ ह्मणे शब्द साचा ॥ आपण बोलिलां जे वाचा ॥ परि विश्वामित्र भावो मनींचा ॥ सुटली तळमळ ॥१९॥
जैसा घृतें शिंपिला कृशांन ॥ अधिकचि प्रज्वळे जाण ॥ कीं गजा देखोनि पंचानन ॥ खवळे जैसा ॥२०॥
ह्मणे वसिष्ठासि गर्धिंसुत ॥ तूं सूर्यवंशाचा पुरोहित ॥ ह्मणॊनि बोलसी ऐसी मात ॥ सत्यपणें गा ॥२१॥
कल्पतरु आणि इतर द्रुमा ॥ केविं साजे अन्योन्य उपमा ॥ मानिजे चिंतामणीसि समा ॥ गारगोटा केवीं ॥२२॥
परिसा आणि खापरा ॥ कंचे समान काय हिरा ॥ ब्रह्मकपाळें व्यभिचारा ॥ घडे मदिरापान ॥२३॥
सत्वें ढाळीन हरिश्चंद्र ॥ हेंचि माझें प्रतिज्ञोत्तर ॥ नातरी तपश्चयेंचा सागर ॥ वोपीन त्यासी ॥२४॥
कीं शिखायज्ञेपवीत त्यजून ॥ न करितां शौच आचमन ॥ नातरी स्नानें विण भोजन ॥ तें पातक मममस्तकीं ॥२५॥
नातरी अतिथी विन्मुख करणें ॥ विषय पोषिजे परान्नें ॥ कीं कुरुक्षेत्रीं घेइजे दानें ॥ हीं पातकें मममस्तकीं ॥२६॥
जरी सत्व राखील भूपती ॥ हरिश्चंद्र अयोध्येचा नृपती ॥ तरी जाण म्यां आपुले हातीं ॥ वधिलें पूर्वजां ॥२७॥
म्यां पन्नास कोटी तप केलें ॥ तिन्हीलोक जिंकिले ॥ तरी तितुकेंही व्यर्थ गेलें ॥ माझें सत्य ॥२८॥
जीं म्या प्रतिसृष्टिकरितां ॥ तपें साधिलीं सर्वथा ॥ तेही करणी सकळ आतां ॥ हरलिया देणें ॥२९॥
केलें लोहपिष्ठ भक्षण ॥ आणि सूर्यांचें अवलोकन ॥ निरोधें आवरिलें मन ॥ कोटिवरुषें ॥३०॥
पंचाग्नि साधन रेतकुंडीं जळत ॥ दहाकोटी तप केलें हिमांत ॥ मृत्यु जिंकिला समस्त ॥ आणि पाताळभुवनें ॥३१॥
इतुक्या तपाचिया राशी ॥ केवीं उलंडवती हरिश्वंद्रासी ॥ सत्वहीन करीन त्यासी ॥ तरीच मी विश्वामित्र ॥३२॥
तंव वसिष्ठ तयासि ह्मणे ॥ हें तुमचें साच बोलणें ॥ परि हरिश्चंद्राकारणें ॥ हें न चले काहीं ॥३३॥
तंव बृहस्पती आणि इंद्र ॥ उभारयां बोलती उत्तर ॥ कीं या दोघांत वाद थोर ॥ प्रवर्तक आतां ॥३४॥
आतां सभा विसर्जिजे ॥ झाडकरी येथोनि जाइजे ॥ नाहीं तरी विश्वामित्र बोलिला जें ॥ तें करील साच ॥३५॥
असो सभा विसर्जून ॥ ऋषि निघाले तेथून ॥ दोघांही प्रतिज्ञा करून ॥ आले अयोध्येसी ॥३६॥
मग विश्वामित्र ऋषी ॥ स्वयें आला सिद्धाश्रमासी ॥ तेथे करणी केली कैशी ॥ द्देषभावें ॥३७॥
आणि तो वसिष्ठ कुळगुरु ॥ स्वयें निघाला वेगवतरू ॥ तया भेटला हरिश्वंदु ॥ कुळगुरूसी ॥३८॥
त्याचिये महिमेचा मर्यादा ॥ हरिश्वंद्र देत सदा ॥ तंव तो ऋषी आशिर्वादा ॥ देता जाहला ॥३९॥
वसिष्ठाचिया आगमना ॥ संतोष हरिश्वंद्राच्या मना ॥ मग देवोनि आलिंगना ॥ बैसविला सिंहासनीं ॥४०॥
उपरी वसिष्ठ बोले वचनें ॥ राया हरिश्वंद्राच्या कारणें ॥ कीं कोणैककाळीं जाहलें येणें ॥ नारदाचें इंद्रलोकीं ॥४१॥
तेथें आयोध्येचा महिमा ॥ नारदें वानिला संभ्रमा ॥ अमरावतीचीं उपमा ॥ देवों सरसावला ॥४२॥
तंव विश्वामित्र होता तेथें ॥ तो न मानीच नारदातें ॥ ह्मणोनि मग म्यां तयातें ॥ वारिलें बोलें ॥४३॥
ऐसा विरोध जाहला ॥ विश्वामित्र पण केला ॥ कीं म्या तों निखांदिला ॥ ह्मणवोनियां ॥४४॥
मग इंद्रसभा गजबजिली ॥ रजें तेथूनियां उठली ॥ आह्मां उभयां प्रतिज्ञा जाहली ॥ विरुद्धमतें ॥४५॥
तरी आतां दक्षिणदिशे ॥ विश्वामित्र सिद्धाश्रमीं वसे ॥ तेथोनि तुझें पारधीमिषें ॥ टाळील सत्व ॥४६॥
तरी आतां तुवां ते वनीं ॥ न जावें राजचक्रचुडामणी ॥ विश्वामित्र करील करणी ॥ ते न कळे कोणातें ॥४७॥
दुसरी सृष्टी करीतहोता ॥ तें कार्य राहिलेंसे आतां पुढें ॥ वोढवलें अरिष्ट सुता ॥ सत्व टाळावयाचें ॥४८॥
तंव ह्मणे हरिश्वंदु ॥ वसिष्ठा तुह्मी माझे गुरु ॥ असतां कराल दुःखपारु ॥ सहज कृपेनें ॥४९॥
मज येक गुरुचि असे ॥ आणिक दुजें काहीं नसे ॥ माता बालका उपवासें ॥ ठेवील केवीं ॥५०॥
तंव वसिष्ठे मागोनि आज्ञा ॥ गेला प्रयागीं माघस्नाना ॥ तेथें करी अघमर्षणा ॥ राहोनी उदकीं ॥५१॥
कीं कल्याण व्हावें नृपनाथा ॥ ह्मणोनि जोडी तपपर्वता ॥ तो महामुनी त्याची समर्थता ॥ त्रिभुवनी गाजें ॥५२॥
आतां असो हा महामुनी ॥ विश्वामित्र करी कराणी ॥ आणि वसिष्ठ बैसला स्थानी ॥ प्रयागींचे ॥५३॥
इकडे मेंढियावरी आरुढोनी ॥ विश्वामित्रें आव्हानिला अग्नी ॥ अमित कुंडें प्रज्वळोनी ॥ रक्तक्षता समपीं ॥५४॥
आपुला देह कापूनी ॥ कुंडीं देत आहुती लागुनी ॥ अंगें जाहलीं असती कर्तनीं ॥ छिन्नभिन्न ॥५५॥
ऐसें निर्वाण साधोनी ॥ बैसला विश्वामित्र मुनी ॥ तंव भगवती माता भवानी ॥ उभी असे पुढां ॥५६॥
भवानी ह्मणे तुष्टलें माग ॥ काय इच्छितोसि तें सांग ॥ परि कापिलें होतें जें अष्टांग ॥ तें दिव्यदेह केलें ॥५७॥
मग तियेसि विश्वामित्र ह्मणे ॥ माते येक माव करणें ॥ तरी आदीं दारवंठे रुंधणें ॥ अयोध्येचे ॥५८॥
ऐसें ह्मणतां कुंडांतुनी ॥ व्याघ्र निघाले करीत ध्वनी ॥ गोंवारी पळती रानोरानी ॥ सहजें देखा ॥५९॥
त्याव्याघ्रां उदरभरण कैंचे ॥ जन रोधिले मार्गींचे ॥ राजद्वार अयोध्येचें ॥ रोधिलें तेंही ॥६०॥
दुःखित जाहले मुनिजन ॥ मार्ग खुंटला अकारण ॥ सर्वसूखांचें कारण ॥ राहिलें व्यापार ॥६१॥
मग रायासि श्रृत जाहलें ॥ नागरीकजनीं विनविलें ॥ कीं व्याघ्रांहीं खादलें ॥ अपार जन ॥६२॥
रायासि ह्मणती नगरलोक ॥ हरिश्वंदा तू प्रजापालक ॥ व्याघ्रीं पाडिलें महाधाक ॥ असतां तुह्मीं ॥६३॥
अहो जी व्याघ्रांचीं थाटें ॥ बैसलीं असती वाटोवाटें ॥ बालकें नेताति चोहटें ॥ धरूनियां ॥६४॥
ऐसी आंथिली हे विवशीं ॥ करणी की विश्वामित्र ऋषी ॥ तंव कळवळा आला रायासी ॥ बालकें धरितां ॥६५॥
ह्मणे आतां होवो भलतें ॥ निश्वयें मारावें या व्याघ्रांतें ॥ रावो निघाला सैन्यभरितें ॥ तये वेळीं ॥६६॥
छत्तीसकोटी रहंवर ॥ ऐशीसहस्त्र कुंजर ॥ साठींसहस्त्र असिवार ॥ पायभारां मिती नाहीं ॥६७॥
रावो निघाला दक्षिणपंथें ॥ मारीत चालिला व्याघ्रांतें ॥ तंव सिद्धाश्रमीं विश्र्वामित्रें ॥ काय केलें ॥६८॥
रायाचा सैन्यभार लक्षूनी ॥ निघालिया दोनी हरिणी ॥ तंव रावो घ्याघ्या ह्मणवोनी ॥ लागला पाठीं ॥६९॥
सैन्य भार राहिला मागें ॥ राव निघाला तुरंगवेगें ॥ मग तीं सिद्धाश्रमासि दोघें ॥ पावलीं हरिणें ॥७०॥
अदृश्य जाहलीं हरिणें जेथें ॥ ऋतु प्रकटला असे तेथें ॥ रम्य सिद्धाश्रमाभोंवतें॥ दिसे वनस्थळ ॥७१॥
तंव विश्वामित्रें केली करणी ॥ दोनी रचिल्या क्ळावंतिणी ॥ त्या आलिया राया देखोनी ॥ संभ्रमेसी ॥७२॥
पंचमराग आळविला ॥ वसंत राग राहविला ॥ वोप त्रिपदे दावूं लागला ॥ कळा देखोनी ॥७३॥
रावो तारामतीसहित ॥ हरिश्वंद्र सक्तीर्तिंवंत ॥ राहिला कौतुक पाहत ॥ भुललें मन ॥७४॥
रायें त्याग देऊं आरंभिला ॥ तंव नृत्यांगनाहीं निवारिला ॥ ह्मणती अवसर पाहिजे दीधला ॥ आह्मासि राया ॥७५॥
तंव सत्वकीर्ती प्रधान कोपोनी ॥ ह्मणे यांसी दवडा मारोनी ॥ सत्वधीर राजा ह्मणवोनी ॥ सत्व नाहीं सांडिलें ॥७६॥
मग त्या रडताचि निघाल्या ॥ ऋषिआश्रमासि पातल्या ॥ स्फुंदोनि आपुला वृतांत कथिला ॥ विश्वामित्रासी ॥७७॥
ऐकोनि ऋषी कोपला ॥ तवकें करुनिया उठिला ॥ द्वेषें लवलाहें पातला ॥ रायाजवळी ॥७८॥
ह्मणे चांडाळ दुराचारी ॥ माझीं बाळकें मारिलीं निर्धारीं ॥ कां आलासि वनाभीतरी ॥ माझिये दुष्टा ॥७९॥
ऐसिय माझे सिद्धवनीं ॥ चिते वृक आणि हरिणी ॥ सिंह व्याघ्रां सम जाणोनी ॥ मेळविलें येथें ॥८०॥
येथें सर्पा आणि खरेश्वरा ॥ वैर नाहीं अणुमात्रा ॥ कीं मूषकां आणि मांजरां ॥ नाहीं वैर ॥८१॥
तूं चांडाळ दुराचारी ॥ येथें कैसा आलासि वैरी ॥ शिविया देत परोपरी ॥ विश्वामित्र नृपातें ॥८२॥
तंव तारामती धांवुनी ॥ लागे ऋषीचिये चरणी ॥ ह्मणे क्षमा कीजे जी मुनी ॥ पडली चूक ॥८३॥
तैसाचि सत्कीर्तीं प्रधान ॥ विनवीतसे कर जोडून ॥ आमुचा अपराध ह्मणवोन ॥ केलें दंडवत ॥८४॥
रावो ह्मणे कळलें नाहीं ॥ येरवीं मी न करितों काहीं ॥ चुकी पडली जी देहीं ॥ क्षमा कीजे ॥८५॥
मग ऋषी तेथूनि परतला ॥ आणि रावो चालता जाहला ॥ जातां रायें तडाग देखिला ॥ उत्तम येक ॥८६॥
चातक आले चरावया ॥ मयूर सारसें साळया ॥ राजहंस पक्षी राया ॥ करिती क्रीडा ॥८७॥
रावो ह्मणे हें अति निर्मळ ॥ पवित्रपणें स्वानंदशीतळ ॥ तरी स्नान कीजे जळ ॥ उत्तम देखोनी ॥८८॥
तंव जाहला अस्तमान ॥ तेथेंचि राहिला हरिश्वंद्र जाण ॥ परि ऋषींने रचिली कवण ॥ माव देखा ॥८९॥
वसिष्ठ प्रयागीं राहिला ॥ रावो येकलाचि पडीळाला ॥ तो विश्वामित्रें आपायीं पाडीला ॥ वसिष्ठा न कळतां ॥९०॥
होतां अर्धरात्र निशी ॥ शयन जाहलें राजयासी ॥ तंव माव विश्वामित्र ऋषी ॥ रचिता होय ॥९१॥
राजा स्वप्न असे देखत ॥ कीं स्वप्नीं दान केलें समस्त ॥ आपुलें काहीं नवखंडांत ॥ उरलेंचि नाहीं ।९२॥
राज्यावेगळें आपणा केलें ॥ ऐसें विपरीत स्वप्न देखिलें ॥ कीं सकळही पुण्य घातलें ॥ विप्राहातीं ॥९३॥
रावो दचकोनियां उठिला ॥ मनीं थोर असे भ्याला ॥ ह्मणे मज विप्र कोठोनि भेटला ॥ स्वप्नामाजी ॥९४॥
असो जालिया प्रातःकाळीं ॥ प्रधान बोलविला जवळी ॥ तया सांगीतली बोली ॥ स्वप्नावस्थेची ॥९५॥
ह्मणे म्यां स्वप्नीं विप्राकारणें ॥ स्वहातें दीधलें राज्यभोगणें ॥ तंव सत्वकीर्ति प्रधान ह्मणे ॥ स्वामी ऐका ॥९६॥
राया ऐसें होय तेणें ॥ आधीं सचैल स्नान करणें ॥ मग सिचित्तअंतः करणें ॥ कीजे धर्म ॥९७॥
असो राजा राणी आणि प्रधान ॥ तिघीं केलें सचैल स्नान ॥ तंव विश्वामित्र माव आपण ॥ काय करिताजाहला ॥९८॥
सिद्धसरोवरीं स्नान करितां ॥ विश्वामित्र आला अवचित ॥ तयासि रूप पालटितां ॥ नलगे वेळ ॥९९॥
महायोग्य ब्राह्मण ॥ विश्वामित्र जाहला आपण ॥ ह्मणे संकल्प सांगितलिया जाण ॥ मागेन तें देंइजे ॥१००॥
रावो ह्मणे काय पाहिजे ॥ येरु हास्य करोनि मागिजे ॥ ह्मणे राया मजसी दीजे ॥ महादान ॥१॥
मज सुवर्ण औटभारा दान दीजे जी राजेंद्रा ॥ ह्मणोनि संकल्पीं दक्षिणकरा ॥ सरसाविलें विप्रें ॥२॥
तंव ते तारामती ह्मणे ॥ हेंचि आह्मांसही देणें ॥ मग संकल्प घातला तेणें ॥ हरिश्वंद्रराये ॥३॥
ह्मणे अयोध्यासी जाइजे ॥ तेथें तुमचें उत्तीर्ण होइजे ॥ तरी तुह्मीं बीजें कीजे ॥ आमुचे नगरीं ॥४॥
मग ऋषि राजा आणि राणी ॥ सकळ आलीं अयोध्याभुवनीं ॥ तंव तारामती सिंहासनीं ॥ चालिला बैसो ५॥
ह्मणोनि तये ऋषि कोपला ॥ पालव तिच आंसुडिला ह्मणे सांडूनि राव येकला ॥ बैसों केवीं आलीस तूं ॥६॥
तारामती होवोनि दुःखित ॥ हरिश्वंद्रापाशीं येत ॥ ह्मणे अनुचित असे बोलत ॥ ऋषी पाहेंपां ॥७॥
हरिश्वंद्रासि ऋषि ह्मणे ॥ राया सत्वाचें करीं सांडणें ॥ नाहीं तरी स्वप्नींचें देणें ॥ केलें पाहिजे सत्य तुज ॥८॥
तुवां सिद्धाश्रमा भीतरीं ॥ स्वप्न देखिलें असे रात्रीं ॥ तें केलें पाहिजे साचारी ॥ राज्यसर्मपणें ॥९॥
जरी राज्य तुझें नसे ॥ मग तारामती कां सिंहासनीं बैसे ॥ तरी वाचे बोलिलासि तैसे ॥ नव्हे मन भूपाळा ॥११०॥
रावो ह्मणे औटभारसुवर्णा ॥ भिजवूनि देतों दक्षिणा ॥ ऐसें ऐकतां ब्राह्मणा ॥ आलें हांसें ॥११॥
ह्मणे भांडार तें कवणाचें ॥ राज्य तरी ब्राह्मणाचें ॥ हें न विचारितां सत्व तुमचें ॥ राखे केवीं ॥१२॥
आतां औटभार सोनें ॥ ते दक्षिणा कोठोनि देणें ॥ राखीं आपुले सत्वाकारणें ॥ सूर्यवंशोद्भवा ॥१३॥
ह्मणसी भांडारींचें आणा ॥ परि तें दीधलें ब्राह्मणा ॥ तरी शब्द वाचेसि उणा ॥ बोलोंनये ॥१४॥
सिंहासनीं न बैसिजे ॥ तारामती सर्वें घेइजे ॥ अन्यदेशीं बीजें कीजे ॥ येथोनियां ॥१५॥
ऐसें ह्मणोनि क्रोधें उठिला ॥ रावो मागुते करीं बाधिला ॥ ध्वजस्तंभा जवळी आणिला ॥ ओढोनियां ॥१६॥
मागुती तारामतीसि ह्मणे ॥ माझें औटभार सुवर्ण देणें ॥ नाहींतरी सत्त्व सांडणें ॥ मग मी जाईन ॥१७॥
तंव आपण तारामती ॥ ह्मणे तया ऋषीप्रती ॥ कीं अवघड पडलियाही स्थिती ॥ सत्व केवीम सांडिजे ॥१८॥
मग ऋषीसि आला कोप ॥ संतापें प्रज्वळला अमूप ॥ जेवीं प्रळयकाळींचा दीप ॥ हुताशन ॥१९॥
तारामती सती राणी ॥ तिये विश्वामित्र करी जाचणी ॥ मागुतीं हात बांधोनी ॥ मारीतसे ॥१२०॥
तंव तें रोहिदास पुत्रा ॥ ठाउकें जाहलें जगत्रा ॥ ह्मणती जी बाळा राजद्दारा ॥ काय जाहलें ।२१॥
हाहाबोलें पातला पुत्र ॥ तंव रागें भरला विश्वामित्र ॥ कीं मारावयासि कर ॥ उचलिला वेगें ॥२२॥
पुत्रासि ह्मणे सत्त्व सांडिजे ॥ येरें सुष्ठु उत्तर दीजे ॥ सत्व सांडितां पूर्वजीं लाजि ॥ सूर्यवंशीं ॥२३॥
पुत्र रावो तारामती ॥ कोणी सत्व न सांडिती ॥ तंव लोक वचनीं बोलती ॥ कीं हा चांडाळ ब्राह्मण ॥२४॥
सत्वकीर्ती प्रधान ह्मणे ॥ ऋषे माझें वचन ऐकिणें ॥ पूर्वजां जेवी होय वर्तणें ॥ तैसेंच कीजे ॥२५॥
आतां आन न विचारिजे ॥ दक्षिणा आपुली तुह्मीं घेइजे ॥ महिमा रायाचा राखिजे ॥ कॄपा करोनी ॥२६॥
तंव तो विश्वामित्र ह्मणे ॥ लोकां नागवोनि द्रव्य घेणें ॥ येणें राया सत्व राखणें ॥ करीं आतां ॥२७॥
नातरी आतां राज्य कैंचें ॥ औटभार सुवर्ण देयीं आमुचें ॥ देणें जरी असेल साचें ॥ तरी सत्व राखिजे ॥२८॥
तंव रोहिदास पुत्र ह्मणे ॥ सत्य आह्मां दक्षिणा देणें ॥ जें माझिये पितयाचे वचनें ॥ मानिलें असे ॥२९॥
येरु अंतरीं करोनि हास्य ॥ ह्मणे तिघांचें येक मानस ॥ तरी गेलें तप लयास ॥ माझें सत्य ॥१३०॥
सत्वधीर पुत्र पाहीं ॥ हें वसिष्ठे सांगीतिलें नाहीं ॥ नातरीं आणिक करितों काहीं ॥ हरिश्वंद्राचें ॥३१॥
मग तो बंधनींचा सोडिला रावो ॥ राणीसहित पाहाहो ॥ आणि ह्मणे रोहिदासा जा हो ॥ माझी दक्षिणा देवोनी ॥३२॥
माझिया देशाहूनि परता ॥ राया जायीं राणीसह सुता ॥ दक्षिणा देऊनि अकिंचतना ॥ रक्षीं आपुली ॥३३॥
रावो ह्मणे मी आपणातें ॥ विकीन स्वामी भलतयातें ॥ परी तुमच्या दक्षिणाऋणातें ॥ उत्तीर्ण होईन ॥३४॥
कांतिनगरासि जाईन ॥ आपणा गाहाण ठेवीन ॥ परि मी उत्तीर्ण होईन ॥ तुमचे ऋणासी ॥३५॥
वाराणसी ठाव पवित्र ॥ तेथें जाऊं आह्मी सहपुत्र ॥ मग होऊं उत्तीर्णमात्र ॥ दक्षिणे तुमचें ॥३६॥
शेखीं मर्यादा करूनि निश्चिती ॥ घडी न लागे जी महामती ॥ ऐसें ह्मणोनियां भूपती ॥ निघाता जाहला ॥३७॥
विश्वामित्र ह्मणे नरेशा ॥ संगें कनक नेतोसि कैसा ॥ आतां सांडोनि सर्व आशा ॥ जाणें तुज ॥३८॥
ह्मणे येणें घेतलं कीती ॥ याची सर्वत्र घ्यारे झडती ॥ रायाची सकळही संपत्ती ॥ प्रीतकारपणें घेतली ॥३९॥
अंगावरील हेमभूषणें ॥ ऋषींनें घेतलें सकळ सोनें ॥ मग निघालीं तिघेंजणें ॥ देऊनि सर्व ॥१४०॥
तंव नगरीं लोक नगनारी ॥ बालकें रुदन करिती भारी ॥ मयूर सारिका अपारीं ॥ आदिकरोनी ॥४१॥
वैराटिका आळविती ॥ केउतीं तिघें जाती ह्मणती ॥ गाई वत्से जाहलीं ॥ सांडिती ॥ चारा पान्हा ॥४२॥
याचिपरी चतुर्विधा नारी ॥ चढोनि माडिये धवलारीं ॥ नागरीक जन अयोध्यापुरीं ॥ दाटले चौहाटां ॥४३॥
ह्मणती आतां ये समयीं तिन्ही ॥ कैसें निघालीं नगरींहुनी ॥ सहोदर आणि तात जननी ॥ आमुचीं सत्य ॥४४॥
ऐसे लोक रुदना करिती ॥ कोठें जातसां ह्मणोनि पुसती ॥ आंसुवें पल्लवीं पुशिती ॥ नेत्रकमळींचीं ॥४५॥
तीं तिघें सुकुमारें राजसें ॥ पाय रगडिती कंटकांसारिसे ॥ तारामती आंसुवें पुसें ॥ ह्मणे उगा बा रोहिदासा ॥४६॥
चालिलीं तिघेंजणें सांगातें ॥ लोक रुदना करिते तेथें ॥ मग हरिश्वंद्र तयांतें ॥ राहा ह्मणोनि गहिंवरे ॥४७॥
लोक गहिंवरती उकसांबुकसां ॥ ह्मणती राव सत्वाचा ठसा ॥ आतां पडिला असे फांसां ॥ चालावयाचे ॥४८॥
मार्गी चालत असतां तयां ॥ कंकर रूपती तळविया ॥ मग तो विश्वामित्र तया ॥ आणिक करी काय ॥४९॥
जेवीं देहासरिशी छाया ॥ कीं प्राणासवें असे माया ॥ तैसें प्रेम असे राया ॥ तिघांजणासी ॥१५०॥
तारामती हरिश्वंद्र ॥ मागें चालतसे लेंकुर ॥ ऐसा महासत्वधीर ॥ रोहिदास तो ॥५१॥
करुणा येतसे अंतरीं जीवा ॥ ह्मणे धांवधांव गा केशवा ॥ माझें बाळक जी सदाशिवा ॥ कष्टत असे ॥५२॥
तये वेळीं विश्वामित्र तेथें ॥ आव्हानीत असे सूर्यांतें ॥ ह्मणे तुवां द्वादशकळातें ॥ तपावें तीव्र ॥५३॥
मग तो सूर्य द्वादशकळीं ॥ तपत असे गा विशाळा ॥ तो तया रोहिदासा बाळा ॥ भावी कल्पांत ॥५४॥
तंव ह्मणे राव जन्मेजयो ॥ येकवंशींच्या सूर्य आणि रावो ॥ तरी तपावयासि उपावो ॥ काय ह्मणोनी ॥५५॥
मग वैशंपायन बोले वचनीं ॥ कीं विश्वामित्रें सहस्त्रकिरणी ॥ प्रसन्न केला होता ह्मणवोनी ॥ करीतसे कार्य ॥५६॥
राया सज्जन अथवा सोइरा ॥ माता पिता आणि पुत्रा ॥ वचन दीधलिया अन्यत्रा ॥ करणें लागे ॥५७॥
तरी विश्वामित्र हा धरणी ॥ शापूनि पाडील दिनमणी ॥ ह्मणोनि तपे खडतरकिरणीं ॥ सूर्यनारायण ॥५८॥
जो दुसरी सृष्टी कर्ता ॥ न्युनत्व आणिता विधात्या ॥ तरी तो पाडूं काय आदित्या ॥ राहों शके ॥५९॥
असो मग विश्वामित्रें जाणा ॥ आज्ञा केली असे वरूणा ॥ कीं मार्गीं चालतां जीवना ॥ नसावें कीठें ॥१६०॥
यानंतरें माव करोनी ॥ आव्हाटें भरिले सकळ रानीं ॥ सराटें खडतर रुपती चरणीं ॥ पाय मेदिनीं न देववे ॥६१॥
तैं चैत्रमासींचा उन्हाळा ॥ सूर्य तपे बाराकळां ॥ राव राणी आणि बाळा ॥ कष्ट होती अपार ॥६२॥
सकळां ठायी उदक पाहती ॥ कूप विहिरी तडागें रितीं ॥ दुःखें व्याकुळ होताती ॥ छायेविण ॥६३॥
ऐसा सूर्य माघ्यान्हीं आला ॥ खडतर काळांहीं तपों लागला ॥ तेणें कूर्म पाताळीं पोळला ॥ पृथ्वीगर्भीं ॥६४॥
शेष पोळला सहस्त्रफणी ॥ सांडू पाहे मस्तकींचा मणी ॥ वराहाची दाढा पोळोनी ॥ पावला दुःख ॥६५॥
राव जातसे जेणें पंथें ॥ तंव देखिलें सरितेतें ॥ परि उदक नाहीं तेथें । किंचितमात्र ॥६६॥
अभक्ताचें अंतर जैसें ॥ भीतरीं परब्रह्मा किमपिन वसे ॥ सारितानीर जाहलें तैसें ॥ न दिसे राया ॥६७॥
मग पुढारें मनीं चिंतिती ॥ कोठें बैसिजे बाळा ह्मणती ॥ छाया स्वल्पही न देखती ॥ प्रसंगास्तव ॥६८॥
तेव्हां विश्वामित्रें माव केली ॥ वृद्ध ब्राह्मणें काठीं टेंकिली ॥ थरथरां मान कांपों लागली ॥ तयाची पैं ।६९॥
ह्मणे स्वस्ति गा यजमाना ॥ माझी भार्या गर्भिणी जाणा ॥ कष्टलों वांचूनि पांयतणा ॥ वनीं या मी ॥१७०॥
तंव सत्वाचा सगारू ॥ पायतणीं घालोनि करू ॥ घ्याघ्या जी ह्मणोनि आदरु ॥ केला तयाचा ॥७१॥
ऐशीं त्रिवर्गांचीं ही पायतणें ॥ घेतलीं तेणें ब्राह्मणें ॥ मग तीं अनवाणीं चरणें ॥ तिघें चालती ॥७२॥
यापरी राया शतयोजनें ॥ तयां घडलें मार्ग क्रमणें ॥ जाणों ऋषीचें तपकेणें ॥ प्राप्त व्हावया ॥७३॥
जो सदा बैसे सुखासनीं ॥ तो चरणीं चाले खरड मेदिनी ॥ सूर्यतापें जिव्हा वदनीं ॥ जाहली शुष्क ॥७४॥
विश्वामित्राचिये भेणें ॥ द्वादशात्म तपे दारूण ॥ विरों शकती चंड पाषाण ॥ तेथें छाया असे कैंची ॥७५॥
तापें सर्वांगे तापलीं ॥ तळवां पोळों लागलीं ॥ मुखें म्लान कोमाइलीं ॥ तिघांजणांची ॥७६॥
पूर्वी नळासि विपत्य घडलें ॥ तेणें इतुके कष्ट नाहीं भोगिले ॥ पांडवही वनवासा गेले ॥ परि दुःख ऐसें नाहीं ॥७७॥
असो ऐशा उष्ण देशांत ॥ हरिश्चंद्र असे चालत ॥ तंव विश्वामित्र वायूसि ह्मणत ॥ कीं वाजूं नको ॥७८॥
इये वर्भीं तूं जरी वाजसी ॥ तरी भस्म करीन निश्वयेंसी ॥ तेणें भिवोनि विश्वामित्रासी ॥ मंद जाहला ॥७९॥
मागुती आणिक माव केली ॥ पोवई तेथें रचियेली ॥ जये मागीं तिघें आलीं ॥ कष्टत ॥१८०॥
तेथें विश्वामित्रानें देख ॥ ब्राह्मणरूप धरिलें विशेष ॥ उदकें भरोनि आणिला कलश ॥ सुवर्णाचा ॥८१॥
अहो श्रमलांति हें घ्या ह्मणोनी ॥ देताजाहला शीतळपाणी परि हरिश्वंद्र बोले वचनीं ॥ सत्वसमुद्र ॥८२॥
ह्मणे पोवईचें प्राशितां जीवन ॥ जोडिलें सुकृत जाय अकारण ॥ केलें असे जें दानपुण्य ॥ तें अवघें वितुळे ॥८३॥
अन्नछत्रीं केलिया भोजन ॥ निर्फळ संसार होय संपूर्ण ॥ मग विश्वामित्र बोले वचन ॥ हरिश्वद्रांसी ॥८४॥
कीं इतुकी होतां जाचणीं ॥ सत्व राखिसी अंतःकरणीं ॥ शरीररक्षणार्थ घेतां पाणी ॥ दूषण काय ।८५॥
राजा ह्मणे हो महामती ॥ भोगणें आपुली विपत्ती ॥ सत्व सांडिल्या प्राप्त कुगती ॥ होय प्राणिया ॥८६॥
जें तरी सत्वातें हारविती ॥ त्यांची सदा होय अपकीतीं ॥ जन अवघे तयां निंदिती ॥ जगतांमध्यें ॥८७॥
ऐसें ह्मणोनि सत्वखाणीं ॥ पुढें चालता होय चरणीं ॥ तंव दूरी तारामती राणी ॥ अंतरली तया ॥८८॥
तयेसही ऋषि ह्मणत ॥ चाल वो तूं पोवईआंत ॥ तुझिये पतीसि उपचार बहुत ॥ श्रमहारक होताती ॥८९॥
भीतरीं उदक असे शीतळ ॥ तें त्वां प्राशावें निर्मळ जळ ॥ कापुरमिश्रित परिमळ ॥ नानापरींचीं उदकें ॥१९०॥
ऐकोनि तारामती ह्मणे ॥ हें माझें जी नव्हें करणें ॥ पोवईचें उदक घेणें ॥ केविं घडे मज ॥९१॥
येरु ह्मणे तूं सुकुमार पूर्ण ॥ चालतां भागलीस अनुदीन ॥ जाऊं पाहती तुझे प्राण । उदकावांचोनी ॥९२॥
पैल पाहें तुझा राजेंद्र ॥ पोवईमध्यें जाहला स्थिर ॥ शब्द करीतसे मावकर ॥ कीं आरती ये ह्मणवोनी ॥९३॥
ऐसी ऋषीनें माव केली ॥ ऐकतां सती स्तब्ध जाहली ॥ ह्मणे विपरीत करणी घडली ॥ राव पोवईमाजी केविं राहे ॥९४॥
शेष जरी सांडील धरणी ॥ समुद्र मर्यादा जाय सांडुनी ॥ तरीच पोवईचें पाणी । घेईल राजा ॥९५॥
ऐसी ते पोवई सांडुनी ॥ निघाली सत्वगुणाची जननी ॥ कीं विश्वामित्राची करणी ॥ जाहली निर्फळ ॥९६॥
मागूनि रोहिदास असे येत ॥ देखोनि ऋषी आला धांवत ॥ उचलोनि घे कडीये त्वरित ॥ त्या बाळाकासी ॥९७॥
ह्मणे बाळा घेई उदकासी ॥ ऐसा आणिला पोवईपाशीं ॥ बहुत सायास केले तयासी ॥ उदक घेई ह्मणवोनी ॥९८॥
तंव ऋषीसि बाळ बोले ॥ कीं हे मजला न घडे वहिलें ॥ पोवईंचें उदक प्राशिलें ॥ सूर्यवंशीं न घडे हें ॥९९॥
ऐसें मुनीसि बोलुनी ॥ बाळ निघाला तेथूनी तंव प्रज्वळिला दाववन्हीं ॥ विश्वामित्रें ॥२००॥
तृण माथांहूनि परतें ॥ वाढलें असे भोवतें ॥ तिघें जाती ऐशिया पंथें ॥ दुःखेकरोनी ॥१॥
असंभाव्य अग्नि पेटला ॥ आकाशी धडाडिती ज्वाळा ॥ तो अग्नि विश्वामित्रासि भ्याला ॥ शापास्तव ॥२॥
तयां भोंवता अग्नि भावें ॥ ज्वाळा लागती दुष्टभावें ॥ तंव मातेनें घेतला कडिये ॥ रोहिदासासी ॥३॥
ज्वाळा तयांतें लागती ॥ सर्वांगीं फोड तरारती ॥ घारी गिघें आकाशीं धांवती ॥ नरणभयास्तव ॥४॥
त्रिवर्गें ह्मणती आलें मरण ॥ परि ब्राह्मणाचें राहिलें ऋण ॥ काय करील नारायण ॥ तें न कळे आह्मां ॥५॥
रोहिदा सही आरंबळला ॥ दुःखें बापुडा दीन जाहला ॥ मग तया पोटेंसि धरिला ॥ तारामतीनें ॥६॥
दुःखश्रमांचा कळस जाहला ॥ येरयेरां न देखती डोळा ॥ ऐसें वर्तलें तये वेळां ॥ त्रिवर्गासी ॥७॥
रक्त पीत नील ज्वाळा ॥ लागल्या दिसती व्योममडळा ॥ अग्नी धडाडिला विशाळा ॥ डोळं काहीं दिसेना ॥८॥
असंभाव्य दाटला धूर ॥ चुकोनि धांवती येरयेर ॥ तारामती शोधी लेंकुर ॥ आणि आपुले पतीसी ॥९॥
अग्नि झगटला अंगासी ॥ वस्त्रे पेटलें ज्वाळेंसीं ॥ कटकटा ह्मणे हृषीकेशी ॥ काय केलें दयाळा ॥२१०॥
तंव देखिला येक वृद्ध ब्राह्मण ॥ तारामती ह्मणे हा येथ कोण ॥ यातें पतिपुत्र पुसों ह्मणवोन ॥ सरसावली पुढारां ॥११॥
ॠषीसि करोनिया नमन ॥ ह्मणे देखिले काय दोघे जण ॥ येरु ह्मणे जळोनि जाण ॥ भस्म जाहले ॥१२॥
मग तो ब्राह्मण दाखवूं चाले ॥ येरी कटकटा ह्मणोनि बोले ॥ तंव दोघे जळोनियां पडिले ॥ येरी देखती जाहली ॥१३॥
ऐसें तयांतें देखोनि ॥ सती अंग घाली धरणीं ॥ ह्मणे विधातया शूळपाणी ॥ ऐसें काय प्राक्तन ॥१४॥
अहा हरिश्वंद्रा भूपाळा ॥ सूर्यवंशीचिया निर्मळा ॥ आतां तुजलागीं मेघसांवळा ॥ कोपळा कैसा ॥१५॥
अगा ये पुत्रा चूडामणी ॥ कुळदीपक तूं त्रिभुवनीं ॥ ऐसे तारामती राणी ॥ करी रुदन ॥१६॥
बाळा मज कां जाहलासि उदास ॥ माझा कां घेतला तुवां त्रास ॥ शुन्य जाहला सूर्यवंश ॥ तुजविणें पुत्रा ॥१७॥
आतां असो हें रुदन ॥ ग्रंथ वाढेल निःकारण ॥ सांगो पुढील अनुसंधान ॥ कल्पतरूचें ॥१८॥
हे कथाकल्पतरूची मती ॥ बोलिली असे भागवतीं ॥ सकळ वर्णितां न आवरती ॥ कथापारू ॥१९॥
आतां असो हे ग्रंथकथा ॥ विश्वामित्राची माव भारता ॥ घेवोनि जाईल दोघां प्रेतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥२२०॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ सप्तमस्तबक मनोहरू ॥ हरिश्वंद्राआख्यानप्रकारू ॥ द्वादशाऽध्यायीं कथियेला ॥२२१॥