कथाकल्पतरू - स्तबक ७ - अध्याय ८

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ शरभरूप जाहला महादेवो ॥ तो सांगा जी दुसरा अनुभवो ॥ अग्निपुराणींचा ॥१॥

मग ह्मणें वैशंपायन ॥ राया ऐकें चित्त देऊन ॥ नृसिंह पराभवी शिव आपण ॥ तें सांगों तुज ॥२॥

शरभरूप जें भयंकरें ॥ तें घेतलें महारुद्रे ॥ वरद वधिला शारंगधरें ॥ ह्मणोनीच कीं ॥३॥

महादारूण येकसरें ॥ तेज घेतलें तये वीरें ॥ वीरभद्र भ्याला ह्मणोनि येरें ॥ आदरिलें जाळूं ॥४॥

देहींचा सोडोनि खटाटोप ॥ शिवें धरिला दारूण कोप ॥ केला मल्लयुद्ध उद्देप ॥ जाज्वल्यमान ॥५॥

तेव्हां गगनाचे पोकळीं ॥ न सांठें तेजाची उकळीं ॥ विघडूं पाहे सांखळी ॥ नृसिंहाची ॥६॥

महारुद्रें रूप घेतलें ॥ तें अतितेजाळें आथिलें ॥ जाणों हेमतेजातें ॥ जिंतिलें ॥ अग्नीसहित ॥७॥

नव्हे विद्युल्लतेसि सरी ॥ नाहीं उड्डगणीं कीं रविउस्त्रीं ॥ स्वतेजें निरुपम त्रिपुरारी ॥ त्रिगुणात्मक ॥८॥

तेणें तेजें तेजाकार ॥ नभीं लोपला भास्कर ॥ देवीं केला जयजयकार ॥ देखोनियां रूपा ॥९॥

विशाळ जटा सहस्त्र भुजा ॥ ललाटी अर्ध द्विजरांजा ॥ दादा दंतपंक्ति बीजा ॥ नेत्र तीन्ही ॥१०॥

मागील धड सिंहाचें ॥ पुढील घड पक्षियाचें ॥ विपरीत रूप देवाचें ॥ विक्राळ पक्ष ॥११॥

जाणों वज्राची धारा जैसी ॥ अष्टचरणींची नखें तैसीं ॥ चंचुपुटांची शोभा परियेसीं ॥ वज्रातुल्य ॥१२॥

चारी चरण रणवटीं ॥ चारी चरण कटानेहटीं ॥ हुंकारें गर्जवी सृष्टी ॥ क्षणक्षणांत ॥१३॥

ऐसी बीभत्स स्वयमेव ॥ त्या शरभरूपाचे ठेव ॥ देखोनि गर्जिन्नले देव ॥ जयजयाकारें ॥१४॥

ह्मणती आतां नृसिंहतेज ॥ तें निवारिलेंचि सहज ॥ जैसें जाय कीं तमंरज ॥ दिनकाराभेणें ॥१५॥

मग तये नृसिंहाचें वक्त्र ॥ अवलोकन करी त्रिनेत्र ॥ तंव येराचें तेज समग्र ॥ संचरलें शरभीं ॥१६॥

मागील त्राण लीन जाहलें ॥ दिव्य तेज शरभीं मिळालें ॥ कीं मार्तडा देखोनि जाहलें ॥ खाद्योता जैसें ॥१७॥

तंव जन्मेजयो ह्मणे ॥ मुने येक असे पुसणें ॥ तें सांगिजे कृपावचनें ॥ मजलागोनी ॥१८॥

तरी शंभूचा जो अवतार ॥ वीरभद्र महवीर ॥ त्याचा सांडोनि बडिवार ॥ पशुवासि भ्याला नृसिंह कां ॥१९॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ आदिरूप तरी त्रिलोचन ॥ ह्मणोनि दाविलें लीलावर्तन ॥ नृसिंहदेवें ॥२०॥

आणिक ऐकें गा भूपती ॥ येविषयीं असे दुजी मती ॥ तेणें गुणेंचि श्रीपतीं ॥ दीधला मान ॥२१॥

तृणाअहार करी अजा ॥ तयेसि व्याघ्र भक्षी सहजा ॥ तये व्याघ्र अथवा गजा ॥ मारी सिंह ॥२२॥

तो सिंह शरभाचा आहार ॥ लक्षांचा करी येकला संहार ॥ ह्मणोनि वीरभद्राहूनि हर ॥ नृसिंह भयानक मानिला ॥२३॥

पाहें पां बहुरूपियाची चेडी ॥ उचित आलिया पाटांव फाडी ॥ कीं आपुलें संपादणींसि परवडी ॥ येईल ह्मणोनी ॥२४॥

शरभासि सिंहें भिइजे ॥ हें तरी सहजें आयकिजे ॥ यापुढें शरभे वर्तन कीजे ॥ तें ऐकें राया ॥२५॥

खंद्योतांचिया कोडी दिसती ॥ परि त्या रविकिरणीं लोपती ॥ तैसे शरभीं सिंह हरती ॥ असंख्यात ॥२६॥

तेजज लोपतां पुरली हांव ॥ तंव शरभें वरी घेतले धांव ॥ कंठ शोभे जेवीं गांव ॥ काळकुटाचा ॥२७॥

पक्ष उभे केले पसरोनी ॥ अठ्ठाहासें मेळविला दंशोनी ॥ पुच्छ घातलें वळसोनी ॥ झोंबावया ॥२८॥

घातुवादिया धातूतें ॥ नूतन करीतसे मागुतें ॥ कीं वज्र जैसें गिरिघातातें ॥ तयापरी चालिला ॥२९॥

जटाजुट पिंजारूनी ॥ गिरिऐशा भुजा पसरूनी ॥ मग चंचूपुट सांवरूनी ॥ धरिलें शिर नृसिंहचें ॥३०॥

अट्टाहास्यें करोनी ॥ नाभी चेपिली चहूं चरणीं ॥ नखीं त्वचा विदारूनी ॥ बांधिले पाय ॥३१॥

पुच्छें बांधोनि पायमोळीं ॥ घेवोनि उडाला अंतराळीं ॥ नेवोनियां आकाशपोकळी ॥ तेथोनी भुमी ॥३२॥

धरोनि उडाला त्रिजगतीं ॥ कासावीस केला श्रीपती ॥ ऐसा सोडी घरी मागुती ॥ याचियेपरी ॥३३॥

वेळोवेळां सोडी घरी ॥ गरुडसर्पाचिये परी ॥ निघोनि जातां वीर्यलहरी ॥ शांत जाहला नृसिंह ॥३४॥

नाभिये चरणीं फाडिला ॥ नखे हुदयीं गाडिला ॥ केशीं धरोनि आसुडिला ॥ अतित्राणें ॥३५॥

तंव नृसिंहें वोळखोनि हर ॥ करिता जाहला नमस्कार ॥ हस्त जोडोनियां मधुर ॥ वदे वाणी ॥३६॥

शंकराचीं अष्टोत्तरशत ॥ नामें जपिन्नला अनंत ॥ जीं ऐकिलिया नासे निश्वित ॥ दुःखभांडार ॥३७॥

प्रणम्य करितां शिवचरणीं ॥ प्रकाशली दिव्यवाणी ॥ मग बोलतसे शारंगपाणी ॥ नानास्तुतीतें ॥३८॥

ह्मणेजी शिवा शंकरा ॥ आर्तिहरणा मृडनीवरा ॥ यक्षपती मयस्करा ॥ शरभरूपा ॥३९॥

आत्मया तूं अंबिकापती ॥ नमो जी शिवा उमापती ॥ स्वयंभु प्रभवा पशुपती ॥ वराहदंता ॥४०॥

देवा आरिचक्रसंहारा ॥ हरा कृतांता नरहरा ॥ प्रळयकारा शंकरा रुद्ररूपा ॥४१॥

जयजया हो कपर्दिकाळा ॥ कर्पूरगौरा जाश्वनीळा ॥ हिरण्यबाहू धरत्रिशूळा ॥ महोग्ररूपा ॥४२॥

भीमरूपा भवा भीमा ॥ जयजयाजी भीमकर्मा ॥ अससी अतीत कर्माअकर्मा ॥ मुंडमाळिया ॥४३॥

सुनीळग्रीवा दूरतरा ॥ धन्यधन्य त्रिशूळधरा ॥ भक्तवरदा त्र्यंबका हरा ॥ डौरधारका ॥४४॥

ओं नमोजी त्रिनयना ॥ स्थाणुरूपा उमारमणा ॥ क्षुधातृषानिवारणा ॥ अमृतरूपा ॥४५॥

नमो हिरण्यबाहवा ॥ पुंजिष्ठा ईशाना नीलग्रीवा ॥ विरूपाक्षा महादेवा ॥ ज्ञानिया तूं ॥४६॥

नमो भैरवा बिल्मिना ॥ नृसिंहसंहारकारणा ॥ कैवर्ता तूं वरूथिना ॥ दुंदुभ्या देवा ॥४७॥

नमो परेशानधिन्वा ॥ विश्वकळा तूं महादेवा ॥ परावरा शूळपणवा ॥ विश्वरूपा ॥४८॥

परावरा मूतनाथा ॥ नमो वाग्दानवाचातीता ॥ अखंड नमो अनागता ॥ व्याघ्रांबरा तुज ॥४९॥

नीळारंभ तूं अतीता ॥ सर्वदेवां चिये आवर्ता ॥ उत्पत्तिसंहारा आणि स्थिता ॥ शैलजापती ॥५०॥

शेलजापती शंकरा ॥ धवलांगीं शोभे भस्मरा ॥ जटाजुटा त्रिनेत्रा ॥ पंचवक्त्रा तूं ॥५१॥

शिवा देवा शूळपाणी ॥ अंकीं गिरिजा भवानी ॥ गौरीहरा नंदिवहनी ॥ सर्पकंठा ॥५२॥

ऐशा अष्टोत्तरशत नामें ॥ हर स्तविला मेघश्यामें ॥ जीं वर्णिलीं असती उत्तमें ॥ सकळऋषीहीं ॥५३॥

असो नृसिंह ह्मणे माझ्या शरीरीं ॥ अज्ञान संचरेल गा त्रिपुरारी ॥ तेव्हां ऐसेंचि निरसन करीं ॥ वत्सलपणें ॥५४॥

ऐसें बोलोनि शिवाप्रती ॥ चरणीं लागला श्रीपती ॥ तंव कृपादृष्टी जगन्नाथीं घातली देखा ॥५५॥

ब्रह्माअदिकरोनि अवधारा ॥ तेहतीसकोटी सुरवरां ॥ आकाशीं मात जयजयकारा ॥ करिते जाहले ॥५६॥

ह्मणती तव पुण्यें विश्वेश्वरा ॥ आह्मी वांचलों सर्वेश्वरा ॥ उदयो करोनि चराचरा ॥ रक्षिलें तुवां ॥५७॥

हरि ह्मणे बालक चुके जरी ॥ तरी माता तयाची उपेक्षा न करी ॥ तैसें तुझेनि आधारें त्रिपुरारी ॥ जाहलें मज ॥५८॥

जयजयाजी महादेवा ॥ रक्षिलें तुवां माझिये जीवा ॥ भवानीवरा हरा शिवा ॥ शरभरूपा तूं ॥५९॥

तुजवांचोनि आमुची वेदना ॥ कोण जाणेल हो त्रिनयना ॥ रूपलावण्य नेत्रहीना ॥ न वर्णवे जैसें ॥६०॥

कीं सुवर्णकोंदणीं रत्‍न जैसें ॥ आह्मांमाजी तवरूप तैसें ॥ ह्मणोनि जीवेभावें परियेसें ध्यावें तुजची ॥६१॥

शिवा अघोरा तनु दोनी ॥ या तुझ्याचि लीला शूळपाणी ॥ ऐसें ब्रह्मा आदिकरोनी ॥ बोलते जाहले ॥६२॥

तयांमाजी जे अघोर तनु ॥ ते सूर्य विष्णु हुताशनु ॥ आणि दुर्जा जे शिवतनु ॥ ते चंद्रमा साच ॥६३॥

तरी ऐशिया दोन्हीं तनूतें ॥ देवा रक्षावें आमुतें ॥ सुख द्यावें चराचरातें ॥ कल्पांतवरी ॥६४॥

ब्रह्मा विष्णु वज्रपाणी ॥ वरूण भूमी सहस्त्रफणी ॥ वायु आदि पंचतत्वें गगनीं ॥ हे तुझीच तनु ॥६५॥

हें स्तवन ऐकोनि शुद्धभावें ॥ मग देवांसि ह्मणितलें सदाशिवें ॥ कीं आह्मांसि आन न पाहावें हरि तोचि हर ॥६६॥

जो मी देवांसि देवेश ॥ सर्वभूतांमाजी भूतेश ॥ नरकेसरी हुषीकेश ॥ तोचि जाणा ॥६७॥

जेवीं जळीं जळ मिळे ॥ तेथें दुजें कैसें वेगळें ॥ नातरी उदकक्षीरमेळें ॥ दुजेपण आथीच ना ॥६८॥

अथवा घृतीं घृत मिळालें ॥ कीं लवणासि केवीं दूषण आलें ॥ तैसें शिवीं लीन जाहलें ॥ नृसिंहतेज ॥६९॥

मग तयाची त्वचा काढूनी ॥ देवो पांघुरला वरूनी ॥ आणिज शिरकमळ खुंटोनी ॥ मुडमाळे ओंविलें ॥७०॥

कीं नृसिंहाचें शिर वहिलें ॥ मुंडमाळे रत्‍न वोंविलें ॥ परमप्रिय अंतरीम मानिलें ॥ देवाधिदेवें ॥७१॥

ऐसें देवांसि सुखी केलें ॥ मग वीरभद्रासह कैलासीं गेलें ॥ नृसिंहसंहारण नाम जाहलें ॥ त्यादिवसापासुनी ॥७२॥

ब्रह्मा सत्यलोकासि गेला ॥ शंभु शिवलोकीं वसिन्नला ॥ क्षीरसागरीं विष्णु पहुडला ॥ लक्ष्मीसहित ॥७३॥

देहत्वचा यापरी हरी ॥ सांडोनियां क्षीरसागरीं ॥ पहुडलासे शेषावरी ॥ कवणा नेणतां ॥७४॥

ऐसें हें शरभाआख्यान ॥ ऐकतां उद्धरती श्रोतेजन ॥ सर्वपापांचे निरसन ॥ आणि यशप्राप्ती ॥७५॥

हें कल्याणकारक कथन ॥ तृष्टिपुष्टीचें वर्धन ॥ अपमृत्युचें होय निरसन ॥ कथाश्रवणें ॥७६॥

अरिचक्राचें प्रधमन ॥ सर्वव्याधींचें निरसन ॥ नासे दुरितदुष्ट स्वप्न ॥ उप्तात हरती ॥७७॥

विषासि होय क्षयकारक ॥ अवर्षणासि नाशक ॥ शुद्धज्ञान प्रकाशक ॥ पुत्रवृद्धी ॥७८॥

होय शिवलोकीं गमन ॥ विषयज्ञान प्रकाशन ॥ विष्णुमायेचें होय निरसन ॥ कथाश्रवणें ॥७९॥

वाकसिद्धिचें होय ज्ञान ॥ अवलक्ष्मी जाय निघोन ॥ लक्ष्मीचें प्राप्त होय सदन ॥ गृहामध्यें वाचितां ॥८०॥

हें प्रातःकाळीं पढावें ॥ कथारंगीं चित्त जडावे ॥ मग तत्काळीं पडावें ॥ पुण्यडोहीं ॥८१॥

चोर व्याघ्रादि सर्वही ॥ शिवावृकांचें भय नाहीं ॥ उल्कापात भूमिकंपही ॥ न देखिजे राया ॥८२॥

रोगकारक वायु न वाजे ॥ अकाळीं मेघही न गर्जें ॥ ज्याज्या अवघडीं पडिजे ॥ तीं तीं विघ्ने नासती ॥८३॥

हें आख्यान पढती ऐकती ॥ त्यांच्या कोटीब्रह्महत्या नासती ॥ सप्त नामात्मक स्तोत्र ह्मणती ॥ ते तरतील संसारीं ॥८४॥

नैमिषारण्यीं हे कथा ॥ सूत सांगे पुण्यवंता ॥ जन्मेजया क्षितीनाथा ॥ सांगे वैशंपायन ॥८५॥

संध्यालोप जाहला जयातें ॥ तेणें जपावीं नामें अष्टोत्तरशतें ॥ हे कथा सांगीतली सुतें ॥ ऋषिवर्यासी ॥८६॥

मग रुद्रगणांसहित ॥ कैलासीं गेला गजास्यतात ॥ आणि विधाता देवांसहित ॥ गेला सत्यलोकासी ॥८७॥

क्षीरसागरीं चक्रपाणी ॥ गेला समवेतसिंर्धुनंदिनी ॥ अमरावतीसि वज्रपाणी ॥ सिंहासनीं बैसला ॥८८॥

वैशपायन ह्मणे गाभूपती ॥ कथा निवेदिली तुजप्रती ॥ तरी विरोध न धरावा चित्तीं ॥ हरिहरांमाजी ॥८९॥

हे कथाकल्पतरूची वाणी ॥ मेळविली नानापुराणीं ॥ जेवीं हेम जोडिजे धमूनी ॥ वसुंधरे पासाव ॥९०॥

नातरी पयगभींचें घृत ॥ मंथन करितां होय प्राप्त ॥ त्याचिये परी हें संस्कृत ॥ मंथिल राया ॥९१॥

ऋषिमताविण बोलणें ॥ तें वाचेसि जाणिजे दूषण ॥ ऐसें केलिया घडे पतन ॥ न लगतां वेळ ॥९२॥

काळिकाखंडीं स्कंदपुराणीं ॥ तेथील कथा हे पावनी ॥ प्रीति पावो शारंगपाणी ॥ हृषीकेश ।९३॥

नृसिंहाअख्यान संहारू ॥ कथानाम कल्पतरु ॥ शरभाआख्यान बडिवारु ॥ पुण्यपावन ॥९४॥

पुराणहित बोलेल जरी ॥ तरी जिव्हा पडो मुखाबाहेरी ॥ असत्य कथा कथन करी ॥ तो कवी जाय अधःपाता ॥९५॥

ऐसें हें नृसिंहविदारण ॥ श्रोतीं ऐकिलें सावधान ॥ पुढें करा जी कथाश्रवण ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥९६॥

॥ इति श्रीकथाकल्पतरू ॥ सप्तमस्तबक मनोहरू ॥ शरभाआख्यानप्रकारू ॥ अष्टमाऽध्यायीं कथियेला ॥९७॥

॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP