कथाकल्पतरू - स्तबक ७ - अध्याय १५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

वैशंपायनासि ह्नणे जन्मेजयो ॥ येक असे जी संदेहो ॥ तरी त्या कथेचा अनुभवो ॥ सांगिजे मज ॥१॥

चंद्र सांगितला सिंधुजात ॥ परि त्या ह्नणती अत्रीचा सुत ॥ तरी हा मनींचा द्वितीयार्थ ॥ फेडी माझिये ॥२॥

हे फेडावी माझी अवस्था ॥ सांगोनियां मूळकथा ॥ मग जाहला बोलता ॥ वैशंपायन ॥३॥

रायासि ह्नणे मुनीश्वर ॥ हें कल्पपरत्वें चालवी ईश्वर ॥ जैसा येकचि असे नृत्यकार ॥ बहुतां रुपांचा ॥४॥

असो शांडिल्या आणि सुमती ॥ या होत्या बहिणी गा भूपती ॥ काशिराजाचिया अंगजाती ॥ पूर्वील काळीं ॥५॥

दोनी जालिया उपवरा ॥ शांडिल्या दीधली द्विजवरा ॥ परी सुमतीसि न मिळे नोवर ॥ ह्नणोनि जाहली तापसी ते ॥६॥

शांडिल्ये स्वरुप सौभाग्यता ॥ गुणें आथिली पतिव्रता ॥ पतिवचना वीण सर्वथा ॥ नुल्लंघी पद ॥७॥

सर्वदा पतीचें घ्यान मनीं ॥ तीर्थ व्रत नेणे स्वप्नीं ॥ भ्रतारपूजना वांचोनी ॥ नेघे उदकमात्र ॥८॥

भोजन शयन देत भ्रतारा ॥ चरण संवाहनूनि घाली वारा ॥ निद्रा जाणोनि मग उपहारा ॥ स्वीकारी आपण ॥९॥

आणि जे सुमती दुसरी ॥ ते मासोपवासें निराहारी ॥ परि येकेचि राहती नगरीं ॥ दोघी बहिणी ॥१०॥

असो मग कोणे एके दिनी ॥ अवधिया नगरा लागला वन्ही ॥ तंव शांडिल्या फिरवी पाणी ॥ मंदिराभोंवतें ॥११॥

ह्नणे मी असेन पतिव्रता ॥ तरी वैश्वानरा न येई आरुता ॥ ह्नणोनि प्रार्थी शमिसुता ॥ पतिव्रता ते ॥१२॥

ते जाणोनियां पतिव्रता ॥ अग्नि मुरडला गा भारता ॥ जेवी सिंहदर्शनें गजयूथा ॥ पडे फुटी ॥१३॥

कीं तमा लोपवी दिनकर ॥ नातरी मर्यादा राखी सागर ॥ तैस मुरडला वैश्वानर ॥ सतीचेनि बोलें ॥१४॥

सती आणि सत्यवादी ॥ दानशीळ आणि कर्मवादी ॥ राया इतुकियांचे शब्दीं ॥ वागती तत्वें ॥१५॥

इकडे सुमती होती देवस्थानीं ॥ ते नगर जळतां देखे नयनीं ॥ तंव वेगां येवोनि वन्ही ॥ जाळिलें खोपट तयेचें ॥१६॥

मग ते सुमती योगिणी ॥ आली शांडिल्येचे भुवनीं ॥ पाहतां विस्मय करोनि मनीं ॥ बोले शांडिल्येसी ॥१७॥

ह्नणे समस्त जळालें नगर ॥ मठमंडप तरुवर ॥ तरी तुझें वांचलें मंदिर ॥ कैशियापरी ॥१८॥

तंव शांडिल्या सांगे आपण ॥ माझें दैवत पतीचे चरण ॥ तयांची घातली म्यां आण ॥ अग्निपुरुषासी ॥१९॥

तरी पतिसेवेचें महिमान ॥ ह्नणोनि वांचलें हें भुवन ॥ भोंवतें सांडिलें म्याम जीवन ॥ तंतुमात्रे ॥२०॥

ऐसें ऐकोनि ह्नणे सुमती ॥ मी वो अंतरलें ऐसिये स्थिती ॥ मार्ग सांडोनि अन्यपंथी ॥ लागलें मी ॥२१॥

वयसा गेली शतसंवत्सर ॥ विकळ जाहले दशन नेत्र ॥ आतां कोण करील सैवर ॥ मज अदैवेचें ॥२२॥

तंव शांडिल्या ह्नणे वचनीं ॥ सूर्योदयीं जायीं देवस्थानीं ॥ जो देखशील वो बहिणी ॥ तो वरावा तुवां ॥२३॥

ऐसें ऐकोनियां वचन ॥ येरीचें उत्कंठिलें मन ॥ दृष्टीं पाहिलें देवस्थान ॥ भोगावतीतीरीं ॥२४॥

मग ते प्रवेशली गाभारां ॥ तंव देखिलें कौशिका विप्रा ॥ लशीचा वाहतसे झरा ॥ कुष्ठरोगें ॥२५॥

कर्ण वोष्ठ टाठुरलीं नखें ॥ श्वास न सांडवे नासिकें ॥ भीतरीं बैसलासे घाकें मक्षिकाचें ॥२६॥

तेथें ते प्रवेशली वनिता ॥ माळ घातली न पाहतां ॥ ह्नणे तूं पती आणि मी कांता ॥ सत्य जाण ॥२७॥

मग फुटलिया रविकर ॥ पाहे तंव कुष्ठरोग शरीर ॥ ह्नणोनि उदक तापवोनि शीघ्र ॥ न्हाणिलें तयासी ॥२८॥

नगरीं करुनि भिक्षाटण ॥ त्यासी जेववी उत्तमान्न ॥ आपुलिये तनूचें पांघरुण ॥ करी तयासी ॥२९॥

त्याचिये चरणींचे तीर्थ ॥ तें आपण नित्य प्राशित ॥ त्यासी रुचें तें घाली पथ्य ॥ सदाकाळीं ॥३०॥

त्यासी कराया मूत्रमळ ॥ दुरडां घालोनि वागवी पांगुळ ॥ ऐसें साधिलें तपोबळ ॥ पैठनगरीं ॥३१॥

मग कवणिये येके वेळीं ॥ पतीसि करोनियां पाखांळी ॥ दुरडां धालोनि सायंकाळीं ॥ नेत रोगिया तो ॥३२॥

येरुचे दृष्टी पडिली गणिका ॥ ह्नणे मज मेळवीं हे नायका ॥ नाहीं तरी मी प्रेतलो का ॥ गेलों जाण ॥३३॥

तंव तयेनें प्रार्थिला प्राणनाथ ॥ काहीं सांचवीन जी द्रव्यार्थ ॥ मग पुरवीन मनोरथ ॥ तुमचा स्वामी ॥३४॥

असो घेवोनि द्रव्यसामुगी ॥ मग ते रामा निघाली रात्री ॥ भ्रतार घेवोनियां शिरीं ॥ पतिव्रता ते ॥३५॥

तंव मांडव्य नामें मुनीश्वर ॥ तो सुळीं वोंविलासे तस्कर ॥ त्यासी लागला जातां कोंपर ॥ त्या कौशिकाचा ॥३६॥

तेणें दुखवला ऋषीश्वर ॥ ह्नणे जयाचा लागला कोंपर ॥ तो अर्कोदयीं दुष्टनर ॥ मरावा सत्य ॥३७॥

ऐसें ऐकोनि पतिव्रता ॥ भ्रतारासी ठेवोनि खालता ॥ मग प्रार्थिला तयेनें सविता ॥ नानापरी ॥३८॥

ऋषि बोलिला दुष्टवचन ॥ परी पति गेलिया मज दूषण ॥ कैसें पहावें म्यां वैधव्यपण ॥ आपुले नेत्रीं ॥३९॥

मी पतिव्रता असेन जरी ॥ तरी त्वां करावी सकळ रात्री ॥ उदयो जाहलिया क्षणमात्रीं ॥ शापीन तुज ॥४०॥

ऐसी ऐकोनि शापवार्ता ॥ तेणें अंतरीं भ्याला सविता ॥ मग रात्री केली समस्ता ॥ दहादिवस ॥४१॥

मग देवीं मिळोनि समस्तीं ॥ वार्ता पुसिली बृहस्पतीप्रती ॥ कीं निरोधिला कां देव गभस्ती ॥ दहादिवस ॥४२॥

समस्त राहिले व्यवहार ॥ होमहवन यज्ञ अध्वर ॥ आण जन्ममरणाचा आचार ॥ सर्व राहिला ॥४३॥

मार्ग खुंटले पांथिकारां ॥ प्रबळता जाहली निशाचरां ॥ वसतेधरीं तस्करां ॥ जाहले थार ॥४४॥

मग बोलिला बृहस्पती ॥ कीं सुमती नामें महासती ॥ तयेसि भ्यालासे गभस्ती ॥ सत्य जाणा ॥४५॥

तया उगवतां दिनकरा ॥ मृत्यु होईल प्राणेश्वर ॥ ऐसा शाप ऋषीश्वरा ॥ मांडव्याचा ॥४६॥

तरी देवा देवो उभयतां ॥ पिशाचें मानिती भूतां ॥ पतिव्रते वारी पतिव्रता ॥ पंडिता पंडित ॥४७॥

आतां स्वयंभुमुनीची सुता ॥ अनुसूया नामें पतिव्रता ॥ ते आत्रिऋषीची कांता ॥ उभवूं शकेल ॥४८॥

ऐसें ह्नणतां देवगुरु ॥ मग निघाले विधि हरि हरु ॥ आणि निघाला सुरेश्वरु ॥ देवांसहित ॥ ॥४९॥

सकळही तये क्षणीं ॥ भेटावया भालुकापाटणीं ॥ जेथें अत्रिऋषीची कामिनी ॥ अनसूया ते ॥५०॥

समस्तीं करोनि नमस्कार ॥ कथिला सुमतीचा विचार ॥ कीं सूर्याविण राहिला व्यवहार ॥ त्रैलोक्याचा ॥५१॥

ह्नणती त्वां ते सती प्रार्थोनी ॥ आनंद करावा त्रिभुवनीं ॥ तंव ते निघाली जननी ॥ देवत्रयांची ॥५२॥

पैठणी तीर्थ भोगावती ॥ तेथें कौशिकाची असे युवती ॥ जिये भ्यालासे गभस्ती ॥ शापवचनें ॥५३॥

तिये भेटोनि अत्रिकांता ॥ ह्नणे सुमते तूं पतिव्रता ॥ तरी उगवूंद्याचा सविता ॥ मजकारणें ॥५४॥

ऐसें ऐकोनि ह्नणे सुमता ॥ तूं साक्षात वो देवमाता ॥ परि हें करितां प्राणनाथा ॥ मुकेन मी सत्य ॥५५॥

तंव ह्नणे अनुसूया सती ॥ हें वो आणूं नको चित्तीं ॥ भानु प्रकाशतां तुझा पती ॥ आणीन मागुता ॥५६॥

धांडोळोनियां त्रिभुवन ॥ तुझें आणीन पतिरत्न ॥ आणिही राखीन ऋषिवचन ॥ मांडव्याचें ॥५७॥

हरीन कुष्टाचें दूषण ॥ हें टाळीन वो किडाळपण ॥ लोहाचें होय कांचन ॥ परिसें जेवीं ॥५८॥

मग तिचिया वचनावरी ॥ सूर्या प्रार्थितसे सुमती नारी ॥ तंव तो उदेला अंबरीं ॥ दिवसां दाहां ॥ ॥५९॥

भूमीसि लागतां रविकिरण ॥ तंव कौशिकें सांडिला प्राण ॥ मग अनसूय पतीचे चरण ॥ चिंती मनीं ॥६०॥

ह्नणे मी जरी पतिव्रता सती ॥ तुझी असेल चरणभक्ती ॥ तरी भगवंता उठवीं पती ॥ या सुमतीचा ॥६१॥

ऐसें करितां चरणचिंतन ॥ कौशिकाचे आले प्राण ॥ शरीर जाहलें जेवीं कांचन ॥ तेजभरेंसी ॥६२॥

मग सुमती लागोनि चरणीं ॥ ह्नणे माये त्वां राखिलीं दोनी ॥ आणि भेटली कामिनी ॥ कौशिकासी ॥६३॥

परि कौशिकें सांडिले होते प्राण ॥ तैं सुमतीनें त्यजिलें भूषण ॥ ह्नणोनि अनुसूया बोलिली वचन ॥ प्रमाणोत्तर ॥६४॥

कीं तुझिये अंगीची हे अवस्था ॥ ते आह्मी वांटोनि घेऊं समस्ता ॥ तरी रात्रीमाजी निद्रा करितां ॥ त्यजूं अलंकार ॥६५॥

ऐसें न करी जे योषा ॥ ते जडली जाण महादोषा ॥ तियेनें भ्रताराचे आयुष्या ॥ घातलें शस्त्र ॥६६॥

मग बोलिले त्रिमूर्ती ॥ अनुसूये तूं महासती ॥ आतां मनोभावाचिये प्रीतीं ॥ माग कांहीं ॥६७॥

तंव ते बोलिली सुंदरा ॥ विरिंचि विष्णु आणि शंकरा ॥ तुह्मीं माझिये यावें उदरा ॥ तिघांजणाहीं ॥६८॥

देव बोलिले तिघेजण ॥ अंशें येऊं सत्य जाण ॥ तुझे होऊं ही उत्तीर्ण ॥ महासतिये ॥६९॥

मग विसर्जिली ते सभा ॥ जाहली पतिव्रतेची प्रभा ॥ तीनी देव येतील गर्भा ॥ तें असो आतां ॥७०॥

तंव ह्नणे राजा भारत ॥ कीं मांडव्यासारिखा मुनि समर्थ ॥ तया सूळदानाचा प्राध्यर्थ ॥ कैसेनि जाहला ॥७१॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ मांडव्य महा तपोधन ॥ तो सूर्यदेवातें उपासून ॥ होता ध्यानीं ॥७२॥

एकदा रायाचिये मंदिरीं ॥ अर्थ चोरिलासे तस्करीं ॥ ऋषी नेणतां मठक्षेत्रीं ॥ पावले ते समस्त ॥७३॥

तंव दूत आले पाठोपाठीं ॥ ह्नणोनि तस्कर पळाले मर्ठी ॥ दूत पाहती तंव दृष्टीं ॥ देखिला मांडव्य पुढारी ॥७४॥

दूत ह्नणती हाचि होय कुरंठा ॥ संतरुपें घेतसे वांटा ॥ ह्नणोनि जाळिले खोपटा ॥ राजदूती ॥७५॥

मग बांधूनिया बाहूंसी ॥ समस्तां आणिलें रायापाशीं ॥ ह्नणती पैल हा तापसी ॥ महाचोर ॥७६॥

समस्तां रोंविलें सुळीं ॥ तंव चोर ते निवर्तले तत्काळी ॥ परि मांडव्य वांचला चिरकाळीं ॥ शूळाग्रस्थ ॥७७॥

यापरी गेला संवत्सर ॥ परि प्राण न सांडी ऋषीश्वर ॥ राखण राहिलासे किंकर ॥ भूपाळाचा ॥७८॥

तंव धरुनि पक्षियांचें शरीर ॥ रात्रीं आले ऋषीश्वर ॥ ह्नणती मांडव्या कर्म अपवित्र ॥ काय केलें तुवां ॥७९॥

उल्लंघूनियां धर्मनीती ॥ धरिली तस्करांची संगती ॥ तप सांडूनि हीनमती ॥ लाधलासि कां ॥८०॥

वस्त्रें कण आणि पुस्तका ॥ पशु घातमात्र कनका ॥ हें हरितां महापातका ॥ पावे प्राणी ॥८१॥

मग ह्नणे मांडव्यमुनी ॥ मी नेणें जी चोरी स्वप्नी ॥ परि पूर्वकर्माची काय करणी ॥ तें न कले मज ॥८२॥

पूर्वकर्माचें अर्जित ॥ परपीडा जाली असेल किंचित ॥ तें भोगणें लागे सत्य ॥ प्राणिमात्रां ॥ ॥८३॥

हें वचन ऐकोनि किंकर ॥ रायासि सांगे विचार ॥ कीं सुळींचा नव्हे जी तस्कर ॥ मांडव्यऋषी ॥८४॥

ऐकतां राव आला लवलाहीं ॥ लागला ऋषीचिये पाई ॥ ह्नणे क्षमा करोनियां भुई ॥ उतरावें स्वामिया ॥८५॥

ऋषी ह्नणे गा भूपाळा ॥ रुसावें आपुलिया निढळा ॥ भोग जाहल्या वांचोनि सूळा ॥ न सुटिजे वेगळें ॥८६॥

रावो काढी नानापरी ॥ परि सूळ अधिकचि भरे उरीं ॥ ह्नणोनि रायें खङ्गधारीं ॥ खंडिला सुळ ॥८७॥

ऐसें करोनि रायें बळ ॥ छेदिलें सुळाचें लोहफाळ ॥ परि उदरीं राहिलें सल ॥ मांडव्याचे ॥८८॥

तेणें नागवला महामुनी ॥ आणि मांडव्य ह्नणिजे पुराणीं ॥ मग तो गेला यमभुवनीं ॥ येणेंचि शरीरें ॥८९॥

यमार्ते पुसे ऋषीश्वर ॥ येवढा दंड कां केला थोर ॥ कैसा काय अनाचार ॥ घडला मज ॥९०॥

यम ह्नणे गा अवधारीं ॥ कंटक घालोनिया उदरीं ॥ खेळ खेळाया भिंगोरी ॥ वोंविली तुवां ॥९१॥

हें असे मार्केडेयपुराणीं ॥ परि ब्रह्मपुराणींची आनवाणी ॥ कीं खद्योत पोळिला गुदस्थानीं ॥ दर्भशलाकेनें ॥९२॥

मग ह्नणे मांडव्यमुनी ॥ अल्पदोषाचे आचरणीं ॥ थोर केली गा जाचणी ॥ श्राद्धदेवा ॥९३॥

ऐसें वदोनि शापी ऋषी ॥ कीं त्वां मनुष्य व्हावें मृत्युलोकीं ॥ दासीपुत्र परि विवेकी ॥ ज्ञानसंपन्न होशील ॥९४॥

मग तो भारतवंशी विख्यात ॥ व्यासदेवाचा रेतजात ॥ यमराय जन्मला दासीसुत ॥ विदुर नामें ॥९५॥

आतां असो हे वित्पत्ती ॥ अनुसूया जाहली ऋतुवंती ॥ देव उपजले तें भूपती ॥ सांगों तुज ॥९६॥

अनुसूया असतां ऋतुस्त्रात ॥ अत्रीसि जाहला कामचेत ॥ रुप पाहतां ऊर्ध्वरेत ॥ आलें ऋषीचें ॥९७॥

तो मनचंद्रमा निर्धारें ॥ निघाला मुनीचे नेद्वत्रारें ॥ ब्रह्मरुपें ऋषीश्वरें ॥ सृजिला प्रथम ॥९८॥

शुद्धचक्र श्वेतगुणी ॥ परि लागलें बुबुळाचें पाणी ॥ तो कलंक देखिजे नयनीं ॥ अद्यापि चंद्रीं ॥९९॥

ऐसा हा अयोनिसंभवो ॥ ब्रह्मरुप ब्राह्मणांचा रावो ॥ मग गगना गेला नाहो ॥ शर्वेरीचा ॥१००॥

पुढें अत्रिअनुसूयेचे समरसां ॥ अंशें उत्पत्ति जाहली महेशा ॥ तो उपजला ऋषि दुर्वासा ॥ महातपस्वी ॥१॥

भारता तो दुर्वास सुत ॥ तपविद्येचा पूर्णभरित ॥ चित्तीं धरुनि परमार्थ ॥ गेला तपासी ॥२॥

मग विष्णुच्या पूर्णअंशीं ॥ दत्तात्रेय नाम गर्भवासीं ॥ अत्रिअनुसूयेचे समरसीं ॥ जन्मला तो ॥३॥

दत्तात्रेय करसंपुटीं ॥ दुर्वास जन्मला ललाटीं ॥ घामु निरपितां दक्षिणमुष्टीं ॥ अनुसूयेच्या ॥४॥

परि तो जाहला महापंडित ॥ दत्तनामें अवधूत ॥ मग सिंहाद्रीचा पर्वत ॥ धरिला तेणें ॥५॥

तो महातेजस्वी ऋषीश्वर ॥ पवनाचा करी आहार ॥ येकला येक दिगंबर ॥ असे तेथें ॥६॥

आप आपणियातें नेणें ॥ सर्व देखे येकदृष्टीनें ॥ रुदन बरळ हांसणें ॥ आनंदाचें ॥७॥

नाशिली सुखदुःखाची काजळी ॥ आप आपणियातें वोंवाळी ॥ नित्य नवी होय दिवाळी ॥ सणेंविण ॥८॥

इंद्रियां घालोनियां आकडी ॥ खंडिली मनाची कडाडी ॥ मग अनुहातें परवडी ॥ सेवी अमृत ॥९॥

ऐसा जाणोनियां आचार ॥ तेथें येवोनि ऋषीश्वर ॥ सेवा करिती निरंतर ॥ शिष्यपणानें ॥११०॥

तंव तयातें ह्नणे दत्त ॥ मी अज्ञानी कें अवधूत ॥ तुह्मी पंडित मी किंचित ॥ गुरु केविं पैं ॥११॥

असो मग कोणे एके अवसरीं ॥ स्त्रानासि गेला सरोवरीं ॥ तेथें येकसहस्त्र वर्षेवरी ॥ भीतरीं राहिला दत्त ॥१२॥

भरतां सहस्त्र संवत्सरीं ॥ गुरुदत्त आले बाहेरी ॥ सर्वे घेवोनियां सुंदरी ॥ लक्ष्मी जे कां ॥१३॥

हातीं मदिरेचे पात्र ॥ कुश्वळ धरिलेंसे शरीर ॥ तंव देखिले ऋषीश्वर ॥ बैसले तेथें ॥१४॥

पाहतां संतोषला अवधूत ॥ सकळां उपदेशी ज्ञानपंथ ॥ जो लवणजळाचा येकांत ॥ अद्वैतसागरीं ॥१५॥

ऐसा अवतरला अवधूत ॥ सर्वदेशीं प्रकाशली मात ॥ कीं सिंहाद्रिपर्वती आहे समर्थ ॥ योगी येक ॥१६॥

तंव कृतवीर्य सोमवंशी ॥ तो निवर्तला काळवंशी ॥ मग टिळा काढावया अर्जुनासी ॥ आणिलें प्रधानीं ॥१७॥

परि गर्गगुरुसि ह्नणे अर्जुन ॥ माझा ऐका जी येक प्रश्न ॥ राज्य चालवितां माझा प्राण ॥ पडेल पतनीं ॥१८॥

न घडे प्रजांचें पाळण ॥ दोषेंविण लाविजे दूषण ॥ आणि प्रजांचें हरिजे कांचन ॥ अभिलाषगुणें ॥१९॥

श्रुतिमार्ग न वागे चित्तीं ॥ अनाचारीं अति प्रीति ॥ अवकाळीं रमिजे रती ॥ राज्यमदें पैं ॥१२०॥

नावडे वृद्धांची संगती ॥ आणि दुखविजे ब्राह्मणज्ञाती ॥ हिंसाकर्म करितां चित्तीं ॥ न वाटे कंटाळा ॥ ॥२१॥

कामाचिये उन्मत्तता ॥ स्त्रिया कीजेति बहुता ॥ सर्वाठायी तरी समता ॥ नाहीं त्यासी ॥२२॥

ह्नणोनि राज्यांती नरक भोगणे ॥ हें प्रत्यक्ष बोलती पुराणें ॥ तें म्यां ऐकोनि अंतःकरणें ॥ घेतला भेवो ॥२३॥

येखादा भेटोनि योगीश्वर ॥ तो मस्तकीं जरी ठेवील कर ॥ तयावांचोनि राज्यभार ॥ न चालवे माझेनी ॥२४॥

तंव बोलिला गर्गाचारी ॥ कीं सिंहाद्रीचे पाठारीं ॥ येक ऐकिलासे परस्परीं ॥ महासिद्ध ॥२५॥

तया नांव दत्तअवधूत ॥ जो त्रिमूर्तिमाजी अनंत ॥ राज्य गेलिया सुरनाथ ॥ स्थापिला तेणें ॥२६॥

शस्त्रास्त्राचिये निर्घाती ॥ अमरावती जिंकिली दैत्यीं ॥ तैं दत्तात्रेयें सुरपती ॥ राखिला आपण ॥२७॥

तंव अर्जुन ह्नणे गर्गातें ॥ इंद्र राखिला कैसा अवधूतें ॥ तये सांगा पां मूळकथेतें ॥ मजलागोनी ॥२८॥

मग तो ह्नणे पुरोहित ॥ कीं क्रोंच नामें दानवसुत ॥ तया जंबु नामें महादैत्य ॥ उदेला एक ॥२९॥

तेणें प्रसन्न करोनि ईश्वर ॥ नानापरींचे पावला वर ॥ मग जिंकोनि सुरेश्वर ॥ घेतलें अमरावतीसी ॥१३०॥

ह्नणोनि देव गेले समुद्रतीरीं ॥ हरिसी सांगाय दुःखपरी ॥ परि न देखती क्षीरसागरीं ॥ नारायणीं ॥३१॥

तंव देवांसि ह्नणे बृहस्पती ॥ कीं सिंहाद्रि नामें पर्वतीं ॥ तेथें अवधूतवेषें श्रीपती ॥ राहिला असे ॥३२॥

मग देव निघाले त्वरित ॥ सिंहाद्रीसि आले समस्त ॥ तेथें देखिला लक्ष्मीकांत ॥ योगिरुपें ॥३३॥

घालोनि दंडवत ॥ जयजयाजी ह्नणती समस्त ॥ तूं आमुचें कुळदैवत ॥ योगीस्वरुपा ॥३४॥

मग तयांतें ह्नणे दत्त ॥ मी हो अमंगळ अवधूत ॥ मज कां करिता प्रणिपांत ॥ अनाचरियासी ॥३५॥

माझें अमंगळ शरीर ॥ हातीं मद्याचें असे खापर ॥ तुह्मी साक्षांत सुरवर ॥ देवलोकींचे ॥३६॥

तंव बोलिला बृहस्पती ॥ देवा तुं प्रत्यक्ष वेदमूर्ती ॥ श्वपचागृहीचा गार्हपती ॥ दूषवे कवणा ॥३७॥

ब्राह्मण आणि अनामिकधरीं ॥ पाक जाहले नानाकुसरी ॥ तेथें वायुस्पर्शनाचे परी ॥ लीला तुझी ॥३८॥

नातरी पद्मिणीचें पत्र ॥ जीवनीं असोनि अनादर ॥ तैसा पाहतां अनाचार ॥ तुझिये ठायीं ॥३९॥

अथवा रंगसंगें स्फटिक ॥ वर्णव्यक्तिसवें भासे अनेक ॥ तैसा तूं व्यापूनियां येक ॥ वेगळा हरी ॥१४०॥

ह्नणोनि घातलें दंडवत ॥ तुज वांचोनि आह्मी अनाथ ॥ जंबु दैत्यें घेतलें समस्त ॥ देवराज्य ॥४१॥

तेव्हां बोलिला योगेश्वर ॥ माझा ऐका हो विचार ॥ युद्ध करितां जंबुवीर ॥ आणावा येथें ॥४२॥

मग तयाचे वचनावरी ॥ देव गेले अमरपुरीं ॥ युद्ध होतहोतां सिंहाद्री ॥ आणिलें दैत्या ॥४३॥

परि दृष्टी न पडे ऋषेश्वर ॥ आणि जवळीं नाहीं परिवार ॥ ह्नणोनि भ्याला सुरेश्वर ॥ दैत्यसेनेसी ॥४४॥

धाकें देवां पडिली तुटी ॥ इतुक्यांत योगी देंखिला मठीं ॥ आणि शेजे असे गोरटी ॥ स्त्रिया येकी ॥४५॥

ते साक्षांत मोहनमुद्रा ॥ ह्नणती हे न साजे दिगंबरा ॥ तंव वेगीं शिरीं वाहूनि सुंदरा ॥ निघाले दैत्य ॥४६॥

ते लक्ष्मी वाहूनिया शिरीं ॥ दैत्य मुरडले सैन्यभारी ॥ ह्नणती हें स्त्रीरत्न त्रिपुरारीं ॥ दीधलें आह्मां ॥४७॥

श्रीकथाकल्पतरु ॥ सप्तमस्तबक मनोहरु ॥ पंचदशोऽध्यायीं कथियेला ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP