॥ श्रीगणेशाय नमः ॥
मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ कैसा त्रेतायुगींचा उद्भवो ॥ तो फेडा जी संदेहो ॥ माझिये मनींचा ॥१॥
तरी तवगुरुवर्यैं व्यासें ॥ अठरा पर्वें कथिली उपदेशें ॥ तीं सांगावीं गा अशेषें ॥ मजलागोनी ॥२॥
यानंतरें बोलिला मुनी ॥ ह्मणे राया अठरापर्वाची वाणी ॥ जगत्रयाची कराया पापधुणी ॥ नामाथिलें भारत ॥३॥
आदिपर्व सभापर्व ॥ तिजें अद्रुत अरण्यपर्व ॥ नष्टचर्य विराटपर्व ॥ उद्योगपर्व पांचवें ॥४॥
भीष्मपर्व द्रोणपर्व ॥ कर्ण पर्व शल्यपर्व ॥ शांतिपर्व सौप्तिकपर्व ॥ स्त्रीपर्व बारावें ॥५॥
आश्वमेधिक अनुशासन ॥ आश्रमवासिक शांति जाण ॥ मौसलपर्व महाहनन ॥ गर्भपातन तें ॥६॥
अठरावें स्वर्गारोहण ॥ व्यासदेवें केलें कथन ॥ अर्थ वेदांत शोधून ॥ तें भारत ह्मणिजे ॥७॥
आतां श्रीभागवतवाणी ॥ कथाकल्पतरूसीं ॥ मेळणी ॥ आणिक अठरापुराणीं ॥ केली शो धून ॥८॥
मार्कंडेयपुराण अग्निपुराण ॥ पद्मपुराण गरुडपुराण ॥ कुर्मपुराण वामनपुराण ॥ लिंगपुराण सातवें ॥९॥
नारदपुराण स्कंदपुराण ॥ दाहवें वराहपुराण ॥ अकरावें नृसिंहपुराण ॥ मत्स्यपुराण बारावें ॥१०॥
भविष्योत्तर वायुपुराण ॥ आणिक ब्रह्मवैवर्त पुराण ॥ ब्रह्मपुराण ब्रह्मांडपुराण ॥ अठरावें श्रीभागवत ॥११॥
हें पुराणकथन परिसिलें ॥ तंव जन्मेजयें आणिक पुसिलें ॥ ह्मणे येक सांगा जी वहिलें ॥ मजलागोनी ॥१२॥
माझिये पूर्वजें भीमसेनें ॥ द्वापारीं युद्ध केलें तेणें ॥ तैं कुंजरकलेवरें त्राणें ॥ आदरिलीं आकाशीं ॥१३॥
तींचि कीं भ्रमती अजूनी ॥ संशय घेतला माझिये मनीं ॥ तरी सांगा कृपाकरोनी ॥ भ्रमनिवारणार्थ ॥१४॥
कोणे दळीं हा जीव गुंतला ॥ ह्मणवोनि ऐसा भ्रम उपजला ॥ हा कवण भावो गमला ॥ माझिये मनीं ॥१५॥
अष्टदिशांसी अष्टकमळदळें ॥ कवणे दिशे जीव उजळे ॥ तीं सांगिजे सर्वमेळें ॥ अधऊर्ध्व कैसें ॥१६॥
तरी हें सकळ निश्वळमनें ॥ घडावें मजसी सांगणें ॥ तंव वैशंपायन ह्मणे ॥ ऐक राया ॥१७॥
हृदयीं अष्टदळअंबुजीं ॥ तेथें परमहंस असे सहजीं ॥ मग तो दळोदळीं विराजी ॥ भ्रमण करितां ॥१८॥
पूर्वदिशेचें शुभ्रदळ ॥ तेथें आसन करी निर्मळ ॥ तेव्हा पुण्यवासना निर्मळ ॥ उपजे राया ॥१९॥
धूम्रवर्ण आग्नेयकोण ॥ तेथे परमहंसा होय भ्रमण ॥ तेव्हां चिंता आलस्यादि गुण ॥ होय सुखदुःख ॥२०॥
लोहितप्रभा दक्षिणदळीं ॥ तेथें परमहंस ये जिये वेळीं ॥ भ्रम मत्सर तये वेळीं ॥ उपजे राया ॥२१॥
परमहंस ये नैॠत्यदळा ॥ तयाचा वर्ण असे निळा ॥ तेव्हां अधर्माचिया फळा ॥ उद्धव होय ॥२२॥
पश्चिमदळ तें असे पिंवळें ॥ तेथेंक हंस ये जये वेळे ॥ तैं धर्मपुण्याचे सोहळे ॥ होती राया ॥२३॥
वायव्यदळींची होय स्थिती ॥ जेथें काश्मीराची कांती ॥ तेथें हंस ये सहजगती ॥ तैं उत्तम वासना होय ॥२४॥
उत्तरदळ माणिकवर्ण ॥ तेथें हंस खेळे आपण ॥ तैं संतोषचि पूर्णघन ॥ इच्छी भारता ॥२५॥
ईशान्यदळींचें विश्रामण ॥ तया विराजे हेमवर्ण ॥ तैं उदार दया पूर्ण ॥ उपजे राया ॥२६॥
हंस विचरे अष्टदळसंधीं ॥ तैं उपजली नानाव्याधीं ॥ वर्तें ऊर्ध्वकमळामधीं ॥ तैं जागृती आणि ज्ञान ॥२७॥
ऐसा जीव राया भारता ॥ वर्तमानीं तुझा वर्ततां ॥ ह्मणोनि भ्रमतुझिया चित्ता ॥ वाटला सत्य ॥२८॥
तेव्हां हंस दक्षिणदळीं होता ॥ ह्मणोनि भ्रम उपजला चित्त ॥ प्रचीत यावया भारता ॥ नलगे वेळ ॥२९॥
येरवीं तूं पवित्र राजा ॥ केवीं होय भाव दुजा ॥ असे पुण्यवासना सहजा ॥ राया तुझी ॥३०॥
आतां असो हे आडकथा ॥ सावधान व्हावें श्रोता ॥ हे अखिल नाशावया दुरितां ॥ असे समर्थ ॥३१॥
आतां त्रेतायुग जे रचिलें ॥ तें बारालक्ष शाण्णवसहस्त्रीं जाहलें ॥ तयामाजी उद्भवलें ॥ चराचर हें ॥३२॥
वैशाखशुद्ध तृतीयेस ॥ त्रेतायुगाचा होय प्रवेश ॥ प्रथमप्रहरीं उद्धवास ॥ प्राप्त जाहलें ॥३३॥
तैं जामदग्न्य ब्रह्मवर्णीं ॥ प्रगट जाहला तैं पासुनी ॥ जो भृगुवंशी महाभूषणीं ॥ वाढला राया ॥३४॥
मागुती रघुवंशाची वल्ली ॥ रामाअवतारें विस्तारली ॥ ते कथा असे कथिली ॥ भूगोलखंडीं ॥३५॥
ते भूगोलखंडींची कथा ॥ सविस्तर असे भारता ॥ जे भविष्योत्तरींच्या अनुमता ॥ पुण्यपावनी ॥३६॥
कराया विश्वोपकारासी ॥ संस्कृत कथिलें प्राकृतेंसीं ॥ कीं तृषार्त पीडे मार्गासीं ॥ कूपीं उदक असतां ॥३७॥
तैसी नव्हती तडागंसरिता ॥ पात्र दोर नलगे सर्वथा ॥ करांजुळीनेंचि होय तृप्तता ॥ तैसें प्राकृत ॥३८॥
आतां मांघातयापासुनी ॥ आरुती जाहली विस्तारणी ॥ परि मूळ चतुराननी ॥ असे तया ॥३९॥
मांघातयाचे दोन सुत ॥ येक मुचुकुंद दुजा परिक्षित ॥ परिक्षितीचा मनु विख्यात ॥ मनुचा उत्तानचरण ॥४०॥
उत्त्नचरणाचा ध्रुव कुमर ॥ ध्रुवाचा जाणिजे वत्सर ॥ वत्सराचा असे कुमर ॥ उल्मुख नामें ॥४१॥
उल्मुखाचा पुत्र अंग ॥ अंगाचा वेणू उपांग ॥ तेणें विहितपंथ केला भंग ॥ पीडिले ब्राह्मण ॥४२॥
वेणुदेहोत्पन्न सुतु ॥ तया नाम बोलिजे पृथु ॥ जेणें चालविला विहितपंथु ॥ सनातन जो ॥४३॥
तेणें धनुष्याचे आंडणीं ॥ सकळही गिरि पाडुनी ॥ पृथ्वीसि पराक्रमें जिंकूनी ॥ केली समान ॥४४॥
आतां असो हा पुढार ॥ पृथूचा कुमर हरिश्वंद्र । हरिश्वंद्रसुत परिकर ॥ रोहिदास तो ॥४५॥
तया रोहिदासा पासुन ॥ अंबऋषी जाहला जाण ॥ मग अंबऋषीचा नंदन ताल जंघ नामें ॥४६॥
तालजंघापासूनि कुमर ॥ अजखंड बोलिजे विचित्र ॥ ऐसा सूर्यवंशाचा विस्तार ॥ विस्तारलासे ॥४७॥
पुढे तयाचा नाडसिंधु ॥ नाडसिंधूचा नाडयोगु ॥ नाडयोगाचा गर्भसाधु ॥ धुंधुमार ॥४८॥
तये धुधुमाराचे पोटीं ॥ सगरांची उद्भवली पेटी ॥ सगरापासोनि उठाउठी ॥ जाहला भगीरथ ॥४९॥
भगीरथाचिये संततीं ॥ जाहली दिलीपाची उप्तत्ती ॥ दिलीपाचा रघु चक्रवर्तीं ॥ जाण राया ॥५०॥
रघुरायाचा पुत्र ऐकिला ॥ तो अजराज नामें आथिला ॥ अजराजाचा पुत्र जाहला ॥ द्शरथ नामें ॥५१॥
पुढें दशरथा पासूनी ॥ जाहली रामरत्नखाणी ॥ पुढें रामचंद्रापासूनी ॥ लव अंकुश दोघे ॥५२॥
ते सांगों जरी रामकथा ॥ तरी विस्तार पावेल ग्रंथा ॥ तॄतीयस्तबकीं गा भारता ॥ हे असे साक्ष ॥५३॥
असो अंकुशापासोनि विस्तार ॥ जाहला सुकर्म नामें शूर ॥ आणि सुकर्माचा कुमर ॥ नष्टनाभी तो ॥५४॥
नष्टनाभीचा परमऋषी ॥ क्षेमदधी त्याचिये कुशी ॥ त्यासी जाहला सुत परियेसीं ॥ देवाजित तो ॥५५॥
देवाजिताचा उनाम ह्मणती ॥ उनामाचा परिजाग्निक सांगती ॥ परिजाग्निकाचा शैल भूपती ॥ शैलाचा नभ ॥५६॥
नभाचा सुत वज्रबाहो ॥ वज्रबाहूचा विश्रवो ॥ सुराव तयाचा उद्भवो ॥ हिरण्यनाभी ॥५७॥
हिरण्याचा वीर्यतेज ॥ तया शैल्य ऐसें चोज ॥ तयाचा असे सहजें सहज ॥ धर्मसेन ॥५८॥
धर्मसेनाचा केशवसंधी ॥ तयाचा सुत अतिवर्ण बुद्धी ॥ अतिवर्णाचा धुशधी ॥ तयाचा अजमढि ॥५९॥
अजमीढाचा जनरूपु ॥ जनरूपाचा परळदीपू ॥ परळदीपाचा स्वरूपू ॥ रूपसेन ॥६०॥
ऐसी रामवंशावळी ॥ बावन्न पिढिया बोलिली ॥ त्रेतायुगीं विस्तारली ॥ जाण राया ॥६१॥
त्रेतायुग वर्तमानीं ॥ धर्म चाले चहूंचरणीं ॥ क्षत्रियां अग्निहोत्रकरणी ॥ होती राया ॥६२॥
आतां असों हें वंशवर्णन ॥ ऐक राया चित्त देऊन ॥ सर्वचराचर विस्तरण ॥ जाहलें त्रेतीं ॥६३॥
त्रेता युगीं गीर्वाण बोली ॥ कृतयुगाचीच असे चाली ॥ मनुष्यप्रमाण गणना जाहली ॥ चौदा ताल ॥६४॥
मानवीं अद्भुत असे शक्ती ॥ पुरुषीं बळ सहस्त्र हत्ती ॥ आयुष्याची असे गणती ॥ दहासहस्त्र वरूषें ॥६५॥
पृथ्वी येकवेळां पेरिजे ॥ चौदावेळा पीक घेइजे ॥ वनस्पती सदा फळिजे ॥ भारता राया ॥६६॥
सवाघट दुग्ध गौशीं ॥ असत्य न ये वाचेसी ॥ तैं तीन अवतार हृषीकेशी ॥ अवतरलासें ॥६७॥
दैत्यीं दाटली वसुमतीं ॥ संकट पडिलें गा भूपती ॥ ह्मणेनियांचे श्रीपती ॥ अवतरला पैं ॥६८॥
कश्यपऋषीची जे नारी ॥ अदिती नामें सुंदरी ॥ तिचिये गर्भीं मुरारी ॥ अवतरलासे ॥६९॥
वासुदेव पिता ह्मणिजेती ॥ वसिष्ठगुरु केला निश्चिती ॥ तैं रक्षिलीसे वसुमती ॥ दैत्यांपासाव ॥७०॥
ऐसें ऐकोनियां भूपती ॥ ह्मणे कैशी रक्षिली वसुमती ॥ ते सकळही सांगा स्थिती ॥ आद्यंत मज ॥७१॥
मग ह्मणे वैशंपायन मुनी ॥ बळी उपजला कोणैकदिनीं तेणें अमरावतीसह तिन्हीं ॥ जिंकिलीं भुवनें ॥७२॥
ऐशिये वेळीं पाप प्रकटलें ॥ धरणीनें पीक सांडिलें ॥ तैं आपुलेंचि सुकृत साधिलें ॥ तेणें रायें ॥७३॥
करी नानायज्ञदानें ॥ व्रतें आणि उद्यापनें ॥ बळी ऐसें नाम तेणें ॥ जाहलें राया ॥७४॥
बळिधाकें पळाला इंद्र ॥ कैलास सांडोनियां रुद्र ॥ सत्यलोकासि चतुर्वक्त्र ॥ सोडी भयें ॥७५॥
मग त्याहीं विनविला मुरारी ॥ जावोनियां क्षीरसागरीं ॥ हात जो डोनियां पवित्रीं ॥ विनवी घांता ॥७६॥
जयजयाजी शेषशयना ॥ क्षीरसागरिया नारायणा ॥ दुःख उद्भवलें इंद्रा त्रिनयना ॥ चतुर्मखासहित ॥७७॥
दैत्यी दाटली वसुंधरा ॥ यज्ञपुण्यें घेतलें अमरपुरा ॥ कैलासासहित पंचवक्त्रा ॥ मजही देवा ॥७८॥
ऐसी ऐकोनि आर्त वाणी ॥ मग बोलिला शारंगपाणी ॥ आणि तैशीच केली करणी ॥ अवताराची ॥७९॥
तरी येविषयीं समुळकथा ॥ द्वितीयस्तबकीं असे भारता ॥ मागुतेनी सांगतां ग्रथा ॥ होईल पसर ॥८०॥
असो अदितीमातेचे कुशीं ॥ अवतरले गा हृषीकेशी ॥ वामनरूपें परियेसीं ॥ स्ववीर्यानें ॥८१॥
त्रिपदें त्रिभुवनें आटिली ॥ दैत्य घातला पाताळी ॥ परि भक्त ह्मणोनियां बळी ॥ स्थापिला स्वपदीं ॥८२॥
तंव बोलिला जन्मेजयो ॥ ह्मणे येक फेडाजी संदेहो ॥ कश्यपराणी आणि पिता वासुदेवो ॥ कवणे गुणें ॥८३॥
मग ह्मणे वैशंपायन ॥ आदितीसि पुत्र नाहीं ह्मणोन ॥ क्षीरसागरप्रति जावोन ॥ विनविला तयेनें श्रीहरी ॥८४॥
सहस्त्र संवत्सर भरले ॥ अदिती मातेनें तप केलें ॥ सुखसमाधीं वीर्य ढळलें ॥ आदिविष्णूचें ॥८५॥
परि तें न कळतां अदिती ॥ चरणीं चुरिलें वसुमतीं ॥ तें विखुरलेपणें गा भूपती ॥ जाहले बहुत ॥८६॥
असो मग कोणेयेके दिनीं ॥ जागृत जाहले शारंगपाणी ॥ तंव तपव्रतावस्थे कामिनी ॥ देखिली कश्यपाची ॥८७॥
मग ह्मणे माग प्रसन्न ॥ येरी ह्मणे द्यावें पुत्रदान ॥ यावरी बोले जगज्जीवन ॥ तंव उसळलें वीर्य भूमिगत ॥८८॥
तें विष्णूनें आपुल्या करीं ॥ पूर्वील वीर्य अग्नीचे परि ॥ आदितीसि दीधलें पसाभरी ॥ जाज्वल्यमान ॥८९॥
प्रसन्नोत्तरीं बोले भाषा ॥ ह्मणे पुत्र दिला आपुले सारिखा ॥ तेणें उभयतां पावलीं हरिखा ॥ अदिती आणि श्रीविष्णु ॥९०॥
ह्मणोनियां तियेचे पोटीं ॥ देव जन्मले तेहतीसकोटी ॥ ब्रह्मया घडामोड मोठी ॥ कश्यपपृथ्वीसी ॥९१॥
परि श्रीहरीसि ज्ञान जाहलें ॥ कीं निद्रावसरीं ॥ स्ववीर्य ढळलें ॥ मग देवें मनीं विचारिलें ॥ कैसें आतां ॥९२॥
मागुतीं अदितीसि ह्मणे हरी ॥ मज येणें घडलें तुझे उदरीं ॥ वीर्य दिधलें तुझे करीं ॥ ह्मणवोनियां ॥९३॥
ते दिवशींहूनि गर्भप्रवेशु ॥ वासुदेवाचा असे अंत्रु ॥ ह्मणोनि नामाच सौरसु ॥ जाहला राया ॥९४॥
हे कथा भविष्योत्तरपुराणीं ॥ वर्णिलीसे संस्कृत वाणी ॥ केली प्राकृतासि मेळणी ॥ कल्पतरूचे ॥९५॥
जेवीं सुवर्णमुद्रिका करीं ॥ हिरा रत्न जोडिजे वरी ॥ मग त्य श्रृंगाराची कुसरी ॥ दिसे अनुपम्य ॥९६॥
यानंतरें परशुराम जन्मला ॥ तो सांगूं जरी वहिला ॥ तरी तो कथाभाग कथिला ॥ द्वितीयस्त बकीं ॥९७॥
आतां तिसरा अवतार ॥ कथी वाल्मिक ऋषीश्वर ॥ श्रीराम जन्मला धनुर्धर ॥ रघुकुळटिळक ॥९८॥
जाणोविश्वामित्राचा आत्मा ॥ मेघश्याम परमात्मा ॥ येकपत्नी व्रत श्रीरामा ॥ भवतारक जो ॥९९॥
तयाची कौसल्या असे माता ॥ आणि जाणिजे दशरथ पिता ॥ महासती ते पत्नी सीता ॥ गुरु विश्वामित्र ॥१००॥
जैं सीताहरण जाहलें ॥ तैं लंकेचें क्षेत्र केलें ॥ शेवटीं मुक्तिपद दीधलें ॥ रावणासी ॥१॥
तंव ह्मणे पारिक्षिती ॥ कीं रावणासि ब्राह्मण ह्माणती ॥ तरी हे कवणाची वीर्योप्तत्ती ॥ जाहली मुने ॥२॥
मग ह्मणे वैशंपायन ॥ राया बरवा पुशिला प्रश्न ॥ तरी प्रसवला चतुरानन ॥ तया पुलस्तीसी ॥३॥
तो पुलस्ती महातपोधन ॥ तयाचा जाहला नंदन ॥ तया विश्रवा नामाभिधान ॥ बोलिजे राया ॥४॥
विश्रव्यासी तप आचरितां ॥ आली कैकसी रावणमाता ॥ तियेनें अभिलाषिलें पुलस्तिसुता ॥ देखोनि रूप उत्तम ॥५॥
येकदां प्रदोषकाळ ॥ समयासी ऋतुमागती होय राक्षसी ॥ तंव तो ह्मणे मी तपोराशी ॥ ऐसें न घडे ॥६॥
परि येरी ह्मणे ऋषिसुता ॥ आतां शापीन ऋतु न देतां ॥ येरू ह्मणे आन विचार करितां ॥ शापील हे निश्वयें ॥७॥
मग कैंचा तपआचार ॥ जाईल सर्व मानभर ॥ स्त्रियेनें मांडिला अविचार ॥ तरी आतां कीजे कैसें ॥८॥
ऋषि ह्मणे मी धर्मिष्ठ मुनी ॥ तूंचि रक्षीं हो कामिनी ॥ कैसा ऋतु देणें ह्मणवोनि ॥ बोले तयेसी ॥९॥
तंव तियेनें पूर्वरूप सांडिलें ॥ लावण्यरूप आदरिलें ॥ मग काममोहें ऋतु देते जाहले ॥ मुनीराव ॥११०॥
सुरतरंगीं गर्भ राहिला ॥ तोचि दशानन जन्मला ॥ दाहवा चंद्र होता वहिला मुनिरायासी ॥११॥
यास्तव ब्रह्माराक्षस ह्मणिजे ॥ जैसें बीज संभविजे ॥ हा निश्वयाथों जाणिजे ॥ भारता तूं गा ॥१२॥
यानंतरें ह्मणे भूपती ॥ मांगा सूर्यवंश कथिला मजप्रती ॥ तरी ते ध्रुवकथेची स्थिती ॥ सांगिजे आतां ॥१३॥
तेव्हां मग ध्रुवाची कथा ॥ सांगणें पडिली ऋषिनाथा ॥ ते ऐकावी पुढें श्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१४॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ सप्तमस्तबक मनोहरू ॥ त्रेतायुगआख्यानप्रकारू ॥ नवामाध्यायीं कथियेला ॥११५॥