कथाकल्पतरू - स्तबक ७ - अध्याय १

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीशांतादुर्गा प्रसन्न ॥

नमो व्यंकटरूपा नारायणा ॥ तुज विनवितों जगज्जीवना ॥ सर्वरूपां आणि त्रिभुवना ॥ भरोनि उरलासि तूं ॥१॥

तूंचि शारदा तूंचि गणेश ॥ तूं सच्चिदानंद उपदेश ॥ तुजविण नाहीं आणिक ईश ॥ उदार दाता ॥२॥

तुझा वरदप्रसाद होय ॥ तरीच लाहिजे सकळ सोय ॥ कीं इच्छापरिपूर्ण कार्य होय ॥ चिंतनीं जयाचे ॥३॥

जयजयाजी श्री अनंता ॥ शेषशयना तूं निदिस्था ॥ जयजय हो गोपिनाथा ॥ कैवल्यदानी ॥४॥

जयजय परमानंदा ॥ अनादिसिद्धा गोविंदा ॥ गुणातीता मूळकंदा ॥ निजाक्षर तूं ॥५॥

जयजयाजी भगवंता ॥ षड्‍गुणैश्र्वर्यसंपन्नता ॥ परात्परा मोक्षदाता ॥ कैवल्यदानी ॥६॥

जय स्वर्गस्थित्यंतस्थापना ॥ बालमुकुंदा नारायणा ॥ करुणाकरा नीललोचना ॥ विश्र्वरूपा ॥७॥

जय गोपीजनवल्लभा ॥ बरवी दिसे पीतांबरशोभा ॥ प्रभारत्‍नमुकुटगाभा ॥ वैजयंतीसह ॥८॥

जयजय भक्तजनतारका ॥ असुरमर्दना स्थितिस्थापका ॥ सहज तेज मिरवे मृगांका ॥ शृंगार दिव्य ॥९॥

आतां जें बोलणें तुजविणें ॥ तें जणूं वंध्यावल्लीचें फुलणें ॥ तरी काय काज फळाविणें ॥ आथिजे पैं ॥१०॥

कीं शृंगार करिजे वनितां ॥ तो भ्रताराविणें शून्यता ॥ जगीं न लाहे सौभाग्यता ॥ व्यर्थ जैसी ॥११॥

नातरी वांश स्त्री मोहाळ ॥ काय कीजे तिचा उदरगोळ ॥ कीं अपत्याविण कीडाळ ॥ न फिटे तयेचें ॥१२॥

जैसी उदकावीण सरितां ॥ ते काय कीजे निर्फळता ॥ उपकार न करवे तृषिता ॥ पीडलीया ॥१३॥

आतां असो हें दृष्टांतवचन ॥ पुढें तुझेंचि असे कारण ॥ जैसें गंगे दीजे अर्ध्यदान ॥ गंगोदकाचेंची ॥१४॥

नातरी अर्का दीजे आरती ॥ ते काय आणिकाची दीप्ती ॥ तैसी करितों ॥ तुझी स्तुती ॥ तुझ्याचि कृपें ॥१५॥

कीं त्रिवेणीच्या भीतरीं ॥ ते स्नानें सुशीतळ करी ॥ अर्ध्य दीजे दोन्हीं करीं ॥ उदकें उदकासी ॥१६॥

तैसें येथें विश्र्वंभरा ॥ तुझेंचि तुज अर्पावें दातारा ॥ आतां ज्ञानगर्भींचा गाभारा ॥ प्रेरावा तुवां ॥१७॥

विरुढला जो कल्पतरु ॥ त्याचा तूंचि होई बनकरु ॥ मुक्तिपुष्पाचाही मधुकरु ॥ तुंचि येथें ॥१८॥

मागां कल्पतरूचा साहवा ॥ पूर्ण जाहला स्तबक बरवा ॥ तरी आतां स्तबक सातवा ॥ बोलवीं पुढें ॥१९॥

जन्मेजय राजा भारत ॥ मुनीची असे स्तुति करीत ॥ नानाद्रव्यांहीं चरण क्षाळित ॥ वैशंपायनाचे ॥२०॥

रत्‍नखचित आणिला पाट ॥ जो चंदनाचा चोखट ॥ तो मुक्ताफळीं सुभट ॥ भरिला भोंवता ॥२१॥

करूनि वाळूविची थडी ॥ त्यावरी पीतांबराची घडी ॥ ऐसी करोनियां परवडी ॥ वरी सोडिला ग्रथ ॥२२॥

मग तो मुनी वैशंपायन ॥ रायें बैसविला हातीं धरून ॥ रत्‍नखचित पाट मांडून ॥ आसन वरी घातलें ॥२३॥

सुवर्णपुष्पांचिया माळा ॥ घातल्या वैशंपायनाचे गळां ॥ चरणीं ठेवोनि शिरकमळा ॥ विनवी राजा ॥२४॥

दोनी जोडोनियां पाणी ॥ रावो लागला मुनिचरणीं ॥ अठरा ब्रह्महत्यांची धुणी ॥ केली होणोनियां ॥२५॥

याउपरीं वैशंपायन मुनी ॥ हॄदयी स्मेर शारंगपाणी ॥ केली अंतरीं चिंतवणी ॥ गुरूडध्वजाची ॥२६॥

तंव पावला श्रीहरी ॥ हात ठेविला मुनीचे शिरीं ॥ बीज प्रकाशविलें अंतरीं ॥ ग्रंथ वदावया ॥२७॥

मग स्मरिली कुळदेवता ॥ गुरु श्रोतयां विष्णुभक्तां ॥ वेदव्यासादिकां समस्तां ॥ केलें नमन ॥२८॥

आतां कामधेनूच्या समरसें ॥ घृतमिश्रित दुग्ध‍असे ॥ तें नवनीताचिया विकासें ॥ वेगळें होय ॥२९॥

कीं नानाद्रव्यांचा सुवास ॥ पुष्पीं असे समरस ॥ तैसा कॄष्णनामाचा अधिवास ॥ असे या कथेसी ॥३०॥

कीं काष्ठासवें हुतांशन ॥ असे तयातें व्यापून ॥ तैसा कथेसर्व नारायण । मिश्रित असे ॥३१॥

जैसें गभस्तिसवें तेज ॥ कीं सोमासवें अमृत सहज ॥ तैसें अनंतनामराज ॥ कथेसंगें ॥३२॥

नातरी नेत्रींची बाहुली ॥ व्यापूनि असे राहिली ॥ तैसी अनंतनामावळी ॥ मीनली कथेसी ॥३३॥

नानावनस्पतींचा रस ॥ मक्षिका मेळवी अशेष ॥ तैसा ग्रंथराज नवरस ॥ कल्पतरू हा ॥३४॥

जेवीं कल्पतरु कल्पिलें दाता ॥ तेवीं प्रीती सांगेन हरिकथा ॥ ते नारायणासि समर्पितां ॥ कल्पतरू हा ॥३५॥

अपूर्व शास्त्रें शोधोनी ॥ मेळविली हे रत्‍नखाणी ॥ जैसा हिरा हेमभूषणीं ॥ पावे शोभा ॥३६॥

तैसा ग्रंथशिरोमणी ॥ कल्पतरू नानापुराणीं ॥ शोधोनि कथाआळणी ॥ जाहला सप्तम स्तबक ॥३७॥

षष्ठस्तबक जालियावरी ॥ हा आरंभिला कपाळेश्वरीं ॥ जेथें साक्षात आदिकुमरी ॥ प्रकटली असे ॥३८॥

ते सौभाग्यवंती साचार ॥ कृपेनें बोलिला उत्तर ॥ कीं कल्पतरु ग्रंथ निर्धार ॥ आरंभीं तुं ॥३९॥

ऐसें कुमारी बोलोनी ॥ करीं दीधली लेखणी ॥ लिहावया अंनतवाणी ॥ कल्पतरू हा ॥४०॥

अठरापुराणांचा संबंध ॥ बोलविला महा अगाध ॥ सांकडें फिटे प्रमाणसिद्ध ॥ ऐके तयाचें ॥४१॥

हे असोत दृष्टांत आतां ॥ पुढें असे अनंतकथा ॥ आकाश काय मापें मोजितां ॥ वोहटूं शके ॥४२॥

गंगेचिया महापूरा ॥ तृणें काय बांधवे बांधेरा ॥ कीं नदीचिया बाळसरां ॥ मोजावें कवणें ॥४३॥

नातरी वर्षाकाळींचे नीरा ॥ कोणा मोजवती तोयधारा ॥ गणित करितां शेषाशहस्त्रां ॥ वक्त्रीं न होय ॥४४॥

तैसे श्रीकृष्णाचे पंवाडे ॥ वर्णितां सहस्त्रमुखा जिव्हादुखंडे ॥ महाश्रेष्ठ तयाचेनिपाडें ॥ दुजा कोण वर्णील ॥४५॥

असो आतां या जन्मेजया ॥ संगतीं जोडला मुनिराया ॥ तरी त्या राजा ऋषींचियां ॥ संवादा ऐका ॥४६॥

सानंद ह्मणे जन्मेजयो ॥ मुनी तूं ज्ञानकथेचा डोहो ॥ कीं उद्धरावया उपावो ॥ ब्रह्महत्येचा ॥४७॥

मग ह्मणे राजा भारत ॥ मुने तुझेनि जाहलों तृप्त ॥ तरी चौदामनूंचा वृत्तांत ॥ सांगे मज ॥४८॥

कीती संवत्सरांचें युग ॥ कितीयुगांचा चौकडीभाग ॥ कीतीचौकड्या मनूचा भोग ॥ आणि किती मनू कल्पाचे ॥४९॥

उत्पन्न मनु जाहले किती ॥ केव्हां प्रळयो केव्हां शांती ॥ घडामोडी कवणेस्थितीं ॥ तें सांगावें जी ॥५०॥

ऐसें दोनी करजोडीनी ॥ मुनीसि पुसे राव वचनीं ॥ तंव बोलिला हर्षोनी ॥ वैशंपायन ॥५१॥

मग ह्मणे मुनीश्वरु ॥ कोण जाणे हा विचारू ॥ परि मज बोलिला श्रीगुरु ॥ वेदव्यास वचनीं ॥५२॥

त्या वेदव्यासाचें उच्छिष्ट ॥ बोलावें लागत असे निकट ॥ प्रसादभक्त वरिष्ठ ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥५३॥

॥ इति श्रीकथाकल्पतरू ॥ सप्तमस्तबक‍अवसरू ॥ मंगलाचरणविस्तारू ॥ प्रथमाऽध्यायीं कथियेला ॥५४॥

॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP