ऐका ऐका सर्व जन । भावें भजा नारायण ॥१॥
जगीं तारक दुसरा । नाहीं नाहीं हो आसरा ॥२॥
स्नान संध्या टिळे टाळ । भक्ति विण व्यर्थ माळ ॥३॥
स्नेहें विण दीप जसा । भक्ति विण थाट तसा ॥४॥
बहुतां जन्मींचें सृक्रुत । हाता लागे नरपोत ॥५॥
तरा यावन्न विभिन्न । अंतीं पश्चात्तापें खिन्न ॥६॥
देह स्वस्थ ’रंग’ बरा । नाहीं आली जै हो जरा ॥७॥
आत्मसार्थक तैं करा । मुक्तिसुख शांति वरा ॥८॥