मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

पदें - ८२४१ ते ८२५०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८२४१॥
गजवदन सखा म्यां नमियला ॥ध्रु०॥
मुळारंभीं नाना रंभी । वाल्मिक वचनीं आणिला हो ॥१॥
शेष फणीवर मेरु भारी ॥ वाल्मिक संदेह फिटला हो ॥२॥
तुका ह्मणे ध्यातो त्याला । नाचत रंगणीं आला हो ॥३॥

॥८२४२॥
भक्तांसाठीं तो जगजेठी बसुन माळ्यावर । पाखरें उडवी सारंगधर ॥ध्रु०॥
भक्तांमध्यें भक्ति पाहा त्या बोधल्यानें केली । थोट ताटाला कणसें आलीं ॥
कैसा तो देव अनंत विठ्ठल अनंत रुपख्याली । कसी देव भक्तांची माउली ॥
त्याचें चरणा पासीं विनवूं जोडून दोन्ही कर ॥ पाखरें०॥१॥
नामदेवाशीं ह्मणती ब्राह्मण जात तुझी ओंगळ । निघ बाहेर करसी विटाळ ॥
गेला देउळामागें त्यानें केले दगडाचे टाळ । हरीनें फिरविलें देऊळ ॥
अगाध लीला त्याची द्वारका एका खांबावर ॥ पाखरे०॥२॥
जनाईच्या घरीं देवें भरल्या पाण्याच्या घागरी । चहूं हातांनीं रांजण भरी ॥
दळण कांडण धुणें धुवुनी पाटी डोईवरी । गवर्‍या वेंचून आणी घरीं ॥
प्रल्हादाला जेव्हां तारिलें जलद अग्नीवर ॥ पाखरें उडवी०॥३॥
चोख्यामेळ्याचें घरीं देवानें सोडिली द्वादशी । तेव्हां तें श्रुत झाले रायासीं ॥
नेलें पाचारुन रायें तेव्हां शिक्षा दिधली त्यासी । देवा तूं मार त्याचा खासी ॥
आगाध तुझी माव कळेना तुका ह्मणे जोडुनि कर ॥ पाखरें उडवी सारंगधर ॥४॥

॥८२४३॥
देखिलें स्वप्न । स्वप्नअवसरीं ॥ जणुका मी पंढरपुरीं ॥
करुन एक चित्त । चित्त सत्वर ॥ सोडिले प्रपंच घरदार ॥
मिळाले संत । संतांचे भार । हर्षलें मन माझें फार ॥
जाऊं संगातीं । हरीनाम गर्जताती ॥ विणा टाळ मृदंग वाजती ॥
वाजती झणकारी ॥ जणुका मी० ॥१॥
सहज मीं गेलों ॥ गेलों राउळाला ॥ पाहिला गरुड आणिला मेळा ॥
सभा मंडप । मंडप न्याहाळिला ॥ कर कटावरी ठेविला ॥
जगजेठी कैवारी ॥ जणु का मी पंढरपुरीं ॥२॥
वाहुनी तुळसी । तुळसी बुका माळा ॥ गंधाक्षता प्रेमळा ॥
दास विनवीतो दयाळा ॥ हरिनांव तुझें घेतां ॥
कधीं भेटसी रुक्मिणीकांता ॥ चरणावरि ठेवुनी माथा ।
तुकाराम तुला विनविता ॥ विनवितो वारंवारीं ।
जणु का मी पंढरपुरी ॥ देखिलें०॥३॥

॥८२४४॥
देहीं मठ बांधिला ज्याणें । योगीयानें ॥धृ०॥
आत्मा गोसावीं निर्गुण । त्याचे शिष्य पांच जण ।
पंचप्राण आणि उदान । करी जतन ॥१॥
दहा दरवाजे मठाला । दोनी दीपद्वारें त्याला ।
योगी बसले निरंजनाला । अग्नीच्या जळती ज्वाळा । तें पाहून ॥२॥
पाण्यामध्यें जळतें पाणीं । धन्य देवाची करणी ।
विरळा जाणे गुरुज्ञानी । देव पृथ्वीचा धनी ॥ करी पाळण ॥३॥
पाणी भरलें नाभीकमळीं । अंतर बाह्य धुनी चालली ।
गुरु पुत्रानें पाहिली । द्यावी सांगून ॥४॥
तुकाराम पुसे खूण । इतकें द्यावें मज सांगून ।
नाहीं तरिं करावे श्रवण । धरावें ध्यान ॥५॥

॥८२४५॥
सखी पुसे सखयेसी ॥ सद्गुरुची महिमा कैसी ॥
तें गुज सांगें मजपाशीं । सखये बाई ॥१॥
सद्गुरुराज दयाळ मोठा । तोडि अहंकाराच्या वाटा ॥
नेऊन बसवी मुळपीठा । सखयेबाई ॥२॥
कायावाचाचामनोभावें । सद्गुरुला शरण जावें ॥
आपुलें स्वहित विचारावें । सखयेबाई ॥३॥
तुका ह्मणे अहो बाई । ऐसें नवल सांगूं काई ॥
पुन्हा जन्ममरण नाहीं । सखयेबाई ॥४॥

॥८२४६॥
गांवावर एक बाभुळ । खालीं शेंडा वरती मूळ ॥
खालीं कळस वरदेउळ । गत आहे न्यारी ॥१॥
तमाशा संतांघरीं ॥ निर्गुणपुरी० ॥धृ०॥
फुला आधीं गुंफिला तुरा । याचा अर्थ करी चतुरा ॥
कोण सद्गुरुघरचा पुरा । असेल चतुर ॥
खोविल शिरीं ॥ तमाशा संतां०॥२॥
घोडा रोवून बांधिला खुंट । नगार्‍यावर चढविला उंट ॥
कोण सद्गुरुचा पुतळा असेल बळिवंत ।
अर्थ विचारी ॥ तमाशा सं०॥३॥
दिवावार्‍या घालितसे सेव । ह्याचा घ्याहो तुह्मीं अनुभव ॥
तुका वैकुंठिंचा राव । गत आहे न्यारी ॥ तमाशा संतांघरीं ॥४॥

॥८२४७॥
कलियुगीं विठ्ठलपद पहा ॥ध्रु०॥
शुकसनकादिक निशिदिनीं गाती । अष्ट दिशा दहा ॥ कलि० ॥१॥
हस्त कटी समचरण विटेवरी । अष्ट दिशा दहा ॥ कलि०॥२॥
तुका म्हणे पती जगासी । उद्धरी जडदेहा ॥ कलि०॥३॥

॥८२४८॥
कसीरे विट जोडली पुंडलीका ॥ मनीं धरुनियां निका ॥ध्रु०॥
मायबापाची सेवा करुनी ॥ विठ्ठल आणिला सखा ॥१॥
खांदीं कावडी वाहे पाणी ॥ एकनाथाचे फुका ॥२॥
भिमातिरीं रहिवास केला ॥ तुकीं उतरला तुका ॥३॥ कसिरे०॥

॥८२४९॥
पार्वतीवर नमिला म्यां शिव शंकर ॥ पार्वतीवर ॥ध्रु०॥
शंभू कैलासाशेखरीं । पार्वती आदिमाया सुंदरी ॥
बैसुनी शंकराचे शेजारी । तया विनवीत जोडूनीकर ॥ नमिला०॥१॥
गिरिजा पुसे शंकरासी । तरि मी काय होय तुह्मांसी ॥
शंकर ह्मणे माता होशी । मी तुझा कुमर ॥२॥
ऐकुनि बोललि गिरिजा । मी तरी तुमची आत्मजा ॥
तुम्ह्मी पिता शंभूराजा । माझें माहेर ॥३॥
बोलिला नंदी ते अवसरीं । ऐका ह्मणे त्रिपुरारी ॥
गिरिजा शंकराची अंतुरीं । तुह्मी भ्रतार ॥४॥
बोलिले मग स्वामी कार्तिक । नंदि तुह्मांसी काय ठाउक ॥
गिरिजा भाची बहिणीची लेंक । भाचरुं थोर ॥५॥
बोले वीरभद्र आपण । तुह्मी लबाड चौघेजण ॥
गिरिजा शंकराची बहीण । नातें साचार ॥६॥
ब्रह्मा विष्णु त्रिनयन । हे काय होती तिघेजण ॥
तुका ह्मणे द्यावें निवडून । तुह्मी चतुर ॥नमिला०॥७॥

॥८२५०॥
येथें कोणाचें काय बा गेलें । ज्याचें त्याणेंच अनहित केलें ॥ध्रु०॥
संतीं सांगितलें ऐकेना । स्वता बुद्धीही असेना ॥
वृत्ती निबरली पिकेना । मूढ कोणाचे ऐकेना ॥१॥
अन्य यातीचे संगती लागे । साधु जनामध्ये न वागे ॥
केल्यावीण पराक्रम सांगे । जेथेंचि सांगे तेथें भीक मागे ॥२॥
नीत टाकुनि अनीत चाले । भडभड भलतेंच बोले ॥
मंद होउनी उन्मत्त डोले । अखेर फार वाईट झालें ॥३॥
तुका ह्मणे कांहीं नेम । चित्तीं न धरी अधम ॥
सांग पडलासे भ्रम । अंतीं कुटील त्यासी यम ॥
येथें कोणाचे काय०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP