वैशंपायन वेदमूर्ती ॥ तयांसि पुसे भूपती ॥ कीं वत्सला अभिमन्यु विवाहस्थिती ॥ सांगिजे मज ॥१॥
वैशंपायन ह्नणती भारता ॥ तुझिये पितामहाची कथा ॥ श्रवण करीं गा आतां ॥ येकाग्रमनें ॥ ॥२॥
पांडव गेलिया वनाप्रती ॥ सुभद्रा अभिमन्यु हस्तनावती ॥ काळ क्रमिती दिनराती ॥ विदुरगृहासी ॥३॥
पूर्वी अभिमन्यूसि नोवरी ॥ नेमिली होती बळिभद्रकुमरी ॥ ते वत्सला नामें परिकरीं ॥ अनुपम्यरुपा ॥४॥
परि पांडव जातां वनासी ॥ दुर्योधन विचारी मानसीं ॥ कीं सोयरा करुं आपणासी ॥ रेवतीरमण ॥५॥
ऐसें नेमूनियां दूत ॥ द्वारके पाठविले त्वरित ॥ त्यांही बळिभद्रासि येकांत ॥ मांडिला ऐसा ॥६॥
कीं तुमची वत्सला कन्या ॥ ते द्यावी जी लक्षुमणा ॥ निश्वयार्थ करुनि लग्ना ॥ चलावें सकळीं ॥७॥
दुर्योधन राय पृथ्वीपती ॥ व्याही जोडला तुह्मांप्रती ॥ पांडव नष्टचर्य भोगिती ॥ वनामाजी ॥८॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ बळीभद्र मोहरला जाण ॥ पांडवांकडे गेला असे जंव कृष्ण ॥ तंव कार्य साधूं लग्नाचें ॥९॥
यापरी विचारुनि मनीं ॥ निश्वय केला संभाषणीं ॥ लग्नपत्रिका दीधली नेमोनी ॥ दूतांप्रती ॥१०॥
दूतीं आणितां लग्नपत्रिका ॥ दुर्योधन पावला हरिखा ॥ सामुग्री सिद्ध करुनि देखा ॥ जाते जाहले द्वारके ॥११॥
पांडवांची उणीव देखोनी ॥ विवाह योजिला दुर्जनीं ॥ परि ब्रह्मसुताची करणी ॥ पातली येथें ॥१२॥
मोठमोठ्यांत लावी भांडण ॥ आपण त्रिभुवनीं असे मान्य ॥ मुखीं गातसे नारायण ॥ तो नारदमुनी ॥१३॥
असो कौरवीं हें वर्तविलें ॥ तें नारदें विदुर श्रुत केलें ॥ विदुरें सुभद्रे कळविलें ॥ वर्तमान सकळ ॥१४॥
सुभद्रे तुझिये कुमरा नोवरी ॥ ठरविली होती बळदेवकुमरी ॥ तेचि पर्णावया सुंदरी ॥ द्वारके गेले कौरव ॥१५॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ सुभद्रेचें चिंतावलें मन ॥ उदकें ओहळले नयन ॥ कृष्णभगिनीचे ॥१६॥
परमदुःखें ह्नणे सुभद्रा ॥ सुणी खिंड देखोनि विदुरा ॥ वैरी गेले द्वारकापुरा ॥ वर्हाडिकेसी ॥१७॥
आजि असते जरी अर्जुन ॥ तरी यांसी करुनि निर्वाण ॥ घेवोनि येते वत्सला सून ॥ आपुली ते ॥१८॥
भाऊ असता वृकोदर ॥ तरी संहारिता कौरवभार ॥ वधू आणिता महावीर ॥ बंधुकुमराची ॥१९॥
ते तरी गेले वनांतरी ॥ इकडे कपट साधिती वैरी ॥ ह्नणोनि उकसांबुकसीं सुंदरीं ॥ स्फुंदत असे ॥२०॥
माझें बाळ तरी धाकुटें ॥ देवें कैसें केलें उफराटें ॥ तंव खेळत आलें गोमटें ॥ अभिमन्यु लेंकुर ॥२१॥
ह्नणे माते कां करिसी खंती ॥ काय पडली तुज विपत्ती ॥ ते सांगावी मजप्रती ॥ निवारीन स्वयें ॥२२॥
ऐसें ऐकोनि बोले सुंदरी ॥ बारे तुझी हरिताति नोवरी ॥ पर्णू गेला असे वैरी ॥ दुर्योधनकुमर ॥२३॥
तंव ह्नणे बालवीर ॥ कैंची नोवरी कैंचा वर ॥ शोक टाकीं वो निर्धार ॥ जननीये तूं ॥२४॥
माझें वर्हाड नाहीं जाहलें ॥ कैसी नोवरी काय वहिलें ॥ विधिसूत्राचियेनि बळें ॥ मिळेल आणिक ॥२५॥
प्राक्तन असतां बलवान ॥ नोवरीसी काय न्यून ॥ साह्य असतां गोपालकृष्ण ॥ आपणासी ॥ ॥२६॥
ऐसी ऐकोनि पुत्रवाणी ॥ खवळली ते वसुदेवनंदिनी ॥ ह्नणे मरमर रे अनभिमानी ॥ कां आलासि ममपोटा ॥२७॥
तूं जन्मलासिरे पाथरु ॥ व्यर्थ जालासि भूमिभारु ॥ लाजविलारे कुळाचारु ॥ सोमवंशींचा ॥२८॥
मग गरोदरपणी दुःख ॥ तुवां भोगविलें निरर्थक ॥ आतां जन्मोनि पंडुटिळक ॥ लाजविला त्वां ॥२९॥
पूर्वी जनकराजनंदिनी ते रामपत्नी ॥ रावणें नेली चोरोनी ॥ लंकेमाजी ॥३०॥
तिजनिमित्त रामराणा ॥ करी शिळांही सागरबंधना ॥ दशकंठादि कुंभकर्णा ॥ वधिले तेणें ॥३१॥
तारा गुरुदेवाची पत्नी ॥ शीतकरें भोगिलें तिजलागोनी ॥ तेणें जाहली झोटधरणी ॥ सकळ देवां ॥३२॥
पुनरपि आणिली अंगना ॥ बोलणें जाहलें या पुराणा ॥ तूं तरी जन्मलासि पाषाण ॥ माझिये पोटीं ॥३३॥
तूं जन्मलासि निःकारण ॥ बाप लाजविला अर्जुन ॥ हें मातेचें ऐकोनि वचन ॥ कोपला कुमर ॥३४॥
ह्नणे संहारीन कौरवां ॥ ख्याती लावीन यादवां ॥ घेऊन येईन येधवां ॥ स्त्रुषा तुझी जननीये ॥३५॥
हेचि प्रतिज्ञा जाण माझी ॥ सून आणून देईन तुझी ॥ तरीच उत्तीर्ण होणें बीजीं ॥ अर्जुनाचे ॥३६॥
मज कोपलिया अभिमानी ॥ कोण राखील हे मेदिनी ॥ आतां गुरुशापाची करणी ॥ दावीन जगा ॥३७॥
स्वर्ग घेईन हातोहातीं ॥ पृथ्वी घालीन पालथी ॥ भूमंडळींचे सकळ नृपती ॥ जिंकीन क्षणार्धे ॥३८॥
मज नसतांही अश्वरथा ॥ येकलाचि मारीन बहुतां ॥ ऐसें ह्नणोनि धनुष्यभाता ॥ घेतला वीरें ॥३९॥
यापरि ऐकोनियां उत्तर ॥ मग तो बोलिला विदुर ॥ ह्नणे बाळा तुझा पुरुषार्थ थोर ॥ तो मीचि जाणें ॥४०॥
आतां सिद्ध आहे माझा रथ ॥ परि सारथी असे दुःखित ॥ तरी माता सारथी होवोनि त्वरित ॥ जावें तुह्मीं द्वारके ॥४१॥
मार्ग टाका कौरवांचा ॥ प्रसाद होईल श्रीकृष्णाचा ॥ ऐकोनि ऐसी शुभ वाचा ॥ पुत्रमाता निघालीं ॥४२॥
आनंदोनि पार्थनंदन ॥ नमस्कारिले विदुरचरण ॥ मग सुभद्रा आणि अभिमन्य ॥ बैसलीं रथी ॥४३॥
रथ प्रेरिला पश्विममार्गी ॥ क्रौंचदेशाचिये आंगीं ॥ चातुर्ये चालविला वेगीं ॥ कृष्णभगिनीयें ॥४४॥
पुढें अरण्य महा विशाळ ॥ पर्वत दरडी प्रबळ ॥ वृक्ष पर्वतीं अंतराळ ॥ चुंबित जाहलें ॥४५॥
तंव धनुर्धरशिरोमणी ॥ झाडें छेदी कुठारबाणीं ॥ मग रथ चालवी बहिणी ॥ बळिभद्राची ॥४६॥
ऐसें वन सांडिले प्रबळ ॥ तंव पावले दुर्गम माळ ॥ तेथें पंचानन विक्राळ ॥ गर्जती दिवसा ॥४७॥
चितळ रोही आणि तरसें ॥ मयूरें टाहो करिती बहुवसें ॥ भालुका भुंकती समरसें ॥ वनामाजी ॥४८॥
चितळरोहींचिये नादें ॥ भयें पळती श्वापदें ॥ तंव राक्षस नाना भेदें ॥ सन्निध आले ॥४९॥
ऐकोनि मनुष्याची चाउळी ॥ राक्षस आले महाबळी ॥ तेथें जाहली रणधुमाळी ॥ महायुद्धाची ॥५०॥
देखतां दचकली सुभद्रा ॥ ह्नणे कठीण दिसतें लेंकुरा ॥ आतां सांपडलों राक्षस आहारा ॥ निश्वयें आह्मीं ॥५१॥
तंव बोले अभिमन्यु कुमर ॥ माते चिंता न करीं धरीं धीर ॥ आतां मारीन हे निशाचर ॥ क्षणामाजी ॥५२॥
तंव पातले राक्षस ॥ थोरथोर आसपास ॥ मुख पासोनि धांवले रथास ॥ गिळावयासी ॥५३॥
तो सोमवंशीय झुंजार ॥ युद्धा प्रवर्तला पार्थकुमर ॥ धनुष्य टणत्कारोनि शर ॥ ओढी कानाडी ॥ ॥५४॥
असुर हाणिती तांतडी ॥ एक हाणिती महाझाडीं ॥ एक वर्षती प्रचंड धोंडी ॥ बाळावरी ॥५५॥
ऐसा देखोनि वृत्तांत ॥ मग खवळला सुभद्रासुत ॥ बाण सोडिला धगधगीत ॥ असुरांवरी ॥५६॥
तेणें राक्षस जाहले चूर्ण एक पडिले शिरें तुटोन ॥ एकां दाविलें स्वर्गभुवन ॥ कुमरें तेणें ॥५७॥
हा एकाला ते बहुत ॥ जेवीं टोळ अग्नीसि झडपित ॥ तेवीं जळोनि मरती अमित ॥ आपें आप ॥५८॥
येकला तो अभिमन्युवीर ॥ करी राक्षसांचा संहार ॥ तंव सुभद्र वोंवाळी परिकर ॥ अंतज्योतीं ॥५९॥
राक्षस निमतां तये रणीं ॥ आणिक असुर आले दोनी ॥ तिहीं हाणिले बाळालागुनी ॥ गदाघातें ॥६०॥
घाय लागतां हदयकमळीं ॥ बाळ पडिला रथातळीं ॥ ह्नणोनि सुभद्रा मुखकमळीं ॥ पिटी हात ॥६१॥
दुःखें करीतसे रुदना ॥ ह्नणे काय केलें नारायणा ॥ मज अदैवीचा तान्हा ॥ मारिला असुरीं ॥६२॥
आजि म्याचि हातें आपुलें ॥ अविचारें घर बुडविलें ॥ एकलें आणिलें तान्हुलें ॥ वनामाजी ॥६३॥
ऐसें ह्नणोनियां वक्त्रीं ॥ ढळढळां अश्रु सांडी नेत्रीं ॥ वारा घाली अंचळवस्त्री ॥ बाळकासी ॥६४॥
पल्लवें घालीतसे वारा ॥ दुःखें न बोलवे गा नरेंद्रा ॥ वनीं येकली सुभद्रा ॥ करी शोक ॥६५॥
विलाप करीतसे सुंदरा ॥ अंतरीं आठवी गौरीहरा ॥ तंव सावध जाहला शरीरा ॥ अभिमन्यु बाळ ॥६६॥
त्वरें घेवोनि धनुष्यबाण ॥ दैत्य विंधिला सत्राण ॥ हदयीं हाणोनियां प्राण ॥ घेतला त्याचा ॥६७॥
तंव उठावला दुसरा ॥ तया अभिमन्यु हाणी झरारा ॥ तंव वारीतसे सुभद्रा ॥ नकोनको ह्नणुनी ॥६८॥
बाळें सोडिला प्रखर बाण ॥ तें असुरें वारिलें संधान ॥ ह्नणोनि सोडी अर्धचंद्रबाण ॥ राक्षसवधार्थ ॥६९॥
बाण गेला गर्जत ॥ येरें निवारिला येतयेत ॥ मग गदा घेवोनि त्वरित ॥ राक्षस आला ॥७०॥
अभिमन्यें ही घेवोनि गदा ॥ आवेशें सरसावला युद्धा ॥ परस्परें महाद्वंद्वां ॥ प्रवर्तले वीर ॥७१॥
येक सोमवंशींचा झुंजार ॥ दुसरा रानींचा निशाचर ॥ पितृव्यबंधु परि साचार ॥ ठाउकें नसेची ॥७२॥
गदा वाजती खणखणा ॥ ध्वनी कोंडत असे गगना ॥ निकरें हाणिती चडकणा ॥ येकमेकांसी ॥७३॥
आतां असो हें दारुण ॥ गदा छेदीतसे अभिमन्य ॥ महामंत्रें सवेंचि सत्राण ॥ हाणिला असुर ॥७४॥
हदयीं लागतां प्रचंड घावो ॥ मूर्छा पावला राक्षसरावो ॥ तेणें वातें वृक्ष पहाहो ॥ उन्मळले दोन दारींचे ॥७५॥
राक्षसमठाचिये मार्गी ॥ वृक्ष होते जुनाटयुगीं ॥ ते उन्मळोनि पडिले प्रसंगीं ॥ मग हेडंबा चालिली ॥७६॥
धांवोनि आली रणमोहरां ॥ तंव मूर्छित देखे कुमरा ॥ मग शोक करी सुंदरा ॥ भीमसेनाची ॥७७॥
ह्नणे बा घटध्वजा वीरा ॥ भीमपांडवाचिया कुमरा ॥ अतुर्बळिया झुंजारा ॥ तुज मारिलें कवणें ॥७८॥
ऐसें ऐकतां सुभद्रें ॥ ह्नणे तुह्मी कोणगे असुरें ॥ माझीं तरी सांगतें उत्तरें ॥ ती ऐकें वहिलीं ॥७९॥
अर्जुन माझा भ्रतार ॥ तयाचा बंधू वृकोदर ॥ त्याचाचि ह्नणसी हा कुमर ॥ तरी हें कैसें ॥८०॥
मग सांगतां पूर्वसंबंधु ॥ कळलें कीं हेडंबी भीमवधु ॥ आणि हा घटध्वज पितृव्यबंधु ॥ अभिमन्यूचा ॥८१॥
तंव सावध जाहला घटध्वज ॥ तयासि भेटला पार्थात्मज ॥ मग सर्वही समाचार वोज ॥ कळला परस्परां ॥८२॥
संतोष होवोनि घटध्वजासी ॥ नमस्कारिलें सुभद्रेसी ॥ मग हाती धरुनि अभिमन्यासी ॥ नेलें गृहातें ॥८३॥
भारता तेथें दिवस तीन ॥ राहिलीं सुभद्रा अभिमन्य ॥ घटध्वजें राक्षस मेळवून ॥ सकळ निघाले द्वारके ॥८४॥
त्या राक्षसदळसंघटणीं ॥ संख्या जाहली दोनक्षोणी ॥ नावें सांगेन तुजलागोनी ॥ पारिक्षिता गा ॥८५॥
राया ऐकें चित्त देवोनी ॥ दितीनामें कश्यपपत्नी ॥ तिचिये पोटीं जाहली खाणी ॥ दैत्यकुळाची ॥८६॥
कोणे येके काळवेळीं ॥ दिती सुंदरा राजबाळी ॥ ती आली होमाजवळी ॥ सकामइच्छा ॥८७॥
कश्यप करीत होता याग ॥ तंव हे ऋतु मागे आनमार्ग ॥ तो संध्याकाळ प्रयोग ॥ कामिनी नेणे ॥८८॥
असो तये अवसरीं जाण ॥ ऋतु मागीतला दितीन ॥ तो न देतां तयेकारण ॥ भ्रूणहत्या लागेल पैं ॥८९॥
ऐसें जाणोनि अकाळीं ॥ ऋतु दीधला सायंकाळी ॥ तेथें जन्मला महाबळी ॥ अमळदैत्य ॥९०॥
तये अमळदैत्याचे पोटीं ॥ जन्मल्या दैत्यांच्या थाटी ॥ नामें तयांचीं मुखवटीं ॥ सांगेन तुज ॥९१॥
अश्वमुखी खरमुखी ॥ सूकरमुखी श्वानमुखी ॥ अजामुखी महिषमुखी ॥ हस्तिमुखादि ॥९२॥
ययांचे वंशांचा विस्तारु ॥ सांगतां नावरे कल्पतरु ॥ परि सांगतो स्वल्पमात्रु ॥ जनमेजया गा ॥९३॥
अश्वमुखीचा विस्तार ॥ जो जाहला ज्वाळासुर ॥ तो मर्दिला प्रतापशूर ॥ आदिमायेनें ॥९४॥
त्याचा पुत्र लवणासुर ॥ तो कमळजें मर्दिला परिकर ॥ तयाचा गद नामें वीर ॥ मारिला श्रीकृष्णे ॥९५॥
आतां खरमुखीची विस्तारता ॥ ते सांगतां वाढेल कथा ॥ दशमस्कंधीं गा भारता ॥ असे साक्ष ॥९६॥
खरासि वधिलें श्रीरामें ॥ त्याचा विस्तार संभ्रमें ॥ हटासुर येणें नामें ॥ महा दैत्य ॥९७॥
हटासुराचे दहा पुत्र ॥ महाबळिये सर्वत्र ॥ जाणती कपटाचे अखिल मंत्र ॥ अघोरपणें ॥९८॥
तया दहा वीरांचीं नावें ॥ तीं ऐक गा स्वभावें ॥ कोणकोण तें आघवें ॥ सांगों तुज ॥९९॥
विटासुर तृणासुर ॥ अघासुर बकासुर ॥ बाणासुर धेनुकासुर ॥ मायासुर पैं ॥१००॥
हे वधिले कृष्णावतारीं ॥ घाघासुरही निर्धारी ॥ व्योमासुर आणि सुंददरी ॥ पूतना ते ॥१॥
आतां सूकरमुखीचा विस्तार ॥ तो तूं ऐक गा साचार ॥ तये सूकरमुखीचा कुमर ॥ अंधकासुर तो ॥२॥
अंधकासुराचे पुत्र चार ॥ महाबळिये पवित्र ॥ देव पळविले सर्वत्र ॥ स्वर्गीचे त्यांहीं ॥३॥
तारकासुर शंबरासुर ॥ कृतयुगींचें साचार ॥ तारका वधी गौरीकुमर ॥ स्वामीकार्तिक ॥४॥
शंबर दैत्यासी कौतुकें ॥ मदनें विंधिले रतिशकें ॥ आणिक दुजिये दोघांचे निकें ॥ ऐक राया ॥५॥
मरीचि आणि सुबाहो ॥ यांसी रामें वधिले पहाहो ॥ त्रेतायुगींचा कथालाहो ॥ वर्णिलासे ॥६॥
आतां श्वानमुखीचा विस्तार ॥ त्याचा पुत्र कोल्हासुर ॥ कोल्हासुराचा निर्धार ॥ मेंढासुर तो ॥७॥
मेंढासुराचे अकरा पुत्र ॥ ते बळियाढे सर्वत्र ॥ ज्यांचे घोर असे चरित्र ॥ त्रिभुवनीं या ॥८॥
महिषासुर काळासुर ॥ चक्षुणा वामा महावीर ॥ देवाजित हिमासुर ॥ महापराक्रमी ॥९॥
देवांदैत्यां आजिंक्य वीर ॥ तो बोलिजे रक्तबीज असुर ॥ तैसेचि चंड मुंड निर्धार ॥ महाबळियाढे ॥११०॥
आतां पृथ्वीपती राजे ॥ शुंभनिशुंभ प्रतापी जे ॥ ते मर्दिले असती सहजें ॥ काळिकेनें ॥११॥
त्यांचे बळाची अतुळ ख्याती ॥ ह्नणोनि अवतरली आदिशक्ती ॥ सातशतें मंत्रयुक्ती ॥ प्रताप जियेचा ॥१२॥
आतां अजामुखीचा वंशु ॥ महाकपटी राजसु ॥ तो सांगेन सौरसु ॥ भारता तुज ॥१३॥
अज्ञाचा पुत्र धूम्रकेतु ॥ धूम्रकेतूचा ताम्रकेतु ॥ ताम्रकेतूचा विख्यातु ॥ वज्रकेतु नामें ॥१४॥
वज्राचा सुवज्रकेतु ॥ सुवज्राचा वृषकेतु ॥ वृषकेतूचा बोसतु ॥ तालकेतू तो ॥१५॥
तये तालकेतूची कथा ॥ पंचमस्तबकीं असे भारता ॥ मदलसाआख्यानीं तत्वता ॥ वर्णिलीसे ॥१६॥
महिषासुर प्रचंड वीर ॥ तयासी देवीनें वधिला निर्धार ॥ ह्नणोनि नाहीं वंशविस्तार ॥ तयाचा पैं ॥१७॥
आतां हस्तमुखीचा विस्तार ॥ अतुर्बळी धूम्रवज्र ॥ तया धूम्रवज्रचा कुमर ॥ ताम्रध्वज तो ॥१८॥
ताम्रध्वजाचे दोघे आत्मज ॥ मयूरध्वज तालध्वज ॥ तालध्वजाचा वीर्यबीज ॥ सुबाहू तो ॥१९॥
सुबाहूसी कन्या पुत्र ॥ माजी राजसु सुत विचित्र ॥ आणि कन्या ते परिकर ॥ जरा नामें ॥१२०॥
जरेनें जडविला पुत्रराज ॥ तो जरासंध बृहद्रथात्मज ॥ त्यासी भीमें निवटिलें चोज ॥ राजसूयप्रसंगीं ॥२१॥
त्या जरेची पितृभगिनी ॥ हे हेडंबी प्रतापिणी ॥ ते घटध्वजाची जननी ॥ जाण राया ॥२२॥
ऐसा हा घटध्वजवीर ॥ त्यासी भेटला अभिमन्यु वीर ॥ दोघे पितृव्य बंधु परिकर ॥ पांडवात्मज ॥२३॥
असो निघाला अभिमन्य ॥ सारथी सुभद्रा आपण ॥ सवें दोनीक्षौणी गण ॥ घटोत्कचाचे ॥२४॥
वेगें जावोनि द्वारकेसी ॥ वेढा घातला नगरासी ॥ कौरवही वर्हाडासी ॥ आले होते पूर्वीच ॥२५॥
वत्सलेसि हळदी लागली जाणा ॥ आणि दुर्योधनसुता लक्ष्मणा ॥ देवकप्रतिष्ठा तेचि क्षणा ॥ जाहली होती ॥२६॥
तेचि समयीं अभिमन्युवीर ॥ आणि दळासह भीमकुमर ॥ घ्यावया आले समाचार ॥ नकळतां कोणा ॥२७॥
तें राक्षससैन्य पाईचें ॥ लोक ह्नणती वर्हाडी यांचे मग कुडें केलें मावेचें ॥ त्या सैनीकानीं ॥२८॥
नानावस्तु अलंकार ॥ शालजोड्या पीतांबर ॥ यापरी पेंठा बाजार ॥ नटले राक्षस ॥२९॥
उदीम होतसे मोलाविण ॥ नर्वे घेवोनि द्यावें जीर्ण ॥ कौरव ह्नणती आह्मांकारण ॥ रचिला बाजार यादवीं ॥१३०॥
ऐसेपरी ठक कुडें ॥ राक्षसीं मांडिले असे गाढें ॥ सकळांसही केले उघडें ॥ अभ्यंतरी ॥३१॥
कंठीं असुरचि अलंकार ॥ कटीं असुरचि पीतांबर ॥ येणेंपरी नारीनर ॥ सर्वोपरी सज्जले ॥३२॥
नानापरीची ठकविद्या ॥ करुनि जडले राजभेदा ॥ घरोघरीं प्रकटली विद्या ॥ मोहनमुद्रेची ॥३३॥
द्वारकेचा करुनि भेद ॥ मग केला थोर विनोद ॥ स्त्रियांची रुपें प्रसिद्ध ॥ घेतलीं राक्षसीं ॥३४॥
येवोनि बळीभद्राचे घरीं ॥ बोलों लागल्या त्या नारी ॥ कीं भानुमतीनें ये अवसरीं ॥ आह्मां येथे धाडिलें ॥३५॥
त्यांचिये कुळीं कुळधर्म ॥ कीं लग्नापूर्वी उत्तम ॥ नोवरी पूजावी हा नेम ॥ असे वहिला ॥३६॥
तरी एक घटिका नोवरी ॥ पाचारी भानुमती सुंदरी ॥ कुळाचार करुनि झडकरी ॥ आह्मीं आणूं मागुती ॥३७॥
तें आलें रेवतीमना ॥ नोवरी दीधली त्या अंगनां ॥ येरी घेवोनि तत्क्षणा ॥ मावरुपी पातल्या ॥३८॥
मग नोवरी धरुनि हातीं ॥ अभिमन्यासी लग्न लाविती ॥ सुभद्रा हरिखली चित्तीं ॥ देखोनि वधुवरें ॥३९॥
इकडे ऐसें वर्तलें ॥ मग दुसरें नवल केलें ॥ घटध्वजें रुप धरिलें ॥ नोवरीचें अनुपम्य ॥१४०॥
मग ती मायेच्या स्त्रियांही ॥ नोवरी नेली लवलाहीं ॥ रेवती देखोनि हर्षली देहीं ॥ आणिली ह्नणवोनियां ॥४१॥
ऐसें इकडे कपट जाहलें ॥ तंव वर्हाडगृहीं काय वर्तलें ॥ फळप्रदान वांटिलें ॥ सुहदांजनांसी ॥४२॥
जाहलें तेलफळ रुखवत ॥ वरासि मूळ गेलें त्वरित ॥ मधुपर्कविधान समस्त ॥ जाहलें देखा ॥४३॥
नोवरी ह्नणे आई भूक ॥ मज लागली अलोलिक ॥ ह्नणोनि भक्षिला स्वयंपाक ॥ सकळही तेथींचा ॥४४॥
वाढप्यांसि होवोनि शीण ॥ ह्नणती असेल ही राक्षसीण ॥ परि न कळे अंतर्खूण ॥ सत्यपणाची ॥४५॥
असो अंत्रपाट धरोनि वस्त्रीं ॥ उपाध्ये आणिती नोवरी ॥ मंगळाष्टकें ह्नणती सुस्वरीं ॥ वैदिकमंत्रें ॥४६॥
लज्जाहोम बोहल्यावरी ॥ वर कडिये घेई नोवरी ॥ तंव उचलेना स्थूळ भारी ॥ वाटे तयासी ॥४७॥
येरी रुप दावी तयासी ॥ महा भयानक राक्षसी ॥ ह्नणे झणी मज विश्वाससी ॥ तरी खाईन ॥४८॥
डोळे वटारी नवर्याकडे ॥ नवरा आंतल्याआंत रडे ॥ ह्नणे येथोनि वांचल्या पुढें ॥ न पाहें मुख मी ॥४९॥
जनदृष्टी चोरोनि नोवरी ॥ लक्ष्मणावरी किरकिरी ॥ तेणें निश्विंत बोहल्यावरी ॥ पडिला वर ॥१५०॥
ह्नणोनि जन मिळाले सकळ ॥ तंव ते रुप धरी विशाळ ॥ मुख पसरोनियां विशाळ ॥ दीधली हांक ॥५१॥
हांक ऐकतां भयंकर ॥ मंडपीं जाहला हाहाःकार ॥ मग बोलिला रणशूर ॥ घटध्वज तो ॥५२॥
माझ्या सहोदराची नोवरी ॥ तुह्मी वरावया आलेति वैरी ॥ आतां मारीनरे झुंझारी ॥ कौरवां तुह्मां ॥५३॥
ऐसें ह्नणोनि उडाला ॥ ह्नणे सकळही चलारे चला ॥ मग हास्यरस प्रकटला ॥ तैं अद्भुतची ॥५४॥
कटीचा उडाला पीतांबर ॥ तो जाहला निशाचार ॥ तेणेंचि मारिला महावीर ॥ बैसले जागीं ॥५५॥
कंठा आंवळी कंठीं पदर ॥ महातामारी कुंजर ॥ चाबुकें मारिला स्वार ॥ ठाईचे ठायीं ॥५६॥
वर्हाडी जाहले नग्न ॥ निर्जिवां संचरे सजीवपण ॥ सकळ प्रकटले राक्षसगण ॥ हाकेसरिसे ॥५७॥
असो घटध्वज जो उडाला ॥ तो अभिमन्याजवळी पातला ॥ मग राक्षस करोनि गोळा ॥ सरसावला युद्धासी ॥५८॥
कौरवदळीं हाहाःकार ॥ सन्नध जाहले वीर ॥ रणांगणीं समोर ॥ येते जाहले ॥१६०॥
इकडे राक्षसीं काय केलें ॥ सुभद्रा आणि नवरीसि वहिलें ॥ रथीं बैसवोनि ठेविले ॥ रक्षणा असुर ॥६१॥
मग ते राक्षस झुंझार ॥ युद्धासि आले समोर ॥ शिळाशिखरीं मार थोर ॥ केला तिहीं ॥६२॥
कौरव कोपले अति बळी ॥ सकळ धांवले तये वेळीं ॥ राक्षसांवरी शरजाळीं ॥ करिती वृष्टी ॥६३॥
दोनीदळां येकवट ॥ शस्त्रांचे होती खणखणाट ॥ ठिणग्या उडती झगझगाट ॥ विद्युल्लतेपरी ॥६४॥
कौरव हाणिती बाणधारीं ॥ राक्षस वर्षती शिळाशिखरीं ॥ तेणें कौरवदळीं सर्वोपरी ॥ जाहला मोड ॥६५॥
मोडला देखोनि कौरवभार ॥ युद्धा निघाला बळीभद्र ॥ देखोनि आला समोर ॥ घटध्वज तो ॥६६॥
दोघे वीर महासबळ ॥ युद्ध जाहलें तुंबळ ॥ येकचि वर्तला कल्लोळ ॥ द्वारकेमाजी ॥६७॥
एक शेषाचा अवतारु ॥ दुसरा राक्षस झुंझारु ॥ तें युद्ध सांगतां कल्पतरु ॥ नावरे ग्रंथ ॥६८॥
बळीभद्रा आवरी घटध्वज ॥ राक्षस कौरवांसी घेती झुंज ॥ भोजन घातलें पक्कान्न वोज ॥ वृक्षशिळांचें ॥६९॥
एकावरी पर्वत टाकिती ॥ झाडें उपटोनि येका हाणिती ॥ भयानक हांका देती ॥ अंतराळीं ॥१७०॥
झूंजाची न कळे माव ॥ राक्षसीं केली गवगव ॥ शिळाशिखरीं कौरव ॥ गौरविले तेव्हां ॥७१॥
अश्वासाहित गिळिती स्वार ॥ ह्नणोनि धाकें पळती वीर ॥ थोर जाहला हाहाःकार ॥ कौरवदळीं ॥७२॥
राक्षसीं थोर केला मार ॥ पळोनि गेला कौवरभार ॥ हस्तनापुरा जावोनि थोर ॥ शंखध्वनी करिती पैं ॥७३॥
ऐसे वर्हाडी बोळविले ॥ घटध्वजें यादव जिंकिले ॥ तंव तेथें अकस्मात आले ॥ श्रीकृष्णदेव ॥७४॥
सकळही वर्तमान विचार ॥ कृष्णासि निरुपी हलधर ॥ तंव हासिन्नला शारंगधर ॥ ऐकोनि तें ॥७५॥
मग बोले नारायण ॥ येकाची नोवरी येका देऊन ॥ हें जोडिलें होतें लांछन ॥ बंधुवा तुह्मीं ॥७६॥
असता जरी तो धनुर्धर ॥ तरी मारिता कुरुकुमर ॥ आणि संहारिता यादव भार ॥ क्षणामाजी ॥७७॥
येकलें अभिमन्यु लेकरुं ॥ येवढा केला प्रताप थोरु ॥ काय ह्नणता युधिष्ठिरु ॥ घडतां ऐसें ॥७८॥
दुखविली सुभद्रा बहिणी ॥ हे ज्येष्ठपणाची नव्हे करणी ॥ तरी आतां तयां बोलावोनी ॥ करुं लग्न विधियुक्त ॥७९॥
मग ते रामकृष्ण सत्वरा ॥ बुझावया गेले सुभद्र ॥ क्षेमालिंगनें परस्परां ॥ जाहली भेटी ॥१८०॥
श्रीकृष्ण ह्नणे सुभद्रेसी ॥ आह्मी अपराधी सर्वस्वीं ॥ आतां चलावें गृहासी ॥ वधुवरांसह ॥८१॥
रथीं बैसवोनि अभिमन्य ॥ घटध्वजासहित जन ॥ घेवोनि आले श्रीकृष्ण ॥ द्वारकेसी ॥८२॥
मग अष्टनायका आणि रेवती ॥ त्या सुभद्रेतें सन्मानिती ॥ सोळासहस्त्र तेथें येती ॥ भावजया पैं ॥८३॥
जाहली लग्नाची आयती ॥ हळदी देवकप्रतिष्ठा करिती ॥ ब्राह्मण मंगळाष्टकें ह्नणती ॥ वेदघोषें ॥८४॥
यापरि ओंपुण्याह जाहली ॥ अभिमन्या नोवरी मिळाली ॥ बाशिंगें उटणीं सोहळीं ॥ चारी दिवस ॥८५॥
सुभद्रे गौरवी बळीभद्र ॥ देवोनि वस्त्रें अलंकार ॥ आणि तो गौरविला कुमर ॥ भीमसेनाचा ॥८६॥
हा अभिमन्याचा विवाहो ॥ करी स्वयें देवाधिदेवो ॥ तयाना पूर्ण निर्वाहो ॥ केला घटध्वजें ॥८७॥
मग सुभद्रे आणि अभिमन्या ॥ हस्तनापुरीं कृष्णराया ॥ बोळविता जाहला जाणा ॥ प्रीतिवचनें ॥८८॥
भारता तैसाचि घटध्वजासी ॥ तो मानवला हषीकेशी ॥ वस्त्रें अलंकार बहुवसीं ॥ दीधलें तया ॥८९॥
ऐसा अभिमन्युविवाह जाहला ॥ सुखसोहळा समस्तां वर्तला ॥ मग घटध्वज पुसोनि गेला ॥ निजस्थानासी ॥१९०॥
वैशंपायन ह्नणती भारता ॥ तुवां पुसिली अभिमन्युकथा ॥ ते सांगीतली तत्वतां ॥ तुजलागोनी ॥९१॥
तो तरी चंद्राचा अवतार ॥ कोनी ह्नणती सहस्त्रकर ॥ हा कल्पपरत्वें विचार ॥ भिन्नाभिन्न ॥९२॥
आतां असो हा अभीमन्युवीरु ॥ पुढें कथणें कल्पतरु ॥ पूर्ण जाहला मनोहरु ॥ सप्तमस्तबक ॥ ॥९३॥
श्रवण जालिया कल्पतरुचें ॥ दहन होय मह पापांचें ॥ दूषण जाय जन्मांतरींचें ॥ कल्पतरुश्रवणें ॥९४॥
नारायण कृपेचा दायक ॥ जेवीं व्याधी विभांडी मृगांक ॥ तैसाचि सर्वपांपांसि दाहक ॥ कल्पतरु हा ॥९५॥
कीं चातकाचिये अल्पउदरीं ॥ उदक न माय शिंपीभरी ॥ परि परोपकारार्थ निरंतरीं ॥ इच्छी घनातें ॥९६॥
तेवीं मी बोलिलों कथन ॥ श्रीहरींचे लीलागुण ॥ यासी सेवीत सज्जन ॥ भक्तिभावें ॥९७॥
अपुत्रिकांसी पुत्रसंतान ॥ निर्धना जोडे इच्छितघन ॥ आणि व्याधींचे निरसन ॥ श्रवणें होय ॥९८॥
धन्यधन्य जी श्रोता ॥ श्रीहरिकीर्तनाचा भोक्ता ॥ नानासंकटीं दुश्वित्तता ॥ कधींचि नव्हे ॥९९॥
तया श्रोत्यां नमस्कार ॥ करुनि बोले कवीश्वर ॥ कीं हें संस्कृत मंथोनि सार ॥ काढिलें असे ॥२००॥
जें तरी असे ऋषिप्रणीत ॥ तेंचि येथें बोलिलों प्राकृत ॥ काहीं असलिया विपरीत ॥ क्षमा कीजे ॥१॥
मज उपसितां शब्दसिंधु ॥ राहिला असेल पदबिंदु ॥ तया अल्पदोषाचा बाधु ॥ क्षमा कीजे ॥२॥
कौंडण्यवसिष्ठ मित्रावरुण ॥ तिन्ही प्रवरें गोत्र संपूर्ण ॥ तये कुळीं जन्मधारण ॥ अंबऋषीचें ॥ ॥३॥
तये अंबऋषीची कांता ॥ कमळजा नामें पतिव्रता ॥ ते प्रसवली विष्णुभक्ता ॥ कृष्णकवीसी ॥४॥
तया प्रसन्न श्रीअनंत ॥ जो अंतरात्मा विश्वगत ॥ तेणें दाविला असे ग्रंथ ॥ कल्पतरु हा ॥५॥
गोदेचिये दक्षिणतीरीं ॥ पद्मपुर बोलिजे द्वापारीं ॥ ग्रंथ जाहला पुण्यक्षेत्रीं ॥ नासिकस्थानीं ॥६॥
अरुणा वरुणा गोदावरी ॥ कपालेश्वर साक्ष सुंदरी ॥ कल्पतरु वाहिला पुष्पपत्रीं ॥ गोविंदचरणीं ॥७॥
यया कल्पतरुची कथा ॥ प्रीतिपावो श्रीअनंता ॥ समस्तां जाहला विनविता ॥ कृष्णयाज्ञवल्की ॥८॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ सप्तमस्तबक मनोहरु ॥ वत्सलाहरणप्रकारु ॥ एकोनविंशाध्यायीं कथियेला ॥२०९॥ ॥ स्तबकओव्यासंख्या ॥२६५८ ॥ इति पूर्वार्धः समाप्तः ॥ ॥ अथोत्तरार्धः प्रारंभणीयः ॥ ॥ श्रीसांबासदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ श्रीरुक्मिणीरमणार्पणमस्तु ॥ ॥