॥ श्रीगणेशाय नमः ॥
रायासि ह्मणे वैशंपायनु ॥ भारता तूं अससी सर्वज्ञु ॥ तरी ऐकें साहवा मनु ॥ येकचित्तें ॥१॥
जळमय जेव्हा निराकार ॥ तेथें निद्रिस्थ ईश्वर ॥ मग सृष्टिरचनेचा विचार ॥ उपजला देवासी ॥२॥
आदिदेवाचे हुंकारापासूनी ॥ पवना जाहली उद्भवणी ॥ आणि पंचतत्वांची खाणी ॥ विस्तारली तेथें ॥३॥
हिरण्यगर्भ अंडवत ॥ माझी ब्रह्मा असे दैवत ॥ आणि अवयव होवोनि अकल्पित ॥ फुटलें अंड ॥४॥
तै चाक्षुष नामें मनूलागुन्ग ॥ प्रसवला हिरण्यगर्भ पवन ॥ मग विस्तार जाहला तेथून ॥ चंद्रसूर्याचा ॥५॥
जार मुरोनि जाहली सृष्टी ॥ आकाश बोलिजे हिरण्यगर्भ ऊर्ध्व कंवटी ॥ पाताळ ह्मणिजे तळवटीं ॥ खालिल संपुष्ट ॥६॥
मग रचिला स्वर्गलोक ॥ हें उपनिषदाचें वाक्य ॥ तरी तें ऐकें गा सम्यक ॥ भारता तूं ॥७॥
ब्रह्मलोक प्रजापती ॥ गंधर्व आणि देवस्थिती ॥ तारालोक निशापती ॥ आदित्यलोक ॥८॥
देवलोक आणि अंतरिक्षगती ॥ पितरलोक जाणिजे स्थिती ॥ समस्त लोक गा भूपती ॥ उदकावरी पैं ॥९॥
मग पुत्रप्रजा मानस ॥ ब्रह्म प्रसवला बहुवस ॥ तरी कोणते ते परियेस ॥ सांगों तुज ॥१०॥
राया ब्रह्याचे सुत ॥ ते ऐकें गा संकलित ॥ ऐसें वैशंपायन सांगत ॥ जन्मेजयाप्रती ॥११॥
मरीचि नारद आणि दक्ष ॥ अंत्रि अंगिरा कश्यप आणिक ॥ पुलस्थि पुलहक्रतु देख ॥ इत्यादि पैं ॥१२॥
कश्यपासी स्त्रिया तेरा ॥ त्या प्रसवल्या चराचरा ॥ आदिती प्रसवली सुरवरां ॥ ह्मणोनि आदितेय ते ॥१३॥
विनता प्रसवली पक्षिवरां कदू नागकूळ विखारां ॥ तयां कश्यपऋषीची दारा ॥ प्रसवलीसे ॥१४॥
गण गंधर्व यक्षकिन्नर साठीसहस्त्र ऋषीश्वर ॥ सकळही प्रजा परिकर ॥ जाहल्या ऐशा ॥१५॥
ऐसे साही मनु भारता ॥ पुढें ऐकें देवोनि चित्ता ॥ तरी सातव्या मनूची कथा ॥ ऐकें आतां ॥१६॥
जैं होता धुंधुकार ॥ तैं अंबुज निर्विकार ॥ नाहीं स्थळ निराधार ॥ अविनाश माया ॥१७॥
नाहीं आकाश परियेस ॥ नाहीं पाताळ ना कैलास ॥ नाहीं पंचतत्त्व प्रकाश ॥ तैं नीलवर्ण पूर्णब्रह्म ॥१८॥
नाही बुद्धि मन अहंकार ॥ चैतन्ये वीण नाहीं विकार ॥ तृष्णाधर्म कर्म व्यापार ॥ शास्त्र वेद तीर्थादी ॥१९॥
नाहीं उदयी रूप छाया ॥ वस्तु प्रपंच ना माया ॥ नव्हती वाचा परा मुक्ति राया ॥ ऐसें जेव्हां ॥२०॥
रायासि ह्मणे ऋषीश्वर ॥ तैं होता केवळ अंधकार ॥ तया नीलारंभीं परमेश्वर ॥ येकलाचि असे ॥२१॥
मग कितीयेक कल्प गोलियावरी ॥ जागृत जाहला श्रीहरी ॥ सृष्टि कीजे ऐसी उदरीं ॥ उपजली कल्पना ॥२२॥
कल्पने पासुनि होणार ॥ ते मनीषा प्रकटली साचार ॥ तंव नाभिकमळा अंकुर ॥ फुटला तयाचे ॥२३॥
आणि हिरण्यगर्भाचिये शिरीं ॥ भाळनयन देखिला दैत्यारी ॥ जो बोलिजे त्रिपुरारी ॥ पंचवक्त्र ॥२४॥
तो पंचवदन दशपाणी ॥ अर्धांगीं मिरवे भवानी ॥ पशुपति त्रिशूळपाणी ॥ विष्णुसहित ॥२५॥
ब्रह्मयाचे अर्धभागीं ॥ सावित्री असे अर्धांगीं ॥ आद्यविष्णु उभयवर्गीं ॥ लक्ष्मीसहित ॥२६॥
तंव ह्मणे जन्मेजयो ॥ पार्वतीसि पर्णीं महादेवो ॥ तरी वधूनिया दक्षरावो ॥ कैं पर्णिली ते ॥२७॥
मग ह्मणे वैशंपायनु ॥ कीं जे वर्तमानीं वैवस्वतमनु ॥ तेचि युगीं वर्तमानु ॥ जाहला हा खेळ ॥२८॥
परि ते दक्षाची कन्या निज ॥ अग्निकुंडीं निमाली सहज ॥ मगुती उपजली आदिबीज ॥ हिमाचळीं ते ॥२९॥
तेचि ब्रह्माचे चरित्रीं ॥ अंशरूपें जाहली सावित्री ॥ आणि तेचि मनूचिये अंतरीं ॥ शतरूपा पैं ॥३०॥
आतां असो हा मनु वैवस्वत ॥ जो संख्येमाजी होय सप्त ॥ तया सवें जाहले उदित ॥ चंद्रार्क पैं ॥३१॥
देवें छाया न्याहाळिली ॥ तंव मनुचंद्रादि आभासलीं ॥ ह्मणोनि आज्ञा देवें दीधली ॥ सृषिरचनेसी ॥३२॥
ऐसें आदिब्रह्म प्रसवलें ॥ तें सृष्टीनिर्माण जाहलें ॥ स्वर्ग पाताल निर्मिलें ॥ छाये पासूनी ॥३३॥
मागुती सवेंचि आठवा मनु ॥ तया प्रसवला नारायणु ॥ नामें बोलिजे सावर्णु ॥ आकारला तो ॥३४॥
प्रथम देवें रचिलें अवसर ॥ होऊंलागला विशून्य ॥ शून्य जाहलें महाशून्यापासून ॥ आकारली मेदिनी ॥३५॥
सृष्टिरचनेचा जाहला अवसर ॥ होऊंलागला विस्तार ॥ शून्यरूपें परमेश्वर ॥ भासला जगीं ॥३६॥
शून्य प्रसवलें निरालंबातें ॥ निरालंब अकल्पितातें ॥ ऐसा होय बहुकाळसंकेतें ॥ सृष्टिव्यापार ॥३७॥
निरालंबापासाव अंधकार ॥ अंधकाराचा आकार ॥ त्यापासाव चालक परमेश्वर ॥ व्यापरूपें ॥३८॥
अगोचर जाहला शक्तीचे पोटीं ॥ आलेखही तेथेंचि उठी ॥ आलेखापासूनि उठाउठी ॥ स्वधर्म ऐसे ॥३९॥
वायूतें प्रसवलें निरंजन ॥ तयापासूनि अमृतस्थान ॥ अमृतापासूनि प्रसवलें जाण ॥ निजरूप पैं ॥४०॥
जो आदिपुरुष परमेश्वर ॥ शांतिकारक मनोहर ॥ तोचि प्रसवला आकार ॥ ऐसियापरी ॥४१॥
आणी जो शुन्य निराकार ॥ तेथोनि त्रिवेणी विस्तार ॥ तोही जाहला परमेश्वर ॥ प्रसवता पैं ॥४२॥
प्रथम रचिला आदिधर्म ॥ बत्तीसकोटी विराट परम ॥ त्यचिया पादुका स्तोम ॥ पाताळलोक ॥४३॥
पाय असती पाताळें ॥ मृत्युलोक तीं कुंडलें ॥ आकाश ह्मणीजे ब्रह्मगोळें ॥ मागीलवास तो मेरू ॥४४॥
वैशंपायन ह्मणे भारता ॥ हे अध्यात्मकथा गूढ वार्ता ॥ परि लौकिकाचिया स्वार्था ॥ कथिली तुज ॥४५॥
जे दृश्य असे पिंडीं ॥ तेंचि जाणिजे ब्रह्मांडीं ॥ परि परिअमार्थियावांचोनि पाखांडी ॥ नातुडे कधीं ॥४६॥
तें तुज सांगतसें गुज ॥ जें अग्निपुराणींचें बीज ॥ तरी तें ऐकें गा सहज ॥ भारता तूं ॥४७॥
ब्रह्मांडावरी रचिलें सहस्त्रदळ ॥ तेंचि जाणावें आधारमूळ ॥ तयापासोनि जाहलें द्दिदळ ॥ अग्निचक्र तें ॥४८॥
तेंचि सर्वतेजांचें मुख ॥ परमात्मयाचें स्थान येक ॥ चंद्र बोलिजे तया सम्यक ॥ ज्ञानरूप तें ॥४९॥
चंद्र नसोनि आपतेज ॥ तेज जन्मलें मनीं बीज ॥ तया खाली सर्वदळ निज ॥ शिवस्थान पैं ॥५०॥
आणिक राया ऐकें कथा ॥ त्या सहस्त्रदलतळवटीं पाहतां ॥ देखिजे कीं अकल्पिता ॥ द्वादशदळ ॥५१॥
तेथें महाविष्णु क्षीरसागरीं ॥ शयन करी अहोरात्रीं ॥ तया खाली चतुःसहस्त्रीं ॥ जन्मला ब्रह्मा ॥५२॥
तेथें असे वायु उपजला ॥ तो द्वाद्श अंगुळें प्रवेशला ॥ स्वसामर्थें भेदला ॥ नासिकग्रीं ॥५३॥
तया खालीं दुर्धर्ष आथिला ॥ तया स्वाधिष्ठान असे बोला ॥ पृथ्वी रचाया ब्रह्मा मूळ जाहला ॥ तये स्थानीं ॥५४॥
प्रथम भूलोंक बोलिजे ॥ भुवर्लोक देव कीजे ॥ जनलोक आव्हानिजे ॥ आद्यपुरुष ॥५५॥
तयापासाव तपोलोक ॥ तयाखालीं शेषलोक ॥ तयाखालीं कूर्मलोक ॥ वराहलोक पाताळ ॥५६॥
आतां येकवीस स्वर्गीची गणना ॥ ते ऐकें राया सुजाणा ॥ तरी त्यांचिये सृष्टीची रचना ॥ सांगो तुज ॥५७॥
ते येकचि वर्मस्थानीं ॥ येकवीस स्वर्गीची निसणी ॥ तये वरुती अनुभवी ज्ञानी ॥ जाणती ते ॥५८॥
प्रथम स्थान तें श्रीहाट ॥ त्यावरी दुसरें उद्भट ॥ तिसरें असे गोल्हाट ॥ आणि औटपीठ तें ॥५९॥
तयावरी असे त्रिवेण ॥ तेचि अर्धपीठाची निश्रेणी ॥ अखंड चित्त तये भुवनीं ॥ असेंदि राया ॥६०॥
औटपीट भ्रमरगूफा जाण ॥ जेथें गुरुपादुका प्रमाण ॥ आठगिरी मेरु निर्माण ॥ सप्तपाताळेंसीं ॥६१॥
ऐसा सप्तही स्थानकें ॥ तीं रंधिली श्रीनायकें ॥ येवढें रचोनि आद्यपुरुषें ॥ सवेंचि दहन करूं आदरी ॥६२॥
तंव अनादिधर्म ह्मणे आदिपुरुषा ॥ तुह्मींच शरीर रचिलें देखा ॥ तरी मागुती दहनशकां ॥ असे कवणेगुणें ॥६३॥
मग ह्मणे सर्वेश्वर ॥ येक असे जी विचार ॥ म्यां रचाया त्रिभूवनभार ॥ आज्ञा तुज दीधली ॥६४॥
ऐसें अकल्पित अक्षर ॥ देवें देवोनि उत्तर ॥ तो मातापितासहोदर ॥ कर्मरहित पैं ॥६५॥
जैसा पुरुषाचा अंगमदु ॥ सर्व व्यापोनि अभेदु ॥ तैसा व्यापोनि भिन्नभेदु ॥ असे वेगळा तो ॥६६॥
कर्माकर्म करी संसारीं ॥ धर्माधर्म असे व्यापारीं ॥ उप्तत्ती पाळण आणि संहारी ॥ जगामध्यें ॥६७॥
कवणें पुष्पी वास घातला ॥ वनस्पतिसवें प्रकाशला ॥ कोठें स्वयेंचि संचरला ॥ स्वेदरूपें ॥६८॥
आपेंआप कर्म कार्या ॥ शोभावंत अंकुर माया ॥ अनादि अव्यक्त विलया ॥ करणें तयाचें ॥६९॥
असो हें बोलोनि आद्यपुरुष ॥ उत्तम देवोनि उपदेश ॥ सवेंचि वैष्णवीमायेस ॥ घातलें तयावरी ॥७०॥
मग अनादिधर्माचें भ्रमित मन ॥ अंशसार घेतला काढून ॥ आणि त्या कलेवरासि दहन ॥ करूं आदरिलें ॥७१॥
मग तया दहनपासूनी ॥ कवण जी जाहलीं मेदिनीं ॥ ती सकळ ऐकें श्रवणीं ॥ भारता तूं ॥७२॥
षट्चक्रांचिया देवता ॥ त्या बाहेर निघाल्या समस्ता ॥ मन चंद्र आणि सविता ॥ नक्षत्रादि ॥७३॥
मेद मांस सत्वाचा देहे ॥ त्याची छपन्नकोटी वसुंधरा हे ॥ आणि अष्टकुळाचळ पाहें ॥ असती नखें ॥७४॥
असृग्भूत रोमसार ॥ त्या वनस्पती साचार ॥ रोमावळी अठराभार ॥ जाहल्या पैं ॥७५॥
आतां नवकोटी ज्या तारा ॥ त्या आकाशीं पावल्या अंकुरा ॥ मस्तकींचिया केशभारां ॥ जाणिवपणें ॥७६॥
तंव ह्मणे जन्मेजयो ॥ एक फेडा जी संदेहो ॥ या सत्पसमुद्रांचा उद्भवो ॥ जाहला कैसा ॥७७॥
मग ह्मणे वैशंपायना ॥ राया तुं विचक्षण ॥ तरी पुसिले पुशीचा प्रश्न ॥ सांगों तुज ॥७८॥
ऐकें समुद्रांची उद्भवणी ॥ जळसमुद्र स्वेदापासुनी ॥ आणि नेत्र उदकापासूनी ॥ अमृतसमुद्र ॥७९॥
कल्पनेपासूनि उदधी ॥ तो नाभिजळ महोदधी ॥ आणी क्षारसमुद्राचा विधी ॥ मूत्रापासाव ॥८०॥
तया दहनाचिये पोटीं ॥ घृतसमुद्राची जाहली आटी ॥ तो सत्रावीच्या मूळदेंठीं ॥ जाहला राया ॥८१॥
आणिक ह्मणे ऋषीश्वरू ॥ ऐकें पुढील विचारू ॥ जें बोलिला व्यासगुरु ॥ मजप्रती गा ॥८२॥
गंगा यमुना सरस्वती ॥ हें अंतरीं वोध उतरते ॥ त्या इडापिंगळा बोलिजती ॥ ऋषिवरमतें ॥८३॥
अष्टांगीं नवशतें नाडी ॥ तया नवनवशतें उभवडी ॥ ऐसा विस्तार आखडी ॥ सवालक्ष परियेसा ॥८४॥
चौसष्टकळां पासूनी ॥ बोलिजे चौसष्ट योगिनी ॥ अध ऊर्ध्व दोहीं स्थानीं ॥ देव तेतीसकोटी ॥८५॥
कल्पना प्रसवली अंबरा ॥ तेणें आल्हाद सर्वेश्वरा ॥ भूस्थानीं अग्रेसरा ॥ जन्म विष्णूसी ॥८६॥
मुखापासोनि ब्राह्मण ॥ भूजांपासाव क्षत्रिय जाण ॥ वैश्य बोलिजे जघन्य ॥ शुन्य चरणीं ॥८७॥
पशु जन्मले इंद्रियांपासूनी ॥ भैरव जाहले कक्षस्थानीं ॥ आठकोटी कात्यायनी ॥ जन्मल्या तेथें ॥८८॥
मग ह्मणे वेदमूतीं ॥ राया ऐसी सृष्टीची उप्तत्ती ॥ तो आठवा मनू गा भूपती ॥ विस्तारलासे ॥८९॥
तंव आदिपुरुषाचे उदरी ॥ मार्कडेय फिरे भीतरीं ॥ जालिया उदकमय चराचरीं ॥ हिंडत असे ॥९०॥
देखे आवारु शिवाचा ॥ कैलासरूपें धवलाचा ॥ गणित फेरा बारा कोटींचा ॥ योजनें पैं ॥९१॥
सप्तपाताळांची गणना ॥ येकयेककोटी येक्या भुवना ॥ ऐसेचि येकवीस स्वर्ग जाणा ॥ तेंचि गणित ॥९२॥
माजी कैलस ह्मणिजे किती ॥ तया चारकोटींची गणती ॥ आणि मेरूतो जाणिजेती ॥ बत्तीसकोटी योजनें ॥९३॥
आणिक ह्मणे ऋषीश्वर ॥ येक अए जी तेथें स्थिर ॥ कैलासींचा राज्यधर ॥ शूळपाणी तो ॥९४॥
वैकुंठ आणि क्षीरसागरीं ॥ तेथें लक्ष्मीसहित मुरारी ॥ शेषशयनीं अहोरात्रीं ॥ सुखें निद्रिस्थ ॥९५॥
सत्यलोकीं सावित्रीसहित ॥ ब्रह्मा असे स्तुतिकरित ॥ आनंदसंतोषें खेळत ॥ निजभुवनीं तो ॥९६॥
यापरि सर्वहि नायक ॥ ब्रह्म विष्णु महेशादिक ॥ परि देखे ब्रह्मांडगोलक ॥ मार्कडेय मुनी ॥९७॥
हे माकैडेयपुराणींची वाचा ॥ ऐकें जन्मेजया साचा ॥ ॠषिवाक्यहुनि उंचनीचा ॥ न बोलवे मज ॥९८॥
ऋषिवाक्या वांचोनि बोलणें ॥ तें वांझस्त्रियेचें जणूं मिरवणें ॥ कीं मोह केलियाही कारणें ॥ व्यर्थ होय ॥९९॥
आणिक रायासि ह्मणे मुनी ॥ राया तूं नॄपशिरोमणी ॥ तरी आतां च्यारी खाणी ॥ ऐकें येकचित्तें ॥१००॥
जारज तैशीच भंडज आणी ॥ स्वेदज उद्भिज्ज चौथी खाणी ॥ यांचीं रूपें विस्तारूनी ॥ सांगतों राया ॥१॥
जीव जन्मती स्वेदापासूनी ॥ ते बोलिजे स्वेदजखाणी ॥ स्वेद गोठलिया गोठणीं ॥ ऐसें होय ॥२॥
आता नेत्र अस्थीं पासूनी ॥ दुजी बोलिजें अंडजखाणी ॥ जारज ते जरायुजवेष्टणीं ॥ जाणिजे पैं ॥३॥
उद्भिज्ज ह्मणिजे मेदिनी ॥ ते करणी साच जीवनीं ॥ आणिकक असे पांचवी खाणी ॥ ते सांगों तुज ॥४॥
जैं वर्षाकाळ ऋतु प्रकटे ॥ तैं मक्षिका गंधीसि विनटे ॥ मग तो किडाचुंचुचपेटें ॥ होय तिचें रूप ॥५॥
ऐसी चारखाणींची मात ॥ ऋषिमुखें ऐके भारत ॥ मुनि ह्मणे राया देई चित्त ॥ अग्रकथेसी ॥६॥
हे कल्पतरूची वाणी ॥ बोललों पाहोनि नानापुराणीं ॥ जडवेलें कीं रत्न कोंद्णीं ॥ ह्मणे कॄष्णयाज्ञवल्की ॥७॥
॥ इति श्रीकथाकल्पतरू ॥ सप्तमस्तबक मनोहरू ॥ मनुउत्पत्ति प्रळयप्रकारू ॥ तृतीयोऽध्यायीं कथियेला ॥१०८॥