कथाकल्पतरू - स्तबक ७ - अध्याय ६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

वैशंपायनासि ह्मणे रावो ॥ येक फेडाजी संदेहो ॥ तरी कैसा वधिला दैत्यरावो ॥ शंखासुर तो ॥१॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ हा चतुर्थस्तबकीं असे प्रश्न ॥ वाडकथेचें करितां विस्तरण ॥ कोपतील श्रोते ॥२॥

देवें घेवोनि मत्स्यावतार ॥ सागरीं वधिला शंखासुर ॥ तया अग्रपूजेचा दिला अधिकार ॥ आणि वेद दीधले ब्रह्मयासी ॥३॥

आतां सांगों दुसरा अवतार ॥ पृथ्वीसि होतां दैत्यभार ॥ तैं कूर्मरूपें पृष्ठीं महीभार ॥ साहिला देवें ॥४॥

चंद्रावतीचिये उदरीं ॥ जन्म पावला श्रीहरी ॥ पितेपण दीधलें शरीरीं ॥ पूर्वजांसी ॥५॥

तये अंतरीं शिवपुरीभीतरीं ॥ मधुकैटभ उदेले क्षेत्री ॥ ते शक्तिरूपें श्रीहरी ॥ होय वधिता ॥६॥

तया मधुकैटभांची कथा ॥ पंचमस्तबकीं असे भारता ॥ श्रोतीं सप्तशती वाचितां ॥ ऐकिली असेल ॥७॥

ऐसा अवतारां भीतरीं ॥ तो सहजानंद मुरारी ॥ सृष्टिपालन करी चराचरीं ॥ कूर्मरूपें ॥८॥

आतां तिसरिये अवतारीं ॥ जाहला बराह श्रीहरी ॥ पद्मावतीचिये उदरीं ॥ पिता देवलह ॥९॥

तैं गुप्तरूपें विद्या दीधली ॥ आकांतसमयीं मूर्ती प्रकटली ॥ मम दैत्यासि जाहली समफळी ॥ अपार युद्धे ॥१०॥

तैं वराहरूपें दैत्यभारा ॥ वधोनि धरिली सागरांबरा ॥ दंष्ट्राग्रें रक्षिली अवधारा ॥ वराहरूपें ॥११॥

चवथा अवतार नृसिंहरूपें ॥ जाहला प्रल्हादाचिये कृपें ॥ दैत्यांचीं दवडोनि त्रिविधतापें ॥ दीधली मुक्ती ॥१२॥

तैं हिरण्यकश्यप निर्दाळिला ॥ आणि प्रल्हाद भक्त रक्षिला ॥ पुढें विरोचन मारिला ॥ नारीरूपें ॥१३॥

तें पुनरपि कथन करितां ॥ वाचे दूषण लागेल भारता ॥ द्वितीयस्तबकीं हे कथा ॥ कथिली असे ॥१४॥

बळी जोणिजे विरोचननंदन ॥ तयाचा पुत्र जाहला बाण ॥ तयासि शोणितापुर पट्टण ॥ दीधलें शिवें ॥१५॥

हें ऐकोनि इतुकियावरी ॥ जन्मेजय विनंती करी ॥ ह्मणे शोणितापुर नगरी ॥ जाहली कैसी ॥१६॥

कवणे गुणें हें नाम जाहलें ॥ कोणाचें अशुद्ध गोठलें ॥ आणि मेरूपाठारीं वसिन्नलें ॥ कवणे गुणें ॥१७॥

आणिक पुसणें तुह्मांकारण ॥ कीं नृसिंहरूपें विदारण ॥ केलें तें सांगा विस्तारून ॥ वैशंपायना ॥१८॥

मग ह्माणे वेदमूर्तीं ॥ राया बरवी पुसिली उक्ती ॥ परि हे कथिलीसे भारती ॥ द्वितीयस्तबकीं ॥१९॥

श्रोता ह्मणेल उचित नव्हे ॥ मागील कथेचे अनुभवें ॥ परि अवशिष्टा न चुकावें ॥ वक्तयानें ॥२०॥

जेवीं घरीं असतां चिंतामणी ॥ परिस लाधला सहजें रानीं ॥ तो काय न आणिजे भुवनीं ॥ विवेकियानें ॥२१॥

कस्तुरी आंतुडे गोठणीं ॥ ऐसें कदापि ये घडोनी ॥ तरी ते काय जावें सांडुनी ॥ विवेकियानें ॥२२॥

घरीं गाईंचे असतां वाडे ॥ जरी सहजें कामधेनु जोडे ॥ तरी सभाग्य कां दवडे ॥ तियेलागीं ॥२३॥

तैसी हे कथा सांगतां ॥ रसनवाळी पावे उचिता ॥ कीं दुग्धीं साकरे मेळवितां ॥ गोडी सांडि केवीं ॥२४॥

तरी भूपते सावधानचित्तें ॥ आतां परिसें त्या कथेतें ॥ कीं शोणितापुर नगरीतें ॥ नाम कैसें जाहलें ॥२५॥

असो कोणे येक काळवेळीं ॥ शंभु आणी शैलबाळी ॥ श्रृंगारें करितां नानारळी ॥ वर्तलें काय ॥२६॥

देवी अनुसरली का मबाणें ॥ देतसे गाढ आलिंगनें ॥ दोघे येरयेरां कारणें ॥ मोकळें न सोडिती ॥२७॥

पूर्णव्याप्ती जाहली अनंगा ॥ शंभु आणि महादुर्गा ॥ थोर सत्व उभयवर्गां ॥ मांडिलें सुरत ॥२८॥

दोघां पडिला साभिमान ॥ तंव आला तेथें हुताशंन ॥ अतिथिवेषें आशिर्वाद देऊन ॥ ठाकला उभा ॥२९॥

परि कोणे येके पुराणीं ॥ शिखिंरूपें गेला वज्रपांणी आणि अग्निपुरांणीची वाणी ॥ देवीं धाडिला हुताशन ॥३०॥

असो अतीत येतां पार्वती ॥ तामसदृष्टीनें जाहली पाहती ॥ तंव दान अर्पितसे पशुपती ॥ पार्वतीसी ॥३१॥

अतीता न धाडिजे विमुख ॥ हें जाणे देव त्र्यंबक ॥ मग वीर्य ग्रास पसा येक ॥ घाली महादेव ॥३२॥

आणिक कथा अग्निपुराणीं ॥ कीं पार्वती आली वीर्य घेवोनी ॥ तंव तें न जाणतां वन्ही ॥ प्राशन करीत ॥३३॥

परि पद्मपुराणींचा श्र्लोक ॥ जाणोनि हरवीर्याचा ग्रास ॥ सांडोनियां त्यागविवेक ॥ प्राशितसे वन्ही ॥३४॥

अमोघ शुक्र महादेवाचें ॥ तें वायां जावों न वंचे ॥ ह्मणोनि पावकें तयाचें ॥ केलें प्राशन ॥३५॥

वीर्य दारूण उग्रतर ॥ हृदयीं जाहलें खडतर ॥ तेणें अग्नि जाहला जर्जर ॥ दुःखमेळें ॥३६॥

पोट वाढलें अग्नीसी ॥ वाट नाहीं प्रसूतीसी ॥ आश्वर्य जाहलें मानसीं ॥ मग शभूनि पुसों गेला ॥३७॥

ह्मणे जयजयाजी शंकरा ॥ शर्वा त्र्यंबका तूं हरा ॥ जयजयाजी महेश्र्वरा ॥ कैलासपते ॥३८॥

जयजयाजी आदि देवा ॥ पंचवक्त्रावामदेवा ॥ सर्व रहस्य मूळठेवा ॥ तूंचि भक्तांचा ॥३९॥

महादेव महांकाळा ॥ पिनाकपाणी काळचिया काळा ॥ कर्पूरगौरा जाश्वनीळा ॥ त्रिभुवनपते ॥४०॥

जयजयाजी कर्मातीता ॥ त्रिपुरमर्दना सद्योजाता ॥ नृसिंहतनु संहारिता ॥ शरभरूपा नमोस्तु ते ॥४१॥

गजत्वचा काढोनि सगुण ॥ तयेंचें केलें पांघुरण ॥ शिर घेतलें ओंवून ॥ रुंडमाळेसी ॥४२॥

नृसिंहरूप जैं अवतरलें ॥ तैं त्रैलोक्य दीपावलें ॥ मग त्वां शरभरूप धरिलें ॥ पराभवासी ॥४३॥

तये दिवसापासोनि शंकर ॥ नाम बोलिजे तुह्मां परिकर ॥ तरी आतां संकट थोर ॥ निवारीं माझें ॥४४॥

तुवां घेवोनि शरभ स्वरूप ॥ पराभविलें नृसिंहरूप ॥ ह्मणोनि सकळांचा तूं अधिप ॥ महादेवा ॥४५॥

संकटसमयीं नीलकंठा ॥ मी अपमान पावलों मोठा ॥ तुझेनि शुक्रें गर्भ पोटा ॥ ठकिलों अद्भूत ॥४६॥

तरी मज अग्नीचें मोचन ॥ वेगीं करिता तूं पंचानन ॥ तंव कृपेनें द्रवलें मग ॥ त्रिलोचनाचें ॥४७॥

चंद्रचूंड ह्मणे गंगेपाशीं ॥ गर्भ प्रतिष्ठीं तयेचे उदरासी ॥ ऐसी आज्ञा पावकासी ॥ दीधली शिवें ॥४८॥

षण्मास असती जाहले ॥ कंठवरी उदर भरिलें ॥ जातवेद आला बहुकाळें ॥ गंगेजवळी ॥४९॥

तो गंगेसि प्रार्थूनि ह्मणे ॥ कीं थोर कष्टें मज घडलें येणें ॥ तें गर्भदुःख कूर्माचि जाणे ॥ कीं वराह मत्स्य ॥५०॥

परिसें माते भागरिथी ॥ आज्ञा दीधली जगन्नाथीं ॥ तरी आपुले उदरी प्रीतीं ॥ पाळी गर्भ हा ॥५१॥

ऐसा देव तो लाघवी ॥ जगा देखतां कर्तृत्व लपवी ॥ अनंत चरित्रे दाखवी ॥ जगामाजी ॥५२॥

जेवीं गजें कविट गिळिलें ॥ तें पोटीं न जिरपां गळालें ॥ मग पाहतां दिसे सगळें ॥ परि मगज हारपे ॥५३॥

त्याचिये परि अवधारीं ॥ गर्भ आकर्षी सुंदरी ॥ तंव पाहतां अग्निउदरीं ॥ काहींच नाहीं ॥५४॥

तो शंकराचा ह्मणवोन ॥ भागीरथी नुलंघी वचन ॥ शब्द तयाचा पाळून ॥ सामाविला उदरीं ॥५५॥

गर्भ येतां गंगोदरासी ॥ थोर जाहली कासाविशी ॥ न घरवेचि आपुले उदरासी ॥ भागीरथीतें ॥५६॥

ईश्वरतेज महागाढें ॥ तया गंगोदक जाहले थोडें ॥ ऐसें पडिलें महासांकडे ॥ भागीरथीसी ॥५७॥

पोटामध्यें न सामावे ॥ भोंवता उदरीं फिरता राहे ॥ मग श्रवण घ्राण मुखीं जाये ॥ वतोनियां ॥५८॥

ऐसी त्रिपंथा कष्टली भारी ॥ मग आपुले चरणनीरीं ॥ तें शैवतेज परिसरीं ॥ गाळिती होय नेत्रद्वारें ॥५९॥

तें अगणित शोणित ॥ रुधिर लोटलें असंख्यात ॥ तेणें जाहलें आलोहित ॥ तटाकस्थळ ॥६०॥

येक शरीर सहा आंननें ॥ बारा तया असती लोचनें ॥ ऐसा देह शंभुवीर्यानें ॥ जन्मला राया ॥६१॥

तंव ऋषीश्वरांच्या योषिता ॥ त्यांहीं गर्भ देखिला अवचिता ॥ कार्तिकमासीं स्नान करितां ॥ गंगेमाजी ॥६२॥

भारता मग त्या साहीजणी ॥ बालक लाविती आपुले स्तनीं ॥ ह्मणोनि त्या दिवसापासूनी ॥ बोलिजे कार्तिकेय तो ॥६३॥

गंगेन गाळिला गर्भींहुनी ॥ गांगेय बोलिजे ते गुणीं ॥ शरस्तभीं जन्म ह्मणोनी ॥ शरजन्मा तो ॥६४॥

परि अनारिस स्कंदपूराणीं ॥ कीं कॄत्तिका पडितां सीतें करोनी ॥ ह्मणोनि जागविला अग्नी ॥ सुखानिमित्त ॥६५॥

त्यांहीं भोंवताल्या बैसोनी ॥ आवडीं गुंडाळिला वन्हीं ॥ तंव धुम्ररूपें गर्भ अग्नी ॥ घाली उदरीं तयांचें ॥६६॥

अग्नि जाहला हळुवार ॥ परि येरींसि मार्गीं न धरवे धीर ॥ गंर्भव्यथा होतसे फार ॥ साहीजणीसी ॥६७॥

विचार करिती साही कृत्तिका ॥ ऋषि ह्मणतील गर्भ कैं अलोलिका ॥ तरि हा गाळितांचि विचार निका ॥ शुद्धत्वपणे ॥६८॥

मग तो भागीरथीच्या तीरीं ॥ गर्भ गाळिला योनिद्दारीं ॥ तंव येकवटपणें साही रुधिरीं ॥ जाहला येकपिंड ॥६९॥

मग कोणे येके शुभवेळी ॥ स्नानार्थ आली शैलबाळी ॥ तयेनें देखिलें नेत्रकमळीं ॥ निराश्रित अपत्य ॥७०॥

तया सहा मुखें द्वादश पाणी ॥ तेज दावी जेवी दिनमणी ॥ मुखीं आळवी दिव्यवाणी ॥ अमृतरूप ॥७१॥

पार्वती विचारी निजमनीं ॥ तंव बोलिली गगनवाणी ॥ कीं हा शंभुवीर्य ह्मणवोनी ॥ पाळीं गिरिजे ॥७२॥

असो गंगागर्भीं वाढिन्नला ॥ तेणें गांगेय नांव पावला ॥ आणि कृत्तिकागर्भी प्रवेशला ॥ ह्मणोनि कार्तिकेय ॥७३॥

तोचि शैलजेतें लाधला ॥ स्वामी नामें जगीं आथिला ॥ ऐसिये प्रकारीं जन्मला ॥ स्वामी कार्तिक ॥७४॥

हे स्कंदपुराणींची मती ॥ वर्णिली असे संस्कृतीं ॥ परि पद्मपुराणींची भारती ॥ अनारिसी राया ॥७५॥

भागीरथींये गर्भसांडिला ॥ तो नारदें गौरीसि बोधिला ॥ मग ते वाढवी शैलबाळा ॥ तया गर्भासी ॥७६॥

असो जेथें षण्मुखा जन्म जाहलें ॥ तेथें शोणितापुर वसिन्नलें ॥ कलांतरे नगर रचिलें ॥ बाणासुरानें ॥७७॥

जितुकीं नावें अशुद्दासी ॥ तितुकीं नावें तया नगरासी ॥ मग तेथेम बाणासुरासी ॥ भरिली शेंस ॥७८॥

परि हे असे जुनाट कथा ॥ ते तुज निवेदिली भारता ॥ मागां पुसिलीसे योग्यता ॥ शरभरूपाची ॥७९॥

आतां असो स्वामी कार्तिक ॥ येक आठवला जी विवेक ॥ तरी नृसिंहविदारण श्लोक ॥ सांगों राया ॥८०॥

असो मग इतुकिया उपरी ॥ जन्मेजयो प्रश्र्न करी ॥ की नृसिंहरूपा त्रिपुरारी ॥ कैसें विदारिता होय ॥८१॥

मग ते संपूर्ण निरुपणकथा ॥ वैशंपायन होय सांगता ॥ जेणें निःशेष तुटे व्यथा ॥ जन्ममरणांची ॥८२॥

येथोनि कथेसी बहु गोडी ॥ श्रवणांसि लाधे अलभ्य जोडी ॥ चैतन्यासी होती कोडी ॥ संतोषाच्या ॥८३॥

हिरा न कोमेजे चपळें ॥ चंद्रप्रवाहें अमृत न ढळे ॥ तैसा पुराणकथेचेनि मेळें ॥ मांडला ग्रंथ ॥८४॥

श्रोतीं व्हावें सावधान ॥ श्रवणीं ठेवावें निज मन ॥ कथा ऐकाहो पुण्यपावन ॥ जन्मेजयपश्नीं ॥८५॥

असो दोनी जोडोनि पाणी ॥ जन्मेजयो करी विनवणी ॥ ह्मणे धन्य तुमची वाचा मुनी ॥ पवित्रकारक ॥८६॥

तो जन्मेजय श्रोता रावो ॥ प्रश्नीतसे समर्पोनि भावो ॥ ह्मणे मज दीजे श्रवणलाहो ॥ वैशंपायना ॥८७॥

आमुची जड जीअवस्था ॥ पवित्र जाहली तुमच संगतां ॥ कीं मलिनमतीची वार्ता ॥ नुरली मुने ॥८८॥

तुमचे वक्त्रीं असे अमृत ॥ तेणें अचेता पावविती चेत ॥ महापुण्य फळे अकल्पित ॥ तुमचेनि बोलें ॥८९॥

तूं सर्वत्र चेतनबीज ॥ अभेदभक्ती ज्ञानचोज ॥ अंकूर स्तोमिं तेथें सहज ॥ दिसती शाखा ॥९०॥

फुटले अमृताचे पल्लव ॥ अज्ञानी तारिले अभिनव ॥ कीं मोक्षफळाचे बीजभाव ॥ प्रकटले देखा ॥९१॥

मी ह्मणवितसें धन्य जगीं ॥ वाक्यें ऐकिलीं महेशाजोगीं ॥ कीं कैलासींच पावलों वेगीं ॥ तव प्रसादें ॥९२॥

अग्नीनें स्तविला महेश ॥ तेथें केला नामप्रकाश ॥ परि येकेचि निवेदनें संतोष ॥ न वाटे मना ॥९३॥

तरी नृसिंहासि शरभरूपें ॥ ह्मणसी शिवें विदारिलें कोर्पे ॥ हें आयकिलें आह्मी सांपें ॥ तवमुखें जी ॥९४॥

नृसिंहरूपाची शिरकंवटी ॥ तिसी कमंडलु करी धूर्जटी ॥ आणि चर्माची केली दुपट्टी ॥ पांघूरावया ॥९५॥

हें सत्य न वाटे मनीं ॥ तरी कथणें महामुनी ॥ जेणें करोनि भ्रांतधूणी ॥ होय जगाची ॥९६॥

तरी आतां ते समूळ कथा ॥ सांगा मजसी द्विजनाथा ॥ कीं जेणें करोनि कृतार्थता ॥ होय श्रवणां ॥९७॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया वाढवेळ पुसिला प्रश्न ॥ तूं ग श्रोता विचक्षण ॥ सोमवंशीं ॥९८॥

तुझें अवधान देखोनी ॥ ऐसेंचि होतें माझ्या मनीं ॥ परि येथें शब्द दोन्ही ॥ न साहती राया ॥९९॥

हरिहरांठायीं निरंतर ॥ भेद न देखती जे नर ॥ त्यांहींच परिसावें उत्तर ॥ या कथेचें ॥१००॥

हरिहरांचे ठायीं जाण ॥ जयाची असे बुद्धि भिन्न ॥ तया तत्काळ होय पतन ॥ हे व्यासवाणी ॥१॥

जो हरी तोचि हर ॥ ऐसा जयाचा निर्धार ॥ तयासि लाधला परपार ॥ भवसमुद्राचा ॥२॥

जो तरी हीनबुद्धि त्यजोनी ॥ हरिहरकथा ऐकेल श्रवणीं ॥ तया मुक्तार्थाची मिळणी ॥ ऐहिकपरत्रीं ॥३॥

तंव राजा ह्मणे हो महाऋषी ॥ येथें कंकण ऐसें द्विजासी ॥ तरी कोण पातकी आद्यपुरुषीं ॥ देखेल भेद ॥४॥

परम निर्धार ऋषीश्वरा ॥ तोचि प्रकार तुह्मी आचरा ॥ जेणें येथींच्या अर्थसारा ॥ वरपडा होय ॥५॥

मग संतोषला ऋषिराजा ॥ ह्मणे मनोरथ पुरला माझा ॥ तरी परियेसीं परिक्षितिआत्मजा ॥ पुढिल कथेसी ॥६॥

आतां असो हा परमार्थ ॥ परस्परां होईल ग्रंथ ॥ तो ऐका पापनाशार्थ ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥७॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ सप्तमस्तबक मनोहरू ॥ कार्तिकषण्मुख‍उत्पत्तिप्रकारू ॥ षष्ठोऽध्यायीं कथियेला ॥१०८॥

॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP