॥ श्रीगणेशाय नमः ॥
मुनीसि ह्मणे राव भारत ॥ कथाश्रवणीं गुंतलें चित्त ॥ तरी दाहव्या मनूचा वृत्तांत ॥ सांगावा जी ॥१॥
मग बोले वेदमूर्ती ॥ तूं श्रोता गा पुण्यकीर्ती ॥ मज जोडला तुझिये संगतीं ॥ महालाभ ॥२॥
श्रवण अथवा पठण ॥ जो आवडीं करी हरिकीर्तन ॥ तया यमभोग दारूण ॥ न होती कुंभिपाकादी ॥३॥
असलिया ब्रह्माहत्येचें दूषण ॥ तेंही नासेल सत्य जाण ॥ ऐसें ऐकेल त्याचें विघ्न ॥ निरसे राया ॥४॥
तूं परम विचक्षण ॥ पुसिले पुसीचा ऐकें प्रश्न ॥ जया मार्कंडेय साक्ष जाण ॥ तें सांगतों तुज ॥५॥
तरी कोणे येके दिवशीं ॥ जागृत जाहले हॄषीकेशी ॥ तंव दृष्टी पडली तामसी ॥ प्रळय जालिया ॥६॥
देवासि उपजली करूणा ॥ तों पुढें उभी वासना ॥ देव ह्मणे प्रळयजीवना ॥ कीं मंथन कीजे ॥७॥
शब्द निघतां हुंकार ॥ आटला प्रळयविस्तार ॥ मग सृष्टिरचनेचा अवसर ॥ आला ह्मणोनी ॥८॥
कीं कल्पनेची करोनि रवी ॥ शेष मांजरी हालवी ॥ ऐसे मंथन करितां देवीं ॥ आला घाम ॥९॥
त्या स्वेदाचा जाहला मनु ॥ धार्मिक आणि चंद्रभानु ॥ रात्रीं आणि अनुदिनु ॥ सवेंचि जाहली ॥१०॥
मग धार्मिक घरी पुच्छ ॥ सहस्त्रफणी घरी मुखास ॥ केला मंथनाचा हव्यास ॥ दोघांजणीं ॥११॥
तंव उदका उठिला फेंस ॥ तेणें जाहला धरणीविकास ॥ आणि तेज गोठलिया आकाश ॥ निरालंब जालें ॥१२॥
मग जाहलीं सात पाताळें ॥ तेजागळीं असती सकळें ॥ उदक नाहीसें जाहलें ॥ अकस्मात ॥१३॥
तंव चारी वाचा चारी खाणी ॥ तेथें निघालिया तेक्षणीं ॥ ऐसी तया मनूची करणी ॥ जाहली राया ॥१४॥
परेपासूनि चारी वाचा ॥ ह्मणोनि चतुरानन चहुंमुखांचा ॥ मग चौदाही विद्या तयाच्या ॥ उद्भवल्या मुखीं ॥१५॥
तैसींच तीं चौदा रत्नें ॥ निघालीं तेणें मंथनें ॥ मग विस्तार सर्वगूणें ॥ विधीनें केला ॥१६॥
आतां असो हें येथुनी ॥ सांगों चहूंयुगांची करणी ॥ कृत त्रेत द्वापार कलि याणीं ॥ मार्कडेयो जाणिवला ॥१७॥
मग ह्मणे जन्मेजयो ॥ मुने तूं वेदज्ञ ज्ञानउदयो ॥ तरी पुसिले पुसीचा संदेहो ॥ फेडीं माझा ॥१८॥
जैसें महानदीसि बूडतां ॥ तेथें तारकू पावे अवचिता ॥ तैसा तूं गा द्विजसुता ॥ पावसासि मज ॥१९॥
तरी चारी युगें सांगसी ॥ आणि दहायुगें न सांगसी ॥ ह्मणोनि आश्वर्य मानसीं ॥ वाटतें मज ॥२०॥
ऐकोनि ह्मणे वेदमूर्तीं ॥ कीं जैं पापाची होय उत्पत्ती ॥ मग धर्मलोपें होय शांती ॥ तये युगांची ॥२१॥
ब्रह्मयाचें आयुष्य पुरे ॥ मग निःशेष येक उरे ॥ हे सृष्टिरचना पृथकाकारें ॥ विस्तारस्थिती ॥२२॥
चौदायुगांची पृथक् स्थिती ॥ हीं चारी युगें तैं परतती ॥ ह्मणोनि तयांची नावें लोपती ॥ जन्मेजया गा ॥२३॥
असो कृत त्रेत द्वापार कली ॥ हींचि चारीयुगें रूढलीं ॥ फिरोनि येती तिये वेळीं ॥ मागुती मागुती ॥२४॥
आतां असो चौंयुगांचा मनु ॥ तो तुज सांगों कारणु ॥ शांतिकर्णिक विस्तारुनु ॥ मनुची कथा ॥२५॥
तरी कृतयुगाभीतरीं ॥ सावर्णिक सात्विक अवधारीं ॥ आणि त्रेतायुगाभीतरीं ॥ बोलजि भौक्तिक ॥२६॥
द्वापारींचा मनु जाहला ॥ नामें स्वरोचिक विस्तारला ॥ कलीपाजी चौथा बोलिला ॥ वैवस्वत ॥२७॥
तंव ह्मणे राजा भारत ॥ मुने येक पुसणें वृत्तांत ॥ चौदा चौकड्या येकमनु वर्तत ॥ तरी येके युगीं होय कैसा ॥२८॥
चारी युगांची चौकडी ह्मणसी ॥ येकेयुगीं मनु लेखिसी ॥ तरी हा भिन्नभेद आह्मासी ॥ सांगिजे जी ॥२९॥
मग ह्मणे वैशंपायनु ॥ राया बरवा केला प्रश्नु ॥ तरी ते दहामनु विष्णु ॥ पासूनि जाहले ॥३०॥
आणिक हे गा चारी मनु ॥ युगांपासाव कारणु ॥ जे जे युगीं जो जो मनु ॥ तोचि विस्तार ॥३१॥
चहुंयुगांचें गणीत पुरे ॥ तेथें मनुष्यमात्र नुरे ॥ ह्मणोनि दहा मनु ते दुसरे ॥ जाण राया ॥३२॥
चौदा युगांचा होय प्रळयो ॥ तेथें मनुष्यांचा नुरे ठावो ॥ आणि जीवसृष्टीचा होय क्षयो ॥ चंद्रसूर्यासहित ॥३३॥
मनुष्यांची होय शांती ॥ तैं नाहींच दिनराती ॥ ह्मणोनि युगाचिये अंतीं ॥ मनुष्य केंचें ॥३४॥
दहा मनु ते देवाचे अंश ॥ परि चौंयुगीं चारी प्रकाश ॥ मग विस्तारें मनुष्यअंश ॥ मनुपासाव ॥३५॥
दहा मनु विष्णुपासाव ॥ चारी मनु चौंयुगांचें संभव ॥ युगायुगीं फिरे हा भाव ॥ परि ते दहा वेगळेची ॥३६॥
चारी मनु चौयुगांचें संगतीं ॥ परि तीं युगें फिरोनि येती ॥ चौंयुगांची चौकडी स्थिती ॥ ते मनु वेगळे ॥३७॥
ऐसें जंव बोलिला मुनी ॥ तंव भावें रावो लागला चरणीं ॥ ह्मणे धन्य केली उद्धरणी ॥ मम वंशाची ॥३८॥
मग ह्मणे वैशंपायनु ॥ कृतायुगीं जाहला मनु ॥ तो सांगों विस्तारुनु ॥ राया तुज ॥३९॥
सत्ययुगाच्या प्रथमेशिरीं ॥ कर्णिक मनु अवधारीं ॥ तो सांगों सविस्तरीं ॥ भारता तुज ॥४०॥
तंव राजा पारिक्षित हांसें ॥ ह्मणे येक पुसणें असे ॥ तरीं चंद्रसूर्य प्रत्यक्षें ॥ युगायुगीं वर्तती ॥४१॥
जरी युगाचें गणित पुरे ॥ तरी चंद्र सूर्य कैसा उरे ॥ मुनि ह्मणे मनुप्रळय दुसरे ॥ सांगों तुज ॥४२॥
हर्षे ह्मणे वेदमूर्ती ॥ राया बरवी पुसिली संगती ॥ जेणें श्रवणें होय मुक्ती ॥ पूर्वजांसी ॥४३॥
होय पृथ्वीसहित प्रळयो ॥ तैं कल्प ऐसा जाणावा भावो ॥ आणि पृथ्वीवांचोनि जो क्षयो ॥ तो मनुप्रळयो बोलिजे ॥४४॥
जैं चंद्रसूर्य न विरती ॥ तैं मनुष्यमात्र न उरती ॥ आणिक अंशमात्र उरतो ॥ या पृथ्वीचे ॥४५॥
परि चौंयुगांचें गणित पुरे ॥ आणि जीवसृष्टी संहारे ॥ तैं अंशमात्रें चंद्रदिनकरें ॥ रहिजे लोपोनी ॥४६॥
जेवीं पूर्णिमेपासोनि चंद्रकळां ॥ अमावस्येसि क्षय सकळां ॥ परि पाहतां सूर्यमंडळा ॥ आड लोप ॥४७॥
तेवीं पृथक युगांची पुरे गणना ॥ जेवीं कलाक्षयें चंद्रमा ॥ चहूंयुगांचे मनुनिर्माणा ॥ येर नासे समस्त ॥४८॥
परि होतां युगशांती ॥ समस्त ऋषी मिळोनि येती ॥ इंद्रही त्यजोनि अमरावती ॥ उत्तरे भूमंडळासी ॥४९॥
येती ऋषी येकमेळां ॥ कश्यप अदिती सह सकळां ॥ मग मनुष्यीं अवलीळा ॥ विस्तारे जग ॥५०॥
तेथें देव सदा संतोष ॥ आज्ञापूर्ण आभास वसे ॥ मग प्रकटरूपें दिनेशें ॥ स्वरूपें प्रकाशिजे ॥५१॥
दृष्टांतें ऐकें कारण ॥ जैसें पृथ्वीसि आधार जीवन ॥ तें राहिलेसें व्यापून ॥ घरोनि जिवाळा ॥५२॥
कीं शतवरूषीं पवनभुक ॥ भूमिगत असिजे येक ॥ परि कांति साडलिया पूर्व विवेक ॥ होय प्राप्त ॥५३॥
अथवा दर्दुराचा रेचक ॥ उदकाधारें आवर्तक ॥ तो वर्षाकाळीं साधनक ॥ होय पूर्वरूपें ॥५४॥
नातरी विशिष्ट स्थावरा ॥ छेदिल्या फोडी अंकुरां ॥ मग आप राहे कोटरां ॥ जये ठायासी ॥५५॥
तैसा येथें असे अंश ॥ जिव्हाळे चंद्रदिनेश ॥ आदिविष्णु शुद्धअंश ॥ अभ्यंतरीं गा ॥५६॥
मागुती अंवसेपासुनी ॥ काळा वाढती अंशेंकरूनी ॥ तैसी पूर्ण होय मेदिनी ॥ मन्वंतरूपें चहूंयुगीं ॥५७॥
ऐसी स्थिती असे भारता ॥ तुज कथिली युगकथा ॥ हे जीर्णकाळाची तत्वतां ॥ परि उचिता चुकों नयें ॥५८॥
सांगतां युगांची रचना ॥ अवघड लागे श्रोतेजनां ॥ परि पुसिले पुसीचे वचना ॥ बोलावें ऋषिवाक्ये ॥५९॥
सभेसि होईल अन्यावो ॥ ह्मणोनि बोलणें सत्य न्यायो ॥ तेथें लटिकेपणाचा भावो ॥ नाचरिजे राया ॥६०॥
ह्मणोनि परियेसीं गा राया ॥ लटिकें न बोलावें वायां ॥ तेणें पूर्वज जाती लया ॥ अधःपतनीं ॥६१॥
तैसीच लटिकी साक्ष न दीजे ॥ दोर्षेविण विंप्रा न निंदिजे ॥ आणि अपमान न कीजे ॥ ब्राह्मणाचा ॥६२॥
आतां असो हें भाषण ॥ होय कृतायुगाचें कारण ॥ तें ऐके चित्त देऊन ॥ जन्मेजया गा ॥६३॥
जैं ब्रह्मयाचें आयुष्य खुंटे ॥ तैं हें चराचर आटे ॥ धरणीसहित पाताळकोठें ॥ विरोनि जाती उदकमय ॥६४॥
मग तये कृतयुगापासून ॥ युगमनु तेचि येती फिरोन ॥ परि ते दहामनु निर्माण ॥ चौदाकडींचे वेगळे ॥६५॥
आतां साक्ष असे मार्कंडेय मुनी ॥ हें भृगुवाक्य वराहपुराणीं ॥ तें आइकें चित्त देवोनी ॥ भारता तूं ॥६६॥
गोधूमधान्याची असे कणी ॥ परि षड्रस निपजती पक्कान्नीं ॥ तेथें कायशी शिराणी ॥ पक्कान्नांची ॥६७॥
कीं परिस लाभे जया नरा ॥ तया उणें काय कनकभारां ॥ तैसें आश्रयितां कल्पतरूवरा ॥ कल्पिलें पावे ॥६८॥
तैसा अनंतकथांचा श्रृंगारू ॥ पापनाशन हा कल्पतरु ॥ आर्तिकाचा फिटे संसारु ॥ दुःखमूळ ॥६९॥
कथाआर्तिक जो नरु ॥ तेणें ऐकावा कथाकल्पतरु ॥ मग जन्मांतरींच्या पापां संहारू ॥ होय सहजें ॥७०॥
मेरुमांदार समभारें ॥ दूषणें घडती अपारें ॥ तीं नसती श्रवणमात्रें ॥ आणि पुत्रफळप्राप्ती ॥७१॥
असो पृथ्वीआरूता आकार ॥ आणि परता तो निराकार ॥ आतां कृतयुगाचा संचार ॥ ऐकें राया ॥७२॥
कार्तिकशुद्ध नवमीदिनीं ॥ माजी बुधवार असोनी ॥ कृतयुगाचा प्राप्तकाळ जनीं ॥ जाहला राया ॥७३॥
तंव ह्मणे जन्मेजयो ॥ कैसा तिथिवारांचा उद्भवो ॥ मग मुनि ह्मणे याचा गर्भभावो ॥ सांगो तुज ॥७४॥
सतरालक्षसहस्त्राठ्ठाविस ॥ संवत्सरगणना होय निःशेष ॥ मग द्दापराचा समरस ॥ शेवटीं कलियुग ॥७५॥
आतां कृतयुगाचें शिरीं ॥ ब्रह्मा जन्मला विष्णुनाभ्यंतरीं ॥ मग तयापासाव सर्वप्रकारीं ॥ कालविस्तार जाहला ॥७६॥
जैं देवाची उठली कल्पना ॥ तैंचि तिथिवारांची गणना ॥ चंद्र तारा आणि स्वर्भाना ॥ उद्भवो तेंच ॥७७॥
तैंचि रात्रि आणि दिवस ॥ तिथि वार दिन नक्षत्रांश ॥ आणिक जाहले गा श्रवन ॥ ब्रह्मयापासाव ॥७८॥
ब्रह्मयापासाव मरीचि जाहला ॥ तो कश्यपातें प्रसवला ॥ तयापासाव विस्तारला ॥ गभस्ति देवो ॥७९॥
तयापासाव मनु सावार्णिक ॥ आणि दुसरा शांतिकर्णिक ॥ तयापासोनि अत्रि येक ॥ जाहला असे ॥८०॥
इक्ष्वाकुरावो सोमवंशीं ॥ आला अत्रिपासोनि उदयासी ॥ परि तो आधीं सूर्यवंशीं ॥ जन्मला राया ॥८१॥
सूर्यपत्नी सुवर्णा भूपाळा ॥ तिये सावर्णिक पुत्र जाहला ॥ मग त्या पासाव विस्तारला ॥ सूर्यवंश ॥८२॥
तो सूर्याचा वडिल कुमार ॥ सावर्णिक मनु साचार ॥ आणि धाकुटा पुत्र पवित्र ॥ शांतिकर्ण तो ॥८३॥
वडिलपुत्राची संतती ॥ सूर्यवंश बोलिजे भूपती ॥ धाकुटा शांतिकर्णिक स्थिती ॥ सोमवंशमूळ ॥८४॥
आतां अत्रीचा इक्ष्वाकु बोलिजे ॥ तयाचा विकुक्षि ह्मणिजे ॥ पुढें तयापासाव सहजें ॥ जाहला बाण ॥८५॥
तया बाणाचा पुत्र इंदु ॥ त्याचा कर्मण्य नामे कुमरु ॥ कर्मण्याचा कर्कवीरु ॥ सत्य राया ॥८६॥
त्याचिये जन्मला उदरीं ॥ तो विश्र्वावसु अवधारीं ॥ पुढें तयापासाव शरीरी ॥ गाधिमुनी तो ॥८७॥
विश्वामित्र तयाचा पूर्वज ॥ जो प्रतिसृष्टीकारक सतेज ॥ परि विस्तारितां वंशज ॥ राहिली जगीं ॥८८॥
ब्रह्मसृष्टीहूनि किंचिन्न्युन ॥ प्रतिसृष्टी केली निर्माण ॥ पशु द्रुम आणि वन ॥ देखिजे जगीं ॥८९॥
असो गाधीचे पंच सुत ॥ जगीं विस्तारले विख्यात ॥ वडिलाचा पुत्र विधात ॥ पंचवसु तो ॥९०॥
पंचवसूचा प्रश्नुवा ॥ प्रश्नुवाचा धनुर्धरीवा ॥ धनुर्धरीचा महिघोववा ॥ तया पासाव यमांश ॥९१॥
पुढें यमांशापासुनी ॥ सोमवंश वाढला मेदिनी ॥ माजी मांधाता चक्रवतीं ह्मणोनी ॥ बोलिजे राया ॥९२॥
तैं चारी वर्ण धर्म जाहले ॥ येकोणीस राजे आथिले ॥ त्यांहीं युगप्रथमचरणीं केलें ॥ राज्य राया ॥९३॥
तैं येका पुरुषासि प्रबळ ॥ सहस्त्रहत्तींचें असे बळ ॥ उंच असे येकवीस ताल ॥ मनुष्य पैं ॥९४॥
तैं छत्तीससहस्त्र ग्रहणें ॥ स्वर्गीं होती अयागमनें ॥ प्रत्यक्ष धर्ममूर्तींचें देखणें ॥ चर्मचक्षूंहीं ॥९५॥
ब्राह्मणा येकवीस वेळां बोलाविजे ॥ तंव येकदा घरा येइजे ॥ अथवा न ये तरी न जाइजे ॥ ऐसे असे ॥९६॥
येकवेळ वसुंमती पेरिजे ॥ येकवीसवेळां पीका घेइजे ॥ मातापितरां दुःख न दीजे ॥ ऐसें पूर्वीं ॥९७॥
घेनूसि सवाघट पय होतें ॥ पापसंग्रह कैसा तेथें ॥ सर्वधर्मसंग्रहें दुष्कर्मातें ॥ ठाव कैसा ॥९८॥
वनस्पती सदा फळे ॥ अस्थिगत प्राण मेळें ॥ आयुष्य लक्षवर्षे निर्मळें ॥ होतें राया ॥९९॥
आतां कृतयुगाचा चौथा चरण ॥ तैं राजे जाहले कोणकीण ॥ तें सांगीं विस्तारून ॥ भारता तुज ॥१००॥
विश्र्वावसूचा मुचुकुंद ॥ मुचुकुंदापासाव लेखापाद ॥ लेखापादाचा भैरवनाद ॥ त्याचा परार्ध तत्वतां ॥१॥
परार्धाचा हिरण्यक जाहला ॥ तयाचा हिरण्यकश्यप बोलिला ॥ हिरण्यकश्यपपासूनि जाहला ॥ प्रल्हाद तो ॥२॥
प्रल्हाद भक्तशिरोमणी ॥ पितयानें करितां जाचणी ॥ परि न सांडीच वचनीं ॥ हरीनामातें ॥३॥
प्रल्हादपुत्र विरोचन ॥ विरोचनापासूनि नंदन ॥ बळी बोलिजे गहन ॥ जेणें अमरावती जिंकिली ॥४॥
बळीपासोनि बाणासुर ॥ तेणें संतोषविले हरिहर ॥ युद्धीं मानवला शांरगधर ॥ छेदितां भूजा ॥५॥
पुढें तयाचा जाहला कुमर ॥ जो वेदहरण शंखासुर ॥ जया कारणें मत्स्यावतार ॥ धीरला देवें ॥६॥
लटिकें न बोले महारणीं ॥ तेणें प्रसिन्नला शारंगपाणी ॥ कीं तुज आधीं पूजा ह्मणोनी ॥ दीधला वर ॥७॥
मागुती जाला तयाचा कुमर ॥ तो पवित्रपणें गयासुर ॥ तया पासोनियां कुमर ॥ पिप्पला सुर तो ॥८॥
तथोनि मग तयाचे पाठीं ॥ भद्रकपिल जाहला शेवटीं ॥ ऐसे राजे परिपाठीं ॥ सूर्यवंशींचें ॥९॥
त्यांहीं वसुंधरा दाटली ॥ पूण्यसामुग्री आटली ॥ पापें धरित्री गांजली ॥ दैत्यभारें ॥११०॥
मग धेनुवेषें अनंता ॥ सुमतीं विनवीतसे विधांता ॥ क्षीरसागरीं आलीं अनंता ॥ श्रुत करायासी ॥११॥
तेथें ब्रह्मा विनवी वचनीं ॥ जयजयाजी शारंगपाणी ॥ तूं क्षीरसागरशयनी ॥ शेषशयना ॥१२॥
कृपानिधी नारायणा ॥ अनाथांचिया साह्य कान्हा ॥ पृथ्वी मांडलें दारूणा ॥ विघ्न असे जी ॥१३॥
दैत्यीं दाटली मेदिनी ॥ ह्मणोनी विनवितों शांरगपाणी ॥ तरी पाहिजे केली करणी ॥ अवताराची ॥१४॥
तंव बोलिला नारायण ॥ कीं दुर्वासबोलिला कोपोन ॥ तेणें अंबऋषी फिरला त्रिभुवना ॥ शापमुक्तीस्तव ॥१५॥
तो ममभक्त शिरोमणी ॥ यास्तव दशावतार घेवोनी ॥ तयाचें सांकडें फेडाया लागुनी ॥ मनीं असे माझे ॥१६॥
आतां दैत्यांचा भार जाहला ॥ तरी अवतार पाहिजे धरिला ॥ मी कार्यनिमित्त मानिला ॥ नारायण ॥१७॥
ब्रह्मा ह्मणे जी श्रीपती ॥ हात जोडोनि करी विनंती ॥ मग देव विघातियाप्रती ॥ आज्ञा देता जाहला ॥१८॥
नंतरें तेणें नारायणें ॥ बोलाविलें लक्ष्मीकारणें ॥ ह्मणें त्वां करावें अवतरणें ॥ शक्तिरूपें ॥१९॥
मुनिह्मणे कृतयुगाभीतरीं ॥ चारी अवतार घरी श्रीहरी ॥ दैत्य निर्दाळिले वैरी ॥ केली धर्मस्थापना ॥१२०॥
प्रथमअवताराची सामुग्री ॥ ती धरिली मत्स्यावतारीं ॥ शंखावतीचिये उदरीं ॥ पिता हुताशन ॥२१॥
तेथें प्रथम बाळवयसा ॥ विद्याभ्यास केला सहसा ॥ पाळावया गुरुपण ठसा ॥ लागोनियां ॥२२॥
हंसनगरीचा राज्यधर ॥ नावें आथिला शंखासुर ॥ तेणें सर्व शास्त्रें व्यापार ॥ मोडिला जगीं ॥२३॥
तंव ह्मणे जन्मेजयो ॥ येक फेडाजी संदेहो ॥ तरी कैसा वधिला दैत्यरावो ॥ शंखासुर तो ॥२४॥
मुनि ह्मणे ब्रह्मा ध्यान करितां ॥ येकदा तपीं बैसला होता ॥ एकाग्र अनुष्ठान करितां ॥ वेद हरिले दैत्यानें ॥२५॥
परि अनारिसें वराहपुराणीं ॥ कीं ब्रह्मयानें वेदार्थ प्रार्थिला शारंपाणी ॥ आणिक भविष्योत्तरपुराणी ॥ अनारिसें गा ॥२६॥
धेनुरूपें वसुंधरा ॥ ब्रह्मयासह गेली क्षीरसागरा ॥ मग पापांस्तव सर्वेश्वरा ॥ पडलें सांकडे ॥२७॥
परि अनारिसें पद्मपुराणीं ॥ कीं दहा अवतारांची उशिणी ॥ ते भाष फेडाया लागुनी ॥ केलें पेणें ॥२८॥
असो हे वराहपुराणकथा ॥ तुज कथिली गा भारता ॥ जे संस्कृताचिया अनुमता ॥ अभिन्नपणें ॥२९॥
आतां याचिये पुढील कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ती ऐकावी संतश्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१३०॥
॥ इति श्रीकथाकल्पतरू ॥ सत्पमस्तबक मनोहरू ॥ मनुयुगाआख्यान प्रकारू ॥ पंचमोऽध्यायीं कथियेला ॥१३१॥
॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥
॥ इति श्रीकथाकल्पतरौ सप्तमस्तबके पंचमोऽध्यायः समाप्तः ॥