श्रीगणेशाय नमः
मुनीसि ह्नणे राव भारत ॥ मागां राहिलासे ग्रं थार्थ ॥ कीं कृतत्रेतांचा घटितार्थ ॥ कथिला तुह्मीं ॥१॥
परि द्वापरयुग कैसें जाहलें ॥ तें कवणिये तिथिसी रचिलें ॥ माजी किती राजे वर्तले ॥ आणि किती अवतार ॥२॥
ऐसें ऐकोनि ह्नणे मुनी ॥ भारता तूं महाज्ञानी ॥ तरी ऐकें चित्त देवोनी ॥ पुढील कथन ॥३॥
अमावास्या माघवद्यीं ॥ बुधवारीं द्वापरप्रसिद्धी ॥ तये वर्तमानाचिये आदीं ॥ अवतरला अत्री ॥४॥
अत्रि हा ब्रह्मया पासुनी ॥ सोमवंश जाणिजे तेथुनी ॥ राजे जाहले त्या वर्तमानी ॥ ते ऐक आतां ॥५॥
तये अत्रीचिये उदरीं ॥ सोम जाहला अवधारीं ॥ सोमापासाव सविस्तारीं ॥ जाणिजे बुध ॥६॥
बुधापासोनि पुरुरवा ॥ जो असे नरसंभवा ॥ तेथोनि बोलिजे आघवा ॥ सोमवंश ॥७॥
सुद्युम्नाची जाहली नारी ॥ ते येळा नामें सुंदरी ॥ वन शापिलें होतं त्रिपुरारीं ॥ तयास्तव ॥८॥
आतां असो हे सुद्युम्नकथा ॥ प्रथमस्तबकींची असे वार्ता ॥ कथिलेंचि कथणें भारता ॥ अनुचित होय ॥९॥
तरी श्रीभागवतींची वाणी ॥ कीं तिघे पुत्र बुधभुवनीं ॥ आणि दोन सूर्यवंशीं उद्भवोनी ॥ गेला सुद्युम्न तपासी ॥१०॥
तो पुरुरवा पुत्र बुधाचा ॥ तेथोनि पांचवा ययाती नहुषाचा ॥ पुढें पुत्र ययातीचा ॥ बोलिजे पुरु ॥११॥
पुरुचिये वंशीं निश्विती ॥ येकविसावा शंतनुभूपती ॥ पुढें विचित्रवीर्याची संतती ॥ पंडुराय व्यासवीर्ये ॥ ॥१२॥
पंडुपत्नी कुंती जाण ॥ तेथें इंद्रवीर्ये करुन ॥ पुत्र जन्मला नामें अर्जुन ॥ महाबाहो ॥१३॥
नारायणें त्या अर्जुनातें ॥ शक्ति दीधली स्वहातें ॥ तेणें कार्ये केलीं बहुतें ॥ वाटिवेचीं ॥१४॥
तया अर्जुनाचा सुत अभिमन्य ॥ परीक्षितीं तया पासून ॥ त्या परीक्षितीचा नंदन ॥ जन्मेजया तूं ॥१५॥
पुढें गा राया तुझे पोटीं ॥ शतानीक असे शेवटीं ॥ जन्मनामाची परिपाठी ॥ भविष्य पुढील ॥१६॥
तयाचे पोटीं पुण्यपावनु ॥ पवित्रपणें राजा वेणू ॥ पुढें वत्सराज महाधनु ॥ वेणुपासोनियां ॥१७॥
वत्सराजाचा नरवाहन ॥ त्याचा क्षेमकु निधान ॥ त्याचे पोटी अजरायण ॥ पुण्यराशी ॥१८॥
अजरायणाचा विस्तारु ॥ कामरायण नामें कुमरु ॥ कामरायणाचा कुमरु ॥ कामधनु नामे ॥१९॥
कामधनूचा महाधनु ह्नणिजे ॥ त्याचा मायाविनाश सांगिजें ॥ मायाविनाशाचा जाणिजे ॥ शाकिकवधनु ॥ ॥२०॥
येथूनि सोमवंश पुरला ॥ तों द्वापरकाल आथिला ॥ तैं देवो विष्णु अवतरला ॥ अवतार दोनी ॥२१॥
येथें श्रोता दोषील ॥ कीं सांगीतलें जन्मेजयापुढील ॥ जे वंशाची वेल वाढेल ॥ भविष्य ऐसें ॥२२॥
जन्मेजयापासुनी ॥ राजे होतील ह्नाणवोनी ॥ तरी तें अनागत असोनी ॥ कळलें केवीं ॥२३॥
असो जेवीं शतकोटी रामायण ॥ तें अनागत भाकिलें जाण ॥ जें अन्यथा वाल्मीकिवचन ॥ नव्हेचि कीं ॥२४॥
तैसेंचि बोलिला वेदव्यास ॥ तो अन्यथा नव्हे सौरस ॥ भविष्योत्तरीं इतिहास ॥ भारता हा गा ॥२५॥
असो द्वापरयुगीं मनुष्यशक्ती ॥ सोळासहस्त्र भद्रजाती ॥ येका पुरुषासि उंच स्थिती ॥ सप्त ताल ॥२६॥
स्वधर्माचरें लोक वर्तुती ॥ पांचशतवर्षे आयुष्यगणती ॥ अभ्यंतरी वसे शांती ॥ प्राणिमात्रांचे ॥२७॥
तैं अठरासहस्त्र पडती ग्रहणें ॥ दानें देती आदरमानें ॥ नाहीं अपमान ब्राह्मणाकारणें ॥ थोरआदरें वर्तती ॥२८॥
पृथ्वी येकवेळां पेरिजे ॥ सप्तवेळा पीक घेइजे ॥ पुण्यवंत सकळ सहजें ॥ मेघवृष्टी यथाकाळी ॥२९॥
असो मग राहतां राहतां ॥ कोणेककाळीं गा भारत ॥ दैत्यभारें हे अनंता ॥ दाटली थोर ॥३०॥
ह्नणोनि सोमवंशा भीतरीं ॥ अवतरणें घडलें श्रीहरीं ॥ बंदिशाळेचिये अंचारीं ॥ कुशीं वसुदेवाचे ॥ ॥३१॥
देवकीउदरीं जन्मला ॥ आणि यशोदनें वाढविल ॥ तो विस्तार असे वर्णिला ॥ चतुर्थस्तबकी ॥३२॥
यानंतरें कलियुगींचा अवतार ॥ बौद्धरुपें शारंगधर ॥ तेथें पिता असे वसुतर ॥ आणि माता सावित्री ॥३३॥
त्रिगुणपणें गुरुठसा ॥ धरी निरुपम सर्वेशा ॥ दैत्य निर्दाळिले भरंवसा ॥ गयासुरादि ॥३४॥
तैं अशुद्धगत असती प्राणी ॥ गुप्त राहिले शारंगपाणी ॥ द्वापर सरलिया रिघ्रवणीं ॥ जाहली कलीची ॥३५॥
तंव बोलिला जन्मेजयो ॥ कीं सांगा जी पुढील अन्वयो ॥ तो कलियुगाचा उद्भवो ॥ जाणिजे कैसा ॥३६॥
तया कुलियुगाभीतर्रीं ॥ कीति अवतार घेत श्रीहरी ॥ राजे होतील ते सकळ परी ॥ सांगा मुने ॥३७॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ राया केला बरवा प्रश्न ॥ जेणें सुखिया होय मन ॥ वैष्णवाचें ॥३८॥
भाद्रपदद्य त्रयोदशी ॥ तिसरा प्रहर शुक्रवारेंसीं ॥ ते समयीं कलियुगासी ॥ जाहली रचना ॥३९॥
आतां त्या युगाचे भीतरीं ॥ धर्म लोपला निर्धारीं ॥ तो प्रत्यक्ष जनमात्री ॥ दिसत असे ॥४०॥
पुरुषासी उंच प्रमाण ॥ औटताल असे जाण ॥ अन्नमय सुखावे प्राण ॥ मैथुनीं काम नारीनरां ॥४१॥
नेमिलें असे आयुष्यगणित ॥ संवत्सर येक शत ॥ परि त्याहीमध्यें रोगग्रस्त ॥ असती प्राणी ॥४२॥
पापकर्म सदा आचरे ॥ आयुष्य न पुरतां प्राणी मरे ॥ पीक न पिके वसुंधरे ॥ कलियुगामाजी ॥४३॥
तये कलियुगाभीतरीं ॥ राजे कोण ते अवधारीं ॥ प्रथम राजा शुक्राचारी ॥ बोलिजे भारता ॥४४॥
शुक्राचार्याचा सुधर्मा ॥ त्याचा विश्वपति कर्मा ॥ विश्वपतीचा अंतिभीमा ॥ त्याचा अजपाळ तो ॥४५॥
तये अजपाळांचे कुळीं ॥ महाभद्रपाळ महीतळीं ॥ राज्य करील भूमंडळीं ॥ कलियुगामाजी ॥४६॥
महाभद्रपाळाचे पोटीं ॥ घनपाळ होईल जगजेठी ॥ त्याचिये वंशीं शेवटीं ॥ गंधर्वसेन तो ॥४७॥
गंधर्वसेनाचा विक्रम जाहला ॥ तो विक्रमंचरित्री विस्तारला ॥ त्याचिये उदरीं जन्मला ॥ मोक्षराज तो ॥४८॥
पुढें मोक्षराजापासुनी ॥ भोजराजा जाहला तेथुनी ॥ तेणें राज्य केलें मेदिनी ॥ येकुणचाळीस वर्षे पैं ॥४९॥
आणिक सात मास दिवस तीनी ॥ भोजे राज्य केलें मेदिनीं ॥ मग बैसला सिंहासनीं ॥ कृपाळ पुत्र ॥५०॥
तया पासोनि राज्यभार ॥ चालिला येकोणीस संवत्सर ॥ सात मास दिवस तीन निर्धार ॥ राज्य केलें ॥५१॥
तयापासोनि रामदेवो जाहला ॥ तेणें राज्यभार चालविला ॥ बारावरुषें नवमास घेतला ॥ राज्यभार ॥५२॥
मग रायाचें आयुष्य सरलें ॥ दिवस तीन असती उरले ॥ नंतरें राज्यीं बैसविलें ॥ गजाधिपतीसी ॥५३॥
तेणें भोगिले राज्याधिकारीं ॥ वरुषें दहा महिने चारी ॥ होतां दिवस दहा उपरी ॥ निमाला तो ॥५४॥
मग पृथ्वी रक्षी ऐसा नाहीं ॥ सोमवंश बुडाला पाहीं ॥ ययातीचा उःशाप नाहीं ॥ ह्नणोनि म्लेच्छ सरसावले ॥५५॥
पुरुपुत्राचा वडील बंधु ॥ तो म्लेच्छांचा होवोनि अगाधु ॥ राज्य करीतसे नवविधु ॥ म्लेच्छरुपें ॥५६॥
तंव आणिक पुसे जन्मेजयो ॥ कीं लोपलिया धर्माचा ठावो ॥ कलयुगीं अवतरला वासुदेवो ॥ कैशियापरी ॥५७॥
स्वधर्माचार लोपती ॥ ते कैसी भविष्य प्रतीती ॥ पुढील होणाराची स्थिती ॥ सांगा जी मुने ॥५८॥
मग ह्नणे मुनीश्वर ॥ राया पुससी अनांगत विचार ॥ तरी भविष्यकाळींचा विस्तार ॥ सांगों तुज ॥५९॥
भागीरथीयमुनासंगमीं ॥ त्रिवेणी मध्यवर्ती भूमी ॥ तेथें लग्न लागेल अनुक्रमीं ॥ ब्राह्मणमातंगिणीसी ॥६०॥
विद्याधरनामें सुब्राह्मण ॥ चारी वेद मुखोद्रत पूर्ण ॥ आचारशीळ जेवीं घन ॥ चौदा विद्या तयासी ॥६१॥
तो मातांगिणीतें पर्णील ॥ वेदमंत्री लग्न लागेल ॥ तेथें विष्णु अवतरेल ॥ अवतार दाहवा ॥६२॥
श्रावण शुद्ध षष्ठीदिनीं ॥ चित्रा नक्षत्र असतां जाणीं ॥ जन्मेल तृतीयप्रहरअवसानीं ॥ कांतिनगरामाजी ॥६३॥
वारुवा स्वार होईल ॥ समस्त अधर्मी संहारील ॥ सनातनधर्म स्थापील ॥ स्वशक्तिबळे ॥६४॥
तंव ह्नणे भारतरावो ॥ दहा अवतार जन्मला देवो ॥ त्या तिथिवारांचा उद्भवो ॥ सांगा जी मुने ॥६५॥
यानंतरें बोलिला मुनी ॥ कीं अश्विनशुद्ध दशमी दिनीं ॥ बौद्धरुपें शारंगपाणी ॥ धरी अवतार ॥६६॥
माता शंखावती पिता अवधूत ॥ तेथें अवतरला अनंत ॥ भक्तांकारणे मुक्तिपंथ ॥ दीधला देवें ॥६७॥
आतां कृतयुगीं प्रथम अवतार ॥ मत्स्यरुपी शारंगधर ॥ चैत्रशुद्ध तृतीया परिकर ॥ नक्षत्र रेवती ॥६८॥
तेथें पद्मावतीचे कुशी ॥ मत्स्यरुपें हषीकेशी ॥ नाम बोलिजे पितयासी ॥ गुप्ताभिघ ॥६९॥
आतां असो सर्वेश्वरा ॥ अवतार जाहला दूसरा ॥ वैशाख पौर्णिमा स्वाति नक्षत्रा ॥ जन्मले कूर्म ॥७०॥
चंद्रावतीचिये उदरीं ॥ कूर्म जन्मले अवधारीं ॥ तेथें पुरुरवा तो निर्धारी ॥ बोलिजे पिता ॥७१॥
आतां भाद्रपद शुद्ध तृतीया ॥ चित्रा नक्षत्र बोलिजे राया ॥ तीन घटी वर्तलिया ॥ अवतरले वराह ॥७२॥
तैं लीलावतीचिये पोटीं ॥ अवतरले जगजेठीं ॥ वराहरुपें दाढे सृष्टी ॥ धरितेजाहले ॥७३॥
शेवटीं वैशाखशुद्ध चतुर्दशी ॥ दिवस ना रात्री विशाखांसी ॥ नृसिंहरुपें भक्ततारावयासी ॥ हरि आला अंतरिक्षें ॥७४॥
पांचवा अवतार जाणिजे ॥ तो वामनप्रादुर्भाव ह्नणिजे ॥ त्रेतायुगाची साक्ष दीजे ॥ प्रथमपणें ॥७५॥
भाद्रपदशुद्ध द्वादशी ॥ श्रवणनक्षत्र संगमासी ॥ अदिती माता पिता वसुदेवेंसी ॥ गुरुवसिष्ठ ॥७६॥
साहवा अवतार गा भारता ॥ त्रेतायुगींचा दुजा सर्वथा ॥ रेणुका जमदग्नि माता पिता ॥ परशुराम रुपें ॥७७॥
तैं वैशाख शुद्ध तृतीया ॥ रोहिणी नक्षत्र सहा घडिया ॥ जन्मा आले सृष्टीसि या ॥ आद्यविष्णु ॥७८॥
आतां सूर्यवंशीं गा भारता ॥ श्रीराम जाहला दशरथा ॥ त्रेतींचा तृतीय अवतार माता ॥ कौसल्या ते ॥७९॥
चैत्रमास नवमी दोनप्रहरीं ॥ जन्म जाहलें पुष्यनक्षत्रीं ॥ सातवा अवतार रावणारी ॥ त्र्यंबकभंजन ॥८०॥
पुढें द्वापरयुगाभीतरी ॥ येकचि अवतरला कंसारी ॥ सोमवंशा माझारी ॥ श्रीकृष्ण तो ॥८१॥
श्रावणवद्य बुधाष्टमी ॥ रोहिणी नक्षत्र संगमीं ॥ रात्री अष्टघटिका नेमीं ॥ जन्मले उदरीं देवकीच्या ॥८२॥
देवकी ह्नणिजे माता ॥ आणि वसुदेव तो पिता ॥ तिथिनक्षत्र पुसिलें भारता ॥ तरी ऐशियापरी ॥८३॥
ऐसी हे दशावतारकथा ॥ भविष्योत्तरपुराणींची वार्ता ॥ कीं ऋषिवाक्यावांचूनि भारता ॥ न बोलावें ॥८४॥
यानंतरें ह्नणे नृपवर ॥ येक पुसणें जी विचार ॥ तरी कल्कीअवतार सर्वेश्वर ॥ हीनयोनीं कां जन्मला ॥८५॥
नवही अवतार सुलक्षण ॥ जन्मला असे नारायण ॥ आणि येथें हीनयोनींत अवतरण ॥ व्हावया कारण कायसें ॥८६॥
अहो मातंगीचिये उदरीं ॥ जन्म पावले श्रीहरी ॥ तरी पुण्याची तये सामुग्री ॥ काय होती ॥८७॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ राया तूं पूर्ण ज्ञानधन ॥ ह्नणोनि प्रश्न केलासि गहन ॥ तरी आता ऐक गा ॥८८॥
तरी कोणे येके वेळीं ॥ जाबाली नामें ऋषि भूमंडळी ॥ त्यासी कन्या जाहली निर्मळी ॥ आणि दोघे पुत्र ॥८९॥
ऋषीनें प्रसन्न करोनि चतुरानन ॥ पुत्र मागीतला होता सुगुण ॥ जो चौदाविद्या परिपूर्ण ॥ चौसष्टी कळां सहित ॥९०॥
तंव तयासि ह्नणे विधाता ॥ तुज कन्येसह दीधलें दोघां सुतां ॥ मग जाबाली आला त्वरिता ॥ आश्रमासी ॥९१॥
ऐसा असतां तो जाबाली ॥ यज्ञ करी भूमंडळीं ॥ पिकें दाटली महीतळी ॥ थोर आनंद जाहला ॥९२॥
यापरि सिद्धाश्रमीं असतां ॥ ऋषीच्या मृत्यु आला अवचिता ॥ समिधा आणाया दोघां सुतां ॥ पाठविलें होतें ॥९३॥
जवळी कन्या कामदुहिता ॥ होती तयेसि ह्नणे पिता ॥ कीं माझिये करींची मुद्रिका आतां ॥ काढीं कन्ये ॥९४॥
हिचें प्राशिलिया जीवन ॥ तिहीं लोकींचें होय ज्ञान ॥ आणि होय भविष्यज्ञान ॥ ब्रह्मवरदें ॥९५॥
तरी माझे आलिया कुमर ॥ त्यांसी द्यावी हे परिकर ॥ परि कन्येसि उपजला आदर ॥ त्या मुद्रिकेचा ॥९६॥
असो इतुकें बोलोनि पिता ॥ मुक्तीसि पावला तत्वता ॥ मग धरुनि राहिली प्रेता ॥ कामदुहिता ते ॥९७॥
मनीं विचारुनियां बोले ॥ स्वयें मुद्रिका घेतली ते वेळे ॥ प्राण गेलासे सायंकाळें ॥ तये ऋषीचा ॥९८॥
इतुक्यांत समिधा घेवोनी ॥ प्राप्त जाहले कुमर दोनी ॥ देखती पिता गेला मरणीं ॥ देवलोका ॥९९॥
परि भगिनी कामदुहिता ॥ वनीं रक्षीतसे प्रेता ॥ मग ते समिधा ठेवोनि तत्वतां ॥ प्रेता करिती संस्कार ॥१००॥
मार्गी जातां उतरिती ॥ क्षणैक विश्रांती प्रेता देती ॥ परि मुद्रिका न देखती ॥ दक्षिणकरींची ॥१॥
कामदुहितेसि पुसों लागलें ॥ कीं मुद्रिकेचे काय केलें ॥ येरी ह्नणे नाहीं कळलें ॥ बंधुवर्गा ॥२॥
ज्ञानीं पाहती जंव सुत ॥ तंव तिर्णेचि केली स्वाश्रित ॥ मग कोपोनि शाप देत ॥ तिये लार्गी ॥३॥
ह्नणती वो अपवित्रे येथ ॥ थोर घडलें तुज दुष्कृत ॥ आतां घेतल्यावांचोनि प्रायश्वित ॥ तूं पवित्र नव्हेसी ॥४॥
तरीं त्वां कलियुगा भीतरीं ॥ जावें मातंगिणीचे उदरीं ॥ जाहलीस थोर दुराचारी ॥ तरी हाचि दंड तुज ॥५॥
मग ते ह्नणे कुमारिका ॥ उःशाप द्या जी बंधुनायका ॥ तंव ते ह्नणती आइका ॥ उःशापवचन ॥६॥
कृत त्रेत आणि द्वापर ॥ तीनी युगें गेलियावर ॥ दाहवे अवतारीं श्रीकरधर ॥ येईल उदरीं तूझिये ॥७॥
कलियुग होईल सरतां ॥ आणि सत्ययुग लागतां ॥ तैं तूं उद्धरसी कामदुहिता ॥ सत्य बहिणीये ॥८॥
असो बंधुवर्गे शापिली ॥ ह्नणोनि कामदुहिता कोपली ॥ मग क्रोधरुपें बोलिली ॥ बंधुवांसी ॥९॥
ह्नणे वायां शापिलें मज ॥ तरी माझें घ्या शापबीज ॥ तुह्मी पक्षिरुपें सहज ॥ वर्ताल पृथ्वीवरी ॥११०॥
सहस्त्रवर्षे भरल्यावरी ॥ तारागण व्हाल अंबरीं ॥ तुमची जाती भूमीवरी ॥ राहील निरंतर ॥११॥
तुह्मां येरयेरांचा द्वेष ॥ धराल वैराचा सौरस ॥ येका बुद्धी येका संजीवनीप्रकाश ॥ होईल तुह्मां ॥१२॥
तये पक्षिरुपा भीतरीं ॥ थोर ज्ञान वसेल शरीरीं ॥ भविष्य सांगाल नरनारीं ॥ जगामाजी ॥१३॥
असो मग धाकुटा जाहला काग ॥ वडील पिंगळा सुरंग ॥ तयां सहस्त्रवर्षे भोग ॥ पक्षिरुपीं ॥१४॥
सहस्त्रवर्षे भरिल्यावरी ॥ काग जाहला शुक्राचारी ॥ आणि पिंगळा बोलिजे शरीरीं ॥ बृहस्पती तो ॥१५॥
येक जाहला देवगुरु ॥ दुजिया दैत्यांचा अधिकारु ॥ ह्नणोनि संजीवनीमंत्रु ॥ तयाकारणें ॥१६॥
ह्नणोनि काग आणि पिंगळा ॥ अद्यापि असे वैरमेळा ॥ ते शुक्र बृहस्पती भूपाळा ॥ हे वैरप्रचीती ॥१७॥
आतां असो कामदुहिता ॥ अदृश्य जाहली तत्वतां ॥ कांतिनगरीं गा भारता ॥ राहिली शापदग्ध ॥१८॥
तेचि मातंगीचे उदरीं ॥ कन्या उपजेल अवधारीं ॥ मग ते ऋषीची अंतुरी ॥ होईल राया ॥१९॥
तंव ह्नणे राजा भारत ॥ ऋषीसि मातंगी कायहेत ॥ पत्नी जाहली तो वृत्तांत ॥ सांगा स्वामी ॥१२०॥
मग ह्नणे वैशंपायन ॥ कोणीयेक धन्वा नामें ब्राह्मण ॥ तेणें प्रसन्न करोनि नारायण ॥ मागीतला पुत्र ॥२१॥
परि पुत्र नसे प्राक्तनीं तयाचे ॥ तप तरी विलया जाय कैंचें ॥ तंव वैष्णवीमाया बोलिली वाचे ॥ आद्यशक्ती ॥२२॥
कीं देवा तवसेवा जेणें कीजे ॥ ते निर्फळ केविं जाइजे ॥ ऐसें बोलतां आदिबीजें ॥ संतोषले हरी ॥२३॥
मग विष्णु ह्नणे गा मुनी ॥ आह्मां अवतरणे असे मेदिनीं ॥ कांतिनगरीं मातंगिणी ॥ तयेचे उदरीं ॥२४॥
ती वयसे प्राप्त जालियावरी ॥ तुवां जावें तिचिये घरीं ॥ पुढील भविष्य जाणोनि नारी ॥ ते तुवां वरिजे ॥२५॥
ते पूर्वील जाबलिऋषीची दुहिता ॥ शापदग्ध असे तत्वतां ॥ मजसी जाणें तेथें सर्वथा ॥ उःशापास्तव ॥२६॥
दहावा अवतार अवतरणें ॥ ह्नणोनि तिचे उदरासि जाणें ॥ तुज पुत्रभावें अवतरणें ॥ होईल प्राप्ती ॥२७॥
ऐसी प्रसन्नता जाणोनी ॥ धन्वा निघाला नमस्कारुनी ॥ तो आलासे निजभुवनीं ॥ साधूनि तप ॥२८॥
मग तो निमालिय काळसंकेतें ॥ विद्याधर नामें कांतिनगरीतें ॥ धनवा पावला जन्म तेथें ॥ महामुनी तो ॥२९॥
पुढें पितापुत्र कोणैककाळीं ॥ स्त्रानासि गेले यमुनाजळीं ॥ तंव तेथें खेळतसे बाळी ॥ मातंगिणीची ॥ ॥१३०॥
पांचां वरुषांची कुमारिका ॥ ऋषींसि ह्नने जी आइका ॥ स्त्राना जातां परि विशेषा ॥ नातुडे काळ ॥३१॥
ऐकोनि तटस्थ जाहले ऋषी ॥ कीं कळलें कैसें या बाळिकेसी ॥ मग पुसते जाहले तयेसी ॥ तूं कवणाची ह्नणवोनियां ॥३२॥
तंव ते ह्नणे मी मातंगिणी ॥ कैसें कळलें ह्नणती मुनी ॥ येरी ह्नणे देईन साधुनी ॥ सादृश्य विष्णुकाळ ॥ ॥३३॥
मग ते ऋषी तथास्तु ह्नणत ॥ आणि निघाले कुमारीसहित ॥ भागीरथीजळीं सुस्त्रान ॥ व्हावयालागीं ॥ ॥३४॥
तंव ते करीं अक्षता घेउनी ॥ ब्रह्मप्रयोग सांगे मातंगिणी ॥ तें आश्वर्य अंतःकरणीं ॥ वाटत असे ऋषीचे ॥॥३५॥
कालज्ञानें स्त्रान करितां ॥ वेळ साधला गा भारता ॥ मग देवासि अर्घ्य देतां ॥ विष्णुमूर्ती देखिली ॥३६॥
ऐसा काळ दीधला साधुनी ॥ आश्वर्य वाटलें ऋषीचें मनीं ॥ मग निघाले तेथोनि ॥ आश्रमाप्रती ॥३७॥
ते कन्या मागितली मातंगासी ॥ लग्न लाविलें स्वपुत्रासीं ॥ उदरा येतील हषीकेशी ॥ ह्नणवोनियां ॥३८॥
पुढें श्रीकलंकी अवतरेल ॥ येकत्र सकळ होईल ॥ धरणी पीक सांडील ॥ स्त्रिया परपुरुषी रमतील पैं ॥३९॥
मेघहीन नभ होईल ॥ पुरुषाचा काम जाईल ॥ राजा विश्वासघाता प्रवर्तेल ॥ प्रजाजनांसी सुख नाहीं ॥१४०॥
ब्राह्मण वेदांतें सांडिती ॥ क्रियाभ्रष्ट जन होती ॥ धर्माचार सकळ लोपती ॥ देव राहती अपूज्य ॥४१॥
ऐसा कलियुगकल्प भाव ॥ येकत्र होतील सर्व जीव ॥ कल्कीरुपें प्रकटेल देव ॥ तये काळीं ॥४२॥
हें भूगोलभविष्योत्तर पुराण ॥ साक्ष असे ऋषिवचन ॥ आतां ऐकिजे कारण ॥ अग्रकथेचें ॥४३॥
हा कथानामें कल्पतरु ॥ शास्त्रमतीचा विस्तारु ॥ नानामतांचा विचारु ॥ जन्मेजया गा ॥४४॥
सूर्यापासोनि विस्तारला ॥ ह्नणोनि सूर्यवंश बोलिला ॥ आणि चंद्रापासोनि उद्भवला ॥ तो सोमवंश ॥ ॥४६॥
ऐसी पुण्यपावन कथा ॥ तुज कथिली गा भारता ॥ श्रवणमात्रें महादुरितां ॥ होइजे नाश ॥४७॥
आतां असो हे भविष्यकथा ॥ पुण्यपावन असे तत्वतां ॥ ते ऐकिली सकळश्रोता ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥४८॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ सप्तमस्तबक मनोहरु ॥ कल्कीआख्यानप्रकारु ॥ चतुर्दशाऽध्यायीं कथियेला ॥१४९॥ ॥